Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समृद्धी महामार्ग बस अपघात : आम्ही काच फोडून बाहेर पडलो आणि स्फोट झाला

Webdunia
शनिवार, 1 जुलै 2023 (17:53 IST)
गाडी पलटी झाल्यानंतर आम्ही काच फोडून बाहेर पडलो, पण तितक्यात आग वाढून स्फोट झाला. 15 मिनिटांत अग्निशमन दलाचं पथक आलं, पण तोपर्यंत गाडीचा कोळसा झाला होता, अशी माहिती समृद्धी महामार्ग अपघातातून वाचलेल्या योगेश गवई या तरूणाने दिली.
 
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसला आज (1 जुलै) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली.
 
25 जणांचा मृत्यू, 8 जण बचावले
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी बसमध्ये 33 प्रवासी होते. त्यामधील 25 प्रवासी झोपेतच मृत्यूमुखी पडले. इतर 8 प्रवासी अपघातातून बचावले.
 
अपघातातून वाचलेल्या प्रवाशांकडून पोलिसांनी घटनाक्रम जाणून घेतला. बचावलेला प्रवासी योगेश गवई याने सांगितलं, “मी छत्रपती संभाजीनगरला उतरणार होतो. एका तासात माझा स्टॉप येईल म्हणून मी उतरण्याची तयारी सुरू केली होती. तितक्यात गाडी पलटी होऊन मी आणि माझा मित्र खाली पडलो. तितक्यात आमच्या समोरचा प्रवासी काच फोडून बाहेर निघत असल्याचं आम्ही पाहिलं आम्हीही त्याच्या मागे निघालो. गाडीवरून उडी मारून आम्ही बाहेर पडलो.

"आम्ही बाहेर आल्यानंतर आमच्या मागेही काही प्रवासी आले. गाडी पलटी झाल्यानंतर लगेच आगीने पेट घेतला होता. पाहता पाहता आग वाढत गेली. प्रवाशांचा आक्रोश आम्ही ऐकला. पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. 15 मिनिटांत अग्निशमन दलाचं पथक आलं, पण तोपर्यंत गाडीचा कोळसा झाला होता,” असं गवई याने म्हटलं.
सदर खासगी बस (वाहन क्रमांक MH 29 BE 1819) ही समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याच्या दिशेने येत होती. दरम्यान, बुलडाण्यातील सिंदखेड राजाजवळ बसचं टायर फुटून ती चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. पुढे ती एका खांबाला जाऊन धडकली. यानंतर फरपटत एका छोट्या पुलावर जाऊन आदळली.

या धडकेत बसच्या डिझेल टँकवर आघात होऊन ते फुटलं. दरम्यान, ठिणग्याही उडाल्याने बसने पेट घेतला. या आगीतच बहुतांश प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या अपघातात वाचलेल्या प्रवाशांनी काच फोडून कसाबसा बाहेर प्रवेश मिळवल्याने त्यांना आपले प्राण वाचवता आले, अशी माहिती कडासने यांनी दिली.
मृतांची ओळख अद्याप पटवता आलेली नाही. याबाबत तज्ज्ञांकडून तपास सुरू आहे. तर जखमी प्रवाशांवर बुलडाण्यातील रुग्णालयातच उपचार करण्यात येत आहेत, असंही पोलिसांनी सांगितलं.
 
अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये बसचा कोळसा झाल्याचं भीषण दृश्य फोटोंमधून पाहता येऊ शकतं.
 
अपघात होण्यापूर्वी काही तास आधी कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. यानंतर पुढे बुलडाण्याजवळ बसला अपघात झाला.
 
अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे.
सदर बस ही विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी प्रवासी वाहतूक कंपनीची होती. या कंपनीचे मालक विरेंद्र देर्ना यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2020 मध्ये ही बस त्यांनी खरेदी केली होती.
 
ते म्हणाले, "ही बस नवीनच आहे. त्याची कागदपत्रेही अद्ययावत आहेत. त्याचा चालक दानिश हासुद्धा अनुभवी आहे. दानिशच्या म्हणण्यानुसार, गाडीचा टायर फुटून अपघात झाला. त्यानंतर आग लागून गाडीतील ज्वलनशील पदार्थांनी पेट घेतल्याने हा प्रकार घडला आहे."
भाजपचा मोर्चा रद्द
बुलडाणा येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मुंबईतील मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
 
भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली.
 
त्यांनी ट्वीट करून म्हटलं, "बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण
 
महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दु:खाचा.डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्या ही सहवेदना"
 
"स्वतः मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांनी सुध्दा शोकभावना व्यक्त केल्या आहेत. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घटनास्थळी पोहचत आहेत.
 
"या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज होणारे भाजप आणि महायुतीचे 'आक्रोश आंदोलन' आज न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही. पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू," असं शेलार म्हणाले.
 
प्रशासनाकडून 5 लाखांची मदत
दरम्यान, या अपघात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
 
याबाबत ट्विट करून मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.
 
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
दुर्घटनेची माहिती कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असंही या ट्वीटमध्ये सांगण्यात आलं.
 
तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."
 
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्ग बस अपघात प्रकरणी शोक व्यक्त केला. याविषयी पंतप्रधान म्हणाले, "बुलडाणा येथे झालेल्या भीषण बस अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रचंड दुःख झालं आहे. या अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींचे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या दुःखात मी सहभागी आहे.
जखमींनीही लवकर बरं व्हावं, अशी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासनाकडून सर्व अपघात पीडितांना शक्य ती सगळी मदत केली जात आहे, असं मोदी म्हणाले.
 
तसंच, केंद्र सरकारमार्फत मृतांच्या नातेवाईंकांना दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा मोदींकडून करण्यात आली आहे.
 
बुलडाण्यातील अपघात नव्हे घात - इम्तियाज जलील
बुलडाण्यात झालेला अपघात हा अपघात नसून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेला घात आहे, अशी टीका छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
 
"कोणताही एक्सप्रेस वे तयार होतो तेव्हा रोड सेफ्टीचे नियम पाळून त्याचा क्लिअरन्स घ्यावा लागतो. तो क्लिअरन्स मिळाला होता का, इथे अपघात का होत आहेत," असा प्रश्न जलील यांनी विचारला.
 
ते पुढे म्हणाले, "समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा इव्हेंट करण्यात आला. घाईघाईने त्यांना ते उद्घाटन करायंच होतं. आपली सत्ता गेली तर दुसरा कुणी उद्घाटन करेल, अशी त्यांना भीती होती."
 
"त्यामुळे हा शिंदे फडणवीस यांनी केलेला घात आहे," असं जलील म्हणाले.
 
अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज - अजित पवार
या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
 
"आज भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेत जखमी प्रवाश्यांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो," असं पवार यांनी म्हटलं.
 
विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शोकसंदेशात पुढे म्हणतात की, "समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्यावतीने सातत्याने करण्यात आली आहे. शासनाने आतातरी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे."
 
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत मन हेलावणारे आहे.गेल्या वर्ष भरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत.बुलढा ण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत.अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवाना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही या अपघातावर प्रतिक्रिया दिली.
 
ते म्हणाले, "बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना."
 
"या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते," असं त्यांनी म्हटलं.
 




Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल,असे एकनाथ शिंदे म्हणाले

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

मातीचा ढिगारा अंगावर पडून अपघातात दोन बहिणींसह चार मुलींचा मृत्यू

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments