Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवेंद्र फडणवीस: महाविकास आघाडीमुळे भाजपची महाराष्ट्रातील 'स्पेस' वाढेल का?

Webdunia
मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (16:28 IST)
'महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी एकत्र लढल्यास, ते सगळ्यात मोठी 'स्पेस' भाजपसाठी मोकळी करत आहेत. भाजप ती 'स्पेस' व्यापल्याशिवाय राहणार नाही.'
 
हे वक्तव्य आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचं. नाशिकमधील माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजपप्रवेशावेळी ते बोलत होते.
 
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुका महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्ष (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) एकत्रित सामोरे गेले. त्यात महाविकास आघाडीला 6 पैकी 5 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर अजित पवार, अनिल परब अशा अनेक वरिष्ठ नेत्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचे संकेत दिले होते.
 
शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले होते, "महाराष्ट्रात यापुढे महाविकास आघाडी एकत्र लढल्यास दुसऱ्या कोणत्याच पक्षाला जागा राहणार नाही. या निवडणुकीत तीनही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढले आणि हे त्याचेच यश आहे. तीन पक्षांचे झेंडे जरी वेगवेगळे असले तरी अजेंडा मात्र एकच आहे."
त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आगामी निवडणुकांना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित सामोरं जाण्याची शक्यता बळावली असतानाच, देवेंद्र फडणवीस यांनी मात्र याचा भाजपला फायदाच होईल, असं म्हटलंय.
 
महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष आगामी महापालिका किंवा इतर सर्वच निवडणुका एकत्रित लढल्यास भाजपला महाराष्ट्रात 'स्पेस' निर्माण करता येईल का? या प्रश्नाचं उत्तर आपण या बातमीतून जाणून घेऊच. तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले, हे पाहू.
 
ते तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास भाजपला 'स्पेस' मिळेल - फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आता हे तिन्ही पक्ष सांगतात, एकत्र लढू. त्यांनी जरूर एकत्र लढलं पाहिजे. माझी तर इच्छाच आहे. कारण एकत्रित लढल्याने एखादा तात्कालिक फायदा त्यांना होईल. मात्र, तीन पक्ष एकत्रित आल्यानं जी राजकीय स्पेस असते. त्या स्पेसमध्ये किती लोक मावतील? हे सुद्धा महत्त्वाचं असतं. दोनच पक्ष त्या राजकीय स्पेसमध्ये मावणं कठीण जातं, हे तिघे एकत्र येण्याचं बोलत आहेत. याचा अर्थ, त्यातली सगळ्यांत मोठी स्पेस ते भाजपसाठी मोकळी करत आहेत. भाजप ती स्पेस व्यापल्याशिवाय राहणार नाही."
 
"देशाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा भाजपला कॉर्नर केलं गेलं, तेव्हा भाजप स्वबळावर उभा राहिला. राजस्थान असो वा कर्नाटक या राज्यांमध्ये भाजपला बाजूला ठेवलं गेलं, पण ती स्पेश भाजपनं व्यापली आणि आज तिथे मोठा पक्ष झाला. त्यामुळे या तीन पक्षांनी आपल्याला संधी दिलीय," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसंच, ही राजकीय स्पेस, राजकीय पोकळी व्यापून महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर सत्ता आणणारा पक्ष आपल्याला बनवायचा आहे, असं आवाहनही फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केलं.
 
यात दोन-तीन प्रश्न उपस्थित होतात. अशी काही स्पेस निर्माण झालीय का, झाली असल्यास ती भाजपला घेता येईला का इत्यादी बरेच प्रश्न आहेत. आपण या प्रश्नांचा आढावा घेऊया.
 
'कुठल्याही सत्तेवेळी विरोधी स्पेस तयार होतेच'
महाराष्ट्रातील किंवा कुठल्याही सत्तेवेळी अशी स्पेस तयार होतच असते, असं वरिष्ठ पत्रकार संदीप प्रधान म्हणतात.
 
याबद्दल अधिक विस्तृतपणे सांगताना प्रधान म्हणतात, "तीन पक्ष एकत्र आल्यामुळे जशी एक ताकद निर्माण होते, तशीच सरकारच्या विरोधातही जनभावना तयार होत जाते. ती कशी, तर सरकारला आता एक वर्ष पूर्ण झालंय, आता त्यांना आपलं काम दाखवावं लागेल. अन्यथा, मग नाराजी वाढत जाईल आणि त्यातून एक जनभावना तयार होईल. त्याचा फायदा विरोधातील पक्षाला, आजच्या घडीला भाजपला होईल. या स्पेसबद्दल फडणवीस बोलत असतील तर ते बरोबर आहे."
"जेव्हा आता कधी निवडणुका येतील, तेव्हा राज्यातील सत्तेत हे तीन पक्ष असल्यानं त्यांच्या निर्णयांविरोधातली जी भावना असेल, ती आपल्या फायद्याची ठरेल, असा भाजपचा कयास असू शकतो. ती स्पेस त्यांना मिळू शकते, पण कधी, तर ते त्या स्पेससाठी योग्य लढले तरच," असं संदीप प्रधान सांगतात.
 
अर्थात, अशी स्पेस मिळू न देणं हे लोकाभिमुख निर्णय घेऊन महाविकास आघाडीच्या हातात आहे, असंही ते नमूद करतात.
 
मात्र, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांना अशी कुठलीच शक्यता वाटत नाही. त्या म्हणतात की, "काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असल्यानं कुठलीही स्पेस निर्माण होण्याची शक्यताच दिसत नाही."
 
'आघाडी 15 वर्षे सत्तेत होती, मग तेव्हा स्पेस कुठं गेली होती?'
याबद्दल सांगताना राही भिडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आधीच्या 15 वर्षांच्या कार्यकाळाचं उदाहरण देतात.
 
त्या सांगतात, "आधी 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. विशेषत: 1995-99 हे युतीचं सरकार गेल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली, तेव्हा सत्ता स्थापन करताना एकूण 8 पक्ष सहभागी झाले होते. तेव्हा प्रचंड रुसवे-फुगवे होत असत, पण ते सरकार त्यांनी चालवून दाखवलं.
 
"एकवेळ अशी आली की, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना कळत नसे की कुणासाठी काय करायचं. मला आठवतंय, विलासरावांना विचारलं होतं, सत्तेतलेच नेते टीका करतात, तर तुमचं नेमकं चाललं कसं आहे? तर ते म्हणाले होते, 'काय करू मी या आठ जणांचं?' पण ते सरकार पूर्ण टिकलं. किंबहुना, नंतरही दोनदा सरकार आलं."
हे उदाहरण देऊन राही भिडे सांगतात की, "याचा अर्थ आठ पक्षांचं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सर्व रुसवे-फुगवे सांभाळून टिकलं, पुढेही दोनदा सरकार आलं, याचा अर्थ त्यांनी विरोधकांची स्पेसच निर्माण होऊ दिली नाही."
 
"आलेली सत्ता टिकवण्याची कसब काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे चांगली आहे, त्यामुळे स्पेस निर्माण होण्याची शक्यता फार कमी दिसते," असंही भिडे म्हणतात.
 
पण प्रश्न उरतोच की, जर विरोधाची स्पेस व्यापून त्याचा फायदा भाजपला करून घ्यायचा असेल, तर नेमक्या कुठल्या गोष्टी कराव्या लागतील?
 
'भाजपकडे या तीन जमेच्या गोष्टी'
तर याबाबत बोलताना संदीप प्रधान म्हणतात, "महाराष्ट्रात विरोधी पक्षात केवळ भाजप नाहीय. इतरही पक्ष आहेत. पण भाजपकडे तीन गोष्टी जमेच्या आहेत. त्या म्हणजे, संघटनात्मकदृष्ट्या असलेली ताकद, अनुभवी नेत्यांची फौज आणि केंद्रातील मोदींचा पाठिंबा. या तीन गोष्टी पाहता विरोधातली स्पेस भाजपला फायद्याची ठरू शकते."
 
मात्र, त्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत राहणं, हे आव्हान असल्याचं प्रधान सांगतात. किंबहुना, "महाविकास आघाडीमुळे निर्माण झालेली राजकीय स्पेस मिळवल्यास स्वत:च्या ताकदीवर सरकार स्थापन करू," हे फडणवीसांचं विधान तोच मनोबल वाढवण्याचा प्रकार आहे.
याचं कारण सांगतान प्रधान म्हणतात, "पुणे आणि नागपूरसारखे विधानपरिषदेचे गड सुद्धा भाजपनं गमावले. यामुळे भाजप कार्यकर्ता काहीसा निराश झालाय. त्यांचं कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावणं भाजपसमोर आव्हान आहे."
 
"आता जेव्हा कधी महाराष्ट्रात निवडणुका होतील, तेव्हा मोदींचा करिष्मा किती आहे, भाजप कार्यकर्त्याचं मनोबल किती टिकून आहे आणि विरोधी पक्ष म्हणून किती काम केलंय, यावरून लोक मतं देण्याचं ठरवतील. त्यामुळे आता विरोधात काम करणं आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं ह भाजपसमोरची मार्ग आहेत," असंही ते नमूद करतात.
 
शिवाय, भाजपनं लोकसभेला प्रचंड मतं मिळवली असतानाही काही महिन्यातच महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेला एकटं लढण्याऐवजी शिवसेनेला सोबत घेतलं होतं.
 
या गोष्टीचा दाखला देत प्रधान सांगतात, "भाजपला महाराष्ट्रात युतीची गरज वाटली, याचा अर्थ त्यांना अपेक्षित ताकद अजून महाराष्ट्रात नाही आणि विरोधात असताना ती ताकद मिळवणं ही संधी आहे, हे खरंच आहे."
 
विरोधकांमध्ये भाजपइतका संघटनेच्या दृष्टीने खमका दुसरा पक्ष नसल्याने भाजपाल बंडखोरांचा फायदा होण्याची आशा आहे का, असाही प्रश्न उद्भवतो. पण मुळात महाविकास आघाडीत बंडखोरी वाढेल का, हाही प्रश्न आहे.
 
बंडखोरांचा भाजपला किती फायदा?
तर यावर काही दिवसांपूर्वीच आम्ही ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याशी बातचीत केली होती.
 
विजय चोरमारे यांच्या मते, "एकाच पक्षाचे मुळात चार-पाच जण तयारी करत असतात. मग तिन्ही पक्षांचे चार-चार पकडले, तर त्यातून एक उमेदवार निवडणं प्रॅक्टिकली शक्य नाही."
लोकमतच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने म्हणतात, तिन्ही पक्ष एकत्र आल्यास बंडखोरांची ताकदही कमकुवत होईल.
 
"शहरानिहाय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची स्वतंत्र ताकद असली, तरी महाविकास आघाडीच्या एक फॉर्म्युला लक्षात आलाय की, तिन्ही पक्ष एकत्र आल्यास बंडखोरांचा त्रास होणार नाही. कारण स्पर्धाच असमतोल होऊन जाते. तीन मोठे पक्ष एकत्र असणं ही महाविकास आघाडीची बंडखोरीच्या समस्येबाबत जमेची बाजू आहे," असं श्रीमंत माने म्हणतात.
 
मात्र वरिष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर यांना वाटतं, "बंडखोरांचा फटका बसेल. किंबहुना, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत जाईल, तर तिसरा गट हा बंडखोरांचा आहे. कारण बंडखोर आपली ताकद सोडणार नाही. त्यामुळे यापुढच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढल्यास दुरंगीऐवजी तिरंगीच होतील."
 
मात्र, राही भिडे म्हणतात, "भाजपला पक्षवाढीसाठी महाराष्ट्रात फार कठीण आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून लक्षात येईल की, सुशिक्षित लोकही भाजपला नाकारत आहेत."
 
अशावेळी बंडखोरीचे प्रमाणही फारसे दिसणार नसल्याचं राही भिडे यांचं मत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख
Show comments