Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इस्त्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष : माध्यमांची कार्यालयं असलेल्या इमारतीवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचा इशारा

Webdunia
रविवार, 16 मे 2021 (10:53 IST)
गाझापट्टीतील एका इमारतीवर इस्रायलने हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इस्रायलला पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितलं आहे.
 
व्हाईट हाउसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे, "सर्व पत्रकार आणि स्वतंत्र मीडियाची सुरक्षा सुनिश्चित करणं इस्रायलची महत्त्वाची जबाबदारी असल्याचं आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे."
याआधी शनिवारी (15 मे) इस्रायलने केलेल्या एका हवाई हल्ल्यात गाझापट्टीतील एक मोठी इमारत जमीनदोस्त झाली होती. या इमारतीत अनेक परदेशी न्यूज चॅनलची कार्यालयं होती.
 
या हल्ल्यात काही जीवितहानी किंवा जखमी झालंय का, याची माहिती अजून मिळालेली नाही.
दुसरीकडे अल- जझीराचे हंगामी महासंचालक डॉ. मुस्तफा स्वेग यांनी म्हटलं आहे, "गाझापट्टीतील अल जझीरा आणि इतर मीडिया संस्थांची कार्यालयं असलेल्या अल-जाला टॉवरवर हल्ला करणं, मानवाधिकारांचं उल्लंघन आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याला युद्धगुन्हा मानलं जातं."
 
गाझापट्टी परिसरात इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात एक इमारत उद्ध्वस्त झाली आहे. या इमारतीत कतारची अल-जझीरा ही वृत्तवाहिनी आणि असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेची कार्यालयं होती.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या मालकाला इस्त्रायलकडून सर्वप्रथम एक इशारा देण्यात आला होता. त्यानंतर ही इमारत रिकामी करून घेण्यात आली होती.
 
या 12 मजली इमारतीत अनेक सदनिका आणि कार्यालयं होती. गाझा येथे बीबीसी न्यूजचंही कार्यालय आहे. पण ते या इमारतीत नसल्याचं बीबीसी जेरुसलेम ब्युरोने स्पष्ट केलं आहे.
 
तर, गाझा पट्टीत हमासचं कार्यालय असलेली एक इमारत उद्ध्वस्त करण्यात आली, असं इस्त्रायलच्या लष्कराने म्हटलं आहे.
 
या इमारतीत अल-जझीरा आणि असोसिएटेड प्रेसची कार्यालयंही होती. त्यावर मिसाईलने हल्ला करण्यात आला, असं इस्त्रायल लष्कराने सांगितलं.
पण सर्वप्रथम सामान्य नागरिकांना या इमारतीतून जाण्याचा इशारा देण्यात आला होता, असं स्पष्टीकरण लष्कराने दिलं.
इस्त्रायल लष्कराने ट्वीट करून म्हटलं की या इमारतीत हमासचं शस्त्रसाठा होता. इथं राहणाऱ्या नागरिकांचा ह्यूमन शिल्ड म्हणून वापर केला जात होता.
 
तर असोसिएटेड प्रेसनेही (AP) या घटनेची माहिती दिली आहे. हल्ल्यापूर्वी सर्व कर्मचारी आणि फ्रीलान्सर यांना इमारतीतून बाहेर काढण्यात आलं होतं, असं AP ने सांगितलं.
या घटनेमुळे धक्का बसला आहे, असं AP चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि CEO प्रुएट यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटलं आहे.
 
इस्त्रायली सैन्याला गाझा पट्टीत AP आणि इतर माध्यम संस्थांची कार्यालये कुठे आहेत, याबाबत माहिती होती. आमचे पत्रकार कुठे आहेत, तसंच आमचं लोकेशनही त्यांना माहीत होतं. आमच्या इमारतीवर हल्ला होईल, असा इशाराही आम्हाला मिळाला होता, असं ते म्हणाले.
या हल्ल्याची माहिती द्यावी, अशी मागणी इस्त्रायलच्या सरकारकडे करण्यात आली आहे, असं AP चे CEO म्हणाले. तसंच आपण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments