Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचं काय झालं?

Webdunia
शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (07:32 IST)
ओंकार करंबेळकर
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर खासदार उदयनराजेंसोबतचा फोटो शेअर केला होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उदयनराजे दिल्लीत भेटल्याचे त्यांनी सांगितले होते.
 
संभाजीराजेंनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यासोबत म्हटलं होतं की, "आमचे बंधू छत्रपती उदयनराजे यांनी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यांचे मन:पूर्वक आभार ! श्री शिवछत्रपती महाराजांची वंशपरंपरा असणाऱ्या कोल्हापूर व सातारच्या गादीचे ऋणानुबंध आजही आम्ही तितक्याच आपुलकीने जोपासतो."
 
याआधी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन अप्रत्यक्षरित्या का होईना महाराष्ट्रातल्या राजघराण्यातल्या दोन व्यक्तींची चर्चा झाली होती. साताऱ्याचे उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती या दोघांची या निमित्ताने तुलना होताना दिसते.
 
या दोघांमध्ये मराठा आरक्षण मोहिमेचे नेतृत्व नक्की कोण करेल यामध्ये स्पर्धा असल्याचं बोललं जात आहे. हे दोघेही सध्या एकाच राजकीय पक्षात आहेत तसेच दोघेही राज्यसभेचे सदस्य आहेत.
 
वरपांगी माध्यमांमध्ये चर्चेला आलेला हा कथित संघर्ष आजचा वाटत असला, तरी या दोन्ही संस्थानांचा इतिहास काही वेगळ्याच आणि धक्कादायक घटना समोर ठेवतो.
 
कधी मैत्री, कधी भांडण, कधी तह तर कधी परिस्थितीनं लादलेली तडजोड अशी अनेक वळणं दोन्ही संस्थानांच्या संबंधांनी घेतली आहेत.
 
छत्रपती शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुरू झालेली ही घटनांची मालिका पुढे अनेक दशकं चालत राहिली होती. ताराराणी बाईसाहेब, राजाराम महाराज, साताऱ्याचे छ. शाहू अशी अनेक व्यक्तीमत्वं या इतिहासाच्या पटावर महत्त्वाची भूमिका बजावून गेली.
 
हा इतिहास आपण थोडक्यात समजावून घेऊ. त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे. ती म्हणजे साताऱ्याचे शाहू महाराज आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज ही दोन्ही व्यक्तिमत्वं वेगवेगळी आहेत. दोघांचाही काळ वेगवेगळा आहे. त्यामुळे ती गल्लत टाळली पाहिजे.
 
शिवाजी महाराजांचा मृत्यू आणि संभाजी महाराज
छ. शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 साली रायगडावर झाला. संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे त्यांचे पुत्र. संभाजी महाराजांच्या आई सईबाई आणि राजाराम महाराजांच्या आई सोयराबाई या होत्या.
 
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज राज्यकारभार पाहू लागले. 1689 साली औरंगजेबाच्या कैदेतच त्यांचा मृत्यू झाला. यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा शाहू यांनाही औरंगजेबाने कैद केलं होतं.
 
राजाराम महाराज यांचा राज्यकारभार
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज काही काळ महाराष्ट्रात राहिले आणि ते तामिळनाडूत जिंजी इथल्या मराठी स्वराज्याच्या मुलखात गेले.
 
तेथून ते महाराष्ट्र आणि जिंजीचा कारभार रामचंद्र पंत अमात्य बावडेकर, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्या सहाय्याने चालवत होते.
 
तेथे 8 वर्षे राज्यकारभार केल्यानंतर 1698 साली ते महाराष्ट्रात परत आले. त्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत 1700 पर्यंत ते महाराष्ट्रातच होते. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांचा सिंहगडावर मृत्यू झाला.
 
ताराराणी यांच्याकडे सूत्रे
राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराराणी यांनी आपला मुलगा शिवाजी (दुसरे) यांना गादीवर बसवून राज्यकारभार सुरू केला. ताराराणी या हंबिरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. त्यांना महाराणी ताराबाई असंही म्हटलं जातं.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, "राजाराम महाराज यांना शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून सुटून परत येतील आणि ते राज्यकारभार सांभाळतील असं वाटायचं. मात्र ताराराणी यांचं मत वेगळं होतं. हे राज्य नवं आहे. राजाराम महाराजांनी मिळवलेलं, टिकवलेलं आहे अशी त्यांची भूमिका होती."
 
शाहू महाराज - ताराराणी वाद
1707 साली औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली. आता शाहू महाराज आणि ताराराणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला.
 
शाहू महाराज सुटून आल्यानंतर ताराराणींच्या पक्षातले एकेक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळू लागले.
 
यामुळे शाहू महाराजांचं पारडं अधिकाधिक जड होऊ लागलं. अखेर धनाजी जाधव शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली. शाहू महाराजांनी ताराराणींच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला. त्यानंतर ताराराणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेल्या. 1708 साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली.
काही काळानंतर ताराराणी यांनी पन्हाळा, विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि 1710 साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळ्यावरती पाया रचला. त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली.
 
पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी (दुसरे) यांना गादीवर बसवून कारभार सुरू केला. पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही सुस्थितीत उभा आहे.
 
नजरकैद
पण हे सगळं काही आलबेल, सुरळीत चालणार नव्हतं. 1714 पर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी (दुसरे) यांनी अचानक ताराराणींना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला.
 
ताराराणी आणि शिवाजी (दुसरे) यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले. नजरकैदेतच शिवाजी यांचा 1727 साली मृत्यू झाला.
 
वारणेचा तह आणि साताऱ्याचा आश्रय
त्यानंतर ताराराणी साताऱ्याला शाहू महाराजांच्या आश्रयाला गेल्या. 1731 साली शाहू महाराज आणि कोल्हापूर (पन्हाळा)चे संभाजी (दुसरे) यांच्यामध्ये वारणेचा तह झाला.
वारणा नदीच्या उत्तरेस शाहू महाराज यांचे सातारा संस्थान आणि दक्षिण संभाजी यांचे कोल्हापूर संस्थान अशा दोन राजगाद्या तयार झाल्या.
 
साताऱ्यामध्ये शाहू महाराजांनंतर वारस नसल्याचे चित्र स्पष्ट होताच ताराराणी यांनी रामराजा (किंवा राजाराम दुसरे) हा आपला नातू आहे म्हणजेच थोरल्या छ. शिवाजी महाराजांचा थेट वंशज आहे असे सांगून त्यांना सत्तेवर बसवण्यास शाहू महाराजांना राजी केलं.
शाहू महाराजांच्या निधनानंतर रामराजे साताऱ्याचा कारभार चालवू लागले. रामराजे काही काळानंतर पेशव्यांच्या सल्ल्यानुसार वागत असल्याचं लक्षात आल्यावर ताराराणी यांनी रामराजाला 1750 साली तो खरा वारसदार नसल्याचं सांगत कैदेत टाकलं आणि कारभार हाती घेतला. पण पेशव्यांनी सैन्यबळाचा वापर केल्यावर पुन्हा कारभार सोडून दिला.
 
1761 साली ताराराणी यांचा साताऱ्यातच मृत्यू झाला. म्हणजे अशापद्धतीने ज्या ताराराणी यांनी कोल्हापूर संस्थानासाठी आटोकाट प्रयत्न केले त्या राणीचा साताऱ्यात मृत्यू झाला. परंतु कोल्हापूर संस्थानात आपला वंश राजगादीवर येण्याऐवजी सातारा संस्थानात आणण्यात त्या यशस्वी झाल्या.
ताराराणी यांचे कौतुक जदुनाथ सरकारांनीही करून ठेवले आहे. रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांचे वंशज नील पंडीत बावडेकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "ताराराणी एक आक्रमक राजकारणी होत्या. त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने अवगत होते. म्हणूनच त्या राज्यकारभार करू शकल्या आणि पेचप्रसंगातून मार्ग काढू शकल्या."
 
ताराराणी यांच्यानंतर सातारा
1777 साली रामराजे यांचा मृत्यू झाला. त्यांनी शाहुराजे (दुसरे) यांना दत्तक घेतलं होतं. प्रतापसिंह हे त्यांचे पुत्र होते. 1818 साली मराठा साम्राज्य संपुष्टात आलं. पण साताऱ्यामध्ये प्रतापसिंहांना नव्याने राजपदावर स्थानापन्न करण्यात आलं.
 
25 सप्टेंबर 1819मध्ये इंग्रज आणि प्रतापसिंह यांच्यामध्ये करार झाला, असं 'जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ' या पुस्तकात डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनी लिहून ठेवले आहे.
सप्टेंबर 1839 मध्ये प्रतापसिंह यांना इंग्रजांनी पदच्युत केले. त्यानंतर ते वाराणसीला जाऊन राहिले. त्यांच्यानंतर त्यांचे भाऊ अप्पासाहेब म्हणजेच शहाजीराजे साताऱ्याची सूत्रं सांभाळू लागले.
 
1849 साली साताऱ्याचे राज्यच खालसा झाले. याच भोसले घराण्याचे सध्या उदयनराजे भोसले वंशज आहेत.
 
कोल्हापूरमध्ये काय झाले?
तिकडे संभाजीराजे (दुसरे) कोल्हापूरचा कारभार पाहात होते. संतती नसल्यामुळे त्यांनी शिवाजी (दुसरे) यांना दत्तक घेतले होते. हे शिवाजी (दुसरे) 1762 ते 1813 असे 51 वर्षे कोल्हापूरच्या गादीवर होते. त्यानंतर 1838 पर्यंत संभाजी व शहाजी या दोन भावांनी कोल्हापूरची गादी सांभाळली.
त्यानंतर शहाजी यांचे पुत्र शिवाजी (तिसरे) यांनी 1866 पर्यंत राज्यकारभार केला. त्यांनी राजाराम यांना दत्तक घेतले.
 
हे राजाराम महाराज 1870 साली इटलीमध्ये वारले. त्यांनाही पुत्र नसल्यामुळे शिवाजी (चौथे) यांना दत्तक घेण्यात आले. त्यांचा 1883 साली मृत्यू झाला.
 
राजर्षी शाहू महाराज आणि पुढे
शिवाजी (चौथे) यांच्या मृत्यूनंतर कागलकर घाटगे घराण्यातून यशवंतराव यांना दत्तक घेण्यात आलं. तेच राजर्षी शाहू महाराज म्हणून ओळखले जातात.
 
जातीभेदाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा, शिक्षण, समाजउपयोगी व्यवस्था, आरोग्य सुविधा या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य इतिहासात अजरामर झालं आहे.
राजर्षी शाहू महाराजांचे 1922 साली निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले. 1940 पर्यंत त्यांनी कोल्हापूरचा राज्यकारभार सांभाळला.
 
त्यानंतर 1946 पर्यंत शिवाजी हे कोल्हापूरचे राजे होते. ते साताऱ्याच्या भोसले घराण्यातून दत्तक आले होते. त्यांच्यानंतर देवास संस्थानच्या पवार घराण्यातून शहाजी (दुसरे) दत्तक आले. 1983 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नागपूरकर भोसले घराण्यातून दत्तक आलेले शाहू महाराज (दुसरे) यांनी पुढील धुरा सांभाळली आहे.
संभाजीराजे छत्रपती
शाहू महाराज दुसरे यांचे संभाजीराजे आणि मालोजीराजे हे दोन पुत्र आहेत. त्यापैकी मालोजीराजे छत्रपती यांनी 2004 साली विधानसभेची निवडणूक लढवून विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं.
 
संभाजीराजे छत्रपती यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1971 रोजी झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूर आणि राजकोट येथे झाले आहे. त्यांनी 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना यश आले नाही.
रायगडवरावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनाचं आयोजन करणे त्याचप्रमाणे मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत आग्रही भूमिका घेत असल्यामुळे ते अनेकदा चर्चेत येतात. सध्या ते भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत.
 
नुकत्याच नवी मुंबईत नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीत व्यासपीठावर छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे या दोघांसाठी खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. संभाजीराजे या बैठकीला पोहोचले पण उदयनराजेंची अनुपस्थितीची चर्चा झाली.
 
ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने याबाबत बोलताना म्हणाले, "दोन्ही राजांचे वेगळे स्वभाव आहेत. संभाजी राजे हे कार्यकर्त्यांशी थेट संपर्कात असतात. लोकांमध्ये रमतात.
 
उदयनराजेंची काम करण्याची पद्धत यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे ते फार प्रसारमाध्यमांमधली चर्चा टाळण्यासाठी काही मोजक्याच ठिकाणी हजेरी लावतात. त्यामुळे उदयनराजे यांना संभाजीराजे नको आहेत असं वाटत नाही"
आता येत्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा प्रवास कशा पद्धतीने होतो आणि दोन्ही राजे हा मुद्दा कसा हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ट्रम्प सरकारमध्ये भारतीय वंशाचे काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी निवड

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबाबत मोठी बातमी,अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं

LIVE: 5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार

5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार,PM मोदीही उपस्थित राहणार

LPG Price Hike: गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ,आजचे दर जाणून घ्या

पुढील लेख
Show comments