Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाचा हॉटस्पॉट धारावी: महानगराच्या वेशीवर ठसठसणारा मिनी इंडिया

Webdunia
सोमवार, 20 एप्रिल 2020 (14:41 IST)
प्राजक्ता धुळप
मुंबईतल्या धारावीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. धारावीतल्या हॉटस्पॉटमध्ये हजारो लोकांची तपासणी करण्यात येतेय, अनेकांना क्वारंटाईन करण्यात येतंय. धारावीच्या वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन हात धुणं, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर याविषयी माहिती देण्यात येतेय.
 
धारावीमध्ये इतक्या वेगाने साथ का पसरतेय, याचं उत्तर तिथल्या लोकसंख्येसोबतच धारावीच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीत आहे. वाहती उघडी गटारं, अस्ताव्यस्त दाटीवाटीची वस्ती, गल्ली-बोळाच्या टोकावरची सार्वजनिक शौचालयं, काही तासच उपलब्ध असणारं पाणी, छोट्याश्या खोलीवजा घरात राहणारी चारपेक्षा जास्त माणसं यातून धारावीकरांचं निकृष्ठ दर्जाचं जीवनमान तयार झालंय, हे वास्तव सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने घातक समजलं जातं.
 
मुंबईतली जवळपास 42 टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत आहे, असं 2011च्या जनगणनेतून पुढे येतं. मुंबईतली धारावी गेली अनेक वर्ष आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी हे बिरूद बाळगून आहे. पण झोपडपट्टीचं पहिल्या क्रमांकाचं स्थान सिद्ध करणारे अधिकृत आकडे उपलब्ध नाहीत.
 
धारावीची लोकसंख्या खरंच 15 लाख?
धारावीच्या झोपडपट्टीत जवळपास 15 लाख लोक राहतात, असं म्हटलं जातं पण त्यालाही ठोस आकड्यांचा आधार नाही. जनगणनेत जी-उत्तर (दादर, माहीम, धारावी) या बीएमसीच्या वॉर्डमध्ये रहिवाश्यांची संख्या 3 लाख 85 हजारच्या आसपास आहे.
 
जागतिक स्तरावर काम करणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने धारावीत 10 लाख लोक राहतात आणि इथे वर्षाला 1 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 75 अब्ज रुपयांची आर्थिक उलाढाल होते अशी नोंद केलीये.
 
दाटीवाटीच्या या वस्तीत हजारो लहान-मोठे उद्योग मुंबई नावाच्या महानगरीच्या आणि बाजारातील गरजा अखंड रात्रंदिवस पूर्ण करत असतात. आकड्यांच्या या पार्श्वभूमीवर धारावीची बहुतांश वस्ती बेकायदेशीर आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. आणि तो अनेकदा विचारला गेला आहे.
 
धारावी मुंबईत अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. पश्चिमेकडे माहीम स्टेशन, पूर्वेकडे सायन स्टेशन आणि उत्तरेच्या दिशेला मिठी नदी यांच्या त्रिकोणी बेचकीत धारावी परिसर येतो. आज आपण ज्याला झोपडपट्टी म्हणतो ती धारावी वस्ती ब्रिटीशांच्या काळापासून अस्तित्वात होती. तेव्हा सात बेटांचं बॉम्बे शहर होतं. या परिसरात तटबंदी संरक्षित करण्यासाठी ब्रिटीशांनी 1737मध्ये धारावीत रेवा किल्ला बांधला. काळ्या दगडात बांधलेल्या या किल्ल्याला काळा किल्ला असंही म्हणतात. आजही या नावाचा बसस्टॉप आहे. तेव्हा धारावी मुंबईच्या वेशीवर होती.
 
धारावीचा इतिहास म्हणजे स्थलांतरितांची कहाणी
अठराव्या शतकाच्या सुरूवातीपासून बाँम्बेचा विस्तार होत गेला, तसतसा बेटांमध्ये खाड्यांलगत भराव टाकून शहराचा भूभाग विस्तारला गेला. '1909च्या गॅझेटिअर ऑफ बाँम्बे अँ आयलंड' या राजपत्रात शहरातल्या सहा कोळीवाड्यांच्या नोंदी आहेत. त्यात मिठी नदीच्या काठी वसलेल्या धारावीच्या कोळीवाड्याचा उल्लेख आहे. म्हणजे कोळी धारावीचे मूळनिवासी.
 
पण पुढे याच परिसरात 1884 साली ब्रिटीशांनी टॅनरिज म्हणजेच प्राण्यांच्या कातडीपासून बनवण्यात येणाऱ्या चामड्याचे कारखाने हलवले. त्याकाळी अस्पृश्य म्हणून अमानुष वागणूक मिळालेला ढोर समाज मेलेल्या जनावरांचं कातडी कमवण्याचं काम करी. हळूहळू इथे कारखाने वाढत गेले, तसे सातारा, सांगली भागातले दलित समाजातले लोक इथे कामासाठी स्थलांतर करून आले. तेव्हा वांद्र्याला कत्तलखाना होता.
 
धारावीत आज भारतातली छोटी छोटी खेडी वसली आहेत असं इथल्या गल्लीबोळातून फिरताना जाणवतं. इथल्या शहरात शतकापूर्वी आलेला तमिळनाडूमधला अदिद्रविड हा दलित समाज चामड्याच्या उद्योगाची आणि धारावीची स्थित्यंतरं सांगतो. तेव्हा टॅनरिजचे मालक मुस्लीम समाजातले असत.
 
गावाकुसाच्या वेशीवरील दलित वस्त्या
तमिळनाडूच्या शेलू शेट नावाच्या मुस्लीम व्यावसायिकाने आपली टॅनरिज सुरू केल्यावर आपल्या तिरुनेवेल्ली या जिल्ह्यातून आदिद्रविड या दलित समाजातील लोकांना कारखान्यावर काम करण्यासाठी आणलं. 19 व्या शतकात दुष्काळ आणि जातीय जाचाला कंटाळून अनेक लोकांनी मुंबईत स्थलांतर केलं असं इथले स्थानिक सांगतात.
 
'तेव्हा जवळपास 25 हजार लोकांनी इथे स्थलांतर केलं. आमच्या लोकांना इथे आल्यावर आझाद वाटलं. गावात अत्याचाराविरोधात संताप आला तरी लढणार कसं. इथे आम्हाला बोलायची कोणाची हिंमत नव्हती. कामच्या जीवावर आम्ही लढू शकत होतो. पुढे 120 वर्षांत आमच्या गावातली अनेक लोकं येत राहिली. काहींचं गावाशी नातं तुटलं. काहींनी इथेच आपलं गाव, संस्कृती वसवली.'- अदिद्रविड महाजन संघाचे सेक्रेटरी मरीभाई सांगतात.
 
'जेव्हा सुरूवातीला लोक कुटुंबांशिवाय इथे यायचे तेव्हा एकाच खोलीत पंधरा-वीसजण राहायचे. त्याला आम्ही पोंगल हाऊस म्हणत असू.'
 
आदिद्रविड समाजाने धारावीत आल्यावर सार्वजनिक गणपती बसवायला सुरूवात केली. 1915 साली गणपतीचं देऊळ बांधण्यासाठी त्यांना शेलूशेटने जागा दिली. त्याची कागदपत्र आजही त्यांच्याकडे आहेत. त्याचेच ऋण म्हणून गणपती विसर्जनाची मिरवणूक धारावीतल्या शेलूशेटच्या वंशजाच्या घराजवळ मान म्हणून थांबत असे.
 
खोपटीवजा खोलीतले छोटे कारखाने
धारावीतल्या टॅनरिजमध्ये गेल्या शतकभरात ढोर, चर्मकार, हराळे, कंकऱ्या, कैकट्या अशा जाती-पोटजाती महाराष्ट्रासह तमिळनाडू आणि कर्नाटकातून स्थलांतर करुन महानगरीत वसल्या. आंध्र प्रदेशमधून आलेला मडिगा समाजही इथे येऊन स्थिर झाला. टॅनरिजनंतर लेदरच्या बँग, पर्स, जॅकेट तयार करणारे कारखानेही आले. आणि इथला तयार माल निर्यात केला जाऊ लागला. आता त्यात पॉलिस्टर, रेक्झिन आणि नायलॉनच्या बॅग इंटस्ट्रीनेही शिरकाव केलाय.
 
वयाच्या 15 व्या वर्षी बिहारच्या सीताबडीमधून आलेला मोहम्मद एका लेदरच्या कारखान्यावर मजूर म्हणून काम करायचा. आज 25 वर्षांनतर तो एका छोट्या कारखान्याचा मालक आहे. त्याच्या कारखान्यातील 15 मजूर त्याच्याच गावातले आहेत. जिथे काम करतात त्याच खोलीत ते राहतात.
 
स्वातंत्र्यपूर्व काळात तमिळींमागोमाग सौराष्ट्रामध्ये दुष्काळ पडल्यावर कुंभार समाज मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाला. आज धारावीतला कुंभारवाडा प्रसिद्ध आहे. पावसाळा सोडला तर वर्षाचे नऊ महिने इथे काम सुरू असतं. काळानुसार इथल्या वस्तूंची मागणी कमी झाल्याने अनेकजण इतर वेगवेगळ्या व्यवसायात काम करतात.
 
एकेकाळी मुंबईत सूतगिरण्या तेजीत होत्या, तेव्हापासून टेक्सटाईल उद्योगाच्या गारमेंट्सच्या व्यवसायाने धारावीत बस्तान बसवलं. खास करून शर्ट्स बनवण्याची छोटी-छोटी युनिट्स इथे सुरू झाली. वीस बाय वीसच्या खोलीत बारा ते पंधरा शिलाई-मशिन्स, काही अद्ययावत यंत्रही असतात. अनेक बड्या कंपन्या इथून शर्ट्स खरेदी करतात, असं इथले व्यवसाय मालक सांगतात.
 
एम्ब्रॉयडरी व्यवसायालाही इथे एकेकाळी बरकत होती. जरीकामात इथल्या अनेक कारागिरांचा हातखंडा आहे. बिहारी आणि बंगाली मुस्लीम या झरदोसी एम्ब्रॉडरीच्य़ा व्यवसायात अधिक दिसतात.
 
देवनारच्या आधी धारावीत डंपिंग ग्राऊंड होतं. त्यानिमित्ताने मिठी नदीच्या काठावर मोठा भरावही टाकला गेला. कचरा डेपो हलवल्यावर तिथे झोपड्यांनी आपलं बस्तान बसवलं. त्याआधीच तिथे भंगार वेचून प्लॅस्टिकचा व्यवसाय सुरू झाला होता. शहरात वापरलं जाणारं प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी इथून कारखान्यांना पुरवलं जातं. हा व्यवसाय धारावीतला सर्वात घातक व्यवसाय समजला जातो. हातात येणाऱ्या प्लॅस्टिकमध्ये कोणतं रसायन असतं याचा अंदाजही इथल्या मजूरांना नसतो.
 
धारावीतील रहिवाश्यांना आरोग्याच्या घातक समस्यांना तोंड द्यावं लागतं. 2006 साली मिठी नदीच्या पुरानंतर साथीच्या आजाराने थैमान घातलं होतं. याशिवाय टीबीचं प्रमाणही धारावीत लक्षणीय आहे. मायक्रोबॅक्टेरिअम ट्यूबरक्लॉसिसच्या संसर्गामुळे होणारा टीबी रोग कोंदट वातावरणातल्या राहणीमान, निकृष्ट आणि अपुऱ्या आहारामुळे होतो. त्यातही ड्रग रेझिस्टंट टीबीचं इतर झोपडपट्ट्यांप्रमाणे इथेही आढळतं.
 
धारावीत काय मिळत नाही?
धारावीत ज्या वस्तूचं उत्पादन होतं ते बाजारातल्या मागणीनुसारच. बांद्राकडून सायनकडे रस्त्यावरून जाताना कल्पनाही येत नाही की धारावीत लाखो छोट्या-मोठ्या व्यवसायांचे कारखाने आहेत. '90 फिट रोड' आणि '60 फिट रोड' काटकोनात छेदतात. त्या रस्त्यावर फेरफटका मारला तरी तिथल्या फॅक्टरीज पाहून आपण अवाक होतो.
 
मुंबईतल्या अनेक भागात मागणीनुसार टनावरती इडली-चटणी बनवण्याची युनिट्स आहेत. बेकरीसोबतच मिठाई, चॉकलेट, लाडू, चिवडा, फरसाण, बिस्किटं, चिक्कीचे कारखाने आहेत. ही युनिट्स अंधाऱ्या खोल्याच आहेत.
 
ऑस्करविजेत्या 'स्लमडॉग मिलेनिअर'नंतर धारावी म्हणजे गरिबीचं 'लाईव्ह' प्रदर्शन म्हणून दाखवलं जाऊ लागलं. परदेशी पर्यटकांनी पसंती दर्शवलेल्या ठिकाणांच्या यादीत धारावीच्या टूरचा नंबर ताजमहालच्याही वर होता. गेल्या दहा वर्षांमध्ये धारावी टूर मॅनेजर्स आणि गाईड्स हजारो पर्यटकांना इथे धारावी दर्शनासाठी आणतात.
 
मुंबई महानगरपालिकेच्या नोंदीत धारावीत साधारण कोणत्या जाती धर्मातील लोक काम करतात त्याची माहिती मिळते. आदिद्रविड, नाडर, थेवर या तमिळ, महाराष्ट्रातला चर्मकार समाज, भटक्या-विमुक्तांमधील कोंचिकोरवे ही माकडवाली जमात, उत्तर प्रदेशमधल्या बरेलवी आणि देवबंदी या मुस्लीम पोटजाती, बिहार-पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचे मुस्लीम, कर्नाटक गुलबर्ग्याचा गोंधळी समाज (भांडीवाले), राजस्थानचे मारवाडी भाषिक, केरळमधून आलेले हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन, हरयाणातली वाल्मिक समाजातील लोकांनी धारावीत गेल्या 136 वर्षांमध्ये स्थलांतर केलं. भारतातल्या गावांमधल्या वेशीवरची गावं आज धारावीने सामावून घेतली आहेत.
 
मूळनिवासी असलेले हिंदू आणि ख्रिश्चन समाजातले कोळी मात्र आज धारावीत जवळपास दोन टक्के असल्याचं महानगरपालिकेच्या आकडेवारीत आढळतं. या सगळ्या समुहांनी आपापली सामाजिक आणि सांस्कृतीक ओळख जपलीये. धारावीत तीसहून अधिक मशिदी, पन्नासहून अधिक मंदिरं आणि सहा चर्च आहेत. 1850मधलं चर्च, बडी मशिद 1887 आणि गणेश मंदिर 1913 साली बांधलं गेलं.
 
इथल्या स्थलांतरित माणसांची नोंद मुंबई महानगरपालिकेकडे आहे, पण भारतीय जनगणनेतून लाखो स्थलांतरितांचा आकडा गायब दिसतो.
 
धारावीच्या विकासाचं भिजत घोंगडं
महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा, मंजुरी आणि पुनर्विकास कायद्यानुसार 1971 साली धारावीला झोपडपट्टी म्हणून मान्यता मिळाली. तेव्हा धारावीची लोकसंख्या 1 लाख 28 हजारच्या आसपास होती. पुढे 1981 साली धारावीचा विकास आराखडा तयार झाला. 1984 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी धारावीच्या विकासासाठी 100 कोटी रुपये मंजूर केले. त्यातील एक तृतियांश निधी निवास आणि पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात आले.
 
पुढे एसआरए अंतर्गत धारावीच्या योजना आल्या आणि गेल्या. काही ठिकाणी पुनर्वसन करत बिल्डिंग, अपार्टमेंट्सही ही उभ्या राहिल्या.
 
जागतिक किर्तीचा मॅगसेसे पुरस्कार विजेते जोकीन अरपुथम यांनी जवळपास तीन दशकं धारावीतल्या गरिबीच्या प्रश्नावर काम केलं. दारिद्र्यरेषेखालील लोकांचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या 'स्लमड्वेलर्स इंटरनॅशनल' या संस्थेने इथल्या पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने झोपडपट्टीतील लोकांच्या मदतीने लहान घरं आणि साधारण 20 हजार सार्वजनिक शौचालयं बांधली. पण शहर नियोजनाच्या अभावामुळे सर्वत्र धारावीत पायाभूत सुविधा काही प्रमाणातच सुस्थितीत असल्याचं दिसतं.
 
पालिकेच्या अखत्यारितील अनेक शौचालयं पाण्याअभावी अस्वच्छ राहतात, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
 
गेल्या 46 वर्षांमध्ये धारावीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली, असं धारावीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊ कोरडे म्हणतात. आज नव्वदीत असलेल्या भाऊ कोरडेंनी आपल्या बालपणापासून धारावीची जडणघडण बघितली आहे. 'काही धारावीवासियांनी पुनर्वसनाच्या प्रक्रियेत इमानेइतबारे घरं बांधून घेतली. पण अनेकांनी पुनर्वसनाच्या प्रक्रियेत अमाप पैसे मिळवून देणारी गुंतवणूक म्हणून पाहिलं.'
 
धारावीला आतापर्यंत तीन मोठे धक्के बसल्याचं भाऊ कोरडे सांगतात. 1993 सालची हिंदू-मुस्लीम दंगल, 2006 साली मुंबईत आलेला महापूर आणि 2016 साली मोदी सरकारने केलेली नोटबंदी. त्यातून धक्के पचवत धारावी सुरुच राहिली.
 
कोरोनाचा सामना कसा करणार?
धारावीतली लोकसंख्येची सर्वाधीक डेन्सिटी म्हणजेच घनता बहुतांशी दुमजली घरांमध्ये आहे. सरासरी 100 चौरस फुट क्षेत्रफळाच्या घरात पाच ते आठ जणांचं कुटुंब असल्याने तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही, त्यामुळे भाग सील केल्याने कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याचं रहिवाश्यांचं म्हणणं आहे.
 
Image copyrightGETTY IMAGES
प्रतिमा मथळा
धारावी
धारावी पुनर्विकास समितीने मुंबईचे आयुक्त प्रवीण परदेशी यांना पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी कोव्हिड-19चा सामना करण्यासाठी धारावीकरांना नेमकं काय हवंय याविषयी मागणी केली आहे. धारावीतले 80 टक्के लोक सार्वजनिक शौचालय वापरतात, त्यामुळे तिथे 24 तास पाणी, साबण आणि सॅनिटायझरची सोय करावी. धारावीतल्या पॅरामेडिकल स्टाफच्या सगळ्या हेल्थ पोस्ट सुरू कराव्यात, धारावीत आलेल्या परराज्यातील स्थलांतरित मजूरांसाठी ताबडतोब धान्य उपलब्ध करून द्यावं अशा मागण्या पत्रकात आहेत. धारावी पुनर्विकास समितीचे पदाधिकारी अॅडव्होकेट राजेंद्र कोरडे सांगतात- 'आज इथला विकास झाला असता आणि नियोजनबद्ध धारावी उभी राहिली असती तर कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रशासनाला सोपं गेलं असतं.'
 
धारावीतल्या नियोजनातील त्रूटी
 
टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसच्या हॅबिटाट सेंटरच्या डीन प्रा. अमिता भिडे आजच्या धारावीच्या परिस्थितीवर आणखी प्रकाश टाकतात.
 
'धारावीतले दोष कोरोना व्हायरसच्या निमत्ताने उघड होत आहेत. शहरातल्या झोपडपट्ट्यांना नेहमीच दुर्लक्षित केलं गेलंय. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही झोपडपट्टीवासीयांना दुय्यम नागरिकत्व दिलं गेलंय. इथे राहणारे लोक बेकायदेशीरपणे राहतायत आणि ते शहरावरचा बोजा आहे, असा शिक्का त्यांच्यावर मारला गेला. जिथे कायदेशीरपणे लोकांना परवडेल अशा किंमतीत राहणं आणि श्रमाचा मोबदला दिला जात नाही अशा वेळी झोपडपट्टी तयार होणारच. नियोजन नसल्यामुळेच लोकांनी स्वतःच्या सोयीने झोपडपट्ट्या उभारल्या. धारावीच्या बाबतीत तर लोकसंख्या, व्यवसाय, आर्थिक उलाढाल याविषयी सरकारकडे अतिशय तुटक माहिती उपलब्ध आहेत.'
 
धारावीच्या या परिस्थितीत सध्या सरकार अवलंबत असलेल्या दृष्टीकोनावर त्या आपलं मत नोंदवतात. 'धारावीत अनेक लोक सार्वजनिक शौचालय वापरतात. पालिकेकडे अनेकांनी वैयक्तिक शौचालय बांधण्याची परवानगी मागणारे अर्ज केले आहेत. पण सरकारने त्या कायद्याच्या दृष्टीकोनातून पाहिल्याने त्याची पूर्तता झालेली नाही.
 
चाळ किंवा घरात लोकांना क्वारंटाईन केल्याने प्रश्न मिटणार नाहीत असं त्या म्हणतात. धारावीत घर या संकल्पनेत त्यांच्या घराबाहेरची जागाही वावरण्यासाठी असते. त्यामुळे सील करण्यासारखे उपाय इथे परिणामकारक ठरतील का ते पाहावं लागेल.' क्वारंटाईनमुळे लोकं आपल्याच वस्तीतल्या लोकांना सामाजिक बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे, असंही त्या म्हणतात. कोरोना हा काही दिवसांचा प्रश्न नसेल. काही तातडीचे त्याचबरोबर काही दूरगामी विचारही यानिमित्ताने करण्याची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
आज असंघटित क्षेत्रातली अस्ताव्यस्त धारावी आणखी एक वेगळं संकट घेऊन आली आहे. इथे जाती-धर्मान आणि गरिबीने पिचलेले लोक राहतात. पोटाची खळगी भरायला स्थलांतरित मजूर येतात. वेगाने धावणाऱ्या या आर्थिक राजधानीवर जेव्हा संकट कोसळतं आणि त्याचा सामना केला जातो तेव्हा मुंबईच्या स्पिरिटविषयी बोललं जातं. पण धारावीची भळभळती जखम मुंबईच्या स्पिरिटमधून गायब असते. कोरोनाच्या संकटाच्या निमित्ताने ही जखम पुन्हा ठसठसतेय...

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments