Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय दत्त: ड्रग्स, टाडा, कॅन्सरशी झुंज आणि गाडी पुन्हा रुळावर; असा आहे त्याचा प्रवास

Webdunia
शुक्रवार, 29 जुलै 2022 (08:12 IST)
काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये निघृणपणे हत्या झालेल्या सिद्धू मुसेवालाचं गाणं आहे - 'संजू'. त्या गाण्याचे बोल आहेत, 'गबरू दे केस जेडा संजय दत्ते.' याचा अर्थ असा की संजय दत्तवर जी कलमं लागली होती. तीच माझ्यावर लागली आहेत.
 
आपल्या गाण्यातून शस्त्रांचं उदात्तीकरण करण्याचा आरोप असलेल्या सिद्धू मुसेवालावर जेव्हा आर्म्स अॅक्टची कलमं लागली होती तेव्हा ती गोष्ट त्याने एखाद्या दागिन्यासारखी मिरवत त्यावर गाणं देखील रचलं.
 
मृत्यूच्या वेळी सिद्धू मुसेवालाचं वय 28 होतं. म्हणजे ज्या काळात सिद्धू मुसेवाला मोठा झाला त्या काळात संजय दत्तचं वलय बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं होतं पण तरीदेखील संजय दत्त हा अनेकांच्या गळ्यातला ताईतच बनून राहिला.
 
त्याने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेत. सुनील दत्त आणि नर्गिस या बॉलिवूडच्या पॉवर कपलच्या पोटी जन्मलेला, सोन्याचा चमचा घेऊन आलेला मुलगा बघता-बघता 'खलनायक' झाला. संजय दत्त ड्रग्सच्या आहारी गेला, टाडाची कलमं लागून तुरुंगात गेला, पुन्हा त्यात कॅन्सर झाला आणि आता केजीएफ, समशेरा सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला.
 
संजय दत्तवर त्याचाच जीवलग मित्र असलेल्या राजकुमार हिराणीने चित्रपट देखील काढला. अनेकांनी असा आरोप केला संजय दत्तचं उदात्तीकरण केलं. पण त्याचं आयुष्य पडद्यावर आणण्यामागे व्यावसायिक दृष्टीकोन देखील होता हे नाकारता येणार नाही कारण संजय दत्तचं आयुष्य कसं आहे हे जाणण्याची उत्सुकता लोकांना तेव्हाही होती आणि आता ही आहे.
 
संजय दत्तच्या प्रवासावर टाकलेली एक नजर
दहाव्या वर्षीच मारला सिगरेटचा पहिला झुरका
29 जुलै 1959 रोजी दत्त घराण्यात संजयचा जन्म झाला. आपला लाडका सुपुत्र आयुष्यात कुठल्या वेड्यावाकड्या वाटा धुंडाळेल आणि कुठल्या संगतीच्या आहारी जाईल, याचा त्या मातेनं कधी स्वप्नातही विचार केला नसेल.
 
नर्गिस आणि सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त. लहानपणी सेटवर असताना, संजूची तयारी झाली की आई त्याचे पापे घ्यायची, त्यावेळी तो लाजून तोंड लपवून घ्यायचा. फिल्म डिव्हिजनच्या डॉक्युमेंटरीमध्ये हा प्रसंग पाहायला मिळतो. लहानगा संजू लाजला की कॅमेऱ्याकडे पाठ फिरवायचा. पण याच संजूबाबानं पुढे आयुष्यभर कॅमेऱ्यापुढे राहणं पसंत केलं.
 
संजय दत्तची मोठी बहीण झहिदाने एका टीव्ही शोमध्ये एक किस्सा सांगितला होता, "संजय मनानं खूप चांगला होता. एके दिवशी नरिमन पॉइंटला गाडी उभी असताना, त्याच्या गाडीभोवती एक मुलगा वारंवार घुटमळत होता. गाडीचा ड्रायव्हर कासीम भाईनं त्या मुलाच्या श्रीमुखात भडकावली. गाडी घराकडे वळवली. मात्र या प्रसंगानं वाईट वाटलेल्या संजयला रडू अनावर झालं. काही केल्या त्याचा हुंदका थांबेना. अखेरीस गाडी पुन्हा मागे घेऊन त्या मुलाला एक दुधाची बाटली घेऊन दिली, तेव्हा कुठे जाऊन संजयला बरं वाटलं."
 
तर एका रेडिओ इंटरव्ह्यूमध्ये नर्गिस यांनी सांगितलं होतं -" संजयचा जन्म झाला, तो थोडा कळता झाला त्यावेळची गोष्ट. जेव्हा मी शूटिंगसाठी म्हणून घराबाहेर निघायचे त्या त्या वेळी संजय खूप रडायचा. इकडे स्टुडिओत जरी पोहोचले तरी माझं चित्त थाऱ्यावर नसायचं. तो ठीक असेल की नाही याची काळजी वाटायची. म्हणूनच शेवटी मी सिनेसृष्टीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला."
 
सुनील दत्त यांनी एक प्रसंग अनेकदा सांगितला आहे. एकदा काश्मीरला असताना, मजामस्तीत त्यांनी संजयच्या हातात सिगरेट दिली, त्याची प्रतिक्रिया त्यांना पाहायची होती. मात्र सुनील दत्त चकित झाले कारण संजूबाबनं सिगरेट व्यवस्थित ओढून दाखवली. इतकंच नाही तर पूर्ण संपवून दाखवली.
 
संजूबाबा तेव्हा दहा वर्षांचाही नव्हता. सुनील दत्त यांना घरी भेटायला येणारे निर्माते वा त्यांचे दोस्तमंडळी सिगारेट ओढायचे. ती अर्धवट ओढलेली सिगारेट्सची थोटकं ते तशीच टाकून जायचे. त्या अर्धवट कांड्या उचलून संजूबाबा चोरून सिगरेट ओढायला शिकला.
 
संजयचं पाऊल वाकडं पडत असल्याची कल्पना आल्यानंच मुंबईच्या कॅथेड्रल शाळेतून त्यांचं नाव काढून त्याला हिमाचल प्रदेशमधली नामांकित 'सेंट लॉरेन्स' बोर्डिंग शाळेत पाठवण्यात आलं. संजयची पुढची काही वर्षं तिथंच गेली.
 
अमली पदार्थांच्या विळख्यात
1977 मध्ये 18 वर्षं वयाचा उमदा तरुण, संजय लॉरेन्स बोर्डिंग शाळेतून घरी परतला. त्याचं नाव मुंबईतल्या नामांकित एल्फिन्स्टन महाविद्यालयात टाकण्यात आलं. याच काळात संजूबाबाची पावलं अमली पदार्थांच्या काळोख्या वाटांकडे वळू लागली.
 
एका मुलाखतीत संजयनं स्वतःच याची कबुली दिली होती की याच दरम्यान तो घरी असला तरी आपल्या खोलीत स्वतःला कोंडून घ्यायचा, एकटं राहणं पसंत करायचा.
 
आई नर्गिसला कदाचित याची कुणकुण होती, मात्र त्यांनी सुनील दत्त यांच्याकडे कधीही संजयच्या अमली पदार्थ सेवनाबद्दल अवाक्षरही काढलं नाही.
 
याच दरम्यान संजयनेही आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सिनेमात एंट्री करायचं ठरवलं. यापूर्वीच त्याने 1971 साली प्रदर्शित झालेल्या 'रेशमा और शेरा' चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं.
 
संजयचा निर्णय झाल्यावर सुनील दत्त यांनी त्याला चांगलं प्रशिक्षण दिलं. त्याच्याकडून चांगली मेहनत करवून घेतली. पुरेशी तयारी झाल्याची खात्री पटल्यावर 'रॉकी' सिनेमात संजयला हिरो म्हणून घेण्याचा निर्णय झाला. नायिका म्हणून टीना मुनीमची निवड करण्यात आली. 'रॉकी'चं शूटिंग सुरू झालं.
 
आई रुग्णालयात आणि संजय दत्त रिहॅबमध्ये
'रॉकी' या आपल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काहीच दिवस आधी संजय दत्तची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त यांचं निधन झालं. 1981 साली जेव्हा रॉकी प्रदर्शनाच्या वाटेवर होता आणि नर्गिस आपल्या अखेरच्या घटका मोजत होत्या, तेव्हा संजय अमेरिकेत एका ड्रग्स रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेत होता.
 
प्रकृती अत्यंत खालावलेली असतानाही नर्गिस यांनी संजयसाठी काही समजुतीच्या गोष्टी रेकॉर्ड केल्या आणि या टेप्स सुनील दत्त यांनी संजयला पाठवल्या.
 
आपल्या आईचा आवाज ऐकून सातासमुद्रापार असलेल्या संजयला ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर पडायला मदत होईल, अशी आशा सुनील दत्त यांना होती असा उल्लेख 'संजय दत्त: द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड्स बॅड बॉय' या पुस्तकात म्हटलं आहे.
 
संजय दत्त जर केवळ ड्रग्सच्याच विळख्यात अडकला असता तर त्याचं पुढे काय झालं आणि तो कोण होता यावर फारसा विचार देखील झाला नसता पण तो अशा केसमध्ये अडकला की ज्यामुळे त्याच्या आयुष्यात वादळ उठलं.
 
'खलनायकी' वाटचाल
1993 सालच्या मुंबई स्फोटांनंतर संजयच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं. 1994 साली मॉरिशसहून शूट संपवून परत येणाऱ्या संजय दत्तला मुंबई विमानतळावरूनच अटक करण्यात आली. स्फोटांशी संबंधित शस्त्रास्त्रांपैकी काही शस्त्रं संजयच्या घरात लपवण्यात आली होती.
 
दाऊद इब्राहिम आणि अबू सालेमसारख्या गुंडांच्या संपर्कात संजय दत्त होता आणि शस्त्र बाळगून शस्त्रास्त्र कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.
 
जेव्हा राकेश मारियांनी संजय दत्तच्या कानाखाली मारली
1993 च्या बॉम्बस्फोटात संजय दत्तचा सहभाग होता. हे उघडकीस आल्यानंतर तत्कालीन चौकशी अधिकारी आणि पोलीस उपायुक्त राकेश मारिया यांनी त्याला अटक करण्याच्या हालचाली सुरू केल्या. संजय दत्तवर एके 56 बाळगल्याचा आणि नंतर त्या समुद्रात फेकून दिल्याचा आरोप होता.
 
संजय दत्तचे वडील सुनील दत्त तेव्हा खासदार होते. त्यामुळे साहजिकच मारिया यांच्यावर खूप दबाव होता. स्फोटांची चौकशी चालू होती तेव्हा तो परदेशात होता. संजय दत्तचा सहभाग असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात येऊ लागल्या होत्या.
 
ज्या दिवशी तो शरण येणार त्या दिवशी राकेश मारिया आणि त्यांची टीम विमानतळावर गेली. ते थेट विमान उतरणार तिथेच गेले आणि थेट संजय दत्तच्या समोर येऊन उभे राहिले. राकेश मारिया यांनी त्यांचा परिचय दिला आणि त्याचा पासपोर्ट ताब्यात घेतला.
 
गाडीत संजय दत्त शिपायांना ओरडून विचारत होता की त्याला कुटे नेत आहेत. पण पोलिसांनी त्याला उत्तर दिलं नाही. ज्या दिवशी संजय दत्तला अटक करण्यात आली त्या दिवशी क्राईम ब्रँचच्या ऑफिसमध्ये बसवण्यात आली आहे.
 
दुसऱ्या दिवशी सकाळी मारिया चौकशीसाठी आले तेव्हा त्यांनी गुन्हा कबूल करायला लावला. तेव्हा तो लहान मुलासारखा रडत होता. तो कोणत्याच प्रश्नांची उत्तरं देत नाही म्हटल्यावर मारियांनी त्याला सणसणीत मुस्काटात दिली. ती झापड इतकी जोरात होती की तो खुर्चीतून उडाला.
 
थोड्यावेळाने जे काही सांगेन ने तुम्हालाच सांगेन असं त्याने मारिया यांना सांगितलं आणि शस्त्रांची माहिती दिली. तरी वडिलांना काही सांगू नका म्हणून तो ओक्साबोक्शी रडायला लागला.
 
तुरुंगवास, जामिन आणि मुन्नाभाई
18 महिने तुरुंगात काढल्यानंतर संजयची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली. संजयच्या अटकेचे राजकीय वर्तुळातही चांगलेच पडसाद उमटले.
 
एक वर्ष जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा एकदा 1994च्या जुलैमध्ये संजयला तुरुंगात जावं लागलं. यावेळी थेट अंडासेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली. कुख्यात गुंड, भयंकर आरोपींना ज्या ठिकाणी ठेवलं जातं तीच ही जागा.
 
सुनील दत्त काँग्रेसचे खासदार असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटले. संजयच्या सुटकेची मागणी सुनील यांनी बाळासाहेबांकडे केली, असं त्यावेळी वृत्तपत्रांनी छापलं होतं.
 
बाळासाहेब ठाकरेंनी उघडपणे संजय दत्तला पाठिंबा दिला आणि दत्त कुटुंबातील कोणताही सदस्य देशविरोधी नसल्याची ग्वाही दिली. याच ठाकरेंची शिवसेना एकेकाळी संजय दत्तच्या सिनेमांना जोरदार विरोध करायची.
 
संजय दत्तला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये शत्रुघ्न सिन्हाही होते.
 
तब्बल 15 महिने तुरुंगाची हवा खाल्यानंतर संजयला दिलासा मिळाला. ऑक्टोबर 1995मध्ये त्याची सुटका झाली. सफेद कुर्ता आणि कपाळावर लाल टिळा, अशा दिमाखात संजयनं तुरुंगाबाहेर पाय ठेवला.
 
1998 साली संजय दत्तने रिया पिल्लईशी विवाह केला. 1999 साली आलेल्या संजयच्या 'वास्तव' सिनेमानं प्रसिद्धीचा नवा अध्याय रचला आणि संजयला त्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला.
 
2003 साली संजयला एक असा सिनेमा मिळाला, ज्यातल्या भूमिकेमुळे संजयच्या नशिबाला 'जादू की झप्पी' मिळाली. 'मुन्नाभाई MBBS' प्रोजेक्ट घेऊन राजकुमार हिरानी आले होते.
 
भाईगिरी ते गांधीगिरी
2006 साली संजय दत्तला मोठा दिलासा मिळाला. संजयवर टाडा कायद्याअंतर्गत ठेवण्यात आलेले आरोप कोर्टाने रद्द केले.
 
'संजय दहशतवादी नव्हता आणि त्याने स्वसंरक्षणासाठी बंदूक बाळगली होती' असा निर्वाळा देत कोर्टाने त्याला केवळ शस्त्रास्त्र कायद्याखाली दोषी ठरवलं आणि 6 वर्षांची शिक्षा सुनावली.
 
पण 18 दिवस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर संजय दत्तला लगेच जामीनही मिळाला. त्याच वेळी मुन्नाभाई मालिकेतला 'लगे रहो मुन्नाभाई' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर हिट झाला. यामुळे संजयला त्याची प्रतिमा सुधारण्यातही मदत झाली.
 
2007 ते 2013 हा काळ संजयसाठी चांगला गेला. याच काळात त्याने चित्रपटसृष्टीत मान्यता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (मूळच्या सारा खान असं नाव असणाऱ्या) अभिनेत्रीशी गोव्यात लग्न केलं. वर्षभरात तो जुळ्या मुलांचा पिता झाला.
 
2013 साली मार्च महिन्यात, म्हणजे मुंबई स्फोटांनंतर तब्बल 20 वर्षांनी कोर्टाने संजय दत्तला 4 आठवड्यांत शरण यायला सांगितलं. त्याची रवानगी पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये करण्यात आली.
 
संजयच्या वकिलांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिकासुद्धा कोर्टाने फेटाळून लावली. 2013 आणि 2014 या दोन वर्षांत संजयला 4 वेळा फर्लो मिळाला यावरून त्याला विशेष वागणूक मिळत असल्याची टीकाही झाली.
 
पण यानंतरही एकदा संजयला पॅरोल मिळाला होता. या काळात संजय दत्तने तुरुंगात टोपल्या, पिशव्या विणण्याचं काम केलं.
 
हवालदाराने दिला सल्ला
तुरुंगात असता तुझं मनौधैर्य खचलं नाही का असा प्रश्न संजय दत्तला विचारण्यात आला होता, त्यावर संजय दत्तने सांगितले की 'असं कधी झालं नाही की तो पूर्णपणे खचला.'
 
या काळात एका हवालदाराने त्याला सल्ला दिला आणि तो सल्ला खूप कामी आल्याचं संजय दत्तने सांगितलं, "जेव्हा मी तुरुंगात गेलो तेव्हा एक हवालदार मला म्हणाला संजूबाबा, जर तुम्ही आशा सोडून दिली तर तुरुंगातला वेळ चुटकीसरशी निघून जातील.
 
"मी त्यांना म्हटलं असं कसं होईल की मी आशाच सोडून देईन? मग ते म्हणाले प्रयत्न करून तर पाहा. मग मी त्यांचा सल्ला गांभीर्याने घेतला. मला दोन तीन आठवडे लागले. पण बाहेर निघण्याची आशा मग मी सोडून दिली आणि माझा तुरुंगातला वेळ चटकन निघून गेला.
 
संजय दत्तने सांगितले की, तुरुंगात असताना रेडिओ जॉकीचे काम करून, पिशव्या बनवून त्याने पाच-सहा हजार रुपये कमावले होते.
 
तो सांगतो, "ते पैसे मी सांभाळून ठेवले आहे. मी ते माझ्या पत्नीकडे सुरक्षितपणे ठेवले आहे. पिशव्या बनवणे, गार्डनचे काम करणे, रेडिओचे काम करने या सर्व शिकण्यासारख्या गोष्टी होत्या आणि तो काळ देखील शिकण्याचा होता."
 
'काटे' संपवून आयुष्य पुन्हा 'खुबसूरत'
1994 साली अटकेपासून कोर्ट आणि तुरुंगांचे उंबरे अनेकदा झिजवलेल्या संजय दत्तची 2016 सालच्या फेब्रुवारी महिन्यात अखेर सुटका झाली. येरवडा तुरुंगातून सुटून येणाऱ्या संजयला तुरुंगाबाहेर भेटण्यासाठी मित्र, आप्तेष्ट आणि चाहत्यांची एकच गर्दी उसळली होती.
 
तुरुंगातून सुटल्यानंतर त्याच्यावर फडकणाऱ्या तिरंग्या झेंड्याला सलाम करणाऱ्या संजयचं दृश्य त्याच्या चाहत्यांना भावुक करणारं होतं. पण ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती की दिखावा, याबाबतही सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये खरपूस चर्चा रंगली.
 
संजय दत्त आता पत्नी मान्यता आणि जुळी मुलं शाहरान आणि इक्रा यांच्यासह आपल्या मुंबईतल्या घरात राहतो.
 
कॅन्सरशी झुंज
सर्व काही सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच संजय दत्तला 2020 कॅन्सरचे निदान झाले, त्याच काळात कोरोनाची साथ शिखरावर होती.
 
अभिनेता संजय दत्त यांना कॅन्सर झाल्याची बातमी सर्वत्र आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. संजय दत्त यांच्या पत्नी मान्यता दत्त यांनी यासंदर्भात एक सविस्तर निवेदन जारी केलं होतं.
 
त्यात मान्यता म्हणाली होती, "संजूला गेली इतकी वर्षं तुम्ही प्रेम आणि आपुलकी दिली आहे. याबद्दल तुमचे आभार मानल्याशिवाय मी सुरुवातच करू शकत नाही.
 
"संजूने आयुष्यात बरेच चढ-उतार बघितले. मात्र, तुम्ही केलेलं कौतुक आणि तुम्ही दिलेला पाठिंबा याच्या बळावर त्यांनी आजवरच्या प्रत्येक कठीण प्रसंगाचा सामना केला आहे. आणि यासाठी आम्ही कायमच आपले ऋणी असणार आहोत. आमच्यापुढे आणखी एक आव्हान उभं ठाकलं आहे आणि तुमच्या प्रेमाच्याच बळावर ते हे संकटदेखील पार करतील, याची मला खात्री आहे.
 
"एक कुटुंब म्हणून आम्ही या संकटाचा सकारात्मकतेने आणि नम्रतेने सामना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक कठीण संघर्ष आणि लांबचा प्रवास असणार आहे. त्यामुळे चेहऱ्यावर स्मित ठेवून शक्य तेवढं सामान्य आयुष्य जगण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि कुठलीही नकारात्मकता न ठेवता संजूसाठी आम्हाला हे करायचं आहे.
 
"या कठीण काळात दुर्दैवाने मी स्वतः घरात क्वारंटाईन असल्याने पुढचे काही दिवस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत असू शकत नाही. प्रत्येक युद्धातच एक दिशा दाखवणारा असतो आणि एक जण किल्ला लढवत असतो. आमच्या कुटुंबातर्फे चालवण्यात येणाऱ्या कॅन्सर फाउंडेशनमध्ये प्रियाने गेली दोन दशकं खूप काम केलं आहे. तिच्या आईने या आजाराशी दिलेली झुंज तिने स्वतः बघितली आहे. या लढाईत ती आमची मार्गदर्शक आहे. तर मी किल्ला लढवत आहे.
 
आपल्या माहितीसाठी, संजूवर प्राथमिक उपचार मुंबईत होतील. परदेशात कधी जायचं, यासंबंधीचे निर्णय कोव्हिडची परिस्थिती कशी आहे, यावर घेतला जाईल. सध्या संजूवर कोकिलाबेन हॉस्पिटलमधले तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत.
 
मी हात जोडून सर्वांना विनंती करते की त्यांचा आजार कुठल्या टप्प्यात आहे, याचे अंदाज बांधू नका आणि डॉक्टरांना त्यांचं काम करू द्या. या सर्व प्रक्रियेची आम्ही तुम्हाला नियमितपणे माहिती देत राहू.
 
त्यानंतर संजय दत्तने कामापासून विश्रांती घेतली आणि तो बरा झाला.
 
शमशेरा आणि केजीएफ-2
संजय दत्त बरा झाल्यानंतर तो पुन्हा कामाला लागला. दक्षिण भारतातला सुपरहिट चित्रपट केजीएफ-1 च्या सिक्वेलमध्ये संजय दत्तने काम केले. त्यात त्याने अधिराचा रोल केला.
तर रणबीर कपूरच्या शमशेरातही त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. संजय दत्तला विचारण्यात आले की तुम्ही आता खलनायकाचेच रोल का करत आहात. त्यावर संजय दत्तने मजेशीर उत्तर दिले होते. तो म्हटला या वयात आलिया भटसोबत रोमॅंटिक सिन तर करू शकत नाही ना. असं असलं तरी वयाच्या 63 व्या वर्षी संजय दत्त जे काही करत आहे ते रोमांचक नाही असं कुणी म्हणू शकेल का?
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

कांटा लगा या गाण्यासाठी शेफाली जरीवालाला इतके पैसे मिळाले

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

Travel :हिवाळ्याच्या हंगामात भारतात या ठिकाणी भेट द्या

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची तिकिटे काही मिनिटांतच विकली,मुंबईत या तारखेला आहे कॉन्सर्ट

पुढील लेख
Show comments