Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री भक्तविजय अध्याय ८

Webdunia
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
आजिचा सुदिन दिवस भला ॥ जैं संतचरित्रग्रंथ देखिला ॥ श्रोते आणि वक्त्यांला ॥ सुधारस लाधला निजप्रेमें ॥१॥
भक्तकथेसी सुधारस म्हणणें ॥ हाही दृष्टांत येथें दिसे गौण ॥ अमृत सेवितां शचीरमण ॥ अक्षयपदीं कोण राहिला ॥२॥
जे कथारस सेविते जन ॥ ते अक्षयपदीं राहिले जाण ॥ करितां भक्तकथाश्रवण ॥ जन्म मरण निवारे ॥३॥
गंगेची उपमा द्यावी यासी ॥ तरी तेही न तुकेच कथारसीं ॥ जैं कर्वतीं घ्यावें त्रिवेणीसी ॥ मोक्ष जीवासी तैं होय ॥४॥
तैसें नव्हे हरिकीर्तन ॥ श्रवणेंचि होती श्रोते पावन ॥ म्हणोनि कथारसनिरूपण ॥ चतुर सर्वज्ञ जाणती ॥५॥
सूर्याहूनि अति सोज्ज्वळ ॥ कीं चंद्राहून वाटे शीतळ ॥ आकाशाहूनि अति निर्मळ ॥ भक्त प्रेमळ जाणती ॥६॥
आतां ऐका देऊनि चित्त ॥ विरिंचि आणि कैलासनाथ ॥ क्षीरसागरीं अकस्मात ॥ दर्शना येत हरीच्या ॥७॥
तयांसी म्हणे क्षीराब्धिजावर ॥ मृत्युलोकीं घेऊं अवतार ॥ निवृत्तिसोपान ज्ञानेश्वर ॥ लीला साचार दाखवूं ॥८॥
त्रिवर्ग बंधु एके ठायीं ॥ जन्म घेऊ लवलाहीं ॥ आदिमाया मुक्ताबाई ॥ भगिनी होईल आपणां ॥९॥
तंव गंगातीरीं क्षेत्र अद्भुत ॥ आपेगांव जगद्विख्यात ॥ तेथील कुळकर्णी गोविंदपंत ॥ असे निजभक्त विष्णूचा ॥१०॥
निराबाई त्याची कांता ॥ परम भाविक पतिव्रता ॥ गरोदर जाहली असतां ॥ पुत्रइच्छा धरियेली ॥११॥
मूर्तिमंत वैराग्य डोळस ॥ आले तिच्या उदरास ॥ भक्ति नवविधा भरले मास ॥ प्रसूत जाहली तेधवां ॥१२॥
तंव भक्तिज्ञानवैराग्यपुतळा ॥ मूर्तिमंत पोटीं उपजला ॥ मायबापांसी आनंद जाहला ॥ निजपुत्रासी देखोनी ॥१३॥
बारा दिवस लोटतां जाण ॥ विठोबा ठेविलें नामाभिधान ॥ अष्ट वर्षें होतां संपूर्ण ॥ मौंजीबंधन पैं केलें ॥१४॥
वेद शास्त्र करूनि पठन ॥ काव्यव्याकरणीं जाहला निपुण ॥ मनांत इच्छा धरिली त्यानें ॥ तीर्थाटन करावें ॥१५॥
अनुताप धरूनि चित्तासी ॥ पुसे मातापितयांसी ॥ आतां आज्ञा द्यावी मजसी ॥ पुष्कर तीर्थासी जावया ॥१६॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ वडिलांस वाटलें समाधान ॥ मग विठोबानें करूनि नमन ॥ सत्वर तेथोनी निघाला ॥१७॥
वैराग्य नुपजे चित्तास ॥ तरी वायां गेला शास्त्राभ्यास ॥ थोर कर्ण बधिरास ॥ असोनि काय उपयोगी ॥१८॥
कीं मयूराचे अंगीं जाण ॥ सर्वत्रचि दिसती नयन ॥ परी एकले दृष्टीवीण ॥ काय कारण तयांचें ॥१९॥
अजाकंठींचे वाढले स्तन ॥ कीं सांवरीचें दाटलें वन ॥ कीं गोरियाचें सुंदर गायन ॥ कीं तारुण्यपण विधवेचें ॥२०॥
नासिकेविण जैसें वक्त्र ॥ कीं महत्त्वावांचूनि कारभार ॥ पुरुषत्वावांचूनि जैसा नर ॥ व्यर्थचि थोर वाढला ॥२१॥
तेवीं शास्त्राभ्यास उदंड केला ॥ आणि अनुताप चित्तासी न जाहला ॥ जेवीं बक अनुष्ठानीं बैसला ॥ मत्स्य गिळावयाकारणें ॥२२॥
म्हणोनि अनुताप धरूनि मना ॥ विठोबा चालिला तीर्थाटना ॥ माया ममता टाकोनि जाणा ॥ हरिभजनीं विनटला ॥२३॥
आधीं येऊन द्वारावती ॥ स्नान केलें श्रीगोमती ॥ मग पाहूनि श्रीकृष्णमूर्ती ॥ दंडवत प्रेतीं घातलें ॥२४॥
देवें धरिला मत्स्यावतार ॥ मारूनि उद्धरिला शंखासुर ॥ महामुक्तीचें माहेर ॥ गेला सत्वर त्या ठाया ॥२५॥
तेथूनि पिंडारकासी आला ॥ तंव मगळहुडा पुढें देखिला ॥ द्वारकेचा कळस पाहिला ॥ मग चालिला तेथोनि ॥२६॥
सुदामपुरी दृष्टीं देखोन ॥ मूळमाधवासी आला जाण ॥ जेथें रुक्मिणीचें लग्न ॥ भीमकनृपवरें लाविलें ॥२७॥
अवतार संपविला श्रीकृष्णें ॥ तें भालुकातीर्थ वंदिलें जाण ॥ मग प्रभासलिंगा तेथून ॥ गेला सत्वर तेधवां ॥२८॥
वंदोनि सोरटीसोमनाथासी ॥ पुढें चालिला वेगेंसीं ॥ मुचकुंदाची गुंफा कैसी ॥ तेही दृष्टीसी देखिली ॥२९॥
भस्म केला कालयवन ॥ तें स्थान दृष्टीं पाहून ॥ मग धवलपुरीसी येऊन ॥ विश्रांतिस्थान देखिलें ॥३०॥
आणीक मार्गींची महातीर्थें ॥ पुराणप्रसिद्ध जगद्विख्यातें ॥ तींही वंदोनि समस्तें ॥ सप्तश्रृंगीसी पातला ॥३१॥
आदिमाया वंदोनि जाण ॥ अरुणावरुणेसी केलें स्नान ॥ मग प्राची गोदावरी तेथून ॥ जाहला देखोन निजसुखी ॥३२॥
कपालेश्वर देखोनि नयनीं ॥ त्र्यंबकासी आला तेथोनी ॥ कुशावर्तीं स्नान करूनी ॥ गंगाद्वार वंदिलें ॥३३॥
सव्य घालूनि ब्रह्मगिरी ॥ हर्ष वाटला निजअंतरीं ॥ मग येऊनि भीमाशंकरीं ॥ सुस्नात जहाला अनुतापें ॥३४॥
नित्यानित्य चालतां जाण ॥ मुखें करीत हरिकीर्तन ॥ तेथोनि अलकावतीस्थान ॥ सत्वर आला त्या ठाया ॥३५॥
चक्रतीर्थीं करूनि स्नन ॥ करीत बैसला देवतार्चन ॥ तों तेथील सिधोपंत ब्राह्मण ॥ स्नानासी जाण पातला ॥३६॥
ब्रह्मचारी दृष्टी देखोन ॥ साष्टांग घातलें लोटांगण ॥ तुमचें सांगा नामाभिधान ॥ केलें आगमन कोठोनी ॥३७॥
ऐकूनि म्हणे ब्रह्मचारी ॥ आपेगांव गंगातीरीं ॥ तेथील वृत्ती आमची बरी ॥ वृद्धाचारी म्हणताती ॥३८॥
माता पिता दोघेंजण ॥ तेथें वृद्धें असती जाण ॥ द्वारकादि तीर्थें करून ॥ अलकावतीस पातलों ॥३९॥
म्हणे धन्य आजिचा सुदिन ॥ जाहलें स्वामींचें आगमन ॥ आतां मंदिरास येऊण ॥ आश्रम पवित्र करावा ॥४०॥
ऐसें म्हणूनि सिधोपंत ॥ घरासी येऊनि गेले त्वरित ॥ भोजन घालोनि पंचामृत ॥ निद्रा करवीत तयासी ॥४१॥
तंव स्वप्नीं येऊनि श्रीपंढरीनाथ ॥ सिधोपंतासी काय बोलत ॥ ब्रह्मचारियासी सालंकृत ॥ कन्यादान करावें ॥४२॥
ऐसें होतांचि स्वप्न ॥ चित्तीं वाटलें समाधान ॥ स्नानसंध्यादि नेम सारून ॥ दृष्टांतवचन सांगितलें ॥४३॥
ब्रह्मचारी वचन बोलत ॥ तुम्हीं सांगतां तें यथार्थ ॥ परी आम्हांसी आज्ञा पंढरीनाथ ॥ न करीच सर्वथा ॥४४॥
सिधोपंत बोले वचन ॥ तरी आजिचा दिवस येथें राहून ॥ सत्य असेल तरी तुम्हांसी स्वप्न ॥ होईल जाणा निश्चयेसीं ॥४५॥
वृंदावनीं आसन घालूनी ॥ निद्रा केली तये क्षणीं ॥ संकल्प विकल्प येतां मनीं ॥ तंव काय स्वप्न देखिलें ॥४६॥
विश्वव्यापक पंढरीनाथ ॥ ब्रह्मचारियासी स्वप्नीं सांगत ॥ चारी अवतार मूर्तिमंत ॥ इच्या उदरा येतील ॥४७॥
तरी माझी आज्ञा वंदोनि शिरीं ॥ कन्यादान अंगीकारीं ॥ ऐसें देखोनि ब्रह्मचारी ॥ उठोनि सत्वरी बैसला ॥४८॥
ब्राह्मणासी पुसतां जाण ॥ घटितं आले छत्तीस गुण ॥ मग लग्नतिथी नेमून ॥ सर्व साहित्य करविलें ॥४९॥
देवकप्रतिष्ठा ब्राह्मण भोजन ॥ केलें निर्विघ्नाचें पूजन ॥ मंगळवाद्यें वाजती जाण ॥ पुण्याहवाचन होतसे ॥५०॥
नानापरींचीं दिव्यान्नें निर्मून ॥ घातलें ब्राह्मणांसी भोजन ॥ करूनि सीमांतपूजन ॥ विप्र बोलती मंगळाष्टकें ॥५१॥
जय जय मुकुंदा मुरारी ॥ पुराणपुरुषा मधुकैटभारी ॥ भक्तभूषणा नानापरी ॥ वधूवरांसी रक्षीं तूं ॥५२॥
जय जय शंख्हासुरमर्दना ॥ जय जय कूर्मरूपा समुद्रमथना ॥ वराहवेषा हिरण्याक्षभंजना ॥ वधूवरांसी रक्षीं तूं ॥५३॥
जय जय नृसिं प्रल्हादरक्षका ॥ जय वामनरूपा बळिछलका ॥ जय परशुधरा सहस्रबाहुअंतका ॥ वधूवरांसी रक्षीं तूं ॥५४॥
जय दशरथकुमरा निशाचरमर्दना ॥ जय गोकुळनाटका नंदनंना ॥ जय बुद्धरूपा जनार्दना ॥ वधूवरांसी रक्षीं तूं ॥५५॥
जय कल्किरूपा म्लेंच्छमर्दना ॥ धर्मस्थापका जगज्जीवना ॥ जय पुंडलीकवरदा रुक्मिणीरमणा ॥ वधूवरांसी रक्षीं तूं ॥५६॥
ऐसीं मंगळाष्टकें म्हणून ॥ विप्र बोलती सावधान ॥ नानापरींचीं वाद्यें लावून ॥ पाणिग्रहण पैं केलें ॥५७॥
चार दिवस सोहळा करून ॥ सिधोपंतासी केलें नमन ॥ म्हणे आषाढमासीं पंढरीस जाणें ॥ श्रीपांडुरंगदर्शन घ्यावया ॥५८॥
मग कुटुंबासहित तयासी ॥ घेऊन चालिला यात्रेसी ॥ स्नान करून चंद्रभागेसी ॥ श्रीपुंडलीकासी नमियेलें ॥५९॥
आणिक क्षेत्रांची उपमा जाण ॥ पंढरीस देतां दिसे गौण ॥ चंद्राऐसें नक्षत्र कोण ॥ गगनीं सोज्ज्वळ दिसेना ॥६०॥
सुवर्णाऐसी धातु कोणती ॥ कीं विष्णुवरिष्ठ कोणाची कीर्ती ॥ कीं कौस्तुभाहून रत्नदीप्ती ॥ सोज्ज्वळ धुंडिता दिसेना ॥६१॥
नंदीवरिष्ठ वृषभ कोण ॥ कीं शंकराऐसा तपस्वी कोण ॥ गीतेवरिष्ठ शास्त्र जाण ॥ धुंडितां त्रिभुवनीं नाढळे ॥६२॥
रामकृष्णनामा वरिष्ठ ॥ मंत्र कोणी न दिसे श्रेष्ठ ॥ कीं भागवतधर्माऐसा वरिष्ठ ॥ धर्म आन असेना ॥६३॥
तेवीं पंढरीऐसें भूमंडळीं ॥ क्षेत्र न दिसे नेत्रकमळीं ॥ जें दृष्टी देखतांचि तत्काळीं ॥ पर्वत जळती पापांचे ॥६४॥
म्हणाल मोक्षदायक सप्तपुरी ॥ त्याहून वरिष्ठ कैसी पंढरी ॥ तरी तेथें अभिमानाची होय बोहरी ॥ न उरे उरी मीपणाची ॥६५॥
आणिके तीर्थी करितां स्नान ॥ विशेष वाढतो अभिमान ॥ पंढरी देखतांचि दुरून ॥ खळासी पाझर सुटती ॥६६॥
असो हें महात्म्य वर्णिंतां ॥ पुढें विशेष वाढेल कथा ॥ सिधोपंत घेऊनि जामाता ॥ पंढरीक्षेत्रांत राहिला ॥६७॥
टाळ विणे मृदंग वाजती ॥ वैष्णव प्रेमें गाती नाचती ॥ हें कौतुक देखोनि कैलासपती ॥ स्वानंदप्रीतीं डुल्लत पैं ॥६८॥
करूनि क्षेत्रप्रदक्षिणा ॥ महाद्वारासी आले जाणा ॥ गरुडधारीं लोटांगणा ॥ विठ्ठलें साष्टांव घातलें ॥६९॥
कन्या जामात दोघांप्रती ॥ सिधोपंतें धरून हातीं ॥ चरणावरी सत्वरगती ॥ नेऊनियां घातलीं ॥७०॥
देवासी देऊन आलिंगन ॥ मग धरिले दृढ चरण ॥ महोत्साह जाहलिया तेथून ॥ सिधोपंत चालिले ॥७१॥
कन्याकुटुंबसहपरिवारीं ॥ जाता जाहला अलकापुरीं ॥ विठोबा म्हणे रामेश्वरीं ॥ जाऊन सत्वरी येईन मी ॥७२॥
अंतर जाणूनियां तयाप्रती ॥ निरोप दिधला सिधोपंतीं ॥ म्हणे यात्रा करूनि सत्वरगती ॥ यावें पुढती आश्रमा ॥७३॥
पांडुरंगासी करूनि नमन ॥ सत्वर निघाला तेथोन ॥ पुराणप्रसिद्ध मुख्य स्थान ॥ अनुक्रमेंचि पाहातसे ॥७४॥
श्रीशैलपर्वत मल्लिकार्जुन ॥ पाहिला निवृत्तिसंगम जाण ॥ देखतां पापराशी भस्म होती तत्क्षण ॥ अगाध महिमान तयाचें ॥७५॥
मार्गीं चालतां सत्वरगती ॥ हृदयीं चिंतित विठ्ठलमूर्ती ॥ मुखीं गात नामकीर्ती ॥ सप्रेमगतीकरूनी ॥७६॥
अहोबळ नरसिंह वासुदेव ॥ गिरि पर्वतीं व्यंकटराव ॥ अरुणाचल पाहूनि सर्व ॥ चिदंबरासी नमियेलें ॥७७॥
तें स्थान पाहूनि जाण ॥ मग पाहिलें गोकर्ण ॥ हाटकेश्वरीं करूनि स्नान ॥ सत्वर तेथून निघाले ॥७८॥
सीताशुद्धीसी हनुमंत गेला ॥ ज्या पर्वतावरूनि उडाला ॥ तें स्थान पाहूनियां डोळां ॥ तेथूनि निघाला सत्वर ॥७९॥
जनार्दन पाहूनि डोळां ॥ सत्वर रामेश्वरासी आला ॥ आपुला हेतु पूर्ण केला ॥ मग निघाला तेथूनि ॥८०॥
कोल्हापुरासी येऊन ॥ पंचगंगेचें केलें स्नान ॥ लक्ष्मीदर्शन घेऊन ॥ केलें गमन तेथोनि ॥८१॥
मग कृष्णातीरासी येऊन ॥ माहुलीसंगमीं केलें स्नान ॥ सत्वर तेथूनि परतोन ॥ अलकापुरीं पातला ॥८२॥
सिधोपंतासी आलिंगन ॥ दिधलें परमप्रीतीकरून ॥ तेणें साष्टांग करूनि नमन ॥ वंदिले चरण तयाचे ॥८३॥
चार रात्री तेथें राहून ॥ सिधोपंतासी बोले वचन ॥ आतां मातापितयांचें दर्शन ॥ घ्यावें ऐसें वाटतसे ॥८४॥
जरी आज्ञा द्याल मजप्रती ॥ तरी आता जाऊं सत्वरगती ॥ अवश्य म्हणूनि सिधोपंतीं ॥ तयाप्रती काय बोलिले ॥८५॥
आपुले कांतेसहवर्तमान ॥ घ्यावें वडिलांचें दर्शन ॥ आम्ही येतसों बोळवण ॥ भेटीकारणें तयांच्या ॥८६॥
मग कन्या जामात घेऊनि पाहीं ॥ सिधोपंत आले आपेगांवीं ॥ गोविंदपंतांसी लवलाहीं ॥ येऊनियां भेटले ॥८७॥
विठ्ठलें वंदोनि मातापिता ॥ क्षेम दिधलें उभयतां ॥ सिधोपंतीं साकल्य कथा ॥ वर्तमान सांगितलें ॥८८॥
ऐसी ऐकोनियां वाणी ॥ निराबाई संतोषली मनीं ॥ जेवीं जनकात्मजा पर्णोनी ॥ अयोध्येसी आला रघुनाथ ॥८९॥
मग श्रीरामसीता देखोनि दृष्टीं ॥ आनंद न माये कौसल्येपोटीं ॥ तेवीं पुत्र सून देखोनि दृष्टीं ॥ मातेसी संतोष वाटला ॥९०॥
कीं भीमसहोदर अर्जुन ॥ द्रौपदीसी आणी पण जिंकून ॥ देखोनि कुंती हर्षायमान ॥ तैसें येथें जाहलें ॥९१॥
वस्त्रें भूषणें उभयतांसी ॥ सिधोपंत देत सन्मानेंसीं ॥ आज्ञा मागोनि आळंदीसी ॥ परतोनि आले तेधवां ॥९२॥
कोणे एके दिवशीं जाण ॥ मातापिता दोघें जण ॥ देह सांडूनि वैकुंठभुवन पावतीं झालीं तेधवां ॥९३॥
संसारचिंतेचा विटाळ ॥ कदा न धरीच विठ्ठल ॥ जैसे येतां तीनी काळ ॥ समसमान सर्वांसी ॥९४॥
कीं सरिता भरूनि मिळतां देख ॥ समुद्र नव्हेचि अधिक ॥ कीं उष्णकाळीं आटतां उदक ॥ उणा कदापि दिसेना ॥९५॥
तेवीं सुखदुःखें दोनी सरसीं ॥ विठोबा लेखी निजमानसीं ॥ हें वर्तमान सिधोपंतासी ॥ कळों आलें तेधवां ॥९६॥
खेद होईल जामातास ॥ म्हणोनि घ्यावा परामर्ष ॥ मागुती आपेगांवास ॥ परतोनि आले तेधवां ॥९७॥
मग म्हणे जामातासी ॥ तुम्ही तों विरक्त उदासी । सर्व पदार्थ संसारासी ॥ नित्यानित्य पाहिजे ॥९८॥
तरी कृपा करूनि मजवरी ॥ आतां चला अलकापुरीं ॥ तुमचें चालविणार हरी ॥ परी लोकाचारीं विपरीत ॥९९॥
अवश्य म्हणतां निजकन्येसी ॥ सवें घेतलें जामातासी ॥ सिधोपंत अतिवेगेंसीं ॥ अलकावतीस पातले ॥१००॥
क्षेत्रवासीं राहतां जाण ॥ चित्तासी वाटलें समाधान ॥ नित्य करी हरिकीर्तन ॥ साधुदर्शन अहर्निशीं ॥१॥
आषाढी कार्तिकी एकादशी ॥ पंढरीस जातसे यात्रेसी ॥ बहुकाळ लोटतां तयासी ॥ संतान होतां दिसेना ॥२॥
मग विठोबा म्हणे निजकांते त्वरित ॥ उदास जाहलें माझें चित्त ॥ तरी वाराणसीस जाऊं यथार्थ ॥ संन्यासग्रहण करावया ॥३॥
ऐसें वाटतें मम मानसीं ॥ आज्ञा मागतों तुजपासीं ॥ रखमाई उत्तर नेदी तयासी ॥ चिंताक्रांत होऊनियां ॥४॥
मग पित्यापासीं येऊन त्वरित ॥ सांगितला सकळ वृत्तांत ॥ आज्ञा मागती प्राणनाथ ॥ संन्यासग्रहण करावया ॥५॥
सिधोपंत म्हणे तिजकारण ॥ पोटीं नसतां पुत्रसंतान ॥ कदा न करावें संन्यासग्रहण ॥ ऐसें वचन श्रुतीचें ॥६॥
झणीं आज्ञा देसील त्यासी ॥ ऐसें सांगतसे पिता तिसी ॥ रखुमाबाई निजचित्तासीं सावध असे सर्वदा ॥७॥
तंव कोणे एके दिवशीं ॥ विठोबा म्हणे निजकांतेसी ॥ स्नानासी जावया गंगेसीं ॥ आज्ञा द्यावी मज आतां ॥८॥
दुश्चित्तपणें असतां जाण ॥ अवश्य कांता बोले वचन ॥ समाधान मनीं पावून ॥ आनंदवनासी पावला ॥९॥
जैसा गारोड्यापासोनि नाग सुटला ॥ अरण्यांत वारुळीं प्रवेशला ॥ कीं पिंजर्‍यांतून रावा उडाला ॥ जाऊनि बैसला वृक्षावरी ॥११०॥
कीं कुटिळ्यांचे सभेंतून ॥ उठतां साधूसी समाधान ॥ कीं पतिव्रता जारिणींतून ॥ आली पळून एकांतीं ॥११॥
कीं व्याघ्रपाशांतून त्वरित ॥ कुरंग पळे अकस्मात ॥ कीं निंदकग्रामांतून संत ॥ महाक्षेत्रांत चालिला ॥१२॥
कीं रंभेपासोन शुकमुनी ॥ दूर पळाला उठोनी ॥ कीं अगस्तिऋषीचे उदरांतूनी ॥ सागर बाहेर निघाला ॥१३॥
यापरी मानूनियां समाधान ॥ वारानसीस आला जाण ॥ त्रिवेणीसंगमीं करून स्नान ॥ अनुताप मनीं धरियेला ॥१४॥
माधवपूजा करूनि जाण ॥ प्रयागासी केलें माघस्नान ॥ तेथून मागुती परतोन ॥ पुष्करासी पातला ॥१५॥
संत साधु वैष्णव जन ॥ तेथें अखंड वसती जाण ॥ गीताआख्यान करितां श्रवण ॥ संन्यासयोग ऐकिला ॥१६॥
म्हणे हा दुस्तर संसार ॥ दुर्धर माया अनिवार ॥ जन्म मरण चुके येरझार ॥ ऐसा विचार करावा ॥१७॥
मग श्रीरामाश्रम संन्यासी ॥ सद्भावें शरण गेला त्यासी ॥ संन्यासदीक्षा द्यावी मजसी ॥ म्हणोनि चरणांसी लागला ॥१८॥
तेणें पूर्वाश्रमानुसंधान ॥ विचारिलें याजकारण ॥ कांता पुत्र बंधुजन ॥ परिवार कोण असे कीं ॥१९॥
येरू म्हणे मी एकला असें ॥ दारापुत्रादि पाश नसे ॥ म्हणोनि अनुतापासरिसें ॥ स्वामीसी शरण आलों सद्भावें ॥१२०॥
संत देखोनि विरक्त ॥ अवश्य म्हणती सद्गुरुनाथ ॥ मंत्रदीक्षा देऊनि त्वरित ॥ संन्यासग्रहण संपादिलें ॥२१॥
यापरी विठ्ठलें चतुर्थाश्रम ॥ वाराणसीसी घेतला जाण ॥ परस्परें वर्तमान ॥ सिधोपंतासी श्रुत जाहलें ॥२२॥
संन्यास घेतला ऐकोनि कानीं ॥ रखुमाबाई चिंताक्रांत मनीं ॥ म्हणे प्राणनाथा मज ये वनीं ॥ टाकोनि कासया दीधलें ॥२३॥
पांडववियोगें जैसी द्रौपदी सती ॥ कीं नळवियोगें रडे दमयंती ॥ कीं हरिश्चंद्राविण तारामती ॥ दुःखानळे आहाळे ॥२४॥
सत्यवानासी येतां मरण ॥ सावित्री सांडूं पाहे प्राण ॥ कीं जयदेवाचें ऐकोनि निर्वाण ॥ पद्मावती मूर्च्छित ॥२५॥
तेवीं कानीं ऐकूनि संन्यासवार्ता ॥ रडे आक्रोशें पतिव्रता ॥ समाधान करितां मातापिता ॥ मग धैर्यें चित्ता आंवरिलें ॥२६॥
सार्थक करावें संसारीं ॥ मग अश्वत्थाची सेवा करी ॥ अनुष्ठान देखोनियां भारी ॥ जाहली बोहरी दोषांची ॥२७॥
संन्यास दिधला भ्रतारासी ॥ ते श्रीपाद आले आळंदीसी ॥ रखुमाई देखोनि त्यांसी ॥ नमस्कारासी पातली ॥२८॥
अश्वत्थाचे पारावरी ॥ श्रीपाद बैसले ते अवसरीं ॥ रखुमाई येऊनि सत्वरीं ॥ नमस्कारी सद्भावें ॥२९॥
अष्टपुत्रा सौभाग्यवती ॥ आशीर्वाद दिधला तिजप्रती ॥ ऐसें ऐकोनियां चित्तीं ॥ परम आश्चर्य वाटलें ॥१३०॥
रखुमाबाई हांसतां चित्तासी ॥ श्रीपाद पुसती तियेसी ॥ म्हणती माते विनोद तुजसी ॥ किमर्थ चित्तीं वाटला ॥३१॥
म्हणे सौभाग्यदायक पुत्रवती ॥ आशीर्वाद दिधला मजप्रती ॥ तो भ्रताराविण सुफळ निश्चितीं ॥ कैसा होईळ यतिराया ॥३२॥
भ्रतारें सांडोनि मजकारण ॥ अनुतापें केलें संन्यासग्रहण ॥ तुम्हीं दिधलें आशीर्वचन ॥ म्हणोनि चित्तीं विकल्प ॥३३॥
अग्निकुंडांत पेरिलें बीज ॥ कीं खडकीं वर्षला मेघराज ॥ तेवीं आशीर्वाद देतां मज ॥ नाहीं कांहीं विचारिलें ॥३४॥
अंधासी दाविला दर्पण ॥ कीं बधिरापुढें केलें गायन ॥ कीं रोगियासी वाढितां पक्वान्न ॥ विचार मनें न करितां ॥३५॥
इंधन नसतां अग्नि फुंकिला ॥ कीं स्नेहेंविण दीप सरसाविला ॥ कृपणावरी शब्द टाकिला ॥ याचकें जैसा व्यर्थचि ॥३६॥
वर्षला नसतां मेघराज ॥ व्यर्थचि भूमींत पेरिलें बीज ॥ कीं आयुष्य नसतां रसराज ॥ वैद्यें कासया पाजावा ॥३७॥
चंद्रबळ नसतां वधूकारण ॥ ज्योतिषें कासया दिधलें लग्न ॥ कीं अस्ता गेलिया दिन ॥ मग अर्ध्यदान कासया ॥३८॥
तेवीं ध्यानीं नाणितां कर्मगती ॥ आशीर्वाद दिधला मजप्रती ॥ असत्य नोहे हे वचनोक्ती ॥ विनोद चित्तीं वाटला ॥३९॥
ऐसें बोलतां रखुमाबाई ॥ आश्चर्य वाटलें श्रीपादासी ॥ म्हणे संन्यासग्रहण देणारासी ॥ प्रायश्चित्त देणें लागेल ॥१४०॥
तरुण स्त्री संतानहीन ॥ टाकूनि घेतां संन्यासग्रहण ॥ तरी गुरु शिष्य दोघांकारण ॥ शास्त्रीं दंड बोलिला ॥४१॥
खाणखूण पुसतां निवाडें ॥ तों शब्द येतसे आपणाकडे ॥ म्हणे पुसावयासी गेलों सांकडें ॥ तों वेहरण मजकडे आलें कीं ॥४२॥
कलंक असता निजांगासी ॥ चंद्रमा हांसे तारागणांसी ॥ कीं क्षारत्व असोनि सागरासी ॥ शब्द गंगेसी ठेवीत ॥४३॥
कीं कडवट मुख असतां पाहीं ॥ पक्वान्नासी शब्द ठेवी ॥ कीं गर्भांधासी दृष्टि नाहीं ॥ आणि भानूसी दोष ठेवीतसे ॥४४॥
सरळ नासिक आपुलें नसतां ॥ आरशावरी कोपतो वृथा ॥ कीं दीपकाखालीं अंधार असतां ॥ प्रकाश दावी आणिकासी ॥४५॥
तेवीं आम्हीच केलें अनुचित ॥ आणिकासी शब्द ठेवितां व्यर्थ ॥ आतां इच्या दोषें सुकृत ॥ विलया जाईल वाटतें ॥४६॥
रखुमाईस पुसे ते क्षणीं ॥ तुझीं आप्त असती कोणी ॥ येरी उभी कर जोडोनी ॥ नम्र वचनें बोलत ॥४७॥
माता पिता बंधु बहिणी ॥ सर्व आहेत मजलागुनी ॥ परी भ्रतारवियोगें ये जनीं ॥ निढळवाणी दिसतसें ॥४८॥
मग आज्ञापिलें श्रीपादें तियेतें ॥ पित्यासी पाचारूनि आणीं येथें ॥ गह्रा जाऊनि त्वरितें ॥ सिधोपंतासी आणिलें ॥४९॥
दृष्टीं देखोनी यतीश्वर ॥ घाली साष्टांग नमस्कार ॥ अर्ध्य पाद्य पूजा उपचार ॥ भोजन सत्वर सारिलें ॥१५०॥
पुसे उभा कर जोडून ॥ कोठोनि स्वामीचें आगमन ॥ पुढारें कोठवरी आहे गमन ॥ मजकारणें सांगिजे ॥५१॥
श्रीपाद बोलती ते अवसरीं ॥ आमुचा आश्रम काशीपुरीं ॥ हेत धरूनि रामेश्वरीं ॥ दक्षिणदेशा पातलों ॥५२॥
तों तुमचे आत्मजेनें येथ ॥ सकळ सांगितला वृत्तांत ॥ आतां वाराणसीस त्वरित ॥ परतोनि जाणें लागेल ॥५३॥
श्रीपाद म्हणती शास्त्रयुक्त ॥ इच्या दोषें आमुचें सुकृत ॥ विलया जाईल समस्त ॥ म्हणोनि सत्वर परतावें ॥५४॥
रखुमाबाईस सवें घेऊनी ॥ तुम्ही चलावें आनंदवनीं ॥ ऐसें म्हणतां तये क्षणीं ॥ सिधोपंत चरणीं लागले ॥५५॥
म्हणती तुम्ही दयावंत ॥ शीघ्र कीजे गमनार्थ ॥ कन्येसी घेऊनि त्वरित ॥ सिधोपंत निघाले ॥५६॥
मग जाऊन वाराणसीसी ॥ श्रीपाद गेले आश्रमासी ॥ पाचारून चैतन्यासी ॥ पूर्व वृत्तांत पुसिला तेव्हां ॥५७॥
गृहस्थाश्रमीं तुज होती कांता ॥ किंवा नव्हती सांग आतां ॥ आम्हांपासीं असत्य बोलतां ॥ उरी सर्वथा न ठेवीं ॥५८॥
सत्य सांगावें मजप्रती ॥ म्हणोनि अभय दिधलें हातीं ॥ ऐकोनि चैतन्य सद्गुरूप्रती ॥ प्रतिउत्तर देतसे ॥५९॥
जैसें बाळक अपराध करित ॥ सक्रोध जननी त्यासी पुसत ॥ तें भीतभीत मातेसी सांगत ॥ त्यापरी बोलत सद्गुरूसी ॥१६०॥
कीं प्रजेनें अनुचित कर्म केलें ॥ शिक्षा करून रायें पुसिलें ॥ मग भीतभीत बोलती वर्तलें ॥ तैसेंचि झाले चैतन्या ॥६१॥
नातरी कुपथ्य करी रोगी जाण ॥ वैद्य पुसे क्रोधायमान ॥ मग व्याधिभयें वर्तमान ॥ सत्य वदे रोगी जैसा ॥६२॥
कीं कनिष्ठस्नुषा करितां घरचार ॥ शिकवणींत पडलें कांहीं अंतर ॥ सासूसी कंअतां समाचार ॥ भयेंकरून जेवीं सांगे ॥६३॥
तेवीं शाप देईल यतीश्वर ॥ म्हणोनि अंतरीं भय थोर ॥ भीतभीत प्रत्युत्तर ॥ सद्गुरूसी देत तेधवां ॥६४॥
म्हणे तरुण कांता संतानहीन ॥ सत्यचि टाकूनि आलों जाण ॥ श्रीपादें ऐकोनियां वचन ॥ रखुमाईस बोलाविलें ॥६५॥
चैतन्यासी सांगे ते अवसरीं ॥ निजकांतेचा अंगीकार करीं ॥ स्वदेशा जाऊनि सत्वरीं ॥ स्वधर्माचारीं वर्तावें ॥६६॥
अविधि कर्माचें भय मानिसी ॥ विकल्प चित्तीं झणीं धरिसी ॥ माझी आज्ञा प्रमाण तुजसी ॥ हृषीकेशी साह्य तुज ॥६७॥
ऐसा आशीर्वाद होतां जाण ॥ चैतन्यानें वंदिले चरण ॥ निजकांतेसी हातीं धरून ॥ स्वदेशासी चालिला ॥६८॥
अगस्तीची आज्ञा वंदोनि शिरीं ॥ विंध्याचळ पडला पृथ्वीवरी ॥ तेवीं सद्गुरूचें वचन मान्य करी ॥ चैतन्य सत्वरी निघाला ॥६९॥
कन्या जामात दोंघेंजण ॥ सिंधोपंत आले घेऊन ॥ वर्तमान ऐकतां तेथील जन ॥ हांसती पिशुन सकळिक ॥१७०॥
म्हणती संन्यास घेतलियावरी ॥ कैसा झाला घरचारी ॥ एक म्हणती दोष पदरीं ॥ म्हणोनि विपरीत जाहलें ॥७१॥
एक म्हणती विषयलंपट ॥ एक म्हणती कृपण कंटक ॥ एक म्हणती याचें मुख ॥ पाहूं नये सर्वथा ॥७२॥
आधीं सुधारस घेऊन ॥ मग केलें मद्यपान ॥ तेवीं संन्यासदीक्षा त्यागोन ॥ झाला निमग्न प्रपंचीं ॥७३॥
कीं आधीं वेदांत अभ्यासिले ॥ मग कोकशास्त्र हातीं धरिलें ॥ तेवीं वैराग्य टाकूनि बळें ॥ परतला प्रपंचदुःखांत ॥७४॥
सांडोनि विष्णूचें उपासन ॥ मग वेताळ साधूनि केला प्रसन्न ॥ कीं पहिला क्षेत्रवास टाकून ॥ राहिला येऊन कुग्रामीं ॥७५॥
टाकूनि विप्रांची संगती ॥ अनामिकांसी लाविली प्रीती ॥ तेवीं वैराग्यलाभ टाकूनि निश्चितीं ॥ प्रपंचभ्रांतीं पडियेला ॥७६॥
यापरीं निंदिती सकळ जन ॥ परी चैतन्यासी चित्तीं समाधान ॥ जेवीं पर्वतावरी वर्षतां घन ॥ न जाय वाहून कदापि ॥७७॥
दंदशूकाचे भयेंकरून ॥ गरुड न जाय जैसा उडोन ॥ कीं श्वान भुंकतां जैसा वारण ॥ चित्तीं उद्विग्न नव्हेचि ॥७८॥
ऐकोनि समुद्राची गर्जना ॥ अगस्ती भय न धरी मना ॥ कीं खद्योततेज देखोनि नयना ॥ गभस्ती चिंता न धरीच ॥७९॥
तेवीं जननिंदेचे येतां लोट ॥ शांतिउदरीं भरी घोंट ॥ कामक्रोधांची मोडिली वाट ॥ करणी अचाट निरुपम ॥१८०॥
द्विजीं घातलें वाळींत ॥ आप्तवर्गीं सांडिलें त्वरित ॥ खोपट बांधोनि अरण्यांत ॥ कांतेसहित राहिला ॥८१॥
कुटुंबपोषणाकारण ॥ भिक्षा मागोनि मेळवी अन्न ॥ रात्रंदिवस नामस्मरण ॥ नाहीं खंडन क्षणमात्र ॥८२॥
गीताभागवत श्रवण मनन ॥ अखंड चित्तीं समाधान ॥ ऐसीं द्वादश वर्षें लोटतां जाण ॥ पोटीं संतानें जाहलीं ॥८३॥
तिघे पुत्र कन्या एक ॥ ऐसी संतती होतां देख ॥ ऐकतां नामें सकळिक ॥ होती पावन जडमूढ ॥८४॥
प्रथम अवतार मृडानीपती ॥ त्याचें नाम ठेविलें निवृत्ती ॥ विष्णु अवतार जन्मला क्षितीं ॥ तया म्हणती ज्ञानदेव ॥८५॥
विरिंचीअवतार सोपान ॥ आदिमाया मुक्तारूपें जाण ॥ होतांचि वाटलें समाधान ॥ रखुमाबाईस तेधवां ॥८६॥
पुढिले अध्यायीं सुरस कथा ॥ ते सादर परिसावी सभाग्यश्रोतां ॥ जेवीं चकोर चंद्रामृत सेवितां ॥ एकाग्रचित्तें पाहाती ॥८७॥
नातरी नादलुब्ध मृग होऊनी ॥ देहभान जाय विसरूनी ॥ तयाचि रीतीं श्रोतेजनीं ॥ सादर कर्णीं ऐकावें ॥८८॥
कीं तृषा लागतां चातकासी ॥ जलधर वर्षे स्वइच्छेसीं ॥ तेवीं आवडी धरूनि चित्तासी ॥ कथा नवरसी ऐकावी ॥८९॥
अहो भक्तकथा अनिर्वाच्य गहन ॥ वदवीतसे रुक्मिणीरमण ॥ जेवीं मृदंगातूनि निघे ध्वन ॥ परी वाजविल्याविण वाजेना ॥१९०॥
तेवीं चर्मवेष्टित हें वक्त्र ॥ परी ग्रंथ राजीवनेत्र ॥ महीपति उगा निमित्तमात्र ॥ संत सज्ञान जाणती ॥९१॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ अष्टमाध्याय रसाळ हा ॥१९२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गुरुवारी गजानन महाराजांच्या भक्तांना पाठवा हे भावपूर्ण संदेश Gajanan Maharaj Status Guruvar

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

आरती गुरुवारची

गुरुवारी नृसिंह मंत्र जपा, जीवनातील पाप नाहीसे होतील

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments