Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर भाजप-मनसे युती होणार का?

Webdunia
शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (13:44 IST)
दीपाली जगताप, मयुरेश कोण्णूर
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर पोहोचले आहेत. यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि मनसेमध्ये युती होण्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
 
ही सदिच्छा भेट असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. पण या भेटीत मनसे आणि भाजप युतीची चर्चा होणार असल्याचं समजतं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याची चर्चा आहे.
 
राज ठाकरे यांनी नुकताच पुणे आणि नाशिकचा दौरा केला. कोणत्याही पक्षाकडून युतीसाठी प्रस्ताव नसल्याचं आतापर्यंत मनसेकडून सांगण्यात येत होतं. पण आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज ठाकरेंची भेट घेत असल्याने मनसे आणि भाजपमध्ये युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "राज ठाकरे यांची परंप्रांतियांविषयी असलेल्या भूमिकेबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यांनी व्यापक भूमिका घ्यावी .राजकारणात कोणत्याही पर्यायावर कायमस्वरुपी फुली मारता येत नाही."
उत्तर प्रदेशात काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे मनसेची राज्यातील परप्रांतियांबाबत असलेली भूमिका भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे युतीचा निर्णय घेण्यापूर्वी भाजप पक्षश्रेष्ठी याबाबत विचार करतील असं जाणकार सांगतात. त्यामुळे दोन्ही नेत्यांची आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
 
भाजप-मनसे युती होणार?
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांसंदर्भातील भूमिका जाहीर आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांआधी राज ठाकरेंसोबत जाताना भाजपचे नेतृत्व विचार करेल. पण अप्रत्यक्ष युतीची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. मनसेच्या प्रबळ जागा आहेत त्याठिकाणी भाजप प्रबळ उमेदवार देणार नाही आणि भाजपच्या जागांसाठी मनसे सुद्धा उमेदवार देणार नाही अशा पद्धतीने एकत्र येणं शक्य आहे का? असा विचार होऊ शकतो."
 
ते पुढे सांगतात, "भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने चंद्रकांत पाटील राज ठाकरे यांना भेटत आहेत. त्याअर्थी युतीचा निर्णय सकारात्मकदृष्टीने पुढे जात असल्याचं सध्यातरी चित्र आहे. दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. भाजप आणि मनसे यांच्या अनेक भूमिका एकसमान आहे. राज ठाकरे यांची वाढ हिंदुत्ववादी पक्षातच झालीय. मराठी माणसाच्या मुद्याची अडचण एवढे वर्षं शिवसेनेसोबत असताना भाजपला कधीही झाली नाही. त्यामुळे आताही ती अडचण येणार नाही."
 
युती केली तर सगळ्याच ठिकाणी करावी लागेल. परंतु भाजपसोबत गेल्यानंतर मात्र मनसेला परप्रांतियांची तीव्र भूमिका सौम्य करावी लागणार असंही ते सांगतात.

मराठी माणसाने मुंबईत घर सोडून जाऊ नये असं आवाहन नुकतेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी दोन्ही पक्ष एकत्र तयारी करत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला आहे. काही जागांच्या बाबतीत महाविकास आघाडीत समन्वय असू शकतो असाही अंदाज वर्तवला जात आहे.
 
खरं तर महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासून राज ठकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आहे. गेल्या दीड वर्षांत मनसे हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकल्याचंही दिसून आलं. पक्षाच्या वर्धापनदिनी मनसेने पक्षाचा झेंडा सुद्धा बदलला.
 
अयोध्या राम मंदिर पायाभरणीनंतर ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारं पत्र लिहिलं होतं. गेल्यावर्षी मार्च महिन्यात राज ठाकरे यांनीही अयोध्या दौऱ्याचे नियोजन केले होते. यामुळे मनसे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली.
 
कोरोना काळात विरोधक म्हणून भाजपसोबत मनसेनेही ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमधील निर्बंधांवरून मुंबई मनसे आक्रमक होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून कारभार चालवतात अशी टीका सुद्धा मनसे नेत्यांकडून करण्यात आली.
 
युतीचा फायदा कोणाला होणार?
भाजपानं मनसेला सोबत घेतलं तर तीन मुद्द्यांवर फायदा होऊ शकतो असं ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात,
एक म्हणजे गेल्या दोन मुंबई महापालिकेच्या निवडणुका जर पाहिल्या तर दोघांच्या मतांमधलं अंतर लक्षणीय कमी झालं आहे. तो जो फरक आहे, तो भाजपाला कमी करायचा आहे. त्यासाठी मनसेची त्यांना मदत होऊ शकते.
 
दुसरं म्हणजे, जर 2017 ची गेली निवडणूक पाहिली तर भाजपाला पश्चिम आणि पूर्व उपनगरांत मोठं यश मिळालं होतं. पण मध्य मुंबईत कमी मतं मिळाली होती. तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आता त्यावर जर हल्ला करायचा आहे तर मनसेच्या मदतीचा त्यांना फायदा होईल.
 
भाजपाला आणखी एक गरज आहे ती म्हणजे मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर काम करायची. मराठीचबद्दलच्या जुन्या भूमिकांमुळे ते मराठीविरोधी अशी प्रतिमा तयार झाली आहे आणि त्याचा सेना कायम फायदा घेत आली आहे. आता जर मनसेसारखा संपूर्ण एक मराठीवादी पक्ष त्यांच्यासोबत आला तर ही जुनी प्रतिमा बदलण्यास भाजपाला फायदा होईल.
मनसेला भाजपमुळे नवसंजीवनी मिळवण्याची संधी असल्याचंही जाणकार सांगतात. युतीमुळे केंद्रात सत्ता असलेल्या राष्ट्रीय पक्षाची साथ मनसेला मिळेल. भाजपकडे शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फौज आहे, केंद्रात सरकार असल्याने आर्थिक बाजू भक्कम आहे याचाही मनसेला फायदा होईल असं संदीप प्रधान सांगतात.त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात आज नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित माहिती

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

पुढील लेख
Show comments