Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे पाऊस : कुत्र्याला वाचवण्यासाठी गेलेल्या 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

pune rain
Webdunia
- हलिमाबी कुरेशी
पुण्यात पावसाने थैमान घातलं आहे. कालची रात्र कशी गेली याबद्दल पुण्याच्या नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पावसाने कुणाची सून नेली तर कुणाचा मुलगा नेला.
 
पण यासारखी हृदयद्रावक घटना आम्ही पाहिली नव्हती असं पुण्यातल्या पावसाच्या साक्षीदारांनी सांगितलं. आपल्या लाडक्या कुत्र्याला वाचवण्यासाठी 16 वर्षांचा रोहित घरात गेला आणि त्याने आपले प्राण गमावले असं त्याचे वडील भरत आमले यांनी सांगितलं.
 
रोहित हा त्याच्या आजी आजोबांसोबत सहकारनगरातील अरण्येश्वर भागातल्या टांगेवाल कॉलनीत राहत होता. तो दहावीच्या वर्गात होता. पाऊस सुरू झाल्यानंतर त्याने आधी आपल्या आजी-आजोबांना घराबाहेर सुखरूप काढलं आणि त्यानंतर तो त्याच्या पाळीव कुत्र्याला आणण्यासाठी गेला. पावसाचा जोर वाढत होता. त्यामुळे त्याच्या अंगावर भिंत कोसळली आणि त्यात रोहितचा जीव गेल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं.
 
रोहित हा अभ्यासात हुशार होता आणि इथल्या विद्याविकास शाळेत तो 10वीत शिकत होता असं त्याचे आजोबा विठ्ठल शिंदे यांनी सांगितलं.
 
रोहित यांच्या कुटुंबीयांप्रमाणेच अनेकांसाठी कालची रात्र ही काळरात्र ठरली. एका रात्रीत पावसानं होत्याचं नव्हतं करून झालं, असं पुण्यातल्या विजया भिवाजी राणे आजी सांगत होत्या. त्यांच्या सुनेचा नाका-तोंडात पाणी शिरल्यानं मृत्यू झाला आहे.
 
या दुःखानं हवालदिल झालेल्या आजी रात्रभर घराबाहेर गारठ्यात बसून आहेत.
 
भरल्या डोळ्यानं त्या सांगत होत्या, "आधी घरात थोडंसं पाणी आलं. त्यामुळं आम्ही कुठं बाहेर पडलो नाही. पण अचानक पाणी शिरलं आणि आम्ही बाहेर धावलो. पाणी डोक्यावरून जात होतं. माझ्या सुनेच्या नाका-तोंडात पाणी गेलं आणि क्षणात सगळं संपलंच.''
 
नेहमीसारखा पाऊस पडतोय, असं वाटून पुणेकर बुधवारी रात्री आपापल्या घरात निवांत झोपलेले होते. पण थोड्याच वेळात पावसाने खूप नुकसान केलं.. परतीच्या पावसाला सुरुवात झाली आणि काही तासातच रस्त्यांवर तळी साचली, ओढ्यांना पूर आला.
 
सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. एनडीआरएफ आणि अग्निशामन दलाला सुरुवातीस दोन मृतदेह सापडले होते आणि यानंतर मृतांचा आकडा अकरावर गेला आहे. पाण्याचा प्रचंड मोठा लोट आल्यानं अनेक लोक चाळीत आणि सोसायट्यांमधल्या घरांमध्ये अडकून पडले.
 
सगळ्यांनांच परिस्थितीचा अंदाज आला आणि लोकांनी मदत करायला सुरुवात केली. संतोष कदमसुद्धा या मदतकार्यात सहभागी झाले होते. ओढ्यालगतच्या वस्तीत त्यांचे नातेवाईक राहात होते. ते त्यांना मदत करत होते. तिथल्या घरांमध्ये काही महिला अडकल्याचे कळताच, ते पुन्हा एकदा बचावकार्यासाठी गेले.
 
तिथून परतत असताना पाण्याच्या लोटामुळे एका कंपाउंडची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष कदम रिक्षाचालक होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
'ढोलाच्या दोऱ्या काढल्या आणि वाचवलं'
एका बाजूला ओढा आणि दुसऱ्या बाजूने चढावर असलेल्या सोसायट्यांजवळून वाहत येणारं पाणी यामुळे अनेकजण घरात अडकून पडले होते. बाहेर पडायला एकाच गल्लीतून रस्ता असल्यानं बचाव कार्य करायला देखील अडथळे होते.
 
घरातून सुटका झालेले सूरज आव्हाड त्यांचा अनुभव सांगत होते, ''पाऊस पडतच होता. रात्री आधी नुसते लाइट गेले. नेहमीसारखंच होतं सगलं. पण अचानकच पाण्याचा लोंढा आला. इतका जोरात की भिंती कोसळल्या. आमच्या भागातली मुलं पत्र्यावरून चढून लोकांना वाचवत होती. ही मुलं अग्निशामन दलाकडे दोऱ्या मागत होती. पण त्यांच्याकडे माणसं नसल्याचं कारण दलाकडून मिळत होतं. शेवटी आमच्या गल्लीतल्या पोरांनी ढोलाच्या दोऱ्या काढल्या आणि आम्हाला वाचवलं. आमची घरं पार धुवून निघालीत. काहीही शिल्लक राहिलेलं नाही,'' घशातला आवंढा गिळत आव्हाड माहिती देत होते.
 
ओढ्यालगत राहणाऱ्या यमुनाबाई शिंदेसुद्धा त्यांचा भीतीदायक अनुभव विषद केला. रात्री आधी घोट्याइतकं पाणी आत शिरलं. परंतु ओढ्यालगत राहात असल्यानं तेवढं पाणी नेहमीच येत असतं, असा विचार त्यांच्या कुटुंबियांनी केला. परंतु काही वेळातच पाणी वाढू लागलं आणि काही क्षणात गळ्यापर्यंत पाणी जाऊ लागलं. त्यांच्या सहा ते सात घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांनी घराबाहेर धाव घेतली. शेजाऱ्यांच्या दारावर थाप मारत त्यांचे कुटुंबिय बाहेर आले. सगळ्या घरांमध्ये पाणी शिरलं आणि घर सगळं धुवून गेलं. अनेक लोकं आत अडकल्यानं मुलं छपरावरचे पत्रे काढून त्यांना वाचवत होती, असंही शिंदेंनी सांगितलं.
 
पानशेत पूरग्रस्तांना या भागात विस्थापित करण्यात आल होतं. 1995 साली या वसाहतीतील अर्ध्या लोकांना इमारतीमध्ये घर मिळाली होती. ज्यांना घरं मिळालेली नाहीत अशी 50 ते 70 कुटुंब ओढ्याजवळ राहात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments