Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यापुढे माणसाला बिबट्यांसोबतच राहावं लागणार का?

Webdunia
गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (14:24 IST)
- प्रवीण ठाकरे
महाराष्ट्रातील काही भागात बिबट्यानं उसाच्या शेतीलाच स्वतःचा अधिवास बनवला आहे. निसर्गातील मानवी हस्तक्षेपाचा हा परिणाम आहे.
 
मुंबईच्या आरे कॉलनी परिसरात बिबट्या दिसला, उसाच्या शेतात बिबट्या दिसला, बिबट्याची बछडी दिसली, बिबट्यानं गावातील कुत्री, शेळ्यांवर हल्ला केला, अशा घटना आता नव्या राहिलेल्या नाहीत. किंबहुना महाराष्ट्राच्या काही भागात बिबट्यानं उसाच्या शेतातच घर केलं आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.
 
प्रत्येक प्राणीमात्राला परिस्थितीशी लढा द्यावाच लागतो. परिस्थितीशी संघर्ष करत आणि जुळवून घेताना प्राणी आणि वनस्पती स्वतःमध्ये जे काही बदल घडवून आणतात त्याला अनुकूलन म्हटलं जातं. निसर्गात सुरू असणारी ही अव्याहत प्रक्रिया बिबट्यांमध्ये ही दिसू लागल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
 
महाराष्ट्रातील उसाच्या शेतातील बिबट्यांचा सहज वावर मात्र मानवी हस्तक्षेपाचं फलित मानलं जातं आहे. नाशिक, पुण्यातील जुन्नर आणि सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये उसाची शेतीच बिबट्याचा अधिवास बनली आहे, असं चित्र गेल्या काही वर्षांत निर्माण झालं आहे.
 
शेतीसाठी तसेच विविध कारणांनी झालेली जंगलतोड, भक्ष्य प्राण्यांची जंगलातील घटलेली संख्या अशा काही कारणांनी या भागांतील बिबट्यांना उसाच्या शेतीलाच त्यांचा अधिवास बनवावा लागला. उसाच्या शेतात वावरणाऱ्या बिबट्यांचा या पिढीला दुसरं जंगल माहीत नाही.
 
वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर यांनी या बिबट्यात झालेल्या या बदलांना पुष्टी दिली. ते म्हणाले, "भक्ष्यांच्या शोधात असणाऱ्या बिबट्यानं जंगलांच्या सीमा ओलांडल्या. जंगलाच्या आसपास असलेली खेडी आणि नागरी वस्त्या इथं भटकी कुत्री आणि इतर पाळीव प्राणी बिबट्यांसाठी सोपे भक्ष्य ठरू लागली. शिवाय आश्रयासाठी उसाची शेतीही सुरक्षित वाटू लागली."
 
'उसाच्या शेता'तील हे बिबटे दिवसभर उसात पडून असतात आणि रात्रीच्या वेळी शिकार करतात. या बिबट्यांची माणसांवर नजर असते आणि ते माणसांपासून स्वतःला दूर ठेवतात. बऱ्याच वेळा शेतातील घुशी आणि उंदीरसुद्धा त्यांचं भक्ष्य ठरतात, असं त्यांचं निरीक्षण आहे.
 
उसाच्या शेतात दिसणारी बिबट्यांची ही तिसरी पिढी असावी, असं ते सांगतात.
 
ते म्हणाले, "15 वर्षांची एक पिढी, असा हिशोब धरला तर बिबट्यांची आज उसाच्या शेतात दिसणारी तिसरी पिढी मानवासोबत सहजीवन जगत आहे."
 
सर्वसाधारणपणे ऊस हे पीक शेतात वर्ष दीडवर्ष असते. या कालावधीत बिबट्यांना शेतात लपून राहणं सोयीचं ठरतं.
 
पशुवैद्यकीय उपायुक्त डॉ. संजय गायकवाड म्हणतात, "उसाच्या शेतांतील बिबट्याना मुबलक खाद्य तर मिळतंच शिवाय जंगलात असणारे धोकेही इथं कमी आहेत. शिवाय मुबलक खाद्य उपलब्ध होत असल्याने या बिबट्यांच्या प्रजननाचा वेगही जास्त आहे."
बदलत्या परिस्थितीशी बिबट्यांनं अशा प्रकारे जमवून घेतलं आहे आणि माणसांसोबतच सहजीवन स्वीकारलं आहे. पण माणसांनी हे बिबट्यासोबतच सहजीवन स्वीकारलं आहे का, या प्रश्नाचं उत्तर मात्र नाही असंच आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.
 
पुण्यातील जुन्नरपासून जवळ असलेल्या माणिकडोह इथं बिबट्यांसाठीचा पुनर्वसन प्रकल्प राबवणारे वाईल्ड एस. ओ. एस. या संस्थेचे प्रमुख डॉ. अजय देशमुख म्हणतात, "शेतात माणसं कधी असतात यावर बिबट्याचं लक्ष असतं आणि माणसांची नजर चुकवून बिबट्या शिकार करतो. ते म्हणतात, "या बिबट्यांनी स्वतःला बदललं आहे. शेतात माणसं कधी कामाला असतात, ते घरी कधी जातात, पाणी प्यायला कधी जातात, या वेळा चुकवून बिबट्या शिकार करतात, इतकं या बिबट्यानं स्वतःला बदलंलं आहे."
 
उसातल्या बिबट्यांवर ते अधिक माहिती देताना ते म्हणाले, "बिबट्याची मादी उसातच बछड्यांना जन्म देते आणि इथंच त्यांना मोठं करते. शिकार कशी करावी हे ती उसातच पिलांना शिकवते. या बछड्यांसाठी शेत हेच घर असतं. हे बछडे शेतातून बाहेर येऊन काहीवेळा खेळतानाही दिसतात."
 
आपल्या शेतात, घराजवळ बिबट्या आहे, म्हटल्यानंतर लोक घाबरतात आणि पिंजरा लावून बिबट्याला पकडून नेण्यासाठी वनविभागाच्या मागं लागतात. मात्र लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की एक बिबट्या पकडून नेल्यानंतर दुसरा येणारच, असं ते म्हणाले.
बिबट्यांनी मानवावर केलेले हल्ले अपघाती असतात, याचे प्रमाणही फार कमी आहे, असं ते म्हणतात.
 
वनविभाग आणि ही संस्था जुन्नर आणि नाशिक परिसरात जनजागृतीचे काम करते. पाळीव प्राणी, पक्षी जाळीबंद करणे, घराच्या भोवती जाळीचे कुंपण घालणे अशा उपाययोजना या परिसरातील लोक करताना दिसतात.
 
मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपाची ही फलश्रुती असून अशा ठिकाणी मनुष्य आणि वन्यजीव यांच्यातील सहजीवनसाठी अधिकाधिक जनजागृती आणि इतर पातळ्यांवर प्रयत्नांची गरज आहे, असं ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments