Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

न्यूझीलंड कोरोना व्हायरसमुक्त ; जनजीवन सुरळीतपणे सुरू

Webdunia
मंगळवार, 9 जून 2020 (12:31 IST)
न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याचं पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी जाहीर केले. याबरोबरंच सर्व निर्बंध उठवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या जवळपास 200 देशांमध्ये लॉकडाऊन वेगवेगळ्या स्वरुपात अजूनही लागू असताना न्यूझीलंडने मात्र सर्व प्रकारचे निर्बंध उठवले आहेत. देशात कोव्हिड-19 आजाराचा एकही रुग्ण न आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
न्यूझीलंडमध्ये यापुढे सोशल डिस्टंसिंग पाळण्याची गरज नाही. तसंच सार्वजनिक कार्यक्रमांनाही पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. परदेशी नागरिकांसाठी देशाच्या सीमा मात्र अजूनही बंद असतील.
 
न्यूझीलंडमध्ये गेल्या दोन आठवड्यात एकही कोव्हिड पॉझिटिव्ह केस आढळलेली नाही. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
देशात कोव्हिड-19 चा एकही अॅक्टिव्ह रुग्ण नसल्याची बातमी कळली तेव्हा मी आनंदाने नाचले, असं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन म्हणाल्या.
 
त्या म्हणाल्या, "आपण सुरक्षित आणि मजबूत स्थितीत असलो तरी कोव्हिडपूर्व आयुष्याकडे परतण्याचा मार्ग सोपा नाही. मात्र, ज्या दृढनिश्चयाने आपण आरोग्य संकटाचा सामना केला आता तोच दृढनिश्चय आपल्याला आर्थिक पुर्नबांधणीसाठी करावा लागणार आहे."
 
त्या पुढे म्हणाल्या, "आपलं काम पूर्ण झालं नसलं तरी हा एक मैलाचा दगड आहे, हे नाकारता येत नाही."
 
'सातत्यपूर्ण प्रयत्न'
कोरोना विषाणूची लागण होण्याचं प्रमाण वाढू लागण्यानंतर न्यूझिलंडने त्याचा सामना करण्यासाठी एक नवी चार स्तरीय अलर्ट यंत्रणा म्हणजेच सतर्कतेचा इशारा देणारी यंत्रणा स्थापन केली.
 
परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता वेगवेगळ्या टप्प्याचे अलर्ट जारी करण्यात आले. न्यूझीलंडमध्ये 25 मार्चपासून लॉकडाऊन जारी करण्यात आला. त्यावेळी परिस्थिती अतिशय चिंताजनक असल्याने चौथ्या टप्प्याचा अलर्ट घोषित करण्यात आला होता. यात बहुतांश सर्व उद्योग-व्यवसाय, शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आणि नागरिकांनी घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
 
यानंतर जवळपास पाच आठवड्यांनंतर एप्रिल महिन्यात परिस्थिती थोडी अवाक्यात आल्यानंतर तिसऱ्या टप्प्याचा अलर्ट घोषित करण्यात आला. यात टेक-अवे फूडची दुकानं खुली करण्यात आली. अत्यावश्यक नसणारी काही दुकानंही उघडण्याची परवानगी देण्यात आली.
 
त्यानंतर जसजशी कोव्हिड-19 रुग्णांची संख्या कमी होऊ लागली न्यूझीलंडने आणखी एक पातळी खाली येत मे महिन्याच्या मध्यात दुसऱ्या टप्प्यातील अलर्ट घोषित केला.
 
यानंतर परिस्थितीचा अंदाज घेत 22 जून रोजी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची सूचना देणारा पहिल्या टप्प्याचा अलर्ट घोषित करण्याचा सरकारचा विचार होता. मात्र, तब्बल 17 दिवस एकही नवीन कोरोनाग्रस्त न आढळल्याने सरकारने नियोजित तारखेच्या आधीच पहिल्या टप्प्याचा अलर्ट घोषित केला.
 
नव्या नियमांनुसार सर्व शाळा आणि कार्यालयं आता उघडता येतील. लग्नसोहळे, अंत्यसंस्कार आणि सार्वजनिक वाहतूक याठिकाणी कुठलेही निर्बंध नसतील. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं बंधन नसणार. मात्र, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ते पाळावं, अशी अपेक्षा आहे.
 
देशाच्या सीमा मात्र परदेशी प्रवाशांसाठी अजूनही खुल्या करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, परदेशातू मायदेशात येऊ इच्छिणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांना देशात परतण्याची मुभा असेल. मायदेशात परतल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन राहण्याची अट मात्र पाळावी लागणार आहे.
 
न्यूझिलंडने सर्व निर्बंध उठवले असले तरी याचा अर्थ न्यूझीलंडमधून कोव्हिड-19 चं पूर्णपणे निर्मुलन झालं असा होत नाही आणि कोरोनाच्या केसेस यापुढे येतील. तेव्हा त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असेल, असंही पंतप्रधान ऑर्डन यांनी म्हटलं आहे.
 
न्यूझीलंडमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत देशात 1154 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर 22 जणांचा कोव्हिड-19 ने मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या साथीविरोधात न्यूझीलंडने केलेल्या प्रयत्नांचं जगभरात कौतुक झालं आहे.
 
पंतप्रधानांच्या घोषणेनंतर संपूर्ण न्यूझीलंडमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ऑकलँडमध्ये ट्रक ड्रायव्हर असलेले पॅट्रिक वेस्टन बीबीसीशी बोलताना म्हणाले, "प्रत्येकाला आनंद झाला आहे. अखेर आम्ही या संकटातून बाहेर पडलो. असं असलं तरीही साशंकता कायम आहे."
 
"मला वाटतं यावेळी सर्वांना सर्वाधिक काळजी अर्थव्यवस्थेची आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत आणि आता एवढ्या मोठ्या संख्येने लोक कामाच्या शोधात आहेत."
 
"(मंगळवारी) सर्व निर्बंध उठवण्यात आले आणि आता आम्ही पूर्वीसारखं नॉर्मल आयुष्य जगू शकतो. कुठल्याही निर्बंधांशिवाय संगिताचे कार्यक्रम होऊ शकतील, क्रीडा स्पर्धा होऊ शकतील. लोकांनी स्वतःहून सोशल डिस्टन्सिंग पाळावं, अशी अपेक्षा बाळगली जात आहे आणि मला वाटतं एवढा समंजसपणा लोक दाखवतील."
 
"आम्ही खूप आनंदी आहोत. मात्र, भविष्याची काळजीही आहे."

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments