Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजीव गांधींच्या हत्येसाठी जेव्हा अतिरेक्याने 8 दिवस महात्मा गांधींच्या समाधीमागे तळ ठोकला होता

Webdunia
रविवार, 21 मे 2023 (10:23 IST)
31 ऑक्टोबर 1984च्या दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली आणि त्याच्या पुढच्या काही तासांमध्येच राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले होते. इंदिरा गांधीची हत्या आणि राजीव गांधी यांच्या शपथविधी दरम्यान राजीव आणि सोनिया गांधी यांच्यात एक संवाद झाला होता. राजीव गांधी सोनिया गांधींना सांगत होते की, 'पक्षाची इच्छा आहे की, मी पंतप्रधानपदाची शपथ घ्यावी.' सोनिया गांधींनी तत्काळ 'अजिबात नाही', असं सांगितलं होतं. 'ते तुला पण मारून टाकतील...' हे सोनिया गांधींचे शब्द होते. राजीव यांचं उत्तर होतं, 'माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. मी तसाही मारला जाणार आहे.'
 
इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलेल्या पी. सी. अलेक्झांडर यांनी आपलं पुस्तक 'माय डेज विथ इंदिरा गांधी'मध्ये हे लिहिलं आहे.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काही तासांतच त्यांनी AIIMS च्या इमारतीत सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांना भांडताना पाहिलं होतं.
 
त्यावेळी बहुधा राजीव यांच्या डोक्यात खलिस्तानी दहशतवादी आता आपलही हत्या करू शकतात याची भीती असावी.
 
राजीव गांधी यांची हत्या खरंतर श्रीलंकेतल्या एलटीटीई म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमने केली. पण म्हणून खलिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांच्या हत्येचा प्रयत्न केलाच नाही असं नाही. त्याचीच ही गोष्ट...
 
तारीख – 2 ऑक्टोबर 1986
 
स्थळ – राजघाट, नवी दिल्ली
 
वेळ - सकाळी 6 वाजून 55 मिनिटांची
 
आणि
 
स्थिती – गोळीबाराची....
 
इंदिरा गांधी यांच्या हत्येला 2 वर्षं पूर्ण होण्यासाठी काही दिवसांचाच अवधी बाकी होता. पण त्याआधीच राजीव गांधी यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला होता.
 
करमजित सिंग नावाच्या तरुणानं तो आखला होता. त्यासाठी त्यानं स्थळ निवडलं होतं नवी दिल्लीतल्या राजघाटावरच्या महात्मा गांधींच्या समाधीचं.
 
दरवर्षी महात्मा गांधींच्या जयंती निमित्त देशाचे पंतप्रधान त्यांना अभिवादन आणि प्रार्थना करण्यासाठी इथं येतात याची त्याला माहिती होती. तिथंच राजीव यांना मारण्याची संधी असल्याचं करमजित सिंगच्या लक्षात आलं होतं.
 
त्यासाठी त्याने पूर्व तयारीदेखील केली होती. कुठून कसा हल्ला करता येईल याची त्याने चाचपणी केली.
महात्मा गांधींच्या समाधीच्या मागच्या बाजुला यमुना नदीचा काठ आहे. तिथं झुडपांचं जंगल आहे. समाधींच्या कंपाउंडच्या मागे लपून तिथल्या झुडपांमधून हल्ला करण्याचा त्याने प्लॅन केला.
 
कारण तिथून थेट महात्मा गांधींची समाधी दृष्टीपथात होती आणि तिथं दर्शनासाठी आलेल्या माणसावर निशाणा साधणं सोपं होतं.
 
परिस्थिती आणि परिसराचं निट आकलन व्हावं म्हणून त्याने 25 सप्टेंबरपासूनच तिथं तळ ठोकला. राहण्यासाठी काळ्या प्लास्टिकच्या कापडाची 10 फूट उंचीची झोपडीसुद्धा उभारली.
 
भूक लागल्यावर खाण्यासाठी चणे, पाण्याचा कॅन, रात्री मच्छरांपासून संरक्षण व्हावं म्हणून मस्किटो रिपेलेंट क्रिम, ब्लँकेट , महत्त्वाची औषधं, एरंडेल, टूथपेस्ट आणि काही धार्मिक पुस्तकं अशा सर्व गोष्टी जमवल्या.
 
सुरक्षेत मोठी चूक
खरंतर इंदिरा गांधींच्या हत्येनंतर भारतीय पंतप्रधानांच्या सुरक्षेत अमूलाग्र बदल करण्यात आला होता. शिवाय गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती.
 
2 ऑक्टोबरला राजीव गांधी यांच्यावर हल्ला होऊ शकतो, असा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी आधीच दिला होता. त्यांनी क्लिन शेव्ह असलेला शीख तरूण त्यांच्यावर हल्ला करू शकतो, अशी माहितीसुद्धा पुरवली होती. हल्ल्याचं वार्तांकन करताना इंडिया टुडे मासिकानं तेव्हा प्रकाशित केलेल्या लेखात याचा सर्व बारीक-सारीक तपशील देण्यात आला आहे.
 
असे अलर्ट येतच असतात, असंसुद्धा तेव्हाच्या दिल्ली पोलिसांच्या प्रमुखानं म्हटलं होतं. पण, तरीही राजघाटावर त्यादिवशी अभूतपूर्व सुरक्षा होती. हल्ला होऊ शकतो अशा सर्व संभाव्य जागांवर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.
 
सर्व उंच इमारतींवर सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले होते. रस्तेसुद्धा सुरक्षित करण्यात आले होते.
 
पण एवढं सगळं करत असताना एक चूक मात्र सुरक्षा यंत्रणांकडून झालीच.
 
ती म्हणजे – कार्यक्रम सुरू होण्याच्या 24 तास आधी इथं स्क्रिनिंग आणि कोंबिंग ऑपरेशन सुरू करणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात ते आदल्या दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता सुरू करण्यात आलं.
 
आधीच उशीरा आणि त्यातही कमी सूर्यप्रकाशात ते उरकण्यात आलं.
 
स्फोटकं शोधणाऱ्या कुत्र्यांनी सर्व परिसर पिंजून काढला. यमुनेच्या काठावर पोलीस आणि त्यांचे कुत्रे करमजित सिंगच्या त्या झोपडीपाशी आले. त्यांना तिथं संशय आला. पण कुत्र्यांना तिथं काहीच संशायास्पद सापडलं नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. करमजित सिंग थोडक्यात बचावला होता.
 
त्याच्यासाठी ती रात्र वैऱ्याची होती. पण, सुरक्षा यंत्रणांकडून बचावल्यामुळे त्याचा जीव भांड्यात पडला होता. सकाळ होताच त्याने त्याच्याकडे असलेला सैन्याचा गणवेश घातला. जेणेकरून कुणाला लगेच संशय येऊ नये.
 
राजीव गांधी येण्याची वेळ होण्याआधीच तो तिथल्या 8 फूट उंच कंपाउंडच्या भिंतीवर पालथा झोपला.
 
अखेर तो क्षण आलाच...
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी ठरलेल्या वेळेप्रमाणे सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी राजघाटावर उपस्थित झाले.
 
ते समाधीच्या दिशेने चालू लागले. तोच एक गोळी झाडल्याचा आवाज आला. राजीव गांधींवर करमजित सिंगने पहिली गोळी झाडली. पण ती राजीव यांना न लागता त्यांच्या शेजारच्या हिरवळीवर पडली.
 
सुरक्षा यंत्रणांनी लगेचच राजीव गांधी यांना घेरलं, पण राजीव यांनी पुढे चालणं सुरूच ठेवलं.
 
बाहेर उपस्थित असलेल्या दिल्ली पोलिसांना तो स्कूटरचा आवाज असल्याचा संशय आला. पण तिथं उपस्थित असलेल्या साध्या वेशातल्या सुरक्षा रक्षकांना वेगळाच संशय आला त्यांनी तात्काळ लॅब्रेडॉर कुत्र्यांना पाराचण करून शोध सुरू केला.
 
तिथल्या लॉनमध्ये राजीव गांधींना न लागलेली ती गोळी सापडली.
 
तेवढ्यात तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांचं आगमन झालं. गोळीबार झाल्याचं लक्षात आल्यानंतरही प्रार्थनासभा सुरू करण्यात आली.
 
आता स्पष्ट झालं होतं की कुणीतरी राजीव गांधींना लक्ष्य करत आहे. त्यांच्या जिवाला इथं धोका आहे. पोलीस, एसपीजी आणि इतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ अलर्ट झाल्या होत्या.
 
ज्या ज्या ठिकाणाहून गोळी झाडली जाऊ शकते त्या त्या प्रत्येक ठिकाणी मारेकऱ्याचा शोध घेण्यात आला. सुरक्षा रक्षकांनी तिथल्या प्रत्येक उंच झाडाची तपासणी केली. पण कुणीच सापडलं नाही म्हणून मग बाहेरच्या दिशेला असलेल्या इमारतींमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. तिथंही त्यांना काहीच सापडलं नाही.
 
पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेतून करमजित सिंग आणि त्याची ती झोपडी सुटली होती. तिकडे प्रार्थनेचा कार्यक्रम सुरूच होता.
 
राजीव गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग आणि इतर व्हीआयपी मंडळी प्रार्थन सभेत काही काळ बसली. तोपर्यंत 8 वाजले होते.
 
त्यानंतर मात्र राजीव गांधी उठून पुन्हा बाहेर जायला लागले तेव्हा करमजित सिंगला दुसरी संधी मिळाली त्याने त्याच्या जर्मन बनावटीच्या 12 बोअर रिव्हॉल्हरमधून बरोबर 8 वाजून 10 मिनिटांनी दुसरी गोळी राजीव यांच्या दिशेने झाडली.
 
त्याचा हा नेमसुद्धा चुकला होता. आता मात्र सुरक्षा यंत्रणांनी राजीव गांधी, सोनिया गांधी आणि ग्यानी झैलसिंग यांना गराडा घातला. उरलेल्या सुरक्षारक्षकांनी आता करमजित सिंगच्या झोपडीकडे धाव घेतली होती.
 
सुरक्षारक्षकांच्या गराड्यात तिघेही जण त्यांच्या गाड्यांकडे धावू लागले. तेवढ्यात ‘कुठून हे हल्ले होत आहेत’ असा सवाल ग्यानी झैलसिंग यांनी राजीव गांधी यांना विचारला. त्यावर ‘मी आलो तेव्हा त्यांनी माझं असंच स्वागत केलं होतं, आता जातानासुद्धा ते तसंच करत असावेत असं दिसतंय,’ असं त्यांनी उत्तर दिलं.
 
राजीव यांनी कसंबसं झैलसिंग यांना त्यांच्या काळ्या मर्सिडिजमध्ये बसवलं आणि त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या ऍम्बेसेडर गाडीकडे सोनियांसह धाव घेतली. सुरक्षा रक्षकांचं मजबूत कडं आता त्यांच्या भोवती होतं. पण, तेवढ्यात त्यांच्यावर तिसरी गोळी झाडण्यात आली. ही तिसरी गोळी त्यांना छाटून गेली.
 
एवढ्यात करमजित सिंग ज्या दिशेला होता तिथून गोळी झाडल्याचा धूर येत असल्याचं सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आलं होतं. सुरक्षारक्षक तिथं पोहोचण्याआधीच कंपाउंडच्या भिंतीवर उभं राहत करमजित सिंगने ‘मी सरेंडर करतो’ असं मोठ्याने ओरडून सांगितलं.
 
त्याचक्षणी सर्वांच्या बंदुका त्याच्या दिशेने रोखल्या गेल्या. एसपीजी कमाडोंनी त्याला घेरलं. तेवढ्यात तिथं उपस्थित असलेले तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग ओरडले – ‘गोळ्या झाडा त्याला.’
 
पण दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त गौतम कौल यांनी तात्काळ ऑर्डर दिली – ‘गोळी मारू नका, गोळी मारू नका.’ कारण त्यांना हा मारेकरी जिवंत पकडायचा होता.
 
एसपीजीच्या कमांडोंनी तात्काळ करमजित सिंगला खाली उतरवलं आणि त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढून त्याला विवस्त्र केलं. त्याने त्याच्या शरीरावर इतर कुठली स्फोटकं तर लावलेली नाहीत ना याचा शोध घेण्यात आला.
 
तोपर्यंत राजीव गांधी, सोनिया गांधी आणि ग्यानी झैलसिंग सुरक्षितपणे तिथून बाहेर पडले होते.
 
करमजित सिंगकडे असलेलं रिव्हॉल्वर चांगल्या दर्जाचं नव्हतं, त्याच्याकडे असलेली काडतुसं निकृष्ट दर्जाची आणि अर्धवट वापरलेली होती. त्यामुळेच राजीव गांधींचा जीव वाचल्याचं नंतर तपासात पुढे आलं.
 
या घटनेनंतर राजीव गांधींच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली. पण त्यांचं पंतप्रधानपद जाताच त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आणि मग 21 मे 1991 च्या रात्री श्रीपेरंबुदूरमध्ये नेमकं काय घडलं हे सर्वांना माहिती आहेच...
 
पण तरीही श्रीपेरंबुरूपमधली ती काळीरात्र कशी होती, त्या दिवशीचा घटनाक्रम काय होता हे तुम्ही इथं वाचू शकता - राजीव गांधी यांचं आयुष्य संपवून टाकणारा 'तो' स्फोट...
 





Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments