Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अधिकमास चे महत्व

adhik maas
Webdunia
बुधवार, 16 मे 2018 (11:24 IST)
हिंदू पंचांगाप्रमाणे.... चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते.
परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे. दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो परंतु या अधिक तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून याला 'मलमास' असे सुद्धा म्हणतात. व त्यास पुढील चांद्रमासाचे नाव देतात.
 
चैत्र पासून अश्‍विन पर्यंतच्या ७ मासांपैकीच एखादा अधिक मास असतो. कारण या काळात सूर्याची गति मंद असते. म्हणून सूर्यास एका राशीतून दुसर्‍या राशीत जाण्यास ३० दिवसांपेक्षा कमी काळ लागतो. एकदा आलेला अधिकमास पुन्हा १९ वर्षांनी येतो.
 
या अधिकमासात वर्ज्य असलेली कृत्ये - देव प्रतिष्ठापना, गृहारंभ, वास्तुशांत, विवाह, उपनयन, तीर्थयात्रा, विशेष मंगलमय कार्ये.
 
या महिन्याचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण, भगवान विष्णु, पुरुषोत्तम (या मासास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात )
म्हणूनच या महिन्यात विशेषकरून श्रीकृष्णाची भक्ती, पूजा अर्चा करतात, तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम आदीमुळे सुखशांती, संसारसुख मिळते.
 
अधिकमासात करावयाची व्रते व त्यासंबंधी नियम 
 
१. या महिन्यात पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. अंगाला सुगंधी उटी लावावी. नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्ये करावीत. मन निर्मळ ठेवावे. या महिन्यात आवळीच्या झाडाखालील स्नानाला विशेष महत्व आहे.
स्नानानंतर म्हणावयाचा मंत्र
गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणम् ।
गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियम् ॥
भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्रविवर्धिनी ।
अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वधते चिरम् ॥
२. या मासात शक्यतो एक वेळेसच अन्नग्रहण करावे. जेवताना मौन पाळावे.
३. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान द्यावा.
४. या महिन्यात आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग करावा.
( उदा. एखादे फळ अथवा एखाद्य रंगाचे वस्त्र वगैरे. )
५. या महिन्यातील दानाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
 
हिंदू धर्मात मुलगी - जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. (अनारशा ऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, वगैरे जाळीदार पदार्थ द्यावयाचे असतात.) या महिन्यात नारळ, सुपार्‍या, फळे यासारख्या वस्तू सुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात.
 
या महिन्यात पुरणाचे दिंड करून इष्ट मित्रांना, नातेवाईकांना भोजन देतात (या दिंडांना धोंडे सुद्धा म्हणतात यावरुन या महिन्यास 'धोंडे महिना सुद्धा म्हणतात.)
रोज गाईला पूरण पोळीचा घास द्यावा.
महिनाभर सतत नामस्मरण करावे - यात कुलदैवताचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ.
नारायण - श्रीकृष्णाचे स्मरण करावे.
 
अपूपदानाचा संकल्प - 
 
ममत्रयस्त्रिंशद्देवतात्मकविष्णुरूपी सहस्त्रांशु श्रीपुरुषोत्तम प्रीतिद्वारा निखिलपापप्रशमपूर्वं पुत्रपौत्रयुत धनधान्यक्षेमसमृद्धि लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फलप्राप्त्यापूपच्छिद्रसमसंख्यवर्षसहस्त्रवधी स्वर्लोकनिवासादिकल्पोक्तफलसिद्ध्यर्थं मलमासप्रयुक्तं अपूपदानं करिष्ये ।
 
याप्रमाणे संकल्प करून दानवस्तूचे पूजन करावे. नंतर ब्राह्मणाचे पूजन करून पुढील श्लोकांनी त्यांची प्रार्थना करावी,
 
विष्णुरुपी सहस्त्रांशु: सर्वपापप्रणाशन: ।
अपूपान्न प्रदानेन मम पापं व्यपोहतु ॥
नारायण जगद्वीज भास्कर प्रतिरूपक ।
व्रतेनानेन पुत्रांश्च संपदं चापि वर्धय ॥
यस्य हस्ते गदाचक्रे गरुडो यस्य वाहनं ।
शंख: करतले यस्य स मे विष्णु: प्रसीदतु ॥
कलाकाष्ठादिरूपेण निमेषघटिकादिना ।
यो वंचयति भूतानि तस्मै कालात्मने नम: ॥
कुरुक्षेत्रमयं देश: काल: पर्वद्विजो हरि: ।
पृथ्वीसममिमं दानं गृहाण पुरुषोत्तम ॥
मलानांच विशुद्ध्द्यर्ह्तं तव दास्यामि भास्कर ।
इदं सोपस्करं त्रयस्त्रिंशदपूपदानं सदक्षिणाकं सतांबूलं
 
पोथीवाचन/सत्संग -अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला दान द्यावी. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्रीनारायण प्रसन्न होतो आणि भक्तांचे कल्याण करतो.
 
अधिक मासात केलेल्या पूजेचे तीर्थयात्रेचे फळ अनेक पटींनी मिळते. स्त्रीयांना अखंड सौभाग्याचा व पूत्रपौत्रांचा लाभ होतो,
अधिकमासात उपोषणाला विशेष महत्व आहे. उपोषणाचे प्रकार एकभुक्त (दिवसातून एकवेळ जेवावे व एकवेळ उपवास करावा.)
अयाचित (अकस्मात दुसर्‍याकडे जेवायला जाणे.)
उपोषण - पूर्ण उपवास.
अशक्त मनुष्याने वरीलपैकी एखादा प्रकार तीन दिवस तरी करावा. न जमल्यास निदान एक दिवस तरी करावा.
महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्यप्राप्ती होते.
महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.
महिन्यातून निदान एक दिवस तरी गंगास्नान केल्यास सर्वपापापासून मुक्ती मिळते.
महिनाभर जेवताना मौन पाळल्यास पापांचे निरसन होते.
 
अधिकमासात नित्य कर्मे करावीत त्यापासून दूर जाऊ नये. काम्य कर्मे करून नयेत. जे केल्यावाचून गत्यंतर नाही अशी कर्मे अवश्य करावीत.. शुभम भवतु.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

स्वामी समर्थ प्रकट दिन शुभेच्छा

ईद-उल-फितर वर निबंध Essay on Eid-ul-Fitr

Swami Samarth Prakat Din 2025 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कधी, काय करावे?

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments