Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोकियो ऑलिम्पिक: क्रिकेटमध्ये गोल्ड मेडल कोणी मिळवलं होतं माहितेय?

Webdunia
शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (18:00 IST)
अनघा पाठक
क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा, अटीतटीच्या मॅचेस, देशाची मान उंचवण्यासाठी खेळाडूंनी केलेली जीवतोड मेहनत आणि अधूनमधून टीव्हीवर मॅच बघताना ज्यांना पळत पळत मैदानाला साधी एक चक्करही मारता येणार नाही अशांनी खेळांडूंना दिलेले सल्ले आणि देशप्रेमाचे उमाळे.
 
सगळं कसं ऑलिम्पिकमय झालंय. पण एक प्रश्न प्रत्येक भारतीयच्या मनात अधून मधून डोकावला आहेच. गुगलवर नुस्तं ऑलिम्पिक आणि क्रिकेट असे दोन कीवर्ड टाकले की भारतीयांनी विचारलेल्या प्रश्नांची भलीमोठी यादीच समोर येतेय. प्रश्न आहेच तसा - खेळाच्या या महाकुंभात क्रिकेटचा समावेश का नाही?
 
आता नव्याने ही चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये काही नव्या खेळांचा समावेश झाला. यात कराटे, स्केटबोर्डिंग, स्पोर्ट्स क्लायबिंग (उंच आणि अवघड ठिकाणी चढण्याची स्पर्धा) आणि सर्फिंग (समुद्राच्या लाटांवर एका बोर्डच्या मदतीने केलेली सवारी) असे खेळ आहेत.
 
तर बेसबॉल या 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये समावेश झालेल्या खेळाला पुन्हा स्थान मिळालं आहे.
 
तसे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये नवनवीन खेळांचा समावेश होतच असतो. एकदा समावेश झालेला खेळ पुढच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचीही शक्यता असते. नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार 2024 साली होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळ म्हणून ब्रेकडान्सचा समावेश असेल.
 
दुसरीकडे चिअर लीडिंगला (खेळ चालू असताना प्रोत्साहन म्हणून होणारं नाच आणि कसरतींचं सादरीकरण) ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली जातेय. कदाचित काही वर्षांनंतर होणाऱ्या स्पर्धांमध्ये याचा समावेश झालेला दिसेल.
 
आता चिअर लीडिंग म्हणा, बेसबॉल म्हणा किंवा स्केटबोर्डिंग, सर्फिंग हे काही सगळ्यांच देशात खेळले जाणारे खेळ नाहीत. यातले बरेच खेळ प्रामुख्याने अमेरिकन म्हणूनच ओळखले जातात.
 
मग अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या देशात खेळल्या जाणाऱ्या नवनवीन खेळांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होत असेल तर क्रिकेटचा नंबर का लागत नाही?
 
अर्थात क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये नाही हे एकप्रकारे बरंच आहे, निदान तेव्हा तरी भारतीयांचं लक्ष क्रिकेटवरून हटून इतर खेळांकडे जातं असंही अनेकांना वाटतं. काही अंशी यात तथ्यही आहे.
 
दुसरीकडे ज्या खेळात भारत मातब्बर आहे, त्या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला तर हमखास पदक मिळेल आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट आंतरराष्ट्रीय पटलावर पोहचेल असंही अनेकांना वाटतं.
 
मुद्दा दोन्ही बाजूंमध्ये कोण योग्य हा नाहीये. क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये असावा की नसावा हाही लेखाचा विषय नाही, तर आजवरच्या इतिहासात क्रिकेट कधीतरी ऑलिम्पिकमध्ये खेळलं गेलं होतं का? असेल तर केव्हा, आणि आता का खेळलं जात नाही?
 
क्रिकेटसाठी म्हणावे तितके प्रयत्न केले जात नाही का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळावी म्हणून हा लेखनप्रपंच.
 
दोनच संघ सहभागी, एकाच मॅचची स्पर्धा
इतिहासातलं पहिलं ऑलिम्पिक व्हायचं जेव्हा घटत होतं, तेव्हाच क्रिकेट त्यात असेल असं ठरलं होतं. म्हणजे 1896 सालीच क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होणार होता, पण खेळायला संघच नसल्याने ती स्पर्धा रद्द झाली.
 
यानंतर चार वर्षांनी, 1900 साली, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटने प्रवेश मिळवला खरा, पण ही स्पर्धा त्या देशात झाली ज्याचा आज क्रिकेटशी दुरान्वयेही संबंध असेल अशी शंका येत नाही. इतिहासात ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट एकदाच खेळलं गेलं, तेही फ्रान्समध्ये.
 
दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये समावेश झालेल्या 19 खेळांपैकी क्रिकेट एक होतं. हे ऑलिम्पिक पॅरिसमध्ये झालं होतं. यात सुरुवातीला चार संघ सहभागी झाले होते - नेदरलँड्स, बेल्जियम, ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स. हो, फ्रान्सचाही संघ होता !
 
पण बेल्जियम आणि नेदरलँड्सने ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेतली. म्हणजे उरले दोन संघ - ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स. म्हणून मग या दोन संघात एकच मॅच खेळवली गेली आणि तीच फायनल ठरवली गेली.
 
या मॅचने नियमही थोडे वेगळे होते. एकतर संघात नेहमीच्या 11 ऐवजी 12 खेळाडू होते आणि पाच दिवसांच्या टेस्ट मॅच ऐवजी दोन दिवसांची मॅच खेळवली गेली.
 
ग्रेट ब्रिटनचा संघ म्हणजे राष्ट्रीय संघ नव्हताच तर स्थानिक क्लबचा संघ होता तर फ्रान्सच्या संघात त्यावेळी कामानिमित्त पॅरिसमध्ये राहाणारे ब्रिटिश अधिकारीच होते.
 
ग्रेट ब्रिटनने फ्रान्सला (म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांनाच) हरवलं. पण या मॅचमध्ये कोणालाही सुवर्णपदक दिलं गेलं नाही. ब्रिटिश संघाला रौप्य पदक मिळालं तर फ्रान्सच्या संघाला कांस्य.
 
दोन्ही संघाना आठवण म्हणून आयफल टॉवरची एक प्रतिकृती देण्यात आली होती.
 
आता सगळ्यांत मोठी गंमत... दोन्ही संघाना माहिती नव्हतं की आपला सामना ऑलिम्पिकमध्ये होतोय. दोन्ही संघाना वाटलं की त्यांची मॅच 1900 सालीच फ्रान्समध्ये भरलेल्या वर्ल्ड फेअरचा भाग आहे.
 
अगदी ऑलिम्पिकच्या अधिकृत रेकॉर्डमध्येही या मॅचचा समावेश 12 वर्षांनी केला गेला. त्यावेळी दोन्ही संघांची पदकं अपग्रेड करून अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकं दिली गेली.
 
त्यानंतर चार वर्षांनी अमेरिकेतल्या सेंट लुईस शहरात झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची योजना आखली गेली होती, पण त्यात कोणालाही विशेष रस नसल्याने 1904 सालचा सहभागही बारगळला.
 
त्यानंतर क्रिकेट कधीच ऑलिम्पिकमध्ये खेळलं गेलं नाही.
 
पण का?
जेष्ठ क्रीडा पत्रकार शरद कद्रेकर म्हणतात की, "मुळात आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात झाली, संस्कृती रुजली तेव्हा पाच दिवसांची एका मॅच अशा प्रकारची स्पर्धा खेळवणं शक्यच नव्हतं. तेव्हा क्रिकेट म्हणजे टेस्ट मॅच हेच समीकरण रूढ होतं. त्यामुळे तेवढे संघ असतील का? इतका वेळ चालणाऱ्या एका मॅचसाठी सोयीसुविधा उपलब्ध होतील का, ही सगळी गणित जमवणं अवघड होतं. त्यामुळे क्रिकेट आपसूकच ऑलिम्पिक स्पर्धेतून गळालं."
 
ऑलिम्पिकमध्ये नव्या खेळाचा समावेश कसा होतो?
 
जवळपास एक अब्जाहून जास्त लोक क्रिकेट फॉलो करत असले तरी ठराविक देशांमध्येच हा खेळ लोकप्रिय आहे. भारतीय उपखंडातल्या देशांमध्ये, म्हणजे भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अशा देशांमध्ये या खेळाचे सर्वांत जास्त चाहते आहेत.
 
भारतासारख्या देशात क्रिकेटला धर्मही म्हटलं जातं. पण तरीही आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त 10-11 देशांना टेस्टचा दर्जा आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इतकेच देश नित्यनियमाने क्रिकेट खेळतात.
 
अशात येत्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला स्थान मिळेल की नाही हे शोधण्याआधी हे पाहाणं महत्त्वाचं ठरेलं की एखाद्या नव्या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये कसा समावेश होतो.
 
आधी म्हटल्याप्रमाणे टोकियो ऑलिम्पिकमध्ये बेसबॉल, स्केटबोर्डिंग, सर्फिंगसारख्या नव्या खेळांचा समावेश झालाय.
 
इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच पूर्वी ऑलिम्पिकमध्ये कोणते खेळ असतील हे ठरवायची. पण आता आयओसी जिथे स्पर्धा होणार असतील त्या देशाच्या ऑलिम्पिक ऑर्गनायझिंग कमिटीला नवीन खेळ सुचवायला, त्यांच्या समावेशासाठी प्रयत्न करायला परवानगी देते.
 
हा बदल ऑलिम्पिक 2020 अजेंडा ठरल्यानंतर झाला आहे. याचा उद्देश अधिकाधिक लोकांपर्यंत, तरुणांपर्यंत पोहोचणं हा आहे.
 
टोकियो ऑलिम्पिकच्या ऑर्गनायझिंग कमिटीने वर उल्लेखलेल्या नवीन खेळांचा समावेश करण्याचा प्रस्ताव 2015 साली पाठवला होता.
 
2016 साली आयओसीने हा प्रस्ताव मान्य केला. त्यावेळी आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी म्हटलं होतं की, "आम्हाला हे खेळ तरूणांपर्यंत न्यायचे आहेत. आताच्या तरुणाईकडे असणारे वेगवेगळे पर्याय पाहाता ते आमच्याकडे स्वतःहून येतील असं वाटत नाही, आम्हालाच त्यांच्याकडे जावं लागेल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या नव्या खेळांना परवानगी दिलीये ते खेळांच्या केंद्रस्थानी तरूणाई आहे. हे खेळ जपानमध्ये प्रसिद्ध आहेत आणि टोकियो ऑलिम्पिकच्या यशात नक्कीच भर घालतील."
 
एखाद्या देशाच्या ऑलिम्पिक कमिटीने कोणत्या खेळांचा समावेश व्हावा हे सुचवण्यासाठी काही नियम आहेत. ते खेळ खेळवण्यासाठी त्या देशात पुरेशा सोयीसुविधा आणि जागा हवी आणि मुख्य म्हणजे त्या खेळांची त्या देशांना संस्कृती हवी. बरं एका ऑलिम्पिकमध्ये समावेश झालेला खेळ पुढल्या ऑलिम्पिकमध्ये असेलच असं नाही.
 
क्रिकेटला पुन्हा संधी मिळेल का?
आता येऊ क्रिकेटवर. 2024 सालचं ऑलिम्पिक होणार आहे, पॅरिसमध्ये तर त्याच्या पुढचं, म्हणजे 2028 सालचं ऑलिम्पिक होणार आहे लॉस एजेंलिसमध्ये.
 
अमेरिका आणि फ्रान्स या दोन्ही देशांना क्रिकेटची संस्कृती नाही, या देशांमध्ये क्रिकेट लोकप्रिय नाही, आणि त्यानुसार तिथे स्टेडियम किंवा सोयीसुविधाही अगदीच कमी असतील.
 
त्यामुळे या दोन देशांनी क्रिकेटला नॉमिनेट करण्याची शक्यता कमी वाटते.
 
मग दुसरा मार्ग काय?
इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने (आयसीसी) पुढाकार घ्यावा. यासाठी आयसीसीला क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या क्रिकेट बोर्डाचाही पाठिंबा लागेल.
 
त्यासाठी पैसा उभा करावा लागेल. ज्या देशात ऑलिम्पिक होणार आहे, त्या देशांमध्ये क्रिकेटचे स्टेडियम बांधण्यासाठी निधी पुरवावा लागेल. हा निधी त्या त्या देशांमधल्या क्रिकेट बोर्डांना सरकारकडून मिळवावा लागेल. म्हणजे हाही रस्ता खडतरच आहे.
 
आयसीसीचे प्रयत्न
क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी आयसीसी 2028 च्या लॉस एजेंलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा म्हणून प्रयत्न करतेय. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आयसीसीने ऑलिम्पिक कमिटी स्थापन केली आहे.
 
तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आयसीसीने आपल्या सदस्य बोर्डांना विचारलं होतं की जर क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये झाला तर त्या बोर्डांना आपआपल्या देशांकडून किती आर्थिक सहाय्य मिळू शकतं.
 
अशा आशयाची प्रश्नावलीच आयसीसीने क्रिकेट बोर्डांना पाठवली होती.
 
असे प्रयत्न याआधीही आयसीसीने केले होते पण त्यांना यश आलेलं नाही. तरीही आता लॉस एजेंलिस ऑलिम्पिकसाठी संघटनेने जोर लावलाय. त्यांचं म्हणणं आहे की ऑलिम्पिकमधल्या सहभागाने क्रिकेटला आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखीन लोकप्रियता मिळेल. मुख्य म्हणजे नवीन प्रेक्षक मिळतील.
 
याच प्रयत्नांचा भाग म्हणून आयसीसीने एक प्रस्ताव तयार केला आहे अशा बातम्याही आल्यात. या प्रस्तावात म्हटलंय की 'जर क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये झाला तर भारतीय उपखंडातल्या चाहत्यांमुळे ऑलिम्पिक चळवळीला भूतो न भविष्यती असा फायदा मिळेल.'
 
आयसीसीचं म्हणणं आहे भारतीय उपखंडात या खेळाचे जेवढे चाहते आहेत तेवढे अन्य कोणत्याच खेळाचे कुठेही नाहीत.
 
या प्रस्तावात म्हटलंय की जगात एक अब्जाहून अधिक क्रिकेटचे चाहते आहेत आणि त्यातले 92 टक्के भारतीय उपखंडात (भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशांमध्ये) आहेत. क्रिकेटच्या लोकप्रियेतेचा लॉस एजेंलिस ऑलिम्पिकला नक्कीच फायदा होईल.
 
याचा अर्थ येत्या काही काळात ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये विराट कोहली किंवा रोहीत शर्मा खेळताना दिसणार का?
 
ऑलिम्पिक खेळांचा अभ्यास असलेले क्रीडा पत्रकार अभिजीत कुलकर्णी म्हणतात, "कोणत्याही खेळाला ऑलिम्पिक चळवळीचा भाग होण्यासाठी तो खेळ पुरुषांमध्ये 70 देशांत तर महिलांमध्ये 40 देशात खेळला गेला पाहिजे. त्यामुळे 2017-18 साली आयसीसीने 104 देशांना T20 च सदस्यत्व देऊन क्रिकेटचा ऑलिम्पिक चळवळीत येण्याचा रस्ता मोकळा केला. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की ऑलिम्पक चळवळीत येणं आणि खेळाचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत."
 
ऑलिम्पिक चार्टरनुसार 28 नियमित खेळ असतात तर 4 नवे खेळ यजमानांना निवडण्याची मुभा असते. पॅरिस ऑलिम्पिकचे खेळ निवडले गेलेत पण 2028 च्या लॉस एजेंलिस ऑलिम्पिकसाठी क्रिकेटची निवड व्हावी यासाठी आयसीसीचे प्रयत्न चालू आहेत अशीही माहिती अभिजीत यांनी दिली.
 
बीसीसीआयला ऑलिम्पिकमध्ये रस नाही?
शरद कद्रेकर याचं उत्तर नाही असंच देतात. ते म्हणतात, "क्रिकेटच्या बाबतीत पदकापेक्षा आर्थिक गणित महत्त्वाची आहेत असंच चित्र आहे. एक तर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट गेलं तर त्यांचे अधिकार कमी होतील, उदाहरणार्थ ऑलिम्पिकच्या प्रसारणाचे हक्क त्यांच्याकडे नसतील. त्यांच्या रेव्हेन्यू कमी होईल. पुन्हा क्रिकेटच्या मॅचेससाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जातो त्यावर पाणी सोडावं लागेल. मुख्य म्हणजे ऑलिम्पिक आणि इतर स्पर्धांचं वेळापत्रक क्लॅश होण्याची शक्यता असेल. अशा वेळी जर टीम पाठवायची झालीच तर बीसीसीआय ब, क किंवा ड संघ ऑलिम्पिकला पाठवेल."
 
त्यांच्या मते क्रिकेटचं स्वतःचं एक वेळापत्रक असतं, त्याचे प्रायोजक असतात, प्रसारणाचे हक्क, प्रायोजक, ऑर्गनाझर यांचा पैसा गुंतलेला असतो. हे मागे ठेवून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यात बीसीसीआयला रस नाही, असं चित्र सध्या तरी दिसत आहे.
 
फक्त बीबीसीआयच नाही, क्रिकेट जगतातली आणखी दोन मोठी नियामक मंडळं, इंग्लंड आणि वेल्स तसंच ऑस्ट्रेलिया यांनीही आजवर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा म्हणून हिरिरीने प्रयत्न केले नाहीत. बीसीसीआयसारखंच या मंडळांना आर्थिक गणितं जमवण्यात रस होता. पण कदाचित हे चित्र बदलू शकतं.
 
कद्रेकर म्हणतात, "या देशांना ऑलिम्पिक पदकात जास्त रस असू शकतो. त्यामुळेच या देशांमध्ये आता क्रिकेट ऑलिम्पिकचा भाग असावं अशी भावना वाढताना दिसतेय. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडने जोर लावला तर आयसीसीला जास्त बळ मिळेल. मग बीसीसीआयला काहीतरी वेगळा मार्ग शोधून काढावा लागेल."
 
बीसीसीआयने मात्र ऑलिम्पिकबाबत सावध पवित्रा घेतला आहे. सध्या त्यांनी क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होण्याची शक्यता फेटाळून लावली नाहीये तसंच अधिकृतपणे याला होकारही दिला नाहीये. पण जर लॉस एजेंलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट हा खेळ समाविष्ट झाला तर बीसीसीआय आपली महिला आणि पुरुष टीम पाठण्यासाठी आमची तत्वतः मान्यता आहे असं बीसीसीआयने म्हटलंय.
 
पण नियोजनातल्या अडचणींमुळे बीसीसीआयचा क्रिकेटला विरोध होता, आणखी काही कारण नव्हतं असं क्रिकेट समीक्षक मकरंद वायंगणकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
त्यांच्या मते, "2008 पर्यंत बीसीसीआयचा क्रिकेटला विरोध होता पण नंतर तो मावळला. आता जर क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये करायचा असेल तर त्यासाठी काटेकोर नियोजन करावं लागेल कारण आताच क्रिकेट खेळणाऱ्या देशांचा कार्यक्रम भरगच्च आहे."
 
ते पुढे म्हणतात, "त्याबरोबरच क्रिकेटसाठी लागणारं मोठं मैदान, प्रत्येक मॅचच्या वेळेस लागणारं नवं पिच याची उपलब्धता पाहावी लागेल. पिच खराब असेल तर मॅच रंगत नाही. त्यामुळे टोकियो किंवा आणखी एखाद्या देशात, जिथे क्रिकेट माहिती नाही तिथे क्रिकेटचं आयोजन थोडं कठीण आहे."
 
गंमत म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या चमूला पाठवण्यात साहाय्य करण्यासाठी बीसीसीआयने इंडियन ऑलिम्पिक कमिटीला 10 कोटी रूपयांची मदत केली होती.
 
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं की, "बीसीसीआय ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या खेळाडूंना सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन तसंच युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या विनंतीवरून बीसीसीआयने ऑलिम्पिक खेळाडूंसाठी 10 कोटी रूपये मदत देण्यचां ठरवलं आहे."
 
क्रिकेट कधी कोणत्या मोठ्या स्पर्धेत खेळलं गेलं होतं का?
2022 साली होणाऱ्या बर्मिंगहॅम (इंग्लंड) कॉमनवेल्थमध्येही महिलांची क्रिकेट टीम पाठवण्याचं बीसीसीआयने मान्य केलं आहे.
 
कॉमनवेल्थ, एशियन गेम्स किंवा ऑलिम्पिक या खेळांच्या मोठ्या स्पर्धा असतात आणि एकाच वेळी वेगवेगळ्या खेळांच्या मॅच तिथे होत असतात. एकाच खेळाच्या वर्ल्ड कपपेक्षा वेगळ्या असतात. या स्पर्धांना मल्टिइव्हेंट गेम्स असंही म्हणतात.
 
याआधी क्रिकेट कोणत्या मल्टिइव्हेंट स्पर्धेत खेळलं गेलं होतं का? तर हो. 1998 च्या क्वालालंपूर (मलेशिया) कॉमनवेल्थ स्पर्धेत क्रिकेट खेळलं गेलं होतं. याच स्पर्धेत भारताकडून अजेय जाडेजा, सचिन तेंडूलकर, अनिल कुंबळे आणि व्हीवीएस लक्ष्मण खेळले होते. या स्पर्धांच्या वेळेस भारताची एक टीम पाकिस्तानबरोबर सीरिज खेळत होती.
 
पण या दोन्ही टीम्सचा परफॉर्मन्स खास नव्हता. क्वालालंपूरमध्ये स्टार क्रिकेटर्स खेळत असूनही भारत क्वार्टर फायनलमध्येच हरला तर पाकिस्तानविरोधातली सीरिजही भारताने मोठ्या फरकाने गमावली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने सुवर्णपदक पटकावलं होतं.
 
यानंतर कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेट खेळलं गेलं नाही. पण 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिलांच्या T-20 क्रिकेटचा समावेश झालेला आहे.
 
2010 आणि 2014 च्या एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश झाला होता खरा पण दोन्ही वेळेस भारताने आपली टीम पाठवली नव्हती. 2010 च्या एशियन गेम्सचं सुवर्णपदक बांगलादेशने जिंकलं होतं.
 
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट कोणत्या फॉर्ममध्ये खेळलं जाईल?
क्रिकेटचे सध्या तीन प्रकार आहेत - टेस्ट, वन-डे आणि T20. तिन्ही प्रकार वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळले जातात. मग जर ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर यातला कोणता प्रकार खएळला जाईल?
 
"टेस्ट मॅच खेळवणं अशक्य आहे. पण वन-डे सुद्धा अशा स्पर्धांमध्ये खेळवता येणार नाहीत. त्यासाठी किती वेळ, साधनं लागतील याचा विचार करूनच हे लक्षात येतं," कद्रेकर म्हणतात.
 
20 ओव्हरच्या T-20 प्रकाराचाच ऑलिम्पकमध्ये समावेश झाला तर होऊ शकेल. आयसीसीने त्यासाठी प्रयत्न करतेय. पण या बरोबरीने आणखी एका प्रकाराची चर्चा होतेय, तो म्हणजे द हंड्रेड.
 
द हंड्रेड हा इंग्लंडमध्ये जन्माला आलेला प्रकार आहे. अगदीच ताजा ताजा आहे, इतका ताजा की याची पहिली स्पर्धा इंग्लंडमध्ये आता सुरू झालीये.
 
द हंड्रेड म्हणजे 100 बॉल्सची स्पर्धा. T-20 मॅचपेक्षा यात 20 बॉल कमी असतात.
 
जास्तीत जास्त तरुण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी हा प्रकार जन्माला घातलाय असं इंग्लिश क्रिकेट बोर्डाने म्हटलंय.
 
याघडीला इंग्लंडच्या आठ शहरांच्या आठ महिला आणि आठ पुरुष टीम या सीरिजमध्ये खेळतायत. याचे नियमही नेहमीच्या क्रिकेटपेक्षा थोडे वेगळे आहेत.
 
भारताची शेफाली वर्माही यात सहभागी झालीये.
 
महिला आणि पुरुष खेळांडूंमध्ये समानता आणण्यासाठी हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे असं अनेकांना वाटतं. या स्पर्धेमध्ये महिलांच्या मॅचेसला पुरुषांइतकंच महत्त्व दिलं आहे. त्यांना पुरुषांसारख्याच सोयीसुविधा पुरवल्या आहेत आणि मुख्य म्हणजे बक्षिसाची रक्कम दोघांसाठी सारखीच आहे.
 
पण या प्रकाराचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग नको अशाही मताचे अनेक जण आहे. मुख्य म्हणजे आधीच क्रिकेटमध्ये तीन प्रकार असताना चौथा प्रकार कशासाठी असंही जेष्ठ खेळाडूंचं मत आहे.
 
ऑस्ट्रलियाचे माजी कॅप्टन इयान चॅपल यांनी ईएसपीएनसाठी लिहिलेल्या आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय की, "ऑलिम्पिकसाठी T-20 च पुरेसं आहे. त्याला अजून कुठल्या नव्या फॉरमॅटची गरज नाही."
 
"सध्याच्या क्रिकेटमध्ये तुफान प्रसिद्ध झालेल्या T-20 प्रकारातून फक्त 20 बॉल कमी करून आणखी एक प्रकार आणल्याने काय सिद्ध होईल हे मला कळत नाही," ते लिहितात.
 
बीसीसीआय आणि इतर क्रिकेट बोर्डांचा T-20 लाच पाठिंबा आहे.
 
खेळाडूंच्या प्रतिक्रिया काय?
क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा की नाही याबद्दल आजी खेळाडू फारसं काही बोलत नसले तरी माजी खेळाडूंच्या समिश्र प्रतिक्रिया आहेत.
 
बीबीसीच्या 'स्टंप्ड' या कार्यक्रमात बोलताना भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने म्हटलं होतं की ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर त्याने क्रिकेटचीच लोकप्रियता वाढणार आहे.
 
"T-20 हा सगळ्यांत लोकप्रिय प्रकार आहे आणि ज्यांना क्रिकेटमधलं फारसं माहिती नाही त्यांनाही कळण्यासारखा आहे."
 
पण पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट याला वाटतं की क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये असावं हा आग्रह का धरला जातोय?
 
आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना त्याने म्हटलं की, "क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये असावं असं म्हणणं खूप संदिग्ध आहे. हा आग्रह धरायचाच कशाला? क्रिकेट काय जगातल्या लोकांना माहिती नाही का? कोणीतरी येतं म्हणतं 10 ओव्हरची मॅच खेळा, कोणी म्हणतं हंड्रेड खेळा. पण कशाला? इतर खेळांसाठी मेहनत घ्या ना."
 
क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये हवं की नको यावर सगळ्या बाजूंनी जोरदार चर्चा होतेय, जसं जसं ऑलिम्पिक संपत येईल, उत्साह शांत होईल, तसं तसं ही चर्चाही मावळेल.
 
पण क्रिकेटचे चाहते मात्र दर ऑलिम्पिकला विराट, रोहीत, किंवा अजून कोणी भारताचा झेंडा घेऊन ऑलिम्पिकच्या उदघाटन समारंभात चालताना दिसतील का याची वाट पाहातील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments