Marathi Biodata Maker

सरोज अहिरे: तान्ह्या बाळाला घेऊन आल्या आमदार, विधानभवनातील हिरकणी कक्षाची दुरावस्था पाहून अश्रू अनावर

Webdunia
सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (15:27 IST)
"आमदार म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी मी इथे आले आहे. एक आई म्हणून माझ्या बाळासाठी समाधानकारक परिस्थिती नसेल तर सेशनचे उर्वरित दिवस उपस्थित राहू शकेन असं वाटत नाही", असं आमदार सरोज अहिरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यासाठी आमदार सरोज अहिरे या आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन आल्या होत्या. पण बाळासाठी हिरकणी कक्षाच्या नावावर एक खोली रिकामी करून देण्यात आली, त्यात पुरेशी व्यवस्था देखील नव्हती त्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या.
 
त्या पुढे म्हणाल्या, "मागच्या आठवड्यात बाळाला घेऊन मुंबईत आले होते. अधिवेशन काळात हिरकणी कक्ष कार्यरत असावा यासंदर्भात प्रधान सचिवांना सांगितलं. हिरकणी कक्ष म्हणजे चार भिंतीची खोली असते हे मला माहिती नव्हतं. कुठलंतरी ऑफिस मला खाली करुन देण्यात आलं. आज मी तिथे गेले, तिथे खूप धूळ होती. फाटक्या सोफ्यावर बाळाला घेऊन बसण्याची वेळ माझ्यावर आली. आरोग्याला अपायकारक अशी तिथली परिस्थिती होती."
 
"कोट्यवधींच्या निविदा निघत आहेत. पण तुमच्या आमदार भगिनीसाठी काही करावं असं वाटत नाही का? मला विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित राहायचं होतं. पण इथल्या हिरकणी कक्षात बाळाला झोपता येईल अशी व्यवस्था नाही. पाळणा नाही. गेल्या तीन दिवसांपासून बाळाला ताप आहे. मी तरी अधिवेशनाला उपस्थित राहिले. सकाळी त्याला औषध दिलं. पण माझी ही अवस्था असेल तर बाकी महिला भगिंनीसाठी काय अपेक्षा कराव्यात?
 
मुख्यमंत्र्यांना हे सांगण्याची काय गरज आहे? अडीच महिन्यात माझं बाळ दहा वर्षांचं होणार नव्हतं. 30 तारखेला पाच महिन्यांचं होईल. सुविधा मिळणं आवश्यक आहे. तिथे डॉक्टर असेल असं वाटलं होतं. आया वगैरे असतील", असं त्या म्हणाल्या.
"मी आधीच पत्र दिलं होतं. तक्रार करायची परिस्थिती का यावी? मी हिरकणी कक्षाची मागणी केली होती. हिरकणी कक्ष म्हणजे चार भिंतींची खोली नव्हे. हे दुर्देव आहे. नागपूरला बाळाला झोपवण्यासाठी बेड होता, गादी होती. स्वच्छ बेडशीट होती. मी सांगितल्यानंतर पाळणा आणला. डायपरची व्यवस्था केली," असं अहिरे म्हणाल्या.
 
"एक आमदार नसल्याने त्यांना काय फरक पडतो. राज्यपालांचं अभिभाषण झालं आहे. माझा महाराष्ट्र फक्त शिंदे गट आणि भाजपसाठी राहिला आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये आम्हाला रुपयाचा निधी मिळालेला नाही. आम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून येतो. मायबाप जनतेला न्याय मिळणार नसेल तर कॅमेऱ्यासमोर मिरवायचं नाहीये.
 
"मी कंफर्टेबल नसेल, माझं बाळ सुरक्षित आहे याची खात्री नसेल तर मी कुठून भाषण करणार? कुठले प्रश्न मांडणार, कोणाचं भाषण ऐकणार. मी आजचा दिवस वाट बघेन. नाहीतर उद्या मी नाशिकला जाईन. अजित पवार, आमच्या नेत्यांची माफी मागते. व्यवस्था झाली तर अधिवेशनाला उपस्थित राहीन", असं त्यांनी सांगितलं.
 
सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांची होणारी परवड लक्षात घेऊन राज्य सरकारने 2012 मध्ये प्रमुख सरकारी कार्यालयं, न्यायालयं तसंच सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष सुरु करण्याचे धोरण आखले.
 
हिरकणी कक्षाची योजना
स्तनदामाता आणि बाळांचे आजार यावर मात करण्यासाठी भारतीय स्तनपान प्रसारक मंडळाने हिरकणी कक्ष ही संकल्पना पुढे आणली. त्यानंतर सरकारने आरोग्य विभागाच्या राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांच्या माध्यमातून यासंबंधात परिपत्रक काढले.
 
त्यानुसार हिरकणी कक्ष कसा असावा, त्याची ठेवण कशी व्हावी, त्या खोलीत काय असावे याबाबत मार्गदर्शक सूचना परिपत्रकात आहेत. वर्दळीच्या ठिकाणी अभ्यागत स्तनदा मातांना ही सुविधा देण्याची तरतूद परिपत्रकामध्ये केली आहे.
 
आईने बाळाला कामाच्या ठिकाणी घेऊन येणे किंवा कार्यालयात पाळणाघर असणे, या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत. अशा वेळी हिरकणी कक्षाचा आधार मिळू शकतो. हिरकणी कक्ष असेल तर तेथे बसून माता बाटलीत दूध साठवून घरी गेल्यावर बाळाला पाजू शकतील. हिरकणी कक्षाची सुविधा सर्वत्र सहज उपलब्ध झाल्यास मातांना त्याचा फायदा होऊ शकतो.
 
हिरकणीची गोष्ट
 
आपल्या बाळासाठी प्रचंड साहस करणाऱ्या हिरकणी या शिवकालीन महिलेपासून प्रेरणा घेऊन हिरकणी कक्ष असे नाव देण्यात आलं होतं.
 
हिरकणीची गोष्ट अशी, आहे की रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणी गवळण राहत होती. रायगडावर दूध पोहोचवण्यासाठी बाळाला घरी ठेवून तेथे गेली होती. मात्र तिला उशीर झाला. गडाचे दरवाजे बंद झाले. हिरकणीने धीर सोडला नाही.
 
सर्व अडचणींवर मात करत बाळाला स्तनपान करण्यासाठी रात्रीच्या अंधारात उभा कडा हिमतीने उतरून ती घरी आली होती.
 
ज्या बुरुजावरून हिरकणी उतरून खाली आली होती त्या बुरुजाचे पुन्हा बांधकाम करून घेण्याचे आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले होते. त्यांनीच या बुरुजाचे नाव 'हिरकणी बुरुज' असे ठेवले होते असं म्हटलं जातं.
 
अशाच प्रकारे घराबाहेर पडून करिअर करणाऱ्या महिलांसाठी बालसंगोपन करता यावं यासाठी स्तनदा मातांसाठी असलेल्या कक्षाला हिरकणी कक्ष असे नाव देण्याची संकल्पना पुढे आली.
 
मुंबईतील विधान भवनातील हिरकणी कक्ष कसा आहे?
 
विधान भवनाच्या पहिल्या मजल्यावर स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षात केवळ दोन खुर्च्या आणि दोन सोफे ठेवण्यात आलेले आहेत या ठिकाणी दुसरी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
 
त्यामुळे या अधिवेशनात राज्य सरकारने महिलांची थट्टा केली आहे, असा आरोप आमदार सरोज अहिरे यांनी केला आहे.
 
यामुळे आपण या अधिवेशनात थांबायचे की नाही हा प्रश्न आता निर्माण झाला आहे मला माझ्या मुलाची काळजी आहे माझ्या कुटुंबांकडे तो सध्या सुरक्षित आहे मात्र हा हिरकणी कक्ष सुरक्षित नाही बाळाला भरवायचे असेल किंवा अन्य काही असेल तर त्या बाबतीत या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही राज्य सरकार केवळ महिलांची या निमित्ताने थट्टा करीत आहे असा आरोप त्यांनी केला.
 
हिरकणी कक्षातील त्रुटी दूर करणार
"आम्ही हिरकणी कक्ष उभारला आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. त्यामुळे इथली व्यवस्था बघणारी यंत्रणा आहे त्यांच्याकडून काही त्रुटी राहल्या असतील मी मान्य करतो. पण काही त्रुटी राहिल्या म्हणून त्याची तुलना कसाया सोबत करायची हे अमोल मिटकरीचं बोलणं हे अतिशयोक्तीपणाचं आहे. हिरकणी कक्षातील राहलेल्या त्रुटी आपण दुरुस्त करू. याबाबत शासन संवेदनशील आहे", असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुणे न्यायालयात सावरकर मानहानीचा वाद पेटला, सावरकर कुटुंबाने राहुल गांधींच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

World Wildlife Conservation Day 2025 आज वन्यजीव संवर्धन दिन, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

पुण्यातील हवा विषारी झाली, AQI ३३६ सह मुंबईपेक्षाही अधिक धोकादायक: आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत देशाची पहिली शहरी सुरंग बनेल, जाणून घ्या ही कशी खास आहे?

Koregaon Park Land Scam मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक

पुढील लेख
Show comments