Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BMC निवडणूक: एकनाथ शिंदे यांच्याकडे किती नगरसेवक? शिवसेनेतल्या फुटीचा फायदा कोणाला होणार?

Webdunia
मंगळवार, 27 जून 2023 (08:45 IST)
दीपाली जगताप
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा 'भगवा' फडकणार? हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईलच पण ही निवडणूक शिवसेनेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे.
 
गेली 25 वर्षं मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरची ही पहिली निवडणूक असणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयोग कितपत यशस्वी ठरणार? हे सुद्धा याच निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होणार आहे.
 
या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. विशेषत: ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
 
गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचं शिबिर बोलावलं होतं तर यानंतर माझी नगरसेवक आणि विभाग प्रमुखांची बैठक सेना भवन येथे पार पडली होती.
 
तर या आठवड्याची सुरुवातही उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीने केली आहे.
 
मुंबई महानगरपालिकेतील कोव्हिड सेंटरच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरू आहे. तर या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
 
दुसऱ्या बाजूला रस्ते घोटाळ्याचा आरोप करत 1 जुलै रोजी ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर सर्व नेते सहभागी होणार आहेत.
 
येत्या काळात मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरून शिवसेनेतील दोन्ही गट अधिक आक्रमक झालेले दिसतील. यामुळे शिवसेनेतल्या फुटीचा फायदा कोणत्या पक्षाला होणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल
 
लक्ष्य मुंबई महानगरपालिका निवडणूक
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणी 'जनतेला किती लुटलं' यावरून शिवसेनेतल्याच दोन गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.
 
पहिल्या पावसातच मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने पालिकेच्या नालेसफाईच्या कामावर आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
पाणी तुंबलं तेव्हा मुख्यमंत्री काय करत होते? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी तुंबल्यास अधिका-यांवर कारवाई होईल असं सांगत प्रत्युत्तर दिलं.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, "पाऊस पडू द्या तरी, पावसाचं स्वागत करा बदनाम करायला वेळ आहे. आम्ही सांगितलं आहे जिकडे नाले भरतील, पाणी तुंबेल तिथल्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल. जिथे पाणी तुंबणार नाही तिथल्या अधिकाऱ्याचा सत्कार करू. ही आमची भूमिका आहे."
 
तर यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
 
"घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला एवढा बालिशपणा अपेक्षित नाही. ही भूमिका म्हणजे निष्काळजीपणा आहे. सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं चिन्ह म्हणजे ही व्यक्ती आहे." अशी टीका आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
 
भाजपनेही मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पूर्व तयारी सुरू केली आहे. गेल्या काही काळात भाजपच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अनेक बैठक पार पडल्या आहेत.
 
या बैठकीत 'मिशन 151' असा नारा भाजपने दिला आहे. 151 नगरसेवक निवडून आणण्याचं भाजपचं लक्ष्य आहे तर या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसणार असाही दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
 
तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सप्टेंबर 2022 मध्ये मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरेंवर निशाणा साधला होता.
 
अमित शहा म्हणाले होते, "राजकारणात सगळं काही सहन करा, मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे."
 
राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचा अमित शहा यांचा हा पहिलाच मुंबई दौरा होता. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेवर भाजपची सत्ता यायला हवी, मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावे, असं आवाहनही त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केलं होतं
 
आमदार, खासदारांनंतर नगरसेवक फुटणार का?
महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेचे प्रभाग 227 वरून 236 करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचं काम सुरू केलं होतं. परंतु त्यानंतर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने महाविकास आघाडीचा हा निर्णय पुन्हा बदलून महापालिकेची सदस्य संख्या 236 वरून 227 केली.
 
मुंबइ महानगरपालिकेत एकूण 227 नगरसेवक निवडून जातात. बहुमताचा आकडा 114 आहे.
 
यात शिवसेनेचे एकूण 93 नगरसेवक आहेत. यात मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेले 6 नगरसेवक आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेला आहे.
 
दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. महापालिकेत भाजपचे 85 नगरसेवक आहेत.
 
यानंतर काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, समाजवादी पार्टी 6, एमआयएमचे 2 आणि मनसेचे 1 नगरसेवक आहे.
 
7 मार्च 2022 रोजी मुंबई महानगरपालिकेतील महापौर आणि नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला. आता जवळपास दीड वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रलंबित आहे.
 
38 वर्षांनंतर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेचा कारभार प्रशासनाच्या ताब्यात आहे.
 
40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. यानंतर 13 खासदारांनाही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे नगरसेवक कोणाला साथ देतात हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
 
आतापर्यंत 15 माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात शीतल म्हात्रे, यशवंत जाधव, सुवर्णा कारंजे, परमेश्वर कदम, वैशाली शेवाळे, दिलीप लांडे, मानसी दळवी, किरण लांडगे, समाधान सरवणकर
 
अमेय घोले, संतोष खरात, दत्ता नरवनकर, सान्वी तांडेल, आत्माराम चाचे, चंद्रावती मोरे यांचा समावेश आहे.
 
आता शिवसेनेतील उर्वरित माजी नगरसेवक कोणत्या पक्षात जातात? ते कोणाला साथ देतात उद्धव ठाकरे यांना की एकनाथ शिंदे यांना यावर बरीच राजकीय गणित अवलंबून आहेत.
 
32 वर्ष शिवसेना पक्षात काम करत असलेले आणि पाच टर्म नगरसेवक राहिलेले एक माजी नगरसेवक नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, "गेल्या सव्वा वर्षापासून नगरसेवकांना काम करण्यासाठी निधी मिळत नाहीये. निधी नसल्याने प्रभागात लोकांची कामं करता येत नाहीत. किती दिवस जनतेला फक्त आश्वासनं द्यायची असाप्रश्न आमच्यासमोर आहे. निधी असल्याशिवाय नगरसेवक काहीच करू शकत नाही."
 
"अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाकडून विद्यमान नगरसेवकांना निवडणुकीच्या तोंडावर निधी मिळाला तर निश्चितच ते शिंदे गटात जाण्याचा विचार करतील. आता पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यात प्रभागात स्थानिकांची खूप कामे असतात. पण आज निधीअभावी सगळी कामं अपूर्ण आहेत. उद्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका लागल्या तर त्याआधी किमान कामं करावं लागतील. त्यासाठी निधी आवश्यक आहे,"
 
ही परिस्थिती पाहता ठाकरे गटाकडून नगरसेवकांना थांबवण्यासाठी नेमकी काय रणनीती आखली जाते हे महत्त्वाचं आहे.
 
नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या एका नगरसेवकाने दावा केला की, शिंदे गटात येत्या काळात 35-40 नगरसेवक प्रवेश करण्याची शक्यता आहे."
 
शिवसेनेतल्या फुटीचा फायदा कोणाला होणार?
ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काही नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी लोकसभा, विधानसभा निवडणुका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
 
राज्यात 24 महापालिका निवडणुका रखडल्या आहेत.
 
यात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी अशा अनेक महापालिका आहे. परंतु या 24 पैकी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वाधिक चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे.
 
महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत मतदारांमध्ये विभाजन होणार असल्याने याचा राजकीय फायदा कोणत्या पक्षाला होणार हे पहाणं महत्त्वाचं आहे.
 
अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेचं वार्तांकन केलेले ज्येष्ठ पत्रकार सचिन धानजी सांगतात, "अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. यामुळे नगरसेवक, शाखा प्रमुख, गट प्रमुख यांचाही काही निर्णय झालेला दिसत नाही. त्यामुळे आत्ता लगेच तरी काही अंदाज सांगता येणार नाही. परंतु मुंबई हे ठाकरेंचं प्रस्थ आहे. मुंबईत तळागाळापर्यंत त्यांचं वलय आहे."
 
शिंदें यांच्या शिवसेनेत आमदार, खासदारांप्रमाणे नगरसेवक सुद्धा सामील झाले तर शिवसेनेची एकगठ्ठा मतं शिवसेना-भाजप युतीला मिळतील का?
 
यासंदर्भात बोलताना ते म्हणाले,"भाजपच्या मदतीच्या आधारे शिंदेंच्या शिवसेनेला फायदा होऊ शकतो. सत्ताधारी पक्ष म्हणूनही हा फायदा होईल पण जोपर्यंत शिवसैनिक शिंदेंसोबत जात नाही तोपर्यंत शिवसेनेची मतं त्यांना मिळणं कठीण आहे."
 
ते पुढे सांगतात, "केवळ नगरसेवक पक्ष प्रवेश करून चालत नाही तर शिवसेनेत शाखा प्रमुख आणि गट प्रमुखाला महत्त्व आहे. त्यांच्याकडे प्रभागातील एकगठ्ठा मतं खेचून आणण्याची ताकद असते. हे कट्टर शिवसैनिक कुठे जातात हे महत्त्वाचं आहे."
 
गेल्या आठवड्यापासून शिवसेना भवन येथे विभाग प्रमुख, नगरसेवक यांच्या बैठका सुरू आहेत. पण शिवसेना भवनाबाहेर ज्या मोठ्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी दिसून येते, किंवा जो उत्साह दिसतो तो दिसत नसल्याने शिवसैनिकांमध्ये दोन गटापैकी कोणाला साथ द्यायची याबाबत द्विधा मन:स्थिती दिसून येते.
 
"शिवसेनेत मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित करून मतदान करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणारा शिवसेनेचा वर्ग कोणत्या गटात जातो, म्हणजेच प्रत्यक्षात तळागाळात जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता निवडणुकीत कोणाला साथ देतो यावर फुटीचा फायदा कोणाला होणार हे अवलंबून आहे," असंही सचिन धानजी सांगतात.
 
मुंबईसह ठाणेही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड आहे." शिंदेंना ठाण्यात 80 टक्के फायदा होऊ शकतो. पण मुंबईत 20 टक्केच फायदा होईल.आता नेते, नगरसेवक मतांचं परिवर्तन करण्यात किती यशस्वी होतात यावर अवलंबून आहे," असंही ते सांगतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

Christmas 2024 Gift Idea : ख्रिसमससाठी बजेट फ्रेंडली गिफ्ट बघा

श्रीलंकेने रामेश्वरममधून 17 मच्छिमारांना अटक केली, मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला त्यांना वाचवण्याचे आवाहन केले

भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीला यूएस व्हिसा मिळाला, परराष्ट्र मंत्रालयाचे आभार

ब्राझीलमध्ये पूल कोसळून किमान 2 जण ठार, डझनभर बेपत्ता

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची प्रकृती खालावली,रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments