Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निसर्ग चक्रीवादळ: 'सात दिवस आईशी बोलणं झालं नाही, अजून किती दिवस लागतील माहीत नाही'

Webdunia
मंगळवार, 9 जून 2020 (12:27 IST)
-नामदेव अंजना
आता हे तुम्ही वाचत असताना माझं आईशी शेवटचं बोलणं झाल्याला सात दिवस पूर्ण होतील. अजून पुढे किती दिवस बोलू शकणार नाही, काहीच कल्पना नाहीय. गावात नेटवर्क यायला कदाचित आणखी आठवडा जाईल किंवा दोन-तीन आठवडे सुद्धा.कोकणाला धडकलेल्या चक्रीवादळाचा हा मला 1400 किमी दूर दिल्लीत राहून बसलेला फटका.
 
ज्या गावांना प्रत्यक्ष वादळाचा फटका बसला, अशा समुद्रकिनाऱ्यावरील आणि किनाऱ्यापासून काही अंतरावरील गावांमध्ये आता काय स्थिती असेल, याची कल्पना करूनच अंगावर शहारा येतो. कदाचित माझं गाव या वादळाच्या तडाख्यात सापडल्यानं हे सारं अधिक जाणवत असेल.
 
तीन जूनला निसर्ग चक्रीवादळानं कोकण किनाऱ्यावर धडक दिली आणि दिवसभर धुमाकूळ घातला. चक्रीवादळाच्या तडाख्यात माझं गावही सापडलं.
 
रायगडच्या रोहा तालुक्यातील बारशेत हे माझं गावं. रोहा शहरापासून 15-20 किलोमीटर दूर डोंगरात. डोंगरउतारावर मध्यभागी गाव असल्यानं वादळाचा तडाखा जोरदार बसला. घरांवरील कौलं, पत्रे वाऱ्यानं उडाली. कमी-अधिक प्रमाणात, किंबहुना अधिकच, माझ्या आजूबाजूंच्या गावांमध्ये सुद्धा अशीच स्थिती.
 
चक्रीवादळाचं थैमान तीन जूनला दिवसभर माझ्याभोवती क्रूरपणे बातम्यांच्या रुपात वावरत होतं. बातम्यांच्याच जगात काम करत असल्यानं दिवसभर वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिवसभर मेसेज धडकत होते.
 
जिथं जिथं रोह्यातील स्थितीचा उल्लेख होत होता, तिथं लक्ष वेगानं जात होतं आणि काळजात आणखी धस्स होत होतं. आता निघावं आणि गावी जावं आणि किमान आपल्या माणसांसोबत राहावं, असंही वाटत होतं.
 
साधा फोनही लागत नसल्यानं काहीच करू शकत नसल्याची आणि नेमकी स्थिती कळत नसल्याची हतबलता तीव्र होत होती.
 
आई गावी एकटी असते. त्यामुळे या वादळाचं बातम्यांमधून दिसणारं विदारक चित्र पाहिल्यावर काळजीची तीव्रत आणखीच वाढत होती. नको नको ते विचार मनात डोकावत होते.
 
गाव सोडून आधी मुंबई आणि आता दिल्लीत आल्यानंतर रोज रात्री नऊ-साडेनऊ दरम्यान फोन करायचा आणि आईशी बोलायचं, असा प्रघात गेल्या नऊ-दहा वर्षांपासून आयुष्यात पडला होता. त्यात क्वचितच कधी खंड पडला असेल. किंवा खंड पडला, तरी तेव्हा गावी सर्व ठीक आहे, हे माहीत असायचं. पण अशा संकटकाळात फोन लागला नाही, तर सुचेनासं होतं.
 
गेल्या आठवडाभरापासून फोन न लागल्यानं हतबल होण्याला कदाचित हेही एक कारण असावं. पण त्यात भरीस भर म्हणजे, इतकं मोठं संकट गावावर कोसळलंय आणि आपल्याला काहीच कळत नाहीय.
 
मला आठवतंय, चक्रीवादळ कोकणात धडकलं त्या दिवशी म्हणजे, तीन जूनला दिवसभर गावी फोन करण्याचा प्रयत्न केला. पण काहीच संपर्क झाला नाही. चक्रीवादळानं विजेची संपूर्ण यंत्रणाच कोलमडवून टाकली.
 
हे लिहित असतानाही, त्या कोलमडलेल्या यंत्रणेत तसूभरही फरक नाहीय. मुंबईपासून अवघ्या 150-200 किलोमीटरवर असलेलं माझं गावही एखाद्या रिमोट एरियात असल्यासारखं एकाकी पडलंय.
 
माध्यमात काम करत असल्यानं अधिकचे काही संपर्क मिळवता आले. माझ्या गावालाही वादळाचा तडाखा बसल्याचं कळताच आमच्या बीबीसी मराठीच्या टीममधील अनेकांनी वेगवेगळे संपर्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
 
त्याआधारे तीन जून आणि चार जूनला दिवसभ हरतऱ्हेने गावातल्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. गावातले बरेचजण मुंबईत कामधंद्यानिमित्त राहतात. त्यांना वारंवार विचारून, काही संपर्क होतोय का, हे विचारत होतो.
50-55 तासांनंतर मिळाली पहिली माहिती
माझ्याच सहकाऱ्याने NDRF चा नंबर दिला. त्यांना फोन केला, तर तिथून सांगण्यात आलं, "रोह्यापर्यंत अजून आम्ही पोहोचलो नाही, किनारपट्टीच्या भागात आहोत."
 
मग याच सहकाऱ्याने मला हॅम रेडिओमधील एका व्यक्तीचा नंबर दिला. मात्र, तो लागू शकला नाही. जो कुणी कुठला संपर्क देत होता, त्यावर आशेनं फोन करत होतो.
 
गावापर्यंत काही करून संपर्क होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर, मग विचार केला की, आपण तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे रोह्यात संपर्क करूया. मात्र, तिथेही सारखीच स्थिती होती. रोह्यात जेवढे कुणी ओळखीचे होते, त्यांना फोन करून पाहिला. पण सारीच संपर्कयंत्रणा वादळानं तोडली होती.
 
तीन जूनचा पूर्ण दिवस गेल्यानंतर चार जून उजाडला. असं होतं ना की, संकटाच्या काळात आपल्याला काहीच सूचत नाही, तसंच काहीसं झालं होतं.
 
मूळची रोह्यातील असलेल्या एका पत्रकार मैत्रिणीला विचारायचं राहून गेलं होतं. तिला फोन केला आणि म्हटलं, तुझ्या घरी काही संपर्क झाला का? तर तिने सांगितलं, "एअरटेलचं नेटवर्क रोह्यात सुरू आहे. मग तिनेच सांगितलं की, गावाकडे काय स्थिती असेल माहीत नाही, पण रोह्यात इमारतींच्या शेड आणि घरांवरील पत्रे उडालेत, झाडं कोसळलीत, पोल उखडलेत. कुणाच्या दुखापतीची तर अजून काही माहिती नाही."
 
यातून फारसा दिलासा मिळाला नाहीच. पत्रकार मैत्रिणीनं दिलेली माहिती रोह्यातली होती. आमच्या गावाच्या तुलनेत रोहा शहर खोलगट भागात आहे. आमचं गाव डोंगरात. त्यामुळे वादळाचा फटका गावाकडे जास्त बसला असण्याची शक्यता आणखी धडकी भरवत होती.
 
चार जूनचा पूर्ण दिवस कुणा-कुणाला फोन करण्यात गेला. गावातले जे लोक मुंबईत राहतात, त्यांना अधून-मधून फोन करत होतोच. कारण माझ्यासारखंच तेही संपर्क करण्याचा आपापल्या पातळीवर प्रयत्न करत होते.
 
त्यामुळे कुणाचा फोन लागला असेल तर..? या आशेनं मुंबईत फोन करूनही चौकशी करत होतो. यातूनच रात्री आठ वाजण्याच्या सुमारास थोडा दिलासा देणारी माहिती कानी आली.
 
मुंबईत राहणाऱ्या गावातल्या एका दादानं सांगितलं, "आपल्या गावातले दोघेजण मुंबईत फोन करायला रोह्यात येऊन गेले. गावातले बहुतेक घरांचे पत्रे, कौलं उडालीत. नारळी-बिरळीची झाडं कोसळलीत. कुणाला लागलं नाहीय."
 
50-55 तासांनंतर गावाकडून चुटकीभरशी माहिती कानी पडली आणि खरंच जीवात जीव आला. नुकसानीचं जाऊ दे, किमान कुणाला दुखापत झाली नसल्याचं कळल्यावर थोडं बरं वाटलं. पण थेट संपर्क होत नाही, तोपर्यंत मनातली घालमेल सुरूच होती. तरीही वाटत होतं की, गावातली आणखी स्थिती कळावी.
 
'त्या' एका वाक्यानं बरं वाटलं
मध्ये पाच जूनचा दिवस असाच कुणा-कुणाला फोन करण्यात गेला. मात्र, गावातल्यांनी रोह्यात परिस्थिती मुंबईत कळवल्यामुळे थोडा दिलासा दिवसभर सोबतीला होता.
 
मात्र, न राहून विचार केला की, काही करून आईपर्यंत संपर्क करायला हवा. म्हणून रोह्यातल्या मैत्रिणीच्या आई-बाबांना विनंती केली की, गावात जाऊन या आणि घरी काय झालंय, ते कळवा.
 
सहा जूनला पहाटेच ते गावात गेले. रोह्यातून माझ्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एरवीही पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं तुटून पडतात. त्यामुळे आता स्थिती अर्थातच वाईट झाली होती. तरीही ते दुचाकीनं गावात पोहोचले. रोह्यात परतल्यावर त्यांनी मला फोन केला आणि माझ्या घरची, गावातली स्थिती सांगितली.
 
दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते माझ्या गावातून रोह्यात परतले आणि रोह्यात नेटवर्क आल्यावर त्यांनी मला फोन करून सांगितलं, "बहुतांश घरांवरील कौलं, पत्रे उडालेत. पण गावात कुणाला इजा झाली नाहीय. तुझी आईही बरी आहे. काळजी करू नकोस. घरांवर कौलं, पत्रे चढवण्याची कामं सुरू झालीत."
 
त्यांचं हे वाक्य म्हणजे तीन दिवसांपासून ज्या वाक्याची वाट पाहत होतो, तेच होतं. 'जीव भांड्यात पडला म्हणतात', ना तसा हा क्षण होता. सगळे व्यवस्थित असल्याचं कळल्यावरही भरून आलं.
 
अशा संकटाच्यावेळी कुठलीच मदत करू शकत नसल्याची हतबलता आणि तिथली माहिती मिळत नसल्यानं अस्वस्थता... त्या एका वाक्यानं थोडी शांत केली.
 
रोहा-तळा-मुरुड हा सारा माझ्या गावाचा पट्टा नेहमीच पावसाळ्यात तुफान वाऱ्याला सामोरा जातो. त्यात नवीन काहीच नाही. समुद्रापासून तीस-एक किलोमीटरवर असल्यानं वादळा-बिदळाचे इशारेही नेहमीचेच आहेत. त्यातही नवीन काहीच नव्हतं. पण यावेळचं वादळ असं भयंकर रूपात येणार असल्याची कुणाला कुणकुण नव्हती, अन् अंदाजही नव्हता. माध्यमांवर येणाऱ्या बातम्यांमधून कळत होतं की, चक्रीवादळ येणार आहे, पण तो इतक्या भयंकर रूपात येईल, वाटलं नव्हतं.
 
चक्रीवादळाला पाच दिवस झाल्यानंतर, आता लोक आपापली घरं दुरुस्त करू लागलेत. सरकारनं मदत जाहीर केली, पंचनामे सांगितलेत. घरांचे फोटोही मदतीसाठी ग्राह्य धरले जातील म्हटलंय खरं. पण गावाकडे वीज नाहीय. फोन चार्ज नाहीत. फोटो काढणार कसे, हा प्रश्न आहेच.
 
घर सावरायचं की पेरणी करायची?
त्यात पेरणीही आहे. रायगड जिल्ह्यात आता भातशेतीच्या पेरणीचा काळ. दहा दिवसात कोकण किनारपट्टीर मान्सून धडकेल. त्यामुळे दहा दिवसात पेरणी केली नाही, तर गेल्या सहा महिन्यात शेतीचा कस वाढवायला केलेली मेहनत फुकट जाईल.
 
त्यामुळे चक्रीवादळानं उडालेलं डोक्यावरच छप्पर बांधायचं की पुढच्या वर्षभराची भूक भागवणाऱ्या पेरणीकडे लक्ष द्यायचं, अशा द्विधा स्थितीत रायगड आणि एकूणच कोकणातले लोक आता दिसून येतात.
 
कालपासून कोकणात कुठे कुठे फोन लागू लागलेत. अनेकांशी बोलणं होतं. प्रत्येकाच्या बोलण्यात हीच अस्वस्थता जाणवते. द्विधा मनस्थितीतल्या या लोकांना केवळ आर्थिक मदतीच्या घोषणा कितपत आधार देतील, हा मोठा प्रश्न आहे.
 
मदतकार्याची यंत्रणा पंचनाम्याच्या गुंतागुंतीच्या प्रशासकीय प्रक्रियेच्या पुढे जाऊन वेगवान व्हायला हवी. अन्यथा, चक्रीवादळाचं संकट तर येऊन गेलं, पण संकटानंतरच्या जखमा आणखी गडद होतील, हे अनेकांशी बोलल्यानंतर तीव्रपणे जाणवतंय.
 
काही कामानिमित्त शहरात आलेल्या सरपंचाशी काल फोनवर बोलणं झालं, तेव्हा ते सांगत होते, "गावकऱ्यांना आदल्या दिवशी वादळाची कल्पना दिली होती. पण आपल्याकडे कुठे एवढं भयंकर वादळ येतं. नेहमीप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याच्या दोन-चार फेऱ्या असतील, असंच सगळ्यांना वाटत होतं. तरीही शाळा-मंदिरात क्वारंटाईन केलेल्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास परवानगी दिली होती. पण तीन जूनला धडकलेलं चक्रीवादळ अंदाजापलिकडचं होतं. हतबल होतो आम्ही सर्व."
 
सरपंचांनी सांगितलेलं ऐकतानाही अंगावर शहारा येत होता. त्यांच्या बोलण्यातही रडवेला स्वर जाणवला.
 
आता हे लिहित असतानाच कळलं की, अजून दोन-तीन आठवडे विजेची यंत्रणा पूर्ववत व्हायला जातील. तेव्हा कुठे गावात थेट संपर्क होईल आणि सगळ्यांशी बोलता येईल.
 
या वादळामुळे केवळ कोकणातील घरं पाडली नाहीत, तर ज्या आंबा-काजू-नारळ किंवा इतर बागांचं नुकसान झालंय, त्यातून आधीच्या काही वर्षांची मेहनत आणि पुढील काही वर्षांची मिळकत धुळीस मिळवलीय.
 
हे समजून ज्यावेळी थेट मदत गावाकुसापर्यंत पोहोचेल, केवळ सरकारी आकडेवारीत नव्हे, खरीखुरी मदत पोहोचेल, तेव्हा कुठे पुन्हा उभारी घ्यायला आधार मिळेल.
 
आणि ही आपबिती मी मांडलीय, ती काही माझ्या एकट्याची नाही. अनेकांची आहे. माझ्या गावापेक्षाही भयंकर अवस्था किनाऱ्यांवरील गावांची झालीय.
 
कोकणातील समुद्रकिनाऱ्याच्या या वेदाना मायबाप सरकारपर्यंत पोहोचाव्यात, एवढ्याच माफक आशेनं माझा हा वैयक्तिक अनुभव व्यक्त करावा वाटला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments