Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रशिया युक्रेन वाद : जगात फक्त 'या' व्यक्तींकडे आहेत अणूबॉम्ब टाकण्याचे अधिकार

Webdunia
शुक्रवार, 4 मार्च 2022 (20:20 IST)
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या पूर्व भागावर आक्रमण करणारी सैनिकी मोहीम जाहीर केली आणि सीमेवर तैनात रशियन फौजांनी युक्रेनवर हल्ला सुरू केला.
आकारमानाच्या हिशेबाने रशिया हा जगातील सर्वांत मोठा देश आहे तर युक्रेन पंचेचाळीसावा सर्वांत मोठा देश आहे.
 
युक्रेन 'नाटो'चा सदस्य होऊ नये आणि पूर्व युरोपातील देशांमध्ये 'नाटो' फौजा तैनात होऊ नयेत, अशी रशियाची इच्छा आहे. परंतु, 'नाटो'चा सदस्य होण्यासाठी संबंधित पाश्चात्त्य राष्ट्रांशी सहकार्य वाढवण्याचा युक्रेनचा प्रयत्न आहे.
 
युक्रेनवरील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी आणि पाश्चात्त्य देशांनी रशियाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे आणि रशियावर कठोर आर्थिक निर्बंधही लादण्यात आले आहेत. 'नाटो'ने रशियाच्या आसपास असणाऱ्या सदस्य देशांमधील सैन्याची उपस्थिती वाढवली असून युक्रेनला स्वतःच्या संरक्षणाचा पूर्ण अधिकार असल्याचंही म्हटलं आहे.
'नाटो'च्या या भूमिकेचं कारण देत पुतीन यांनी २७ फेब्रुवारीला आपल्या सैन्याकडील अण्वास्त्रं 'स्पेशल अलर्ट'वर ठेवण्याचे आदेश दिले.
 
जगात अण्वास्त्रांचा सर्वांत मोठा साठा रशियाकडे आहे. त्यामुळे रशियाच्या या डावपेचातून जागतिक संकट उत्पन्न होऊ शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अर्थात, रशियासोबतच अमेरिका, चीन आणि ब्रिटन यांच्यासह इतरही अनेक देशांकडे अण्वास्त्रं आहेत. अण्वास्त्रं प्रचंड विध्वंस करतात. या पार्श्वभूमीवर रशियाच्या घोषणेमुळे तणाव वाढणं स्वाभाविक आहे.
 
अण्वास्त्रांच्या वापरासंदर्भात काही नियम आखलेले आहेत का? या विध्वंसक अस्त्रांचं बटण कोणाच्या हातात असतं? रशिया, अमेरिका, चीन आणि ब्रिटन यांच्याकडील अण्वास्त्रांचं 'बटण' कोण दाबू शकतं?
 
अमेरिकेतला 'आण्विक फूटबॉल'
ब्रूस ब्ला हे अमेरिकेतील माजी क्षेपणास्त्र अधिकारी होते. आता ते हयात नाही. सत्तरीच्या दशकात त्यांनी अमेरिकेच्या आण्विक क्षेपणास्त्रांशी संबंधित ठिकाणी काम केलं होतं.
"आम्हाला मिनिटमॅन असं म्हटलं जातं. कारण, आदेश मिळाल्यावर एका मिनिटात आम्ही अण्वास्त्रसज्ज क्षेपणास्त्र सोडू शकतो," असं ब्रूस ब्ला एकदा म्हणाले होते.
 
कोणत्याही क्षणी क्षेपणास्त्र डागण्याचा आदेश देता येईल, अशा कम्प्युटर मॉनिटरवर देखरेख करण्याचं काम ब्रूस आणि त्यांचे सहकारी करत असत. "अमेरिकेत केवळ राष्ट्राध्यक्षांना अण्वास्त्रं वापरण्याचा आदेश देण्याचा अधिकार आहे," असं ब्रूस यांनी सांगितलं होतं.
 
"त्यामुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसोबत कायम काही विशेष व्यक्ती असतात. या व्यक्तींकडे एक ब्रीफकेस असते, त्या ब्रीफकेसला आण्विक फूटबॉल असं म्हटलं जातं."
 
काळ्या रंगाची ही लेदर ब्रीफकेस दिसायला सर्वसामान्य असते, पण त्यात विशिष्ट प्रकारचं उपकरण लावलेलं असतं. त्याद्वारे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष त्यांच्या सल्लागारांशी आणि इतर काही आत्यंतिक महत्त्वाच्या व्यक्तींशी कधीही बोलू शकतात.
 
ब्रूस ब्ला म्हणतात, "या ब्रीफकेसमध्ये कार्टूनच्या पुस्तकासारखं एक पान असतं, त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून युद्धाचा आराखडा, अण्वास्त्रसज्ज क्षेपणास्त्रं आणि त्यांची संभाव्य लक्ष्य यांचा आढावा घेतलेला असतो. हल्ला झाला तर किती लोक मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे, याचाही अंदाज तिथं नोंदवलेला असतो. राष्ट्राध्यक्षांना हे सगळं क्षणार्धात समजून घ्यावं लागतं."
 
'फेडरेशन ऑफ अमेरिकन सायन्टिस्ट्स'च्या एका अहवालात म्हटल्यानुसार, २०२२च्या सुरुवातीला जगातील नऊ देशांकडे मिळून एकूण १२,७०० अण्वास्त्रं आहेत. यातील सर्वाधिक अण्वास्त्रं रशियाकडे असून त्या खालोखाल अमेरिकेचा क्रमांक लागतो. अमेरिकेकडे पाच हजारांहून अधिक अण्वास्त्रं आहेत.
रशियाकडे ५९७७, अमेरिकेकडे ५४२८, चीनकडे ३५०, फ्रान्सकडे २९०, ब्रिटनकडे २२५, पाकिस्तानकडे १६५, भारताकडे १६०, इस्रायलकडे ९० आणि उत्तर कोरियाकडे २० अण्वास्त्रं आहेत.
 
अमेरिकेच्या बाबतीत अण्वास्त्रसज्ज क्षेपणास्त्रं डागण्याची प्रक्रिया पेन्टॅगॉनमधील 'वॉर रूम'मधून होते, परंतु या वॉर रूमला राष्ट्राध्यक्षांनी आदेश देणं गरजेचं असतं.
 
राष्ट्राध्यक्षांनी स्वतःची खास ओळख क्षेपणास्त्र अधिकाऱ्याला सांगितल्यानंतरच हा आदेश स्वीकारला जातो. या विशिष्ट ओळखीचा तपशील बिस्किटाच्या आकारामधील एका प्लॅस्टिकच्या कार्डात असतो.
 
राष्ट्राध्यक्षांना हे कार्ड कायम स्वतःसोबत ठेवावं लागतं. याच कार्डामुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्तिमत्वाचं स्थान लाभलेलं आहे. राष्ट्राध्यक्षांनी संमती दिल्यानंतर काही मिनिटांमध्ये अण्वास्त्रसज्ज क्षेपणास्त्र डागलं जाऊ शकतं.
 
ब्रूस ब्ला म्हणतात, "राष्ट्राध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर 'मिनिटमॅन', म्हणजे जमिनीवर तैनात अण्वास्त्रानी हल्ला करणारे किंवा पाणबुड्यांमध्ये तैनात अण्वास्त्रं डागणारे लोक विशिष्ट सांकेतिक शब्द वापरून अण्वास्त्रं उघडतात आणि मग हल्ल्यासाठी क्षेपणास्त्र सज्ज केलं जातं."
 
ब्रूस ब्ला यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही क्षणी अण्वास्त्रं हल्ला करण्यासाठी दोन व्यक्तींची गरज असते, या व्यक्ती आपापला सांकेतिक शब्द सांगतात. अशा रितीने या दोन व्यक्तींकडे अण्वास्त्रसज्ज क्षेपणास्त्र डागण्याची कळ असते.
 
ब्रूस ब्ला पुढे सांगतात, "माझ्या संपूर्ण कारकीर्दीत एकदा अणुयुद्ध होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. त्या वेळी माझं वय कमी होतं आणि जगात काय चाललंय याची मला पुरेशी माहिती नव्हती. त्या वेळी आम्हाला 'डेफकॉन ३' असा अणुयुद्धासाठी सज्ज राहण्याचा आदेश मिळाला."
 
ब्रूस आणि त्यांचे सहकारी टिमोथी क्षेपणास्त्रांसाठीचा सांकेतिक शब्द काढून खुर्च्यांवर बसले. ते क्षेपणास्त्र डागण्याचा अंतिम आदेश येण्याची वाट पाहत होते, पण सुदैवाने तेव्हा असा आदेश मिळाला नाही.
 
१९७३ साली अरब देश आणि इस्रायल यांच्या युद्ध सुरू होतं, तेव्हाची ही गोष्ट आहे. त्या वेळी सुदैवाने अण्वास्त्रं वापरली गेली नाहीत. त्या आधी १९६०च्या दशकात क्यूबातील क्षेपणास्त्र सज्जतेच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्या अणुयुद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
 
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष कोणताही धोका नसताना किंवा कोणी चिथावणी दिलेली नसताना स्वतःहून अण्वास्त्रहल्ल्याचा आदेश देऊ शकतात का?
 
ब्रूस ब्ला सांगतात, "अशा वेळी 'जॉइंट चीफ ऑफ स्टाफ' समितीचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्षांचा आदेश पाळण्याला नकार देऊ शकतात. परंतु, अशी शक्यता खूपच कमी असते, कारण राष्ट्राध्यक्षांच्या हाताखाली काम करणाऱ्या या लोकांना आदेश पाळण्याचंच प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यामुळे एखाद्या राष्ट्राध्यक्षाने स्वतःहूनच अण्वास्त्रसज्ज क्षेपणास्त्रं सोडण्याचा आदेश दिला, तर तो आदेश अंमलात आणण्यापासून थोपवणं खूपच अवघड असतं."
 
रशियातील 'आण्विक ब्रीफकेस'
इगोर सजेगेन हे शस्त्रास्त्रविषयक तज्ज्ञ आहेत. पूर्वी ते रशियन सरकारसाठी काम करत होते.
 
लंडनमधील एका कंपनीला रशियन सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर १९९९ साली करण्यात आला. इगोर यांनी हे आरोप फेटाळून लावले, पण त्यांना ११ वर्षं तुरुंगवास भोगावा लागला.
 
२०१० साली तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि आता ते ब्रिटिश डिफेन्स थिंक टँकमध्ये सिनियर फेलो म्हणून कार्यरत आहेत.
 
इगोर सांगतात, "अमेरिकेतील आण्विक फूटबॉलप्रमाणे रशियातील राष्ट्राध्यक्षांकडेही अण्वास्त्रांशी संबंधित सांकेतिक शब्द असणारी आण्विक ब्रीफकेस असते. ही ब्रीफकेस कायम राष्ट्राध्यक्षांच्या जवळपास असते. ते झोपतात तेव्हासुद्धा त्यांच्यापासून १०-२० मीटर अंतरावर ही ब्रीफकेस ठेवली जाते. रशियावर कोणी हल्ला केला, तर या ब्रीफकेसमधला गजर वाजू लागतो आणि फ्लॅशलाइट लागतो. मग राष्ट्राध्यक्ष तत्काळ ब्रीफकेसपाशी जाऊन पंतप्रधानांना आणि संरक्षण मंत्र्यांना संपर्क साधतात."
 
अशाच प्रकारच्या दोन ब्रीफकेस रशियन पंतप्रधानांकडे आणि संरक्षण मंत्र्यांकडे असतात, पण आण्विक हल्ल्याचा आदेश केवळ राष्ट्राध्यक्ष देऊ शकतात.
 
इगोर सांगतात, "राष्ट्राध्यक्ष हेच सर्वोच्च सेनाधिकारी असतात, ती ब्रीफकेस बाळगण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते. संकटकाळात राष्ट्राध्यक्ष या ब्रीफकेसच्या माध्यमातून लष्करी अधिकाऱ्यांशी, पंतप्रधानांशी आणि संरक्षण मंत्र्यांशी बोलू शकतात, त्यासाठी वेगळ्या फोनची गरज नसते."
 
रशियन राष्ट्राध्यक्षांना ही ब्रीफकेस उघडून त्यातील उपकरण वापरायची वेळ आत्तापर्यंत केवळ एकदाच आलेली आहे.
 
इगोर सांगतात, "२५ फेब्रुवारी १९९५ रोजी या ब्रीफकेसमधला गजर वाजला होता. त्यातील दिवा लागला होता. दुसरीकडे राष्ट्राध्यक्षांच्या टेबलवरचा इशारा देणारा दिवाही सुरू झाला होता. त्या वेळी बोरीस येल्तसिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते."
 
रशियन रडारांना सीमेजवळ बॅरेन्ट्स समुद्रावरती एक क्षेपणास्त्र दिसलं होतं. ते क्षेपणास्त्र वेगाने रशियाच्या दिशेने येत होतं आणि हाताशी खूपच कमी वेळ होता.
 
इगोर म्हणतात, "बोरीस येल्तसिन यांनी ब्रीफकेस सुरू केली. पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांशी त्यांनी आता पुढील पाऊल कोणतं उचलावं याबद्दल चर्चा केली. या सल्लामसलतीसाठी त्यांच्याकडे केवळ पाच ते नऊ मिनिटांचाच वेळ होता."
 
त्यानंतर रशियन पाणबुड्यांना प्रत्युत्तरासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले.
 
परंतु, धोक्याचा इशारा देणारा गजर चुकीचा होता, असं निदर्शास आलं. नॉर्वेने वैज्ञानिक अभियानाचा भाग म्हणून सोडलेलं एक यान रशियन रडारांना दिसलं आणि ते रशियाच्या दिशेने येणारं क्षेपणास्त्र समजून ब्रीफकेसमधला गजर वाजायला लागला.
 
बोरीस येल्तसिन यांनी त्यावेळी अण्वास्त्रसज्ज क्षेपणास्त्र डागण्याचा आदेश दिला असता, तर युद्धविषयक इतिहासाची अनेक नवीन पानं लिहिली गेली असती.
 
इगोर सांगतात, "क्षेपणास्त्र डागण्यासाठी आपण किती सज्ज आहोत याची चाचणी रशियामध्ये वारंवार केली जाते. अनेकदा क्षेपणास्त्रावर देखरेख ठेवणाऱ्यांना चुकीचा सांकेतिक शब्द देऊन हल्ल्यासाठी तयार राहायला सांगितलं जातं. खरोखर युद्ध सुरू झालं तर अण्वास्त्र हल्ला करण्यासाठी हे लोक कचरणार तर नाहीत ना, याची चाचपणी करण्यासाठी हे केलं जातं."
 
अमेरिकेप्रमाणे रशियातसुद्धा राष्ट्राध्यक्षांनी आदेश दिला, तरच अण्वास्त्र हल्ला केला जाऊ शकतो.
 
ब्रिटनमधलं 'अखेरच्या उपायाचं पत्र'
प्राध्यापक पीटर हॅनेसी यांनी 'द सायलेन्ट डीप' या पुस्तकाचं सहलेखन केलं आहे. ब्रिटिश सैन्याकडे ट्रायडन्ट अण्वास्त्रसज्ज क्षेपणास्त्रं लावलेल्या चार उत्तम पाणबुड्या आहेत, त्यातील एक पाणबुडी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये कायम तैनात ठेवलेली असते. केवळ एकदा इशारा मिळाला की ही पाणबुडी अण्वास्त्र हल्ला करू शकतो, असं हॅनेसी सांगतात.
ते म्हणतात, "उत्तर अटलांटिक समुद्राच्या शांत सखोल अवकाशामध्ये कुठे ना कुठे ही पाणबुडी उपस्थित असते, आणि त्याबद्दल कोणालाही माहीत नसतं. कोणी त्याबद्दल काही सांगूही शकत नाही."
 
प्राध्यापक हॅनेसी पुढे म्हणतात, "ब्रिटिश व्यवस्थेमध्ये अण्वास्त्रसज्ज क्षेपणास्त्र डागण्याचा आदेश फक्त पंतप्रधान देऊ शकतात. त्यांच्या आदेशानासार रॉयल नेव्हीच्या लढाऊ गटातील पाणबुडी आण्विक हल्ला करू शकते."
 
ब्रिटिश पंतप्रधान नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांना क्षेपणास्त्र डागण्यासंदर्भातील स्वतःचा विशेष सांकेतिक शब्द सांगतात. त्या दोन अधिकाऱ्यांकडेसुद्धा विशिष्ट सांकेतिक शब्द असतो आणि तेही परस्परांचे सांकेतिक शब्द सांगतात.
 
सांकेतिक शब्द सांगण्याची ही प्रक्रिया लंडनच्या बाहेर एका बंकरमध्ये पार पडते. इथूनच महासागरात तैनात अण्वास्त्रसज्ज पाणबुडीला क्षेपणास्त्र डागण्याचा आदेश दिला जातो.
 
हॅनेसी सांगतात, "पाणबुडीत दोन अधिकारी वायरलेस यंत्रणेद्वारे हा संदेश ऐकतात आणि परस्परांकडील सांकेतिक शब्द वापरून क्षेपणास्त्र सोडण्याची तयारी करतात."
 
दोन प्रकारचे अणुबॉम्ब
पहिल्या प्रकारच्या अणुबॉम्बमध्ये आण्विक विखंडन प्रक्रियेचा वापर केलेला असतो. त्यात एक न्यूट्रॉन अणूवर येऊन आदळतो आणि अणूचे दोन तुकडे होतात. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि उजेड निर्माण होतो.
 
दुसरा, थर्मोन्यूक्लिअर किंवा हायड्रोजन बॉम्ब. यात आण्विक संयोगाची प्रक्रिया वापरली जाते. अतिशय जास्त तापमानात हायड्रोजनचे आयसोटोप एकमेकांशी संयोग साधून हेलियम तयार होतो. या प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि उजेड निर्माण होतो.
पाणबुडीतून क्षेपणास्त्र चाचणी पाहण्याची संधी मिळालेल्या मोजक्या लोकांमध्ये प्राध्यापक हॅनेसी यांचा समावेश होतो.
 
ते म्हणतात, "कॅप्टनने पांढऱ्या धुरासारखं काहीतरी दाखवलं आणि मग समुद्रात वायूचा मोठा लोटच वेगाने उसळून आला. काहीच सेकंदांनी मोठ्ठा आवाज झाला. समुद्राच्या पाण्यावर वायूचा महाकाय ढग दिसायला लागला. हे सर्व अतिशय नाट्यमय रितीने घडलं. समुद्रतळातून कोणी दैत्य बाहेर आल्यासारखं ते दृश्य होतं."
 
अण्वास्त्रसज्ज क्षेपणास्त्र डागणं म्हणजे शत्रूचा विध्वंस करणं असतं, त्यामुळे हे काम अतिशय जबाबदारीने केलं जातं.
 
हॅनसी सांगतात, "ब्रिटनमध्ये पंतप्रधान झालेली व्यक्ती स्वतःच्या हाताने अण्वास्त्रसज्ज चार पाणबुड्यांना पत्र लिहिते. या पत्राला 'अखेरच्या उपायाचं पत्र' (लेटर ऑफ लास्ट रिजॉर्ट) असं म्हटलं जातं. हे पत्र पाणबुड्यांमध्ये एका तिजोरीत ठेवतात. ब्रिटन एखाद्या हल्ल्यात पूर्णतः उद्ध्वस्त झाला, तरच हे पत्र वाचावं, असा नियम आहे."
 
'अखेरच्या उपायाच्या पत्रा'मध्ये पाणबुड्यांतील अधिकाऱ्यांसाठी नक्की कोणता आदेश लिहिलेला आहे, हे आत्तापर्यंत कोणालाही माहीत नाही.
 
ब्रिटनमध्ये पंतप्रधान बदलले की हे पत्र न उघडता नष्ट केलं जातं. त्यानंतर नवीन पंतप्रधान पाणबुडीतील अधिकाऱ्यांसाठी नवीन पत्र लिहितात. ब्रिटनमध्ये वर्षानुवर्षं ही पद्धत सुरू आहे.
 
चीनमधील लांब बोगदे
टोंग जाओ हे बीजिंगमध्ये कार्नेजी चिन्हुआ सेंटर फॉर ग्लोबल पॉलिसीमध्ये फेलो आहेत. अण्वास्त्रं आणि अणुयुद्ध या गंभीर प्रश्नाचा संबंध थेट मानवी अस्तित्वाशी आहे, असं ते म्हणतात.
 
ते सांगतात, "मानवी समूह अणुयुद्धाच्या अतिशय जवळ आल्याचे अनेक क्षण इतिहासात येऊन गेले आहेत."
 
अण्वास्त्रं बाळगणाऱ्या पण स्वतःहून पहिल्यांदा त्यांचा वापर करायचा नाही, असं धोरण स्वीकारलेल्या देशांमध्ये चीनचा समावेश होतो.
 
आपल्यावर होणाऱ्या संभाव्य अणुहल्ल्याची माहिती आधीच मिळेल, अशी यंत्रणा चीनला अजून विकसित करता आलेली नाही, हे यामागचं कारण असल्याचं टोंग जाओ म्हणतात.
 
"चीन वाट पाहील आणि खरोखर अणुहल्ला झालाय काय याची खातरजमा करेल. खातरजमा झाल्यानंतर हल्ला कोणत्या प्रकारचा आणि कितपत मोठा आहे, याचा अंदाज घेईल. त्यानंतर मग प्रत्युत्तरादाखल कोणते पर्याय वापरायचे याचा विचार केला जाईल," असं ते सांगतात.
 
पण एखाद्या हल्ल्यात चीनचे कोणी मोठे नेते किंवा लष्करी अधिकारी मारले गेले किंवा शत्रूच्या अण्वास्त्रहल्ल्यात चीन उद्ध्वस्त झाला, तर चीनसमोर कोणता पर्याय असेल?
 
टोंग यांच्या मते, "असा हल्ला झाला तर आपल्या नेत्यांचं आणि अण्वास्त्रांचं संरक्षण करण्यासाठी चीनने आधीच खूप तयारी केलेली आहे. यासाठी लांबलचक बोगद्यांचं एक जाळं निर्माण करण्यात आलेलं आहे. काही बोगदे डोंगराळ भागात जमिनीखाली शंभरेक मीटर खोल अंतरावर खोदलेले आहेत."
 
म्हणजे जमिनीवर युद्धाचं वादळ घोंघावेल, तेव्हा जमिनीखाली बोगद्यांमध्ये उपस्थित नेते महत्त्वाचे निर्णय घेत असतील. पण अणुहल्ल्याचा अंतिम निर्णय चीनमध्ये कोणाच्या हातात असतो?
 
टोंग जाओ म्हणतात, "या सर्व गोष्टी गोपनीय आहेत, पण लोकधारणेनुसार चीनमध्ये सैन्यदलं कोणतं पाऊल उचलतील याचा निर्णय कम्युनिस्ट पक्षाच्या पोलिट ब्यूरोमधील स्थायी समिती घेते. त्यामुळे याबाबतीत अंतिम निर्णय या समितीचा असेल की राष्ट्राध्यक्षांचा, हे खरं तर कोणालाच माहीत नाही."
 
चीनच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, चीनवर अणुहल्ला झाला तरी तो काही आठवडे किंवा महिने शांत राहून नंतर प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे, कारण सुरुवातीपासूनच पाश्चात्त्य देशांच्या प्रथम हल्ला करण्याच्या धोरणाला चीनने विरोध केलेला आहे.
 
"चीनने अण्वास्त्रनिर्मितीची क्षमता प्राप्त केली, तेव्हा चेअरमन माओ त्से तुंग यांनी जाहीर केलं की, याबाबतीत चीन जबाबदार देश म्हणून वागेल. हिरोशिमा-नागासाकीमध्ये काय झालं, हे चिनी नेत्यांना लख्खपणे जाणलं होतं."
 
पण ही गोष्ट आता जुनी झालेली आहे. चीनची भूमिकाही आता बदललेली आहे. पाश्चात्त्य देशांच्या विचाराचा प्रभाव चीनवरही पडलेला आहे. जमिनीवरील आण्विक आणि पारंपरिक क्षेपणास्त्रांबाबत काम करणाऱ्या विभागाला चीनने २०१५ साली सैन्यात कायमस्वरूपी समाविष्ट करून घेतलं आणि त्याला 'पीपल्स लिबरेशन रॉकेट फोर्स' असं नाव दिलं. इतर अनेक देशांप्रमाणे चीनसुद्धा दृतगती तंत्रज्ञानावर काम करत असून स्वतःकडील अण्वास्त्रांचा साठा वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.
 
टोंग जाओ म्हणतात, "अमेरिका आणि रशिया इथल्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे चिनी राष्ट्राध्यक्षांकडेही अण्वास्त्रहल्ल्याचा आदेश देण्याचा अधिकार असायला हवा, जेणेकरून शत्रूच्या हल्ल्याची शक्यता दिसली की बचावात्मक हल्ला करता येईल, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात चीन शक्तिशाली रडार विकसित करतो आहे, आणि लांब पल्ल्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रंही तिथे तयार केली जात आहेत."
 
येत्या काही वर्षांमध्ये चीन पहिल्यांदा अण्वास्त्र न वापरण्याचं स्वतःचं धोरणही बदलू शकतो, असं जाणकार म्हणतात.
तुम्ही हा लेख वाचत असाल, तेव्हा जगाच्या एखाद्या कोपऱ्यात काही लोक खास कम्प्युटरच्या पडद्यावर नजर लावून बसलेले असतील, काही लोक बंकरमध्ये बसून आपल्या नेत्याच्या आदेशाची वाट पाहत असतील, तर काही पाणबुड्यांमधील अधिकारी 'अखेरच्या उपायाचं पत्र' वाचावं लागेल की नाही या विचारात असतील.
 
स्वतःच्या नियंत्रणाखालील यंत्रणा वापरून त्याद्वारे कधीही अणुहल्ल्याचा आदेश देता यायला हवा, असं अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि चीन यांच्याकडील आण्विक व्यवस्थेवरून स्पष्ट होतं.
 
परंतु, कोणताही नेता असा अणुहल्ला करण्याचा विचार करणार नाही, कारण याची निष्पत्ती प्रचंड विध्वंसात होईल याची कल्पना त्यांना असते, असं जाणकार म्हणतात.
 
हिरोशिमा-नागासाकीवरील अणुहल्ल्यानंतर अनेकदा जगात अणुयुद्धाची शक्यता निर्माण झाली, परंतु कोणाही नेत्याने अण्वास्त्रांचं 'बटण' दाबलं नाही.
 
आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पुन्हा एकदा अण्वास्त्रं सज्ज ठेवण्याचा आदेश दिल्यामुळे जगावर अणुयुद्धाच्या शक्यतेला सामोरं जातं आहे.
 
ही शक्यता प्रत्यक्षात आली, तर फक्त विध्वंसच घडू शकतो आणि एका नेत्याच्या अशा निर्णयाने सगळं जग उद्ध्वस्त होऊ शकतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

पुण्यात मालकाला गुंगीचे औषध देऊन चोरी करणाऱ्या नोकरासह तिघांना अटक

राजगुरुनगर मध्ये ड्रममध्ये सापडले 8 आणि 9 वर्षांच्या बहिणींचे मृतदेह, कुकची क्रूरता उघडकीस

जपान एअरलाइन्सवर मोठा सायबर हल्ला

भाजप आमदाराचे मामा अपहरण आणि हत्या प्रकरण : पत्नीनेच सतीश वाघ यांच्या हत्येची दिली होती सुपारी

LIVE: मोहन भागवत म्हणाले ब्रिटिशांनी भारताचा इतिहास विकृत केला

पुढील लेख
Show comments