rashifal-2026

आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव

Webdunia
गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (08:01 IST)
मुंबई– आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने  निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.
 
छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. शिवछत्रपतींनी आग्रा येथील याच किल्ल्यात बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. अशा ‘दिवाण-ए- आम’ मध्ये शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांचे स्मरण करण्याची संधी मिळाल्याने आग्रा किल्ल्याच्या आसमंतात शिवछत्रपतींचा जयजयकार घुमणार आहे. त्यादृष्टीने यंदाची शिवजयंती विशेष ठरणार आहे.
 
आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात ही जयंती साजरी करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी केंद्र शासनाकडे केली होती, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या संस्थांना परवानगी नाकारल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. त्यावर शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासन सहआयोजक असल्यास या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहून महाराष्ट्र शासन काही सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळविले, त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने महाराष्ट्र शासनाला आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची अनुमती दिली आहे.
 
या सोहळ्यामुळे मराठी जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्रा येथील ऐतिहासिक ठिकाणी साजरी करण्याची पर्वणी मिळणार आहे, याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महाराष्ट्रातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय तसेच भारतीय पुरातत्व खात्याचेही आभार मानले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments