हैदराबादमध्ये बलात्काराचा आरोप करण्यात आलेल्या चार जणांना पोलिसांनी चकमकीत मारल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना करावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी तेलंगण पोलिसांची बाजू मांडली. या चार लोकांच्या ओळखीबाबत कोणतीही संदिग्धता नाही. पीडितेचा मोबाइल, चार्जर, पॉवर बँक अशा वस्तू हस्तगत करण्यासाठी त्यांना गुन्ह्याच्या जागी नेण्यात आलं होतं.
त्यांना पहाटे 5 ते साडेपाचच्या सुमारास त्यांना तेथं नेण्यात आलं होतं. त्यांना हातकडी घालण्यात आली नव्हती. त्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात दोघे जखमी झाले. त्यांनी पोलिसांचं पिस्तुल घेऊन पोलिसांवर गोळीबार केला आणि पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चौघांचाही मृत्यू झाला असं रोहतगी यांनी सांगितलं.
त्यावर सरन्यायाधीश बोबडे यांनी ते पिस्तुल घेऊन का गेले होते, त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला आणि पोलीस जखमी झाले नाहीत? असा प्रश्न विचारला. तसेच या चौघांनी केलेल्या कृत्याकडे आम्ही दुर्लक्ष करत नसल्याचंही बोबडे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांनी तीन सदस्यांचा एक चौकशी आयोग स्थापन करण्याचे आदेश दिले.
या आयोगामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. एस. शिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रेखा बलदोटा आणि सीबीआयचे माजी संचालक डी. आर. कार्तिकेयन यांचा समावेश असेल. हा आयोग हैदराबाद येथून काम करेल आणि सहा महिन्यांच्या अवधीमध्ये आपला अहवाल देईल.
अशी घडली घटना
तेलुगू माध्यमातल्या वृत्तांनुसार, मृत तरुणी गच्चीबावली भागामध्ये नोकरी करत होती. घरापासून कामाच्या ठिकामी जाण्यासाठी ती स्कूटीचा वापर करत. घटनेच्या दिवशी टोंडुपल्ली टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करून ती टॅक्सीने पुढे गेली. पण ती परतली तेव्हा तिच्या स्कुटीचे टायर पंक्चर झालेले होते. म्हणून मग स्कूटी तिथेच टोल प्लाझाजवळ सोडून टॅक्सीने घरी परतण्याचं तिने ठरवलं.
टोल प्लाझाजवळच्या दोन जणांनी पंक्चर काढतो असे सांगत तिची स्कूटी नेली. मृत तरुणीनं आपल्या बहीण आणि भावाला फोनवरून याबाबत सांगितलं होतं. रस्त्यावर एकटं उभं रहायला भीती वाटतेय, अचानक काही लोक दिसू लागले आहेत आणि एक ट्रक आल्याचंही तिने फोनवर बोलताना सांगितलं होतं.
थोड्या वेळात परत फोन करते असं सांगून तिने बहिणीसोबतच संभाषण संपवलं, पण त्यानंतर फोन बंदच झाला. मृत तरुणीच्या कुटुंबाने टोल प्लाझाजवळ तिचा शोध घेतला आणि त्यांनतर शमशाबाद पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर शमशाबाद पोलिसांच्या शादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाखाली तरुणीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता. त्यानंतर हा मृतदेह गायब झालेल्या मुलीचाच असल्याचं समोर आलं होतं.