Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरात्र महात्म्य : नवरात्रात येणार्‍या विशिष्ट व्रतांबद्दल माहिती

Webdunia
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (13:08 IST)
नमो दैव्ये महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यैभद्रायै नारायणि नमोऽस्तुते ॥
ब्रम्हरुपे सदानन्दे परमानन्द स्वरुपिणी ।
द्रुत सिध्दिप्रदे देवि, नारायणि नमोऽस्तुते ॥
 
आश्विन शुध्द प्रतिपदेपासून नवरात्र व्रत आरंभ होत असून नऊ दिवस भक्तिभावे हे व्रत केलं जातं. प्रतिपदेच्या दिवशी देवीची स्थापना करतात. नऊ दिवसापर्यंत नवरात्र असते. अनेक कुटुंबांतही दुर्गा देवीची पूजा होत असते. 
 
पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. तांब्याच्या कलशावर ताम्हण ठेवून त्यात मंडलाकर मुख्य देवता महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती व आपल्या परंपरेनुसार देवतांची स्थापना केली जाते. घटाच्या बाजूलाच नवे धान्य रुजत घालते जातात. नंतर ते रुजवण उत्सवसमाप्तीनंतर भगिनी केसात माळतात.
 
घटस्थापनेच्या वेळी लावलेला नंदादीप, अखंडदीप विसर्जनापर्यंत अखंड ठेवतात. या नऊ दिवसात श्रीदेवी माहात्म्य - प्राकृत सप्तशती, श्री दुर्गा माहात्म्य, नवरात्र माहात्म्य, श्री दुर्गा कवच इत्यादी ग्रंथांचे, पोथ्यांचे, मंत्रांचे वाचन केलं जातं. अनेक भक्त नऊ दिवस उपवास करतात. तर काही पहिल्या दिवशी व अष्टमीला तर घट उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात.
 
नवरात्रात कुमारिकांना, सुवासिनींना घरी जेवायला आमंत्रित केलं जातं. एका दिवशी एका सुवासिनीची खण- नारळाने ओटी भरतात. मंदिरात जाऊन देवीची खण-नारळाने ओटी भरतात.
 
नवरात्रात नऊ दिवस देवीच्या घटावर सुगंधी फुलांची माळ सोडतात. नवरात्र पूजेत घटावर मंडपी बांधून त्याखाली लोंबणार्‍या विविध फुलांच्या माला बांधण्याची महत्वाची  विधी आहे. अनेक कुटुंबांत ही माळा अर्पित केली जाते. म्हणजे पहिल्या दिवशी एक, दुसर्‍या दिवशी दोन, तिसर्‍या दिवशी तीन याप्रमाणे नवव्या दिवशी नऊ माला बांधतात.
 
नवरात्रात काही विशिष्ट व्रते देखील असतात जसे आश्विन शुध्द पंचमीला उपांगललिता देवीचे व्रत असते. ललिता पंचमीस घटावर सायंकाळी पापडया, करंज्या, गोड वडे वगैरे फुलोरा टांगतात. त्या समारंभात ललिता देवीची पूजा प्रार्थना करुन महाप्रसादासाठी भक्तांना बोलवतात. हा एक कुळधर्म आहे.
 
कुंकवाच्या करंडयाचे झाकण घेऊन त्याची ललितादेवी म्हणून प्रतीकात्मक पूजा करतात. गंधपुष्प आणि अठ्‌ठेचाळीस दूर्वा ललिता देवीला वाहण्याची परंपरागत रुढी आहे.
 
नमो दैव्यै महादैव्ये शिवायै सततं नमः । नमः प्रकृत्यै भद्रायै नियता; प्रणताः स्म ताम्॥
 
ललितादेवीचा हा ध्यानमंत्र आहे.
 
पंचमीला कुंकुमार्चन म्हणजे कुमारिका आणि सुवासिनींकडून देवीला कुंकू वाहतात. कुंकूवाबरोबर दूर्वा, फुले वाहून देवीची आरती म्हणतात. 
 
आश्विन शुध्द अष्टमीला श्रीमहालक्ष्मी व्रतांग पूजा केली जाते. महाराष्ट्रात चित्त्पावन ब्राम्हण समाजात हे व्रत प्रचलित असून लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे श्रीमहालक्ष्मीची पूजा सुवासिनी मोठया उत्साहाने भक्तिभावे करतात. या दिवशी सकाळी देवीची पूजा- आरती करतात. रात्री तांदुळाच्या पिठाची श्रीमहालक्ष्मीची मूर्ती करुन तिची पूजा करतात. ज्यांच्या घरी ही पूजा असते, त्यांच्या घरी सुवासिनी देवीची पूजा करण्यासाठी जातात.
 
सोळा पदरी रेशमाचा दोरा घेऊन त्याला गाठी मारतात. पहिले वर्षे असेल तर एक गाठ, पाचवे वर्ष असेल तर पाच गाठी असा तातू तयार करुन हा दोरा पूजिकेने आपल्या हातात बांधतात. दुस-या दिवशी सकाळी मूर्तिविसर्जनाच्या वेळी देवीपुढे ठेवतात.
 
रात्री देवीची पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकतात. दुसर्‍या दिवशी सूर्योदयापूर्वी पंचोपचार पूजा करुन आरत्या, प्रार्थना करुन विसर्जन करतात. 'उदयोऽस्तु' ही या देवीची घोषणा आहे. नवरात्रात महालक्ष्मीची पूजा हा कुलाचार, कुलधर्म आहे.
 
आश्विन शुध्द प्रतिपदेपासून दशमीपर्यंत नवरात्रात बोडण भरण्याची चाल पुष्कळ ठिकाणी आहे. विशेषतः कोकणस्थ व देशस्थ ब्राम्हणांमधील हा एक कुलाचार आहे. बोडण विधी आश्विन शुध्द प्रतिपदेलाच करण्याची वहिवाट काही कुटुंबांत आहे.
 
बोडण म्हणजे कालवणे अर्थात एका मोठया पात्रात घरातील देवीची मूर्ती ठेवून तिची पूजा करुन सभोवती पाच सुवासिनींनी बसून त्या पात्रात दूध, दही, तूप, साखर, मध ही पाच द्रव्ये एकत्र घालून सर्वांनी मिळून कालवायची असा हा विधी आहे. तर काही ठिकाणी पाच सुवासिनी व एक कुमारिका एकत्र बसून देवीची पूजा करतात. पुरणावरणाचा स्वयंपाक देवीला अर्पण केला जातो. नंतर तो स्वयंपाक पाच सुवासिनी मिळून एकत्र कालवतात. कुमारिकेला देवी मानून तिची पूजा केली जाते आणि ती जेव्हा 'खूप झाले' असे म्हणते तेव्हा ते कालवलेले अन्न गायीला नेऊन देतात.
 
आश्विन शुध्द नवमीला खड्‌गानवमी किंवा खांडेनवमी असे म्हणतात. या दिवशी अनेक कुटुंबात शस्त्रपूजा करण्याची पद्धत आहे.
 
विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक चांगला मुहूर्त असल्याने या दिवशी कोणते ही शुभ कार्यारंभ केले ती सिध्दीस जातात. या दिवशी नक्षत्रांच्या उदयाच्या वेळी विजय हा मुहूर्त असतो. म्हणून कोणत्याही शुभकार्याला या दिवशी मुर्हूत न बघता प्रारंभ करता येतं. हा पराक्रमाचा, विजयाचा दिवस आहे. या दिवशी शमीच्या वृक्षाची पूजा करुन आपटयाची पाने सुवर्णमुद्रा म्हणून लुटण्याची पद्धत आहे. विजयादशमीला श्रीसरस्वती पूजन केले जातं. लहान मुलांना प्रथमच पाटीवर 'श्रीगणेशा' ही अक्षरे गिरवायला लावली जाते. 
 
दसर्‍याला 'अपराजिता' दशमी असेही म्हणतात. ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्या ठिकाणी अष्टदल कमल काढून त्यावर दुर्गेची मूर्ती ठेवून श्रध्देने पूजा केली जाते. दसर्‍याच्या दिवशी
 
'रुप देहि, जयं देहि, यशो देहि, द्विषो जहि'
 
अशी दुर्गेची प्रार्थना करतात.
 
या नऊ दिवसात देव व मानवांचे रक्षण करणार्‍या देवीची भक्तिभावाने पूजा- उपासना केली जाते. देवी सर्वांची इच्छा पूर्ण करुन सर्व संकटांपासून मुक्त करते. 

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments