Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गरोदर महिलेला घेऊन जाणारी अँब्युलन्स वाटेतच बंद पडली, बाळाला जन्म देऊन आई दगावली

Webdunia
रविवार, 3 मार्च 2024 (14:34 IST)
बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयाकडे निघालेली अँब्युलन्स वाटेतच बंद पडल्यानंतर महिलेनी अँब्युलन्समध्येच बाळाला जन्म दिला. प्रसूतीवेळी झालेल्या गुंतागुंतीमध्ये महिलेचा मृत्यू झाला. जर सरकारी सोयी सुविधा नीट मिळाल्या असत्या तर पत्नीचा मृत्यू झाला नसता असं संबंधित महिलेच्या पतीने म्हटले आहे.
 
नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा गावाजवळील बर्डीपाड्याच्या रहिवासी कविता राऊत यांचा 15 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री मृत्यू झाला.
 
सरकारी आरोग्य सुविधा वेळेवर न मिळाल्याने हा मृत्यू झाल्याचा आरोप कविता यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
 
कविता राऊत यांचे पती, मगन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास कविता यांना जवळच्या पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते.
 
पण तिथे सरकारी डॉक्टर उपलब्ध नसल्याने नर्सने त्यांना जवळच्या मोलगी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेव्हा कविता यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली रुग्णवाहिका देण्यात आली. पण कविता यांना घेऊन जाताना अँब्युलन्स रस्त्यातच एका चढावर बंद पडली.
 
कविता यांनी बंद पडलेल्या अँब्युलन्समध्येच बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली.
 
त्याठिकाणी काही वेळानंतर मोलगी ग्रामीण रुग्णालयाची अँब्युलन्स दाखल झाली. कविता यांना मोलगीतील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथेही योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे सांगण्यात आले.
 
याचदरम्यान, जिल्हा रुग्णालय गाठण्याआधीच कविताचा मृत्यू झाला, असं डॉक्टरांनी सांगितलं.
 
खराब रस्ता, बंद अंब्युलन्स, कोलमडलेली आरोग्य यंत्रणा
कविता यांच्या घरापासून आरोग्य केंद्रापर्यंतचा खराब रस्ता, डॉक्टरांची अनुपस्थिती, बंद पडणारी अँब्युलन्स या सगळ्या कारणांमुळे कविता मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून होत आहे.
 
“मी माझ्या बायकोला प्राथमिक आरोग्य केंद्रावर घेऊन गेलो. तेव्हा तिथं डॉक्टरच नव्हते. तिथल्या नर्सने काही चेकअप केले आणि अँब्युलन्सने आम्हाला पुढे पाठवून दिले. पण ती अँब्युलन्स खराब होती आणि रस्त्यामध्येच बंद पडली. आज ते वाहन ठीक असतं तर माझी बायको बाळाला सोडून गेली नसती,” असं सांगताना कविता यांचे पती मगन राऊत यांचा ऊर भरून आला होता.
पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेल्या अँब्युलन्स ही दुरुस्ती खर्च मिळाला नसल्याने सहा महिन्यांपासून बंद पडली आहे.
 
त्यामुळे दुसरी अँब्युलन्स दिली होती. पण ती धड अवस्थेत नव्हती असं सांगण्यात येत आहे.
 
‘आरोग्य व्यवस्थेची तातडीने सर्जरी करा’
नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेसमोर तीन प्रमुख समस्या असल्याचं नंदुरबारमधील जनार्थ आदिवासी विकास संस्थेच्या कार्यकारी संचालक रंजना कान्हेरे सांगतात.
 
त्यांच्या मते, नंदुरबारमध्ये :
 
1) आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे, डॉक्टर्स आणि नर्स यांची पदे रिक्त आहेत. आरोग्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेतले जातायत. त्यामुळे त्यांच्याकडून कामात दिरंगाई वाढतेय.
 
2) प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सुविधा नाहीयेत. त्यामुळे रुग्णांना जिल्हा रुग्णालयात जावं लागतं आणि तिथल्या यंत्रणेवर अधिक ताण पडतो.
 
3) याशिवाय सरकारकडून जनआरोग्यासाठी आर्थिक तरतूद फार कमी आहे.
 
आरोग्य अधिकारी जागेवर नसणं, रुग्णवाहिका वाटेतच बंद पडणं, एका यंत्रणेने दुसऱ्या यंत्रणेकडे बोट दाखवणं या गोष्टी योगायोगाने नाही तर नंदुरबारमध्ये ही सामान्य गोष्ट आहे, असं रंजना कान्हेरे सांगतात.
कविता राऊत यांच्यासारख्या घटना थांबवायच्या असतील तर नंदुरबारच्या आरोग्य यंत्रणेची तातडीने सर्जरी करण्याची गरज आहे, असं रंजना कान्हेरे सांगतात.
 
“नंदुरबारच नाही तर महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयांना भरघोस आर्थिक तरतुदीची गरज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषध पुरवठा पाहिजे. डॉक्टर्स, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर भरती करणं गरजेचं आहे," असं कान्हेरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
जिल्हा प्रशासनाने काय म्हटलं?
कविता राऊत यांचा मृत्यू हा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे, असं नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी सावनकुमार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
याविषयीचा अहवाल सोमवारी 4 मार्च रोजी मिळणार आहे. त्यानुसार संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं सावनकुमार यांनी सांगितलं आहे.
 
पण लोकांचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होत आहे, यावरून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.
 
या दरम्यान, नागरिकांनी आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यात उशीर करू नये, असं प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मत आहे. रुग्ण उशिरा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याने आरोग्य समस्या आणखी वाढतात. हाच प्रकार कविता राऊत यांच्याबाबत घडल्याचं अधिकारी सांगत आहेत.
 
जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कविता राऊत यांना 15 फेब्रुवारी रोजी सकाळपासून कळा सुरू होत्या. पण त्यांनी दवाखान्यात येण्यास नकार दिला. तसंच प्रशासनाकडून कोणत्या गोष्टींची त्रुटी राहिली हे शोधण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे."
 
ते पुढे म्हणाले “या दुर्दैवी घटनेनंतर मी घटनास्थळी भेट दिली. मला मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेला सकाळपासून कळा येत होत्या. त्यांना अनेकांनी समजवलं पण त्यांनी हॉस्पिटलला येण्यासाठी नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यासाठी उशीर झाला. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले तेव्हा त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं होतं.
 
“त्यांना पुढील हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. पण मध्येच अँब्युलन्स बंद पडली. त्यानंतर दुसरी अँब्युलन्स पाठवली. जिल्हा रुग्णालयात येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. याविषयी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
 
सोनवणे यांच्या मते, या भागात महिलांनी संस्थात्मक पातळीवर बाळंतपणावर भर द्यावा यासाठी मोहिम राबवली आहे. नागरिकांनीही आरोग्य समस्या असेल तर लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं, असं आवाहन केलं आहे.

Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

विनोद तावडे यांनी राहुल-खर्गे यांच्या विरोधात कोर्टाची नोटीस बजावली

Hockey:भारतीयमहिला संघाने चीनचा पराभव केला, सामना1-0 ने जिंकला

लग्नाच्या मंचावर हृदयविकाराच्या झटक्याने मित्राचा मृत्यू

ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा डेव्हिस कप उपांत्य फेरी गाठली

ठाणे जिल्ह्यात तीन वर्षांच्या भाचीच्या हत्येप्रकरणी मामाला अटक

पुढील लेख
Show comments