मुंबई येथील भिवंडी येथे सलामतपुरा परिसरात मनपाच्या घंटागाडीने एका ६ वर्षीय मुलाला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत रोहित विजय लोंढे याचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर मात्र स्थानिकांनी घंटागाडी चालकाला जबर चोप दिला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुलाचे वडील जेवण करण्याकरिता बाहेर गेले होते. तर वडील कुठे गेले ते पहायला त्यांच्या शोधात मुलाची आई आणि मुलगा बाहेर पडले होते. मात्र रस्त्यातच मागून येणाऱ्या घंटागाडीने रोहितला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की यात रोहितचा जागीच मृत्यु झाला. घटनेनंतर मात्र स्थानिकांनी घंटागाडी चालकाला बेदम चोप दिला.
या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. मात्र स्थानिकांनी तसेच नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातला आहे. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्याची समजूत घालून त्यांना शांत केले.या प्रकरणी घंटागाडी चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घंटागाडी चालकाकडे वाहनाचा परवाना देखील नाही. त्यामुळे महानगरपालिका विनापरवाना घंटागाड्या चालवत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपणच पालक म्हणून मुलांची काळजी घेणे फार गरजेचे आहे. जर योग्य काळजी घेतली तर असे अपघात टाळता येणारे आहेत.