Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तर मुंबई लोकसभा : पियुष गोयल भाजपचा गड राखणार की महाविकास आघाडी खिंडार पाडणार?

Webdunia
गुरूवार, 14 मार्च 2024 (13:28 IST)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत पराभूत करणारा मतदारसंघ अशी नोंद या मतदारसंघाच्या इतिहासात आहे.पहिल्या निवडणुकीपासून शेवटच्या म्हणजे 2019 च्या निवडणुकीपर्यंत सगळ्यात रंजक, सगळ्यात रंगतदार लढती, या मतदारसंघात झाल्यात. यंदाही तोच कित्ता, तीच रंगत नि तोच रंजकपणा दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.भाजपचे गोपाळ शेट्टी हे या मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. पण भाजपानं यंदा धक्कातंत्र वापर त्यांचं तिकीट कापलं आहे. त्यांच्या जागी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
महाविकास आघाडीनं अजून त्यांचा उमेदवार इथं जाहीर केलेला नाही.
पण 2019 ला काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना साडेचार लाखांहून अधिक मतांनी पराभूत करून भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी संसदेत पोहोचले होते.
 
भारतात 2019 साली सर्वाधिक मताधिक्क्यांनी निवडून आलेल्या खासदारांमध्ये गोपाळ शेट्टींचा क्रमांक लागला होता.पूर्वी राम नाईक खासदार असताना आणि आता गोपाळ शेट्टींच्या दोन्ही कार्यकाळामुळे उत्तर मुंबई हा भाजपचा गड मानला जातोय.
 
मात्र, खरंच भाजपचा हा गड आहे का? या मतदारसंघात भाजप कुणालाही निवडून आणू शकते, अशी ताकद आहे का? शिवाय, भाजपविरोधात महाविकास आघाडीकडून कुणाला उतरवलं जाईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूच.तत्पूर्वी, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या रंजक, रंगतदार आणि संघर्षमय इतिहासावर एक धावती नजर टाकूया.
 
दिग्गजांच्या लढतींचा इतिहास लाभलेला मतदारसंघ
1952 साली उत्तर मुंबई हा लोकसभा निवडणूक द्विसदस्यीय होता. म्हणजे, एकाच मतदारसंघातून सर्वसाधरण आणि राखीव असे दोन खासदार निवडून येत.पहिल्या निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसकडून व्ही. बी. गांधी (सर्वसाधारण) आणि नारायण काजरोळकर (राखीव) हे उमेदवार, तर सोशालिस्ट आणि शेड्युल कास्ट फेडरेशनकडून अशोक मेहता (सर्वसाधार) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (राखीव) उमेदवार होते. कॉ. श्रीपाद डांगे सुद्धा इथून पहिल्या निवडणुकीत उतरले होते.
 
यातून व्ही. बी. गांधी आणि काजरोळकरांचा विजय झाला. डॉ. आंबेडकरांचा पराभव झाला होता.
 
असा या मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकीचा इतिहास आहे.
पुढे हा मतदारसंघ एक सदस्यीय बनला. तेव्हा म्हणजे 1957 ला व्ही. के. कृष्ण मेनन इथून खासदार बनले. ते 1962 लाही पुन्हा निवडून आले. भारताचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. मात्र, चीन युद्धानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला.पुढे आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पार्टीकडून मृणाल गोरे आणि रवींद्र वर्मा, जनता पार्टीचं सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसकडून अनूपचंद शाह खासदार बनले.
 
त्यानंतर 1989 साली भाजपच्या तिकिटावर राम नाईक खासदार म्हणून निवडून आले, ते अगदी 2004 च्या निवडणुकीत अभिनेता गोविंदा त्यांचा पराभव करेपर्यंत. 2004 साली गोविंदा काँग्रेसकडून संसदेत गेला, मात्र पुढच्या खेपेस गोविंदा निवडणुकीतही तरला नाही. त्याच्याऐवजी काँग्रेसनं संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी पुन्हा एकदा राम नाईक यांचा पराभव केला. मात्र, निरुपम यांची खासदारकीही एकच कार्यकाळ टिकली. 2014 साली भाजपचे गोपाळ शेट्टी मोदीलाटेत संसदेत पोहोचले.2019 ची निवडणूक मात्र रंजक आणि रंगतदार बनली, ती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या एन्ट्रीने. उर्मिलाने काँग्रेसकडून उत्तर मुंबईत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र, तिचा गोपाळ शेट्टींनी साडेचार लाखांच्या मताधिक्क्यांनी पराभव केला.
 
उत्तर मुंबईत सध्या कुणाचं पारडं जड? उमेदवारी कुणाला?
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत, तर एका ठिकाणी शिवसेना-शिंदे गटाचे आणि एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे.
एकूणच भाजपची विधानसभा मतदारसंघांमध्येही ताकद असल्यानं 2014 पासून ‘भाजपचा गड’ अशीच ओळख या लोकसभा मतदारसंघाची बनलीय. त्यामुळे इथून निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी उमेदवारांची भाऊगर्दी झाली होती. त्यात पियुष गोयल यांनी बाजी मारली आहे.
 
अतुल भातखळकर, योगेश सागर, सुनील राणे यांची नावंही इथून चर्चेत होती.
दुसरीकडे, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता अधिक आहे. काँग्रेसकडून संजय निरुपम हे रिंगणात उतरतील की, उर्मिला मातोंडकर यांच्याप्रमाणे यंदाही आश्चर्याचा धक्का देत, नवीन उमेदवार देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.काँग्रेस आणि शिवसेनेत या जागेवर नीट दिलजमाई झाल्यास ते भाजपच्या उमेदवाराला आव्हान देऊ शकतात, मात्र तरीही महाविकास आघाडीसाठी अत्यंत कठीण मतदारसंघ म्हणूनच त्यांच्यासमोर असेल.
 
पियुष गोयलांसाठी निवडणूक सोपी की कठीण?
पियुष गोयल यंदा पहिल्यांदाच थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आतापर्यंत ते कायम राज्यसभेतून खासदार राहीले आहेत.त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक किती सोपी आहे हा प्रश्न आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे सांगतात,
“उत्तर मुंबई हा भाजपसाठी कायम सेफ मतदारसंघ राहिला आहे. त्यामुळे पियुष गोयल यांच्यासाठी ही निवडणूक फारशी कठीण नसेल. शिवाय विरोधकांकडे सध्यातरी कुठला चांगला चेहरा दिसत नाहीये. शिवाय या मतदारसंघात सहा पैकी 4 आमदार भाजपाचे आहेत हीसुद्धा त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.”
 
बोरीवली आणि कांदीवली भागात आरएसएसचं जाळंसुद्धा चांगल पसरलेलं आहे. शिवाय विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी हा मतदारसंघ निट बांधल्याचा फायदासुद्धा गोयल यांना होईल, असं भातुसे यांना वाटतं.
पण, आतापर्यंत दोन वेळा मतविभाजनाचा फटका भाजपाला इथं बसला आहे. 2004 मध्ये जनता दलाच्या विद्या चव्हाण यांच्या उमेदवारीचा फटका भाजपला बसला. त्यावेळी अभिनेता गोविंदा काँग्रेसकडून इथून निवडून आला होता. तर 2009मध्ये मनसेच्या उमेदवारामुळे मतविभाजन होऊन काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा विजय झाला होता.आता सध्यातरी तशी कुठली स्थिती इथं दिसत नसल्याचं निरिक्षण भातुसे नोंदवतात.
 
कुठले मुद्दे महत्त्वाचे?
हा लोकसभा मतदारसंघ जाती-धर्मांच्या अंगानं आणि आर्थिक वर्गानुसारही मिश्र वस्ती असलेला आहे.मुंबईतल्या इतर लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्या समस्या असतात, त्याच कमी-अधिक प्रमाणात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात आढळतात.वाहतुकीचा प्रश्न, झोपडपट्ट्या आणि जुन्या चाळींचा प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेलेच आहेत.
संरक्षण खात्याच्या जागेचा प्रश्न उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो, असं मत ज्येष्ठ पत्रकार संतोष प्रधान व्यक्त करतात.ते म्हणतात, या मतदारसंघाच्या हद्दीत संरक्षण खात्याच्या अधिकारात असणाऱ्या अनेक जमिनी आहेत आणि तिथलं पुनर्विकासाचं काम करता येत नसल्याची तक्रारी इथे दिसून येते.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Gujarat Earthquake: गुजरातमधील मेहसाणामध्ये भूकंप, 4.2 तीव्रता

टीम इंडियाने चौथ्या टी-20 सामन्यात विक्रमांची मालिका रचली

अमृता फडणवीस यांच्यावर कन्हैया कुमारची वादग्रस्त टिप्पणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी देवघरमध्ये तासाभराहून अधिक काळ अडकले तर राहुल गांधी गोड्डामध्ये

CISF मध्ये महिलांसाठी दरवाजे उघडले, गृह मंत्रालयाने उचलले हे मोठे पाऊल

पुढील लेख
Show comments