Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चीन भारताला कमकुवत समजतो का? तवांग झटापटीनंतर तयार झालेले 6 प्रश्न

Webdunia
गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (09:08 IST)
- दिलनवाज पाशा
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. भारत आणि चीननं एकमेकांवर आपल्या भूभागावर हस्तक्षेप केल्याचा आरोप केला.
 
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत याबाबत माहिती दिली.
 
राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, चिनी सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांग्त्से भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आक्रमक करून, तिथल्या स्थितीत एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैनिकांनी हे प्रयत्न मोडून काढले.
 
राजनाथ सिंह यांच्या माहितीनुसार, या झटापटीत कुठल्याही भारतीय सैनिकाचा मृत्यू झाला नाही आण कुणीही गंभीर जखमी झाला नाही.
 
अरुणाचल प्रदेशात भारत आणि चीनच्या सीमेमध्ये स्पष्टता नाहीय. दोन्ही देश आपापले वेगवेगळे दावे करतात.
 
चीन अरुणाचल प्रदेशात 90 हजार वर्ग किलोमीटर भूभागावर चीन दावा करतं, तर भारताच्या दाव्यानुसार, चीननं पश्चिमेकडील अक्साई चीनच्या 38 हजार वर्ग किलोमीटर भागावर अवैधरित्या कब्जा केलाय.
 
आताची झटापटीची घटना 9 डिसेंबर 2022 रोजी घडली. मात्र, भारतीय माध्यमांमध्ये 12 डिसेंबरला समोर आली, त्यानंतर 13 डिसेंबरलार जनाथ सिंह यांनी संसदेत याबाबत माहिती दिली.
 
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्य निवेदनानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, स्थिती सध्या नियंत्रणात आहे आणि चीन भारताला आवाहन करतं की, दोन्ह देशांनी सीमांच्या करारांचं पालन करावं.
 
1) भारतीय माध्यमांसारखी चिनी माध्यमांमध्येही चर्चा होतेय का?
चीनच्या लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, “पीएलएचं वेस्टर्न थिएटर कमांड प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चिनी भूभागावर नियमित पेट्रोलिंग करत होतं. त्याचवेळी, भारतीय सैनिक चीनच्या भागात आले आणि चिनी सैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला.”
 
भारत आणि चीननं दोघांनीही एकमेकांवर आपल्या भूभागात घुसखोरी केल्याचा आरोप केलाय.
 
चीनकडून या झटापटीच्या घटनेवर चार दिवसांनंतर प्रतिक्रिया आली.
 
गलवानमध्ये जेव्हा भारत आणि चीनमध्ये झटापट झाली होती, तेव्हाही भारतानं निवेदन देईपर्यंत चीनकडून काहीच सांगण्यात आलं नव्हतं.
 
चीन अशाप्रकारे माहिती देण्यास विलंब का करतं, असा प्रश्न आम्ही लंडनमधील वेस्टमिंस्टर विद्यापीठातील प्रोफेसर आणि चीनसंबंधित विषयांचे जाणकार दिब्येश आनंद यांना विचारला.
 
त्यांच्या मते, “चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीचं माध्यमांवर प्रचंड नियंत्रण आहे आणि तिथली माध्यमं संवेदनशील समजल्या जाणाऱ्या विषयांवर घाईघाईनं वृत्तांकन करत नाहीत. जोपर्यंत एखाद्या मुद्द्यावर कम्युनिस्ट पार्टी भूमिका स्पष्ट करत नाही, एकमत होत नाही, तोपर्यंत माध्यमं वृत्तांकन करत नाहीत. चीनमधील सर्व माध्यमं अशाच प्रकारची आहेत.”
 
भारतात या झटापटीवर संसदेत चर्चा झाली. विरोधी पक्ष केंद्र सरकारवर टीका करून प्रश्न उपस्थित करत आहेत.
 
भारतीय माध्यमांमध्येही या मुद्यानं बरीचशी जागा व्यापलीय. मात्र, चीनमध्ये तसं नाहीय. चीनमधील माध्यमांमध्ये हे वृत्त जवळपास नसल्यासारखेच आहे.
 
एकतर चीनमध्ये विरोधी पक्ष नाहीय, त्यामुळे कुणी या मुद्द्यावर प्रश्नही उपस्थित केले नाहीत.
 
प्रो. आनंद म्हणतात की, “चीनच्या भू-राजनैतिक समीकरणांमध्ये भारत इतका महत्त्वाच हीय, जितका भारतासाठी चीन महत्त्वाचा आहे. त्यामुळेच अशा घटनांवर भारतात ज्या तीव्रतेने चर्चा सुरू होते, तशी चीनमध्ये होत नाही.”
 
2) जुनाच वाद चीन पुन्हा वाढवत आहे का?
भारतीय संरक्षण तज्ज्ञांच्या मते, चीन जाणीवपूर्वक सीमेवर भारतासोबत तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय.
 
भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक म्हणतात की, “यांग्त्से हा भाग तवांगपासून 25 किलोमीटर उत्तरेकडे 11 ते 12 हजार फूट उंचीवर आहे. खूप वर्षांपासूनच हा भाग वादग्रस्त आहे. 1990 च्या दशकात जेव्हा भारत आणि चिनी अधिकाऱ्यांनी चर्चा सुरू केली होती, तेव्हा या भागाला वादग्रस्त भाग म्हणून मानलं गेलं होतं.
 
“मी लष्करप्रमुख असताना जुलै 1999 मध्ये चीनने यांग्त्सेमध्ये ठाण मांडून बसण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही संघर्ष केला आणि त्यांना माघारी पाठवलं. मात्र, आता गलवान घटनेच्या अडीच वर्षांनंतर पुन्हा झटापट झालीय, तीही अशा वेळी जेव्हा दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी स्तरावर आणि सैन्याच्या स्तरावर चर्चा होत आहे.
 
“यावरून हे लक्षात येतं की, चीनने आपली भूमिका बदलली नाहीय आणि सीमेवरील त्यांचा वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न सुरूच आहे. चीन आताही दावा करत असलेल्या या भागावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करतंय. गलवानच्या नंतर भारत आणि चीन दोन्ही देशांनी सीमेवरील सैनिकांची संख्या वाढवली होती. यामुळे तणावही वाढला आहे.”
 
जनरल मलिक यांच्या मते, “चीन यापुढेही भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतच राहील. टॅक्टिकल स्तरावर भारत आणि चीन समोरा-समोर बसलेले तर असतील. चीनचं भारतावरील दबाव तसाच आहे आणि पुढे वाढतच जाईल.
 
“चीनकडून झटापटींसारख्या घटनांच्या माध्यमातून भारताला उकसवण्याचे प्रकार सुरूच राहतील. अशा छोट्या-छोट्या घटना मोठं स्वरूप घेऊ शकतात आणि भारताला यासाठी तयार व्हावं लागेल.”
 
3) चीन भारताला ताकदवान मानतं की कमकुवत?
भारतीय लष्करातील माजी लेफ्टनंट जनरल शंकर प्रसाद म्हणतात की, “भारतचे चीनसोबत दोन विशेष करार आहेत, ज्यांचा उद्देश सीमेवर शांतता राखणं आहे. असं असूनही सीमेवर शांतता राखली जात नाहीय. गवानची घटना झाली, त्यापूर्वी डोकलाममध्ये घटना झाली होतीआणि आता तवांगमध्ये घटना घडलीय.
 
याचं कारण हे आहे की, चीन भारताला कमकुवत समजतं आणि चीनला वाटतं की, आमच्या हिशेबानंच सीमा ठरवू. मात्र, आता काळ बदललाय. आता भारत चीनसमोर झुकत नाही.”
 
त्याचवेळी आंतरराष्ट्रीय विषयांच्या जाणकार आणि ‘ड्रॅकन ऑन अवर डोअरस्टेप : मॅनेजिंग चायना थ्रू मिलिट्री पॉवर’ या पुस्तकाच्या सहलेखिका गजाला वहाब म्हणतात की, “भारत आणि चीन दोन्ही देश एकमेकांना प्रतिस्पर्धी मानतात आणि एकमेकांशी संघर्ष करत आहेत.
 
मात्र, चीन भारताला आपला स्पर्धक मानत नाही. चीनला वाटतं की, भारताकडे चीनचा सामना करण्याची ताकद नाही. मात्र, भारताला वाटतं की, आम्ही ताकदवान आहोत आणि दक्षिण आशियाचा सर्वात मोठी ताकद म्हणून आम्हाला मानलं जावं.
 
“चीन भारताच्या याच गोष्टीचा स्वीकार करत नाही. चीनला वाटतं की, ते जगातील सर्वात मोठी ताकद असलेल्या अमेरिकेचा सामना करत आहेत. अशावेळी भारताचा तर आम्ही सहज सामना करू शकतो. याचमुळे चीन सातत्यानं आपण भारतापेक्षा श्रेष्ठ आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करतंय.”
 
4) तवांगमधील झटापटीमागे चीनची रणनिती आहे का?
भारतीय विश्लेषकांना वाटतं की, “चीन आणि भारतामध्ये झालेली झटापट अचानक झाली नाहीय. यामागे चीनची रणनिती असू शकते.”
 
जनरल व्ही. पी. मलिक म्हणतात की, “असं वाटतंय की, चीन हे सर्व जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक करतंय. जोपर्यंत सीमावाद मिटणार नाही, तोपर्यंत असंच चालत राहील. जोपर्यंत चीन एलएसीला स्वीकारत नाही, तोवर झटापटी सुरूच राहतील.”
 
गजाला वहाब म्हणतात की, “हा सर्व चीनच्या योजनेचा भाग आहे. चीन योजनेविना काहीच करत नाही. चीनचं धोरण आहे की, आपल्या शत्रूविरोधात पूर्ण तयारीनिशी लढायचं. चीन आक्रमकपणे किंवा कुणी उकसावल्यानं काहीच करत नाही. त्यामुळे तवांगमध्ये जे काही झालंय, ते चीननं जाणीवपूर्वकच केलं असेल.”
 
त्याचवेळी दिल्लीस्थित पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रोफेसर आणि चीनविषयक जाणकार अलका आचार्य यांचं मत थोडं वेगळं आहे.
 
अलका आचार्य म्हणतात की, “मला नाही वाटत की, या घटनेच्या वेळेला विशेष महत्त्व आहे. गेल्या 15 वर्षात कुठली ना कुठली घटना घडतेय. प्रत्येक गोष्टीकडे कट-कारस्थानाच्या दृष्टीने पाहणं योग्य नाही. ‘लाईन ऑफ कंट्रोल’वरून दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. तिथे सैनिक तैनात असतात. अशावेळी तिथे ते समोरा-समोर येऊन झटापटीच्या घटना घडण्याची शक्यता कायम राहणारच.”
 
“चीनचे राष्ट्राध्यक्षी शी जीनपिंग त्यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीवरून विरोधाचा सामना करतायेत. परिणामी ते बॅकफूटवर गेलेले दिसतायेत. त्यामुळे असंही मानलं जातंय की, सीमेवर तणावामागे अंतर्गत विषयावरून हटवण्याचाही प्रयत्न आहे.”
 
मात्र, अलका आचार्य यांचा हा तर्क अनेक विश्लेषक फेटाळतात. प्रोफेसर दिब्येश आनंद म्हणतात की, “शी जीनपिंग यांच्या झिरो कोव्हिडसंदर्भातील धोरणाच्या अनुषंगाने सीमावादाकडे पाहणं योग्य नाही. सीमेवर सैनिकीकरण वाढतंय आणि स्थानिक, तसंच क्षेत्रीय स्तरावर निर्णय घेण्याची काही ठोस कारणं असतील.”
 
5) चीनला भारत उत्तर देतंय का?
भारतानं सीमेवरील सैनिकांची संख्या वाढवलीय. तसंच, सुरक्षेचं कवच आणखी मजबूत केलंय.
 
विश्लेषकांच्या मते, आता सीमेवरील परिस्थिती बदलली आहे आणि भारतीय सैन्य चीनच्या रणनितीला उत्तरही देत आहे.
 
माजी लेफ्टनंट जनरल शंकर प्रसाद म्हणतात की, “ही घटना अचानक आहे. यामागे योजना आहे. चीन योजना आणि आकलनानंतरच असं करतं. जर त्यांना भारत कमकुवत दिसत नसेल, तर ते भारतीय भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न करतात. ते हळूहळू पुढे सरकतात. मात्र, आता काळ बदलला आहे. भारताकडे सर्व्हेलंस तंत्रज्ञान, सॅटेलाईट फोटो आहेत. अशावेळी चीनच्या हालचाली भारताच्या नजरेत येतात आणि मग अशा घटना होतात.
 
“आता असं होणार नाही की, चीन अचानक तवांगमध्ये घुसेल. कारण आता चीन असा प्रयत्न करेल, तर भारताकडूनही सडेतोड उत्तर दिलं जाईल. भारताचे लष्कर, राजकीय नेतृत्त्व, उंचीवर लढण्याची लष्कराची क्षमता या गोष्टी आता जमेच्या आहेत. चीन निश्चितपणे योजनेनुसार आलं होतं, मात्र भारताने त्यांना उत्तर दिलं आणि भारतीय सैनिकांनी त्यांना उत्तर दिलं, तसंच सैनिकांना जखमीही केलं.”
 
भारत आणि चीनमध्ये जेव्हा अशाप्रकारच्या घटना होतात, तेव्हा भारतीय माध्यमांमध्ये दावे केले जातात की, भारताने चीनला सडेतोड उत्तर दिलं आणि भारताची ताकद पाहून चीन भयभीत झालाय.
 
पत्रकार गजाल वहाब म्हणतात की, “चीन भारताला घाबरल्याचे दावे योग्य नाहीत. भारत अमेरिकेच्या भरवश्यावर चीनला आव्हान देतंय. या धोरणाचा फटका भारताला बसू शकतो. कारण भारताजवळ चीनचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक आर्थिक ताकद, तंत्रज्ञान आणि लष्करी ताकद नाहीय.
 
भारत तंत्रज्ञान आणि लष्करी ताकदीसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. अर्थव्यवस्थेबाबतही चीन भारताच्या पुढे आहे. अशावेळी चीनला आव्हान दिल्यास भारतासमोरच्या अडचणी वाढतील.”
 
6) भारत-चीनच्या सीमावाद आणखी चिघळेल का?
भारत आणि चीन हे दोन्ही देश आशियातील महत्त्वाचे देश आहेत आणि लष्करीदृष्ट्याही ताकदवान आहेत. दोन्ही देशांमध्ये दक्षिण आशियात वर्चस्व वाढवण्यासाठी स्पर्धा दिसून येते.
 
भारताची अधिकृत भूमिका आहे की, जोपर्यंत सीमेवरील तणाव शांत होत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारणार नाही.
 
जून 2020 मध्ये गलवानमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली.
 
त्यावेळी दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. सीमेवर दोन्ही देशांनी सैनिकांची संख्या वाढवली होती.
 
विश्लेषकांच्या मते, भारत आणि चीनमधील तणाव आता आणखी वाढू शकतो.
 
जनरल व्ही. पी. मलिक म्हणतात की, “टॅक्टिकल स्तरावर तर भारत-चीन समोरा-समोर बसले आहेत. चीन भारतावर दबाव वाढवत आहे आणि पुढेही ते तसंच करत राहतील. चीनकडून उकसवणाऱ्या कारवाया केल्या जातील आणि भारताला उत्तरही द्यावं लागेल. अडचण अशी आहे की, या छोट्या-छोट्या घटना मोठ्या रूप घेऊ शकतात आणि भारताला त्यासाठी तयार राहावं लागेल.”
 
भारत आणि चीन अशा दोन्ह देशात राष्ट्रवाद जोर पकडत आहे.
 
अंतर्गत राजकारणामुळेही सीमेवरील तणावाला वाढवू शकतं.
 
विश्लेषकांच्या मते, सीमेवरील स्थिती शांत करण्यात प्रामाणिक प्रयत्नांचीही कमतरता आहे.
 
प्रो. दिब्येश आनंद म्हणतात की, “जोपर्यंत या प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणाची कमतरता असेल, तोवर ठोस पावलं उचलली जाणार नाहीत. दोन्ही देशांमधील प्रखर राष्ट्रवादामुळे स्थिती शांत होण्यास अडचण आहे.”
 
तर प्रोफेसर अलका आचार्य म्हणतात की, “परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतंच म्हटलंय की, जोपर्यंत सीमेवरील स्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंधी सामान्य होणार नाहीत. हे स्पष्ट आहे की, दोन्ही देशांमध्ये सीमेवरून वाद आहे.”
 
तवांगच्या घटनेनंतर दोन्ही देशांमधी तणाव गलवाननंतर वाढलं तसा वाढला नाहीय. गलावनमध्ये भारताने भूभाग गमावला. मात्र, तवांगमध्ये असं काही झालं नाहीय.
 
तवांगमध्ये दोन्ही देशांमधील सैनिकांची झटापट झालीय. त्यानंतर शांतताही प्रस्थापित झाली. तवांगमध्ये चीनने भारताच्या भूभागावर कब्जा केला नाहीय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

आश्चर्यकारक! माणसाने गिळली जिवंत कोंबडी, जीव गुदमरुन मृत्यु

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण, गुन्हा दाखल

अमित शहांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर संतापले, म्हणाले- भाजपची जुनी मानसिकता समोर आली

LIVE: मुंबईत सीबीआयची धाड,भ्रष्टाचार प्रकरणी दोन आयआरएससह 7 जणांना अटक

मुंबई बोट दुर्घटना: बचाव कार्यात हेलिकॉप्टर गुंतले, 77 प्रवाशांची सुटका, 2 ठार

पुढील लेख
Show comments