राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांच्यावर एन्डोस्कोपी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढील आठ-दहा आणखी एक शस्त्रक्रिया करून त्यांचे गॉलब्लॅडर (पित्ताशय) काढण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. हे काढल्यामुळे शरद पवार यांच्या दैनंदिन व्यवहारांवर कुठलाही परिणाम होणार नाही असं देखील टोपे म्हणाले.
"शरद पवारांची एन्डोस्कोपी झाली. पित्ताशयातून खडा काढण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या पोटात दुखत होतं. आता त्यांची तब्येत चांगली आहे. पित्ताशय काढून टाकण्यासंदर्भात विचार सुरू आहे. असं केल्याने त्यांच्या आयुष्यावर परिणाम होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. पित्ताशय काढून टाकण्यासंदर्भात शस्त्रक्रिया येत्या दहा दिवसात होऊ शकते",असं टोपे यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "विश्रांतीच्या कारणास्तव त्यांना चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आल्यानंतरही त्यांना काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल. राज्यातील नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की शरद पवार यांची प्रकृती व्यवस्थित असून, चिंता करण्याचं कारण नाही".
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा वर्तमानपत्र वाचतानाचा फोटो शेअर केला आहे.
काल संध्याकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. तत्पूर्वी 30 मार्च रोजी दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता.
त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर पवारांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर मंगळवारीच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.
दरम्यान शरद पवार यांना 31 मार्च ऐवजी 30 मार्च रोजीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली होती.
नवाब मलिक यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली की, "कृपया लक्ष द्या, आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना एन्डोस्कोपी आणि सर्जरीसाठी उद्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणं अपेक्षित होतं, मात्र त्यांच्या पोटात दुखू लागल्यानं आजच त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे."
28 मार्चलाही पवारांना केलं होतं हॉस्पिटलमध्ये दाखल
शरद पवारांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे रविवारी, 28 मार्चला संध्याकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होतं. मात्र, तपासणीनंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं.
त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी 29 मार्चला ट्वीट करून माहिती दिली होती की, "कृपया लक्ष द्या. आमचे नेते शरद पवार साहेब यांना पोटात दुखत असल्यामुळे काल रात्री ब्रीच कँडीमध्ये तपासणीसाठी दाखल केलं. तपासणीनंतर लक्षात आलं की त्यांना पित्ताशयासंबंधी त्रास होतो आहे."
शरद पवार यांच्यावर एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल अशीही माहिती त्यांनी दिली होती. पवारांना रक्त पातळ करण्याची औषधं सुरू होती तीही थांबवली गेली असल्याचं मलिकांनी सांगितलं.
शरद पवारांचे सगळे कार्यक्रम पुढच्या सूचनेपर्यंत स्थगित केले गेले आहेत.
शरद पवार-अमित शाह यांच्या कथित भेटीची चर्चा राज्यात होत असतानाच्या पार्श्वभूमीवर आता ही बातमी आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त बैठक झाल्याची बातमी दैनिक दिव्य भास्करने प्रकाशित केली होती.
अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर त्यांच्यात भेट झाल्याची चर्चा होती.
अमित शहा आणि शरद पवार यांची 'कथित' भेट
"देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट झाल्याचं गुजराती वृत्तपत्रात छापून आलं. राष्ट्रवादी काँग्रेसने अशी भेट झाल्याचं नाकारलं आहे. मात्र अमित शहांनी या वृत्ताचा इन्कार केला नाही. सगळ्या राजकीय गोष्टी सार्वजनिक चर्चेसाठी नसतात असं सूचक वक्तव्य अमित शहा यांनी केलं. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही," असं बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी सांगितलं.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे.
राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळते आहे. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली. परमबीर सिंह या माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुखांवर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
यानंतर 'अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले.' असा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर अनिल देशमुख यांनी कारण नसताना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पंगा घेतला असंही राऊत यांनी लिहिलं. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दरी वाढत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तील 'रोखठोक' या आपल्या सदरात 'डॅमेज कंट्रोलचा फज्जा' हा लेख लिहिला. यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'कोणीही या सरकारमध्ये मिठाचा खडा टाकू नये,' अशी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.
अशा परिस्थिती पवारांना दवाखान्यात दाखल केलं आहे. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात कसे उमटतात हे पाहावं लागेल.