Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार

Webdunia
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (16:33 IST)
कवी – कुसुमाग्रज

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!
खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
 
क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
 
पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
 
श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
 
नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
 
कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
 
आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मसाला मॅकरोनी रेसिपी

Breakfast recipe : रवा आप्पे

Career in PG Diploma in Operations Management : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट

12 तासांत किती पाणी प्यावे? शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या

पायांची काळजी घेण्याच्या या टिप्स फॉलो करा

पुढील लेख
Show comments