Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

COP27 : हवामान बदलामुळे 'या' 10 प्रकारचे आजार होण्याची शक्यता

Webdunia
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (19:57 IST)
वितळतं बर्फ, समुद्राला उधाण, पूर, दुष्काळ, कोसळती घरं, शेतीचं नुकसान... हवामान बदलाचे परिणाम म्हटलं, की या गोष्टी तुमच्या नजरेसमोर येत असतील.
 
पण हवामान बदलाचा माणसाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?
 
भारतासारख्या देशात हा परिणाम तीव्रतेनं जाणवतो आहे. इथे उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 55 टक्के वाढ झाल्याचं लॅन्सेट या मेडिकल जर्नलच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे.
 
'लॅन्सेट काऊंटडाऊन' या नावानं ओळखला जाणारा हा वार्षिक अहवाल 99 तज्ज्ञांनी एकत्र येऊन तयार केला आहे, ज्यात जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO आणि जगभरातल्या आघाडीच्या विद्यापीठातील संशोधकांचा समावेश आहे.
 
103 देशांतील हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास यामध्ये करण्यात आला.
 
इजिप्तच्या शर्म अल शेखमध्ये 6 नोव्हेंबरपासून जागतिक हवामान परिषद भरणार आहे आणि त्याआधी हा अहवाल प्रकाशित झाला आहे.
 
भारतीयांच्या आरोग्यावर उष्णतेचा परिणाम
'लँसेट काऊंटडाऊन' या अहवालानुसार भारतात 2000 ते 2004 या कालावधीच्या तुलनेत 2017 ते 2021 या कालावधीत अति उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 55% वाढ झाली आहे.
 
2021 मध्ये उष्णतेच्या लाटांमुळे भारतात 167.2 अब्ज कामाचे तास वाया गेल्याचंही हा अहवाल सांगतो. साहजिकच यामुळे आर्थिक नुकसानही झालं, जे देशाच्या जीडीपीच्या 5.4% एवढं होतं.
लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये असंही समोर आलंय की, मागच्या वीस वर्षांत जगभरात उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये दोन तृतीयांश वाढ झाली आहे.
 
यंदा मार्च आणि एप्रिलमध्ये जी उष्णतेची लाट आली होती, ती हवामान बदलामुळे आलेली असण्याची शक्यता 30 पटींनी जास्त असल्याचं हा अहवाल सांगतो.
 
युकेमधील हवामान विभागाच्या एका अभ्यासानुसार, हवामान बदलाचा प्रभाव नसता, तर भारत आणि पाकिस्तानात अशा उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता एरवी 312 वर्षांतून एखाद्या वेळेस एवढीच होती. पण आता अशा लाटा येण्याचं प्रमाण 100 पटींनी वाढलं आहे.
 
2022 या वर्षात जगभरात अनेक ठिकाणी तापमानानं नवे उच्चांक गाठले. जुलै महिन्यात अगदी युरोपातही पारा 40 अंश सेल्सियसवर पोहोचला.
 
भारतात तर देशातील सर्वच भागांमध्ये नागरिकांना यंदा उन्हाची झळ बसली. यंदाचा मार्च महिना उन्हाच्या बाबतीत विक्रमी ठरला. गेल्या 122 वर्षांमधील तापमानाचा उच्चांक यंदाच्या वर्षी देशाने गाठला. राजधानी दिल्लीचा पारा 44 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला.
 
वाढत्या उष्णतेचा माणसाच्या आरोग्यावर किती परिणाम होतो आहे, याविषयी लँसेट काऊंटडाऊन अहवालाचे लेखक लिहितात, "अतिउष्णतेचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, उष्माघात, गर्भधारणेवर प्रतिकूल परिणाम, झोपेवर परिणाम, मानसिक आरोग्य ढासळणं, दुखापतीमुळे होणारे मृत्यू असे धोके संभवतात."
 
ज्यांचं आरोग्य आधीच धोक्यात आहे, अशा व्यक्तींना उष्णतेच्या लाटेमुळे जास्त त्रास होऊ शकतो, असंही हा अहवाल नमूद करतो.
 
जीवाष्म इंधन जाळण्याचा आरोग्याला फटका
हवामान बदलाला कारणीभूत ठरणाऱ्या जैविक आणि जीवाष्म इंधनांचा वापरही आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. कोळसा, पेट्रोल-डिझेल, लाकूड अशा गोष्टींच्या ज्वलनातून धूर आणि पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे सूक्ष्म धुलीकण हवेत पसरतात. ते नाकावाटे फुप्फुसात जाऊन अडकतात, आणि त्यामुळेही मृत्यू ओढवू शकतो.
जगभरात वायूप्रदुषणामुळे 2020 साली 47 लाख जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लँसेटच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. यातले 13 लाख म्हणजे 35 टक्के मृत्यू हे थेट जीवाष्म इंधनाच्या ज्वलनाशी निगडीत होते.
 
2021 या एका वर्षातच भारतात 3,30,000 जणांचा मृत्यू पार्टिक्युलेट मॅटरमुळे झाल्याचंही लॅन्सेटच्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
 
भारतात घराअंतर्गत आढळणाऱ्या पार्टिक्युलेट मॅटरचं प्रमाण WHOच्या मानकांपेक्षा 27 पटींनी जास्त आहे, असंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं आहे.
 
जमेची गोष्ट म्हणजे भारतात अन्न शिजवण्यासाठी लाकूड आणि कोळशाऐवजी एलपीजी, बायोगॅस अशा इंधनाचा वापर वाढतो आहे. पण दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रात जीवाष्म इंधनांचा वापर अजूनही कमी झालेला नाही.
 
हवामान बदलामुळे कोणते आजार संभवतात?
हवामान बदलामुळे उष्णतेशी निगडीत आजारांप्रमाणेच अन्नसुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर बनतो आहे आणि संसर्गजन्य रोगांचा प्रसार वेगानं होतो आहे, असंही लँसेट काऊंटडाऊन अहवाल सांगतो.
 
निरोगी आयुष्यासाठी स्वच्छ हवा, स्वच्छ आणि पुरेसं पेयजल, पुरेसं आणि सकस अन्न आणि सुरक्षित निवारा या गोष्टींची गरज असते. पण हवामान बदलामुळे या गोष्टी मिळणं कठीण होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं 2021 साली प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटलं होतं.
हवामान बदलामुळे आरोग्याच्या कोणत्या समस्या निर्माण होतायत, याची यादीच WHO नं 2021 साली प्रकाशित केलेल्य या लेखातून समोर येते.
 
अतीतीव्र नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या दुखापती आणि मृत्यू
दूषित पाण्यातून पसरणारे आजार
डायरिया
कुपोषण
अन्नावाटे पसरणारे आजार
प्राण्यांवाटे माणसांमध्ये पसरणारे रोगजंतू
डास किंवा कीटक चावल्यानं होणारे आजार
हृदयरोग
कॅन्सर
मानसिक आरोग्याच्या समस्या
आरोग्याचे हे प्रश्न हवामान बदलामुळे आणखी वाढत असल्याचा इशाराही WHOनं दिला आहे. त्यामुळे दरवर्षी 2,50,000 अतिरिक्त मृत्यू होतील असं भाकितही WHO नं वर्तवलं आहे.
 
संयुक्त राष्ट्रांची मुलांसाठी काम करणारी संस्था युनिसेफनंही काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. उष्णतेच्या वाढत्या लाटांपासून मुलांचं आणि कमजोर गटांचं संरक्षण करण्यासाठी निधी उभा करण्याची तातडीनं गरज आहे, असं त्यात नमूद केलं होतं.
 
संशोधकांना असं दिसून आलं आहे की वर्षातील ज्या महिन्यांमध्ये अमेरिका आणि आफ्रिकेत मलेरियाचा संसर्ग वाढतो, त्या कालावधीत हवामान बदलामुळे गेल्या साठ वर्षांत वाढ झाली आहे.
 
यावर उपाय काय?
पण मग या सगळ्यावर काही उपाय आहे का? तर आहे, असं उत्तर लॅन्सेटच्या अहवालातच दिलं आहे.
 
"आव्हानं मोठी आहेत, पण तातडीनं पावलं उचलली तर करोडो लोकांचा जीव वाचवता येऊ शकेल. त्यासाठी स्वच्छ उर्जेचा वापर आणि उर्जेची कार्यक्षमता या दोन्ही गोष्टींचा वापर वाढवण्याची गरज आहे." असं अनुमान लॅन्सेटच्या तज्ज्ञांनी काढलं आहे.
 
म्हणजेच हवामान बदलाला आळा घालणं, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणं, जंगलांचं संरक्षण करणं, मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन करणाऱ्या जीवाष्म इंधनांचा वापर कमी करणं आणि त्यासाठी आपापल्या देशांच्या, राज्यांच्या सरकारांवर दबाव आणणं अशा गोष्टी कराव्या लागतील.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

डिनर स्पेशल मटर पुलाव

Health Benefits of Broccoli : ब्रोकोली हिवाळ्यातील सुपर फूड आहे फायदे जाणून घेऊया

Career in MBA in Agribusiness : कृषी व्यवसायात एमबीए कोर्स मध्ये करिअर

केसांना कापूर तेल लावल्याने कोणते फायदे होतात?

पुढील लेख