Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गिरीश बापट : मी भाजपसह सगळ्याच पक्षांवर नाराज आहे, असं गिरीश बापट का म्हणायचे?

Webdunia
बुधवार, 29 मार्च 2023 (19:08 IST)
गिरीश बापट यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ते लाईफ सपोर्ट सिस्टिमवर होते.
 
गिरीश बापट यांचं जाणं हा भाजपच्या पुणे आणि राज्यातील कार्यकर्त्यांसाठी धक्का असल्याचं सांगत भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
गिरीश बापट यांनी नगरसेवक म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. नगरसेवक ते खासदार असा जवळपास चाळीस वर्षांचा त्यांचा प्रवास होता.
 
पुण्यात कसबा भागात भाजपचा बालेकिल्ला तयार करण्याचं श्रेय गिरीश बापट यांनाच जातं.
 
गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने आम्हाला सर्वांना धक्का बसला आहे. गेले काही दिवस ते सातत्याने आजाराशी झुंज देत होते. लढवय्ये असलेले गिरीश बापट आजारावर मात करतील, असं आम्हाला वाटलं होतं. पण आज ती आशा कुठेतरी विरली आहे.
 
"गिरीश बापट हे सर्वसामान्यांशी जुळलेले, जमिनीवरची माहिती असलेले नेते, अत्यंत हजरजबाबी, उत्तम संसदपटू, प्रचंड चांगले वक्ते होते. नगरसेवक, आमदार, मंत्री, खासदार म्हणून त्यांनी प्रत्येक कामात आपला ठसा उमटवला. त्यांच्या सर्वपक्षीय संबंधांमुळे आणीबाणीच्या वेळी योग्य मार्ग काढण्यात त्यांची हातोटी होती.
 
पुण्याच्या विकासातील त्यांचं योगदान कुणीच विसरू शकणार नाही, त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणं कठीण आहे, असं फडणवीस म्हणाले.
 
भाजपसह सर्वच पक्षांवर नाराज
गेल्या काही वर्षांत राज्यातील राजकीय परिस्थिती पाहून गिरीश बापट निराश झाले होते. आपण भाजपसह सर्वच पक्षांवर नाराज आहोत, असं त्यांनी साम टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.
 
या मुलाखतीत ते म्हणतात, "राजकीय जीवनामध्ये जसं सामाजिक, शैक्षणिक काम आपण करतो, तसं मूळ पायाभूत समाजाच्या तळापर्यंत जाणं, त्यांचे काम सोडवणं, हे खरं काम आहे.
 
आपण हल्ली काय करतो की कार्यकर्त्यांमधील कार्य मेलं आणि पुढारीच केवळ राहिला, हे बरोबर नाही. आपली बांधिलकी समाजासोबत आहे. मतांच्या राजकारणासाठी काहीही करत राहिलो तर चुकीचं आहे.
 
आपण फ्लेक्स लावले, पेपरला जाहिरात दिली, जेवणं दिली म्हणजे आपण खूप मोठं काहीतरी केलं, असं हल्ली काहींना वाटतं. पण वाढदिवस साजरा करण्याची ही पद्धत आहे का, पण असं करू नये.
 
लोक आपल्याकडे पाहत असतात. कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहावं, पक्ष त्यांच्याकडे पाहतच असतो.
 
एखाद्याचं काम करून दिल्याच्या आनंदापेक्षाला नेत्याचा आनंद कोणताही नाही. आजच्या नव्या संस्कृतीत काम सोडून दुसरंच काहीतरी केलं जातं. तुम्ही आम्हाला जुन्या पीढीचे म्हणा किंवा काहीही म्हणा, आम्हाला हे पटत नाही. मग तो कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, भाजपचा कार्यकर्ता असला तरी आम्हाला ते पटत नाही.
 
आपलं भांडण वैचारिक असलं पाहिजे, वैयक्तिक असता कामा नये. एकमेकांचं काही पटत नसेल तर ते सांगता आलं पाहिजे. मात्र आपण ते करत नाही. राजकारणाला व्यावसायिक स्वरुप आलं आहे.
 
गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास
गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथे झाला.
 
तळेगाव दाभाडेमधूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. यानंतर त्यांनी बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतली.
 
कॉलेजवयापासूनच त्यांनी संघाचे कार्यकर्ते म्हणून काम सुरू केलं होतं. पुढे गिरीश बापट 1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. याठिकाणीही कामास रुजू झाल्यानंतर त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी लढा देण्यास सुरूवात केली.
 
नोकरीस लागल्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये 19 महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला.
 
तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.
 
1983 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.
 
1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन्‌ पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. यानंतर ते 2019 साली पुण्याचे खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.
 
नगरसेवक, आमदार झाले तरी नोकरी सोडली नाही
गिरीश बापट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली.
 
राजकारणात उंची गाठत असतानाही गिरीश बापट यांनी टेल्कोमधील आपली नोकरी कधीच सोडली नाही.
 
याविषयी ते सांगतात, “मी टेल्कोमध्ये 35 वर्षे नोकरी केली. नगरसेवक-आमदार झाल्यानंतर मी नोकरी सोडू शकलो असतो. पण निवृत्त होईपर्यंत मी तिथे नोकरी करत होतो. पण मी नोकरी करत राहिलो. याचं कारण म्हणजे राजकारण हा माझा व्यवसाय नाही, ते माझं व्रत आहे, असं मी मानतो.”
 
राजकारणातील निखळ मैत्रीचं उदाहरण
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांच्याशी गिरीश बापट यांची घनिष्ट मैत्री होती. त्याचा उल्लेख वारंवार ते आपल्या भाषणात करत असत.
 
गेल्या वर्षी अंकुश काकडे यांच्या हॅशटॅग पुणे या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमासही गिरीश बापट आवर्जुन उपस्थित राहिले होते. त्यावेळी अंकुश काकडे यांना विधान परिषद आमदारकी देणार असाल, तर भगत सिंह कोश्यारी असेपर्यंत त्यांचं नाव पाठवू नका, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली होती.
 
यावेळी जर निवडणूक लागली तर मी अंकुश यांना मतदान करणार नाही, तेसुद्धा मला मतदान करणार नाहीत असंही बापट म्हणाले होते.
 
बापट यांच्या निधनानंतर अंकुश काकडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “राजकारण हे आपण राजकारणाच्या ठिकाणी केलं पाहिजे. पण राजकारणात मैत्री आपण गिरीश बापट यांच्याकडे पाहून करायला हवी. सध्याच्या या गढूळ राजकारणामध्ये गिरीश बापट यांच्यासारखी मैत्री आपण ठेवली पाहिजे, एवढंच मी तरुण राजकारण्यांना सांगू इच्छितो.”
 
वादग्रस्त वक्तव्ये
गिरीश बापट यांनी काही वक्तव्येही वादग्रस्त ठरल्याचं काही प्रसंगांमध्ये दिसून आलं. या वक्तव्यांची त्यावेळी माध्यमांमध्ये चर्चाही चांगलीच रंगली होती.
 
टीव्ही 9 मराठीच्या बातमीनुसार, “उत्साहाच्या भरात त्यांनी केलेली वक्तव्ये वादग्रस्त ठरली. तरुणाईला संबोधताना ‘देठ माझा हिरवा‘ हे त्यांचे वक्तव्य सुद्धा चांगलंच गाजलं होतं.
Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात एक शिंगे गेंडा धर्मेंद्रचा मृत्यू

नवी मुंबईत हेडकॉन्स्टेबलची गळा आवळून हत्या

LIVE: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पूजा केली

बांगलादेशींच्या अवैध घुसखोरीवर दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, चार जणांना अटक

शिवराज सिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात केली पूजा, म्हणाले-नवीन वर्ष शेतकऱ्यांना समर्पित आहे

पुढील लेख
Show comments