केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात पुण्यात ‘गुप्त’बैठक झाली. या बैठकीत नक्की कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत तर्क-विर्तक सुरु आहेत. शहर आणि जिल्ह्य़ातील विकास कामांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी ही अधिकृत बैठक होती तर ती विधानभवनात का झाली नाही आणि या बैठकीची पूर्वकल्पना अधिकाऱ्यांनाही का देण्यात आली नव्हती, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या चार वर्षांतील कामांची माहिती देण्यासाठी नितीन गडकरी यांनी शुक्रवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेनंतर त्या मजल्यावरून गडकरी हॉटेलच्या वरच्या मजल्यावर गेले. तेथे शरद पवार उपस्थित होते. गडकरी आणि पवार यांच्यात पंधरा मिनिटे चर्चा झाली. गडकरी यांच्याबरोबर तेथे आलेल्या आमदारांना गडकरी यांनी त्या मजल्यावरून बाहेर जाण्याची सूचना केली आणि नंतर भेटीची चर्चा सुरु झाली.