Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हज यात्रेत यंदा 1300 हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू होण्यामागे 'ही' आहेत 5 कारणं

Webdunia
मंगळवार, 25 जून 2024 (00:10 IST)
सौदी अरेबियाच्या प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, यंदाच्या हज यात्रेदरम्यान किमान 1301 जणांचा मृत्यू झाला.यावर्षीची हज यात्रा पार पडली तेव्हा तापमान अनेकदा 50 डिग्रीपेक्षाही जास्त होतं.
 
यात्रेदरम्यान मृत्यू झालेल्यांपैकी 75% लोकांकडे तिथे असण्यासाठीचं परमिट नव्हतं आणि पुरेसा आडोसा नसताना ते थेट उन्हामध्ये चालल्याचं सौदी अरेबियाची वृत्तसंस्था SPAने म्हटलंय. यापैकी काहीजण वयस्कर होते, आधीपासून आजारी होते, असंही सांगण्यात आलंय.
 
उन्हापासून असणारे धोके काय आहेत आणि ते कसे टाळायचे याबद्दलची जागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, असं सौदीचे आरोग्य मंत्री फहाद अल्-जलाजेल यांनी म्हटलंय.
 
अधिकृत परवाना नसणाऱ्या 1 लाख 40 हजारांपे७ा जास्त यात्रेकरूंवर उपचार करण्यात आले असून यापैकी काही अजूनही हॉस्पिटलमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलंय.
 
परवान्याशिवाय येणाऱ्या प्रवाशांसाठी हज यात्रा अधिक सुरक्षित न केल्याची टीका जगभरातून सौदीवर करण्यात येतेय.
 
या यात्रेदरम्यान 658 इजिप्शियन नागरिक दगावल्याचं AFP न्यूज एजन्सीने अरब अधिकाऱ्यांचा दाखला देत म्हटलंय. यासोबतच मक्केला अनधिकृतपणे यात्रेकरू पाठवणाऱ्या 16 टूरिझम कंपन्यांवर इजिप्तने कारवाई देखील केली आहे.
 
तर आपले 200 नागरिक मरण पावल्याचं इंडोनेशियाने तर 98 नागरिक दगावल्याचं भारताने म्हटलंय.
 
पाकिस्तान, मलेशिया, जॉर्डन, इरान, सेनेगल, सुदान आणि इराकमधल्या कुर्दिस्तान या स्वायत्त भागानेही आपले नागरिक हज यात्रेदरम्यान मरण पावल्याचं म्हटलंय.
 
हज ही एक वार्षिक यात्रा आहे ज्यासाठी मुस्लीम दरवर्षी मक्केला जातात. यावर्षीच्या हज यात्रेत 18 लाख यात्रेकरूंनी भाग घेतल्याचं सौदी अरेबियाने म्हटलंय. मग यावर्षी इतक्या भाविकांचा मृत्यू होण्यामागे काय कारणं आहेत?
 
1) उष्णतेची तीव्र लाट
हज यात्रेदरम्यान इतके मृत्यू होण्यामागे उष्णतेची अभूतपूर्व लाट हे सर्वात मोठं कारण आहे. उन्हात जाणं टाळावं, पाणी पित रहावं असा इशारा देऊनही अनेकांना याचा त्रास झाल्याचं सौदीच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटलंय.
 
नायजेरियातून हज यात्रेसाठी गेलेल्या आयशा इद्रिस यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या न्यूजडे कार्यक्रमात बोलताना सांगितलं, "देवाच्या दयेनेच मी वाचले, कारण तिथे प्रचंड गरम होतं. मला सतत छत्री वापरावी लागली आणि सतत झमझम पाण्याचा (पवित्र पाण्याचा) स्वतःवर शिडकावा करावा लागला."
नईम नावाच्या दुसऱ्या एका यात्रेकरूचा या यात्रेदरम्यान मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय आता उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या मुलाने बीबीसी न्यूज अरेबिकशी बोलताना सांगितलं, "आईसोबतचा आमचा संपर्क अचानक तुटला. आम्ही अनेक दिवस शोध घेतला आणि कळलं की हजदरम्यान ती मरण पावली." मृत्यूनंतर मक्केमध्ये दफन करण्यात येण्याची आईची इच्छा पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
यात्रेसाठी गेलेल्या लोकांना ज्या तीव्रतेच्या उष्णतेचा सामना करावा लागला, ती परिस्थिती त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होती. अशा वातावरणात त्यांनी उन्हात, उघड्यावक थकवणारे शारीरिक कष्ट केले. यापैकी अनेकजण वयस्कर होते किंवा आधीपासूनच कोणत्यातरी आजाराने ग्रस्त होते. पण उन्हामुळे हज दरम्यान पहिल्यांदाच मृत्यू झाले आहेत असं नाही. 1400च्या शतकापासून अशा मृत्यूंची नोंद होत आलेली आहे.
 
यावर्षी जागतिक हवामान बदलामुळे परिस्थिती अधिकच कठीण झाल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलंय.
 
2) प्रचंड गर्दी आणि त्यात सोयींचा अभाव
सौदी मधल्या तीव्र हवामानामुळे खडतर झालेली परिस्थिती प्रशासनाच्या ढिसाळ प्रशासनामुळे अधिकच कठीण बनल्याच यात्रेसाठी गेलेल्या अनेकांनी सांगितलं.
 
राहण्याची सोय योग्य नव्हती, तंबूंमध्ये गर्दी होती, तिथे पुरसा थंडावा (तापमान नियंत्रण) आणि स्वच्छतेच्या सोयी नसल्याचं यात्रेकरूंनी सांगितलं आहे.
 
इस्लामाबादच्या 38 वर्षांच्या अमिना (बदललेलं नाव) यांनी सांगितलं, " मक्केच्या त्या उन्हाळ्यात आमच्या तंबूंमध्ये एअर कंडिशनर नव्हते. कूलर्स लावलेले होते पण त्यात बहुतेकदा पाणी नसायचे. त्या तंबूंमध्ये इतकं गुदमरायला व्हायचं की आम्ही घामाने थबथबून जायचो. भयानक अनुभव होता तो
 
यालाच दुजोरा देत जकार्ताहून आलेल्या यात्रेकरू फौजिया यांनी सांगितलं, "जास्त गर्दी झाल्यामुळे आणि तंबूंमध्ये उष्णता वाढल्याने अनेकजण चक्कर येऊन पडले. या आयोजनामध्ये सुधारणा होणं गरजेचं असलं, तरी यावेळचं हजचं आयोजन हे आतापर्यंतचं सर्वोत्तम होतं."
 
यात्रेकरूंसाठी कोणत्या सोयीसुविधांचं आयोजन करण्यात आलं होतं याबद्दल सौदीच्या आरोग्य मंत्र्यांनीही माहिती दिली. सरकारी माहितीनुसार हजसाठी येणाऱ्या यात्रेकरूंसाठी 189 हॉस्पिटल्स, आरोग्य केंद्र आणि मोबाईल क्लिनिक्स सज्ज होती. यामध्ये 6500 पेक्षा अधिक बेड्सची सोय होती. आरोग्य कर्मचारी, तंंत्रज्ञ, प्रशासकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक मिळून 40 हजारांपेक्षा अधिकजण इथे तैनात होते.
 
3) उन्हातला खडतर प्रवास
या यात्रेदरम्यान भाविकांना मोठं अंतर कडक उन्हामध्ये पायी चालावं लागलं. काहींनी रस्ते बंद असणं आणि नियोजन योग्य नसण्यालाही दोष दिलाय.
 
हजसाठी खासगी यात्रा आयोजन करणाऱ्या मोहम्मद अखा सांगतात, "या यात्रेसाठी कोणत्याही यात्रेकरूला रोज किमान 15 किलोमीटर्स चालावं लागतं. यामुळेच त्यांना उष्माघात होण्याचा, थकवा येण्याचा आणि पिण्यासाठी पाणी न मिळण्याचा धोका संभवतो. ही माझी 18वी हज यात्रा होती. आणि माझ्या अनुभवानुसार सौदी सरकार नियंत्रण ठेवतं, पण ते सोयीसुविधा देऊन फारशी मदत करत नाहीत. यापूर्वीच्या वर्षांमध्ये तंबूंकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील यू-टर्न सुरू होते. पण आता ते सगळे मार्ग बंद करण्यात आले. परिणामी सामान्य यात्रेकरूंना ते अगदी A श्रेणीतल्या पहिल्या झोनमधल्या तंबूंमध्ये राहत असले तरी त्यांना त्यांच्या तंबूपर्यंत पोहोचण्यासाठी उन्हातान्हात 2.5 किलोमीटर चालावं लागलं. या मार्गावर काही आणीबाणी निर्माण झाली तरी किमान 30 मिनिटं कोणीही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जीव वाचवण्यासाठीची कोणतीही तरतूद नाही किंवा या मार्गावर कुठेही पाणीही नाही."
 
4) नोंद नसलेले यात्रेकरू
हजच्या यात्रेला जाण्यासाठी विशेष हज व्हिसासाठीचा अर्ज करावा लागतो. अशा अधिकृत यात्रेकरूंना नुसक कार्ड (Nusuk Card) दिलं जातं, ज्यावर पवित्र स्थळांना भेटी देण्यासाठीचा बारकोड असतो. शिवाय या यात्रेकरूंना रिस्टबँड आणि ओळखपत्रं दिली जातात.
 
पण काही भाविक योग्य त्या कागदपत्रांशिवायचं या पाच दिवसांच्या यात्रेसाठी जाण्याचा प्रयत्न करतात. अशांना शोधण्याचा - थांबवण्याचा प्रयत्न सौदीचे अधिकारी करत असतात. पण अनेकदा असे अनधिकृत यात्रेकरू त्यांना गरज असतानाही अधिकाऱ्यांना टाळतात.
या अशा अनधिकृत यात्रेकरूंमुळे मृत्यूंचा आकडा वाढला असून काही तंबूंमध्ये अधिकची गर्दी झाल्याचं सौदीच्या अधिकाऱ्यांनी ्हटलं आहे.
 
इंडोनेशियाच्या नॅशनल हज अँड उमराह कमिशनचे अध्य मुस्तोलिह सिराज यांनी सांगितलं, "आम्हाला संशय आहे की हजसाठाचा व्हिसा नसणारे असे लोक नोंदणीकृत यात्रेकरूंसाठीच्या भागांमध्ये घुसले."
 
5) वयस्कर, अशक्त आणि आजारी यात्रेकरू
हज यात्रेदरम्यान मृत्यू होण्यामागचं आणखी एक मोठं कारण म्हणजे यात्रेसाठी येणाऱ्यांचं वय. बहुतेक यात्रेकरू हे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात, आयुष्यभराची पुंजी वापरून ही यात्रा करायला येतात.
 
हज यात्रेदरम्यान मृत्यू होणं आणि पवित्र शहरात दफन केलं जाणं भाग्याचं असल्याचाही अनेक मुस्लिमांचा समज आहे.
 
हज यात्रेदरम्यान एखाद्या भाविकाचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल हज मिशनला कळवलं जातं. रिस्टबँड आणि गळ्यातल्या आयकार्डवरून त्यांची ओळख पटवली जाते. यानंतर त्यांना डॉक्टरांकडून सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सौदी अरेबियाकडून मृत्यूचा दाखला दिला जातो.
 
मक्केतली मस्जिद अल्- हरम किंवा मदीनेतील मशीदीत दफनासाठीचं नमाजपठण होतं. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पार्थिवाला स्नान घालून, ते गुंडाळून सौदी सरकारच्या शवागारांमध्ये ठेवलं जातं. सौदी सरकार या सगळ्याचा खर्च उचलतं. यानंतर दफनविधी होतो. अनेकदा अनेक पार्थिवांचं एकाचवेळी दफन केलं जातं. या व्यक्तींच्या कुटुंबियांना कबरीला भेट देता यावी, म्हणून ज्या कबरिस्तानात दफन करण्यात आलं तिथे नोंद करण्यात येते.
 
मरण पावलेल्यांना मानाने आणि आदराने निरोप देण्याचा प्रयत्न आपण रेड क्रेसेंट आणि इतर गटांच्या मदतीने करत असल्याचं सौदी सरकारने म्हटलंय.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

जॉर्जियामधील रेस्टॉरंटमध्ये 12 भारतीय मृत आढळले

LIVE: फडणवीस मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुनगंटीवारही संतप्त

परभणी हिंसाचार आणि सरपंच हत्या प्रकरणावर चर्चा करण्यास फडणवीस सहमत

ठाण्यात कलयुगी बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला

अदानीविरोधात याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दंड

पुढील लेख
Show comments