Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंद्रकांत पाटील म्हणतात तशी, शिवाजी महाराजांनी खरंच हिंदुत्वाची व्होटबॅंक तयार केली का?

Webdunia
गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (09:10 IST)
तुषार कुलकर्णी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची व्होटबॅंक तयार केली असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाचे नाव व्होटबॅंकेसारख्या राजकारणाशी जोडल्याबद्दल काँग्रेस नेते सचिन सावंत, शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
 
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले, "तिकीट पक्षाचं असतं त्यामुळे माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं, व्होटबँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते.
"ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला.
 
"ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडंसं उपयोगी पडतं. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे," असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, पण त्याच बरोबर इतिहासकारांनी देखील चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य हे शिवाजी महाराजांच्या व्यापक भूमिकेच्या संदर्भात विसंगत आहे अशी भावना व्यक्त केली आहे.
 
'हिंदवी स्वराज्याचा अर्थ केवळ हिंदूचेच स्वराज्य नाही'
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच होते केवळ हिंदूंचेच नाही असे मत इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केले.
 
"हिंदवी स्वराज्याचा अर्थ हिंदूंचेच स्वराज्य असा नव्हता. शिवाजी महाराज सर्व धर्मांचा आदर करणारे होते. या देशातील लोक, हिंदुस्थानात असणारे असा त्यामागचा अर्थ होता. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम सरदार होते, अनेक तुकड्यांमध्ये मुस्लीम सैन्य होते, त्यांचा पहिला सरनौबत नूर बेग हा मुस्लीम होता," असं पवार सांगतात.
 
"शिवाजी महाराजांनी कधीच म्हटले नाही की मी केवळ हिंदूंचाच राजा आहे. उलट त्यांनी औरंगजेबाला जे पत्र लिहिलं होतं त्यात त्यांनी औरंगजेबाला देखील म्हटलं होतं की ईश्वर सर्वांचा असतो.
 
"तेव्हा सर्वांना समान लेखूनच राज्यकारभार करावा. शिवाजी महाराजांसाठी त्यांचे राज्य महाराष्ट्र राज्य होते किंवा मराठा राज्य. याचा अर्थ धर्मवाचक किंवा जातीच्या संदर्भात नाही तर तो प्रदेशाच्या संदर्भात आहे," असं सांगतात.
 
'शिवाजी महाराज हे जगभरातील स्वातंत्र्यसैनिकांसाठी प्रेरणास्थान'
कोल्हापूर येथील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणतात की शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ एका धर्मापुरता किंवा जातीपुरता अडकवून ठेवणे अयोग्य आहे.
सावंत सांगतात, "शिवाजी महाराजांचे चरित्र वैश्विक स्वरूपाचे आहे. जगभरातील इतिहासकारांनी त्यांना स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान अशा अर्थानेच संबोधले आहे. जात, धर्म, देश अशा चौकटीत विचार न करता ऐतदेशीय लोकांचे राज्य असावे असी संकल्पना मांडणारा आणि प्रत्यक्षात आणणारा भूमीपुत्र अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे.
 
"आसाममधील आहोम साम्राज्यातील राजांनी देखील शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतल्याचे दाखले आहेत असं सावंत म्हणतात. शिवाजी महाराजांच्या दृष्टीने सिंधू नदी ते कावेरी या प्रांतातील लोक हिंदवी स्वराज्याचे घटक होते. त्याचा धर्माशी संबंध नव्हता," असं सावंत सांगतात.
 
'शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य'
विजय नगर व्हॉइसेस - एक्स्प्लोरिंग साउथ इंडियन हिस्टरी अॅंड हिंदू लिटरेचर या ग्रंथामध्ये विल्यम जॅक्सन यांनी म्हटले आहे की शिवाजी महाराजांनी 1645 साली हिंदवी स्वराज्य हा शब्द पहिल्यांदा वापरला.
 
हिंदवी स्वराज्याचा अर्थ परकीय सत्ताधाऱ्यांपासून मुक्तता, स्वतःचे राज्य असा होता असं या पुस्तकात म्हटले आहे. या पुस्तकात विल्फ्रेड कॅंटवेल स्मिथ यांच्या द क्रिस्टलाइजेशन ऑफ रिलिजिअस कम्युनिटी या पुस्तकाचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यात देखील हाच अर्थ असल्याचे जॅक्सन यांनी म्हटले आहे.
शिवाजी महाराजांचे धर्मविषयक आचरण आणि विचार काय होते याबाबत गोविंद पानसरे त्यांच्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकात म्हणतात,"शिवाजी धर्मच मानत नव्हता किंवा तो निधर्मी होता किंवा त्याने राज्य निधर्मी राज्य म्हणून घोषित केले होतं असा मात्र नाही.
 
"शिवाजी हिंदू होता. त्याची धर्मावर श्रद्धा होती. त्या श्रद्धेप्रमाणे तो वागत होता. देव-देवतांना आणि साधुसंतांना पूजत होता. धर्मासाठी व देवळांसाठी दान देत होता व खर्च करीत होता.
 
"पण तो इस्लाम धर्माच्या विरुद्ध होता काय? तो हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता, म्हणजे मुस्लीम धर्माचा द्वेष करीत होता काय? मुसलमानांचे हिंदूकरण किंवा महाराष्ट्रीयीकरण करण्याचा त्याचा इरादा वा प्रयत्न होता काय?
 
इतिहासाशी इमान राखून खरे बोलायचे, तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे 'नाही' अशी आहेत.
 
शिवाजी महाराजांचा आणि पेशव्यांचा हिंदू धर्म समान नव्हता असे देखील पानसरे सांगतात, 'शिवाजी महाराजांच्या काळात अस्पृश्य देखील किल्लेदार आणि मोठ्या पदांवर काम करत पण पेशव्यांच्या काळात अस्पृश्यांना हीन वागणूक मिळत असे असा उल्लेख पानसरेंनी केला आहे.'
 
शिवाजी महाराजांचे 'हिंदवी स्वराज्य' आणि सावरकरांचे 'हिंदुत्व'
शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य या संकल्पनेपाठीमागे हिंदू धर्माचे राज्य असा अर्थ नव्हता असं पानसरे आणि जयसिंग पवार यांनी म्हटल्याचे आपण पाहिले आहे.
पण शिवाजी महाराजांचे कार्यच मुळात हिंदुत्वाचे कार्य होते असे प्रतिपादन स्वा. विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या हिंदुत्व या पुस्तकात केले आहे.
 
ते सांगतात, "हिंदुत्वाची प्रक्रिया ही 40 हून अधिक शतके जुनी आहे. शालिवाहनापासून ते शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर आलेले बाजीराव पेशवे यांनी केलेले कार्य हे हिंदूपदपादशाही म्हणजेच हिंदूंचे साम्राज्य स्थापनेच्या दृष्टीने केलेले आहे."
 
'पाटील यांचे विधान त्यांच्या पक्षाच्या विचारधारेशीच विसंगत'
चंद्रकांत पाटील यांचे विधान हे त्यांच्या पक्षाच्या विचारधारेशीच विसंगत असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केले आहे.
 
"भाजपचे लोक नेहमी म्हणतात की आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यांसाठी लढतो पण हिंदू ही आमची व्होटबॅंक नाही."
"हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे त्यामुळे त्यासाठी लढणे स्वाभाविक आहे. व्होट बॅंक हे इतर पक्षांच्या राजकारणाशी निगडित असल्याचे भाजपने वेळोवेळी म्हटले आहे पण आता तर थेट आपण व्होट बॅंकेचे राजकारण करत आहोत अशी थेट कबुलीच चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे," असं देसाई यांना वाटतं.
 
"शिवाजी महाराजांबद्दल असे विधान करणे हे निषेधार्ह आहे. शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केले आहे. केवळ हिंदूंसाठीच केले नाही.
 
"त्यांच्या स्वराज्यातील प्रत्येक घटकाप्रती ते न्यायबुद्धीने वागले होते, व्होट बॅंकेबद्दल बोलून भाजपने स्वतःचाच पराभव केला आहे," असं देसाई सांगतात.
 
'शिवाजी महाराजांचे नाव वापरणे हा राजकारणाचा भाग'
शिवाजी महारांजाचे नाव वापरून भाजप राजकारण करू पाहत असल्याची शक्यता ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी व्यक्त केली आहे.
 
"शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष शिवाजी महाराजांचे नाव नेहमी घेताना दिसतात. पण अलीकडील काळात भाजपकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाजी महाराजांच्या मनात सामान्य मराठी मनांत आदराचे स्थान आहे.
"त्यांचे नाव ऐकताच सामान्य व्यक्तीचे धमण्यातील रक्तदेखील उसळते याच गोष्टीचा वापर आपल्या राजकारणासाठी करण्याचा हा प्रकार असू शकतो.
 
"शिवाजी महाराजांचे नाव वापरल्यामुळे जी काही मतं मिळतील ती पदरात पाडून घेण्यासाठी कदाचित अशा प्रकारची विधाने केली जात असावीत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अशा प्रकारे वापर करणे सामान्य मराठी माणसाला कधीच आवडणारे नाही," असं मत परब यांनी व्यक्त केले आहे.
 
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया आली आहे.
 
'शिवाजी महाराज रयतेचे राजे होते'
"भारतीय जनता पक्ष सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी करुन शिवरायांचा अवमान करत आहे," असे मत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मांडले.
 
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडून नरेंद्र मोदींनी त्यावर कळस केला आहे. भाजपा व चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
 
सावंत पुढे म्हणाले की, "शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचा हिंदवी स्वराज्य, हिंदुत्वाची व्होट बँक याच्याशी संबंध जोडून चंद्रकात पाटील यांनी 'तारे' तोडले आहेत.
 
'चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी' - सावंत
"भाजपाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कधीच आदर नव्हता. छत्रपतींचे राज्य हे भाजपा आरएसएसचे कधीच आदर्श नव्हते त्यांचा आदर्श पेशावाईच होता आणि आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ व विजय गोयल यांनीही यापूर्वी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी केली होती.
"आज के शिवाजी: नरेंद्र मोदी नावाचे पुस्तक भाजपानेच प्रकाशित केले होते. गोयल यांच्यावर अजून कारवाई केलेली नाही.
 
"चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान आक्षेपार्ह व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे असून त्याबद्दल महाराष्ट्राची जनता यांना कदापी माफ करणार नाही. भाजपा व चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे," असेही सावंत म्हणाले.
 
'चंद्रकांत पाटील म्हणतात त्यावरून भूमिका ठरत नाही' - राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
"चंद्रकांत पाटील काय म्हणतात त्यावर भूमिका ठरत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली का हे माहिती नाही, मात्र त्यांनी या देशातील सर्वांत पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं.
 
"छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार हिंदूहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्याआधी वीर सावकर यांनी महाराष्ट्रात आणि देशात रुजवला," असं संजय राऊत म्हणाले.
 
"महाराष्ट्रात किंवा देशात भाजपाच्या एखाद्या आमदाराला, खासदाराला हिंदू व्होट बँक या मुद्दयावर निवडणूक गमावावी लागली असं वाटत नाही. आम्ही लढलो, आम्ही जिंकलो. देशात हिंदू व्होट बँक आहे हा विचार सर्वांत प्रथम या देशात बाळासाहेब ठाकरेंनी मांडला. कोण कोणत्या भ्रमात आहेत माहिती नाही. पण या देशाची जनता बाळासाहेबांचं योगदान कधी विसरणार नाही," असं यावेळी ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments