Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इम्रान खान यांच्यावर गोळीबार, थोडक्यात बचावले, एकाचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (12:42 IST)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक ए इन्साफ या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यात थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या रॅलीदरम्यान गोळीबार झाला. या हल्ल्यात इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या पक्षाने दिली आहे.
 
या हल्ल्यादरम्यान एका जणाचा मृत्यू झाला आणि 8 जण जखमी झाल्याची माहिती वजिराबाद सरकारी रुग्णालयाने दिली आहे.
 
पाकिस्तानातील पंजाब राज्यात असलेल्या गुजरानवाला या ठिकाणी इम्रान खान यांची रॅली होती. आज रॅलीचा सातवा दिवस होता. या रॅलीदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला.
 
या हल्ल्याची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही. तसंच हल्लेखोराचा काय उद्देश होता हेसुद्धा स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
 
घटनेसाठी हे तीन नेते जबाबदार - पीटीआय
या हल्ल्यासाठी देशाचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृह मंत्री राणा सनाउल्लाह आणि मेजर जनरल फैसल हे तिघे जण जबाबदार आहेत असं पीटीआयचे नेते असद उमर यांनी म्हटले आहे.
गुरुवारी ( 3 नोव्हेंबर) संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमध्ये त्यांनी सांगितले की इम्रान खान यांच्या वतीने आम्ही हे वक्तव्य करत आहोत.
 
"इम्रान खान यांच्याकडे या हल्ल्याबाबतची कल्पना होती, त्याच आधारावर इम्रान खान यांनी हा दावा केला आहे," असे उमर यांनी म्हटले आहे.
 
"इम्रान खान यांची मागणी आहे की या तिघांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा त्यांच्याविरोधात निदर्शनं केली जातील.
 
हल्लेखोराला अटक, पण अद्याप काहीही बोलला नाही
पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरात जिल्हा पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. या विभागाचे पोलीस अधिकारी अख्तर अब्बास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की सरकारतर्फे इम्रान खान यांना भाषणासाठी व्यासपीठ आणि बुलेटप्रुफ काचांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते पण ते पाळले गेले नाही.
 
हल्लेखोराने अद्यापही काहीही जबाब दिलेला नाही असं अब्बास यांनी सांगितलं.
 
कंटनेरजवळ झाला गोळीबार
इम्रान खान ज्या कंटेनरमधून प्रवास करत होते त्या कंटेनर जवळ हा गोळीबार झाला.
 
या गोळीबारानंतर इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात होती. या हल्ल्यानंतर इम्रान खान पहिल्यांदाच सर्व जनतेसमोर आले असून त्यांना सर्वांना अभिवादन करत असल्याचे दिसत आहे.
 
तेहरीक ए इन्साफ या इम्रान खान यांच्या पक्षाच्या अधिकृत हॅंडलने इम्रान यांचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि इम्रान यांची प्रकृती स्थिर आहे असं म्हटले आहे.
 
नेमकं काय घडलं?
पीटीआयचे सरचिटणीस असद उमर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे की इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांना लाहोर येथे नेण्यात आले आहे.
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन चार जण जखमी झाले असून पोलिसांनी एका व्यक्तीला घटनास्थळाहून ताब्यात घेतले आहे.
इम्रान खान यांच्या पक्षातील नेते डॉ. यास्मिन रशीद यांनी बीबीसी प्रतिनिधीला सांगितले आहे की इम्रान खान यांना दुखापत झाली आहे.
या हल्ल्यात खासदार फैसल जावेद हे देखील जखमी झाले आहेत.
 
त्याच व्यक्तीने गोळी चालवली की नाही याबाबत पोलिसांनी अद्याप काहीही निश्चित माहिती दिलेली नाही.
इम्रान खान यांच्या तेहरीक ए इन्साफ या पक्षाची यात्रा सुरू आहे. या यात्रेचा हा सातवा दिवस आहे.
 
घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकाराने सांगितलं काय घडलं?
पब्लिक न्यूजचे कॅमेरामन तौसिफ अक्रम यांनी घटनास्थळी काय घडले हे सांगितले.
 
की ते ही रॅली कव्हर करण्यासाठी आले होते. जेव्हा ते पीटीआयचे स्थानिक नेते असलम इकबाल यांची मुलाखत घेत होते तेव्हाच त्या ठिकाणी अचानक गोंधळ उडाला.
"लोक ओरडू लागले होते, काही लोक रडू लागले होते. खान साहेबांना गोळी लागली असा आवाज येऊ लागला. जेव्हा आम्ही त्या कंटेनरजवळ पोहोचलो तेव्हा पाहिले की खान साहेबांच्या पायाला गोळी लागली होती. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना देखील गोळ्या लागल्या होत्या आणि रक्त वाहताना दिसत होतं. कंटेनरला देखील गोळ्या लागल्या होत्या," असं तौसिफ यांनी सांगितले.
"नंतर लोकांनी इम्रान खान यांना उचलले आणि प्रोटोकॉलनुसार व्हॅनमधून नेले," तौसिफ यांनी सांगितले.
 
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी केला निषेध
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
 
"या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश गृहमंत्र्यांने मी दिले आहे," असं शरीफ यांनी सांगितले.
 
इम्रान खान यांची प्रकृती लवकरात लवकर चांगली व्हावी अशी मी प्रार्थना करतो. केंद्र सरकार सर्वप्रकारे सुरक्षेसाठी आणि चौकशीसाठी सहकार्य करेल. या देशात हिंसेच्या राजकारणाला जागा नाही असे शरीफ म्हणाले.
 
भारताची प्रतिक्रिया
पत्रकार परिषदेदरम्यान भारतीय परराष्ट्र खात्याला या हल्ल्याबाबतची प्रतिक्रिया मागितली असता परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत.
एप्रिल 2022 मध्ये इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानातील संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्यानंतर त्यांचे सरकार कोसळले. त्यानंतर पाकिस्तानात शाहबाज शरीफ यांचे सरकार आले.
 
इम्रान खान यांचा प्रवास
माजी कर्णधार असलेल्या इम्रान खान यांचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. पाकिस्तानात राजकीय व्यक्तिमत्वाच्या बरोबरीने ते क्रिकेट सेलिब्रिटी आहेत.
 
पाकिस्तानला त्यांनी 1992 साली क्रिकेट वर्ल्डकप जिंकवून देण्याबद्दल ते ओळखले जातात. पाकिस्तानचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन म्हणूनही त्यांची ओळख आहे.
इम्राननी 1996 मध्ये PTI पक्ष स्थापन केला आणि राजकारणात प्रवेश केला. पण त्यांना राजकारणात दखल घेण्याजोगं यश संपादन करण्यासाठी 2013 साल उजाडावं लागलं. त्यावर्षीच्या निवडणुकांमध्ये PTI तिसरा मोठा पक्ष म्हणून समोर आला. पहिले दोन पक्ष होते, पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ शरीफ) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP).
 
असं नेहमीचं म्हटलं जातं की, इम्रान यांना लष्कराचा छुपा पाठिंबा होता. त्यांचे राजकीय विरोधक त्यांना कायम लष्कराचा 'लाडका' म्हणून संबोधतात. पण इम्रान यांनी आपल्या पार्टीच्या लोकप्रियतेमागे लष्कराचा काहीही हात नाही, असं स्पष्ट केलं आहे.
 
आपल्या पक्षाला 2018 निवडणुकांसाठी मैदान खुलं करून दिलं याचाही त्यांनी इन्कार केला आहे.
 
पूर्णवेळ राजकारणात येण्याआधी इम्रान खान यांच्या यूकेमधल्या रंगीत-संगीत जीवनशैलीची पाकिस्तानात खूप चर्चा होत होती. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय माध्यमांनी खूप रस दाखवला. त्यांनी तीन लग्न केली. त्यांचीही चर्चा झाली.
 
आता मात्र त्यांच्याकडे PTI चा धार्मिक नेता म्हणून पाहिलं जातं.
 
इम्रान खान त्यांच्या दानधर्मासाठीही खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या आईच्या नावे एक मोफत कॅन्सर उपचार हॉस्पिटल उभारलं आहे. त्यांच्या आईचा मृत्यू याच रोगाने झाला.
 
तीन लग्न
25 नोव्हेंबर 1952 मध्ये जन्मलेल्या इम्रान यांनी लाहोर येथील एचीसन कॉलेज, कॅथेड्रल स्कूल आणि इंग्लंडमधील प्रसिद्ध रॉयल ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यांनी केबल कॉलेज, ऑक्सफर्डमधून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला.
क्रिकेट कारकिर्दीदरम्यान क्लब, पार्ट्या करणारे रंगीलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. इम्रान यांनी 1995 मध्ये जेमिमा गोल्डस्मिथ या ब्रिटिश महिलेशी लग्न केलं.
 
इम्रान-जेमिमा या दांपत्याला दोन मुलं आहेत. नऊ वर्षं संसार केल्यानंतर इम्रान-जेमिमा यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.
 
लैंगिक शोषणाचा आरोप
2014 मध्ये इम्रान यांनी टीव्ही अँकर रेहम खान यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. रेहम खान यांचे आईवडील पाकिस्तानचे आहेत, मात्र त्यांचा जन्म लिबियाचा आहे. हे लग्न केवळ दहा महिने टिकलं.
 
रेहम यांनी विभक्त झाल्यानंतर पुस्तक लिहिलं. दहा महिन्यांच्या कालावधीत लैंगिक शोषण झाल्याचा आरोप रेहम यांनी पुस्तकात केला आहे.
यानंतर 2018 मध्ये इम्रान यांनी बुशरा मानिका यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
 
क्रिकेट कारकीर्द
पाकिस्तानच्या सार्वकालीन महान क्रिकेटपटूंमध्ये इम्रान यांचा समावेश होतो. 1987 मध्ये इम्रान यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र पुढच्याच वर्षी त्यांना निवृत्ती सोडून परतण्याचं सांगण्यात आलं. इम्रान यांनी पुनरामगन केलं. चारच वर्षांत त्यांनी पाकिस्तानला वर्ल्डकप जिंकून दिला.
 
6व्या वर्षी इम्रान यांच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. पाकिस्तानमधील स्थानिक संघ तसंच ऑक्सफर्ड महाविद्यालयाच्या संघाकडून खेळण्याचा मान मिळवला. इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्याचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. 1971 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांनी पाकिस्तानसाठी पदार्पण केलं.
तीन वर्षांत इम्रान यांनी पाकिस्तानच्या वन डे संघात स्थान मिळवलं. सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर त्यांनी संघातलं स्थान पक्कं केलं. 1978 मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे इम्रान यांनी 139.7 वेगाने टाकलेला चेंडू चांगलाच गाजला होता.
 
डेनिस लिली, अँडी रॉबर्ट्स यासारख्या समकालीन दिग्गजांना मागे टाकण्याची किमया इम्रान यांनी केली होती. इम्रान यांनी 88 कसोटी सामन्यांमध्ये 6 शतकं आणि 18 अर्धशतकांसह 3,807 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 362 विकेट्स आहेत. दैदिप्यमान कारकीर्दीनंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली तेव्हा पाकिस्तानसाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर होता.
 
1982 मध्ये जावेद मियाँदादकडून कर्णधारपदाची सूत्रं हाती घेतली तेव्हा इम्रान यांचा स्वभाव लाजाळू होता. सुरुवातीला टीम मीटिंगमध्ये ते खुलेपणाने बोलू शकत नसत. मात्र अल्पावधीतच त्यांनी खेळाडू आणि कर्णधार म्हणून स्वत:ला प्रस्थापित केलं. मायदेशात भारताविरुद्ध झालेल्या मालिकेत सहा कसोटीत 40 विकेट्स पटकावणं, श्रीलंकेविरुद्ध कारकीर्दीतलं सर्वोत्तम प्रदर्शन आणि कर्णधार म्हणून पहिल्याच वर्षी 13 कसोटीत 88 विकेट्स घेण्याची करामत- अशा अफलातून प्रदर्शनासाठी इम्रान प्रसिद्ध आहेत.
 
दणक्यात पुनरागमन आणि वर्ल्डकप खिशात
1987 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर इम्रान यांनी निवृत्ती स्वीकारली. मात्र राष्ट्रपती जनरल जिया उल हक यांच्या आग्रहाखातर त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजविरुद्ध 3 कसोटीत 23 विकेट घेत त्यांनी दणक्यात पुनरागमन केलं.
1992 वर्ल्डकपविजेत्या पाकिस्तान संघाचं नेतृत्व इम्रान खान यांनी केलं होतं. पाकिस्तानला पहिलावहिला वर्ल्डकप जिंकून देण्याची किमया इम्रान यांच्या नेतृत्वाने साधली होती. क्रिकेटमधून दुसऱ्यांदा निवृत्ती स्वीकारल्यानंतर कारकिर्दीत चेंडूशी छेडछाड केल्याचं त्यांनी कबूल केलं. मात्र एका काऊंटी सामन्यादरम्यान असं केल्याचं त्यांनी सांगितलं.
 
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पाकिस्तानात कधीही मतदान न केल्याचं इम्रान यांनी सांगितलं. मात्र इम्रान यांचा विजय पाकिस्तान राजकारणातील भुत्तो आणि शरीफ यांच्या कुटुंबीयांच्या वर्चस्वाची अखेर झाल्याची नांदी आहे.
 
Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments