Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केरळमध्ये RSS च्या सर्वात जास्त शाखा, मग आजवर भाजपला तिथं फायदा का झाला नाही?

Webdunia
बुधवार, 31 मार्च 2021 (17:21 IST)
जुबेर अहमद
केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रोज 4500 शाखा भरतात. भारतातल्या कोणत्याही राज्यापेक्षा हा आकडा मोठा आहे.
साडेतीन कोटींची लोकसंख्या असलेल्या या राज्यात संघ गेल्या 80 वर्षांपासून सक्रिय आहे. प्रत्येक गल्ली, गाव, तालुक्यात संघाचं अस्तित्व आहे. संघाची सदस्य संख्याही सतत वाढतेय.
असं असतानाही RSS शी निगडीत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला याचा निवडणुकीत फायदा का झालेला नाही? हाच प्रश्न मी भाजप, RSS, निष्पक्ष विचारवंत आणि संघाच्या विचारधारेचा विरोध करणाऱ्या लोकांना विचारला.
याचं उत्तर शोधण्यासाठी मी कोचीच्या संघाच्या मुख्यालयातही गेलो. तुम्हाला प्रश्न पडू शकतो की भाजपच्या जिंकण्या-हरण्यामध्ये संघाच्या भूमिकेला इतकं महत्त्व का द्यावं?
मुळात कोणत्याही निवडणुकीच्या आधी भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी संघाचे कार्यकर्ते कामाला लागतात. सामान्य मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी गल्लीबोळातून फिरतात आणि हे कार्यकर्ते भाजप उमेदवारांची मदत करतात.
संघाची भूमिका
उदाहरणार्थ पल्लकडच्या जागेवरून विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या ई श्रीधरन यांच्याबरोबर सावलीसारखे वावरणारे अॅडव्होकेट पप्पन संघातून आलेत.
ते म्हणतात, "मी भाजपचा सदस्य नाहीये. मी पूर्णवेळ संघाचा कार्यकर्ता आहे आणि व्यवसायाने वकील आहे. मला निवडणुकीपर्यंत श्रीधरन यांच्याबरोबर ड्युटी दिली आहे."
त्यांचं काम मीडियाशी बोलण्याव्यतिरिक्त हाऊसिंग सोसायट्यांचे अधिकारी, संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर क्षेत्रातल्या लोकांशी श्रीधरन यांच्याशी भेट घालून देणं हेही आहे.
मजबूत शरीरयष्टीचे पप्पन आपल्या 88 वर्षांच्या बॉसची पायऱ्या आणि स्टेज चढण्या-उतरण्यात मदतही करतात.
तज्ज्ञांच्या मते गेल्या सहा वर्षांत बिहार, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये भाजपला जोरदार यश मिळालं आहे याचं काही अंशी श्रेय संघालाही जातं.
 
संघाचे कार्यकर्ते
संघाचे स्वयंसेवक भाजपसाठी तळागाळात जिद्दीने काम करतात आणि निवडणुकीचे निकाल येईपर्यंत परत येत नाहीत.
पण स्वतः संघाच्या काही कार्यकर्त्यांच्या मनात ही भावना आहे की केरळमध्ये भाजपला निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी संघ कमी पडला आहे.
केरळ विधानसभेच्या इतिहासात भाजपला आजवर फक्त एकच जागा मिळाली आहे. 2016 च्या निवडणुकीत नेमम मतदारसंघात भाजपचा विजय झाला होता.
केरळमध्ये येत्या 6 एप्रिलला विधानसभेच्या 140 जागांसाठी निवडणुका आहेत. मग यंदा संघाची मेहनत फळाला येईल का?
नेममचे भाजपचे आमदार ओ राजगोपाल यांना मी विचारलं की, भाजपला निवडणुकीत मोठं यश मिळवून द्यायला संघ शेवटी कुठे कमी पडला तर त्यांचं उत्तर प्रामाणिक होतं पण थोडं गोंधळात पाडणारंही होतं.
 
जमिनीवरची परिस्थिती
ओ राजगोपाल म्हणतात, "ऐतिहासिक कारणांनी (आम्ही विजयी होऊ शकलो नाही.) इथे प्रदीर्घ काळापासून कम्युनिस्टांचं वर्चस्व आहे. इथले लोक उच्चशिक्षित आहेत, इतर अशिक्षित भागांत लोक डोळे झाकून आम्हाला मतदान करतात. इथले लोक रोज 3-4 वर्तमानपत्रं वाचतात. त्यांना माहितेय प्रत्येक ठिकाणी काय होतंय ते."
भाजपच्या नेत्यांना हे वक्तव्य कदाचित आवडणार नाही, पण प्रत्यक्षात निवडणुकीत विजय मिळत नसला तरी संघाचं राज्यात वजन आहे आणि संघाची हिंदुत्ववादी विचारसरणी इथे पसरतेय.
भाजप आणि संघाचे स्थानिक पदाधिकारी या गोष्टीने खूश झालेले दिसतात की गेल्या 10-12 वर्षांत राज्यात भाजपचा व्होटशेअर सतत वाढतोय. उजवी हिंदुत्ववादी विचारसरणी अशा राज्यात लोकप्रिय होतेय, जिथे डाव्यांची विचारसरणी पूर्वापारपासून प्रचलित आहे, मजबूत आहे आणि डाव्यांच्या ताब्यात सत्ताही आहे.
पण याही पलिकडे जाऊन भाजपची इच्छा आहे की या निवडणुकीत पक्षाला इतक्या जागा मिळाव्यात की ते किंगमेकर बनावेत म्हणजे सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात राहातील.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : एक सामाजिक संस्था
एशिया न्यूज नेटवर्कचे संपादक एमजी राधाकृष्णन यांच्या मते भाजपला संघाच्या अनेक प्रयत्नांनंतरही निवडणुकांमध्ये यश मिळणार नाही.
ते म्हणतात की, संघाचं निवडणुकांमधलं अपयश समजून घेण्यासाठी केरळच्या लोकसंख्येचा विचार करावा लागेल. केरळमध्ये 45 टक्के लोकसंख्या मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांची आहे. इथले हिंदू 55 टक्के आहेत आणि वेगवेगळ्या विचारसरण्यांमध्ये वाटले गेलेत. यातले बहुसंख्य डाव्या पक्षांचं समर्थन करतात.
राधाकृष्णन म्हणतात की, "जोवर ते (संघ) लोकसंख्येच्या या सामाजिक-राजकीय समीकरणाला तोडू शकत नाहीत तोवर त्यांना कोणताही राजकीय फायदा होणार नाही. अर्थात यात थोडंफार यश मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. गेल्या काही वर्षांत ते राज्यातल्या काही भागात काँग्रेस आणि डाव्या मोर्चांच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झाले आहेत. पण त्यांची संख्या बरीच कमी आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की अजून तरी संघाच्या ठाशीव उपस्थितीमुळे भाजपला निवडणुकीत फायदा झालेला नाही."
डॉक्टर जे प्रकाश एक राजकीय विश्लेषक आहेत. त्यांच्या मते संघाकडे एक राजकीय शक्ती म्हणून पाहणं योग्य नाही. ते म्हणतात, "केरळमध्ये संघ एक सामाजिक शक्ती आहे, राजकीय नाही. केरळमध्ये रोज देशातल्या सर्वाधिक शाखा भरतात. पण असं असूनही संघ सरळ सरळ इथल्या राजकारणात हस्तक्षेप करत नाही. इथली जनताही संघाकडे एक सामाजिक संस्था म्हणूनच पाहाते."
हे खरंय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अखिल भारतीय शैक्षणिक संस्था, विद्या भारती केरळमध्ये अनेक शाळा चालवते. यातल्या अनेक शाळा मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहेत.
कोचीमधल्या संघाच्या मुख्यालयात विद्या भारतीची एक प्रशस्त इमारत आहे जी कोणत्याही आधुनिक शैक्षणिक संस्थेच्या तोडीस तोड आहे.
प्रमुख कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याने मला सांगितलं की, शाळेत आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाव्यतिरिक्त मुलांचं चरित्र घडवणं आणि त्यांना एक आदर्श नागरिक बनवण्यावरही भर दिला जातो.
मी जेव्हा तिथल्या कार्यालयात गेलो तेव्हा ते जवळपास रिकामंच होतं. तिथल्या माणसाने मला सांगितलं की इथले अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या जिल्ह्यात निवडणुकीच्या कामासाठी गेलेत. ते भाजप उमेदवारांना प्रचारासाठी मदत करत आहेत.
श्रीधरन यांच्याबरोबर काम करणाऱ्या पप्पन यांनी मला सांगितलं की संघाचं यश किंवा अपयश भाजपने निवडणुकीत किती जागा जिंकल्या यावर जोखायला नको.
ते म्हणतात, "आमचा प्रभाव वाढतोय. आमच्या विचारधारेचा प्रसार होतोय. शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम होतंय. मी पण संघाच्या शाळेत शिकलोय."
 
पुढची व्युहरचना काय?
राजकीय विश्लेषक जी प्रमोद कुमार म्हणतात की केरळमध्ये भाजप तेव्हाच यशस्वी होऊ शकेल जेव्हा त्यांना हिंदूंची एकगठ्ठा मत मिळतील.
ते म्हणतात, "हिंदूंची एकगठ्ठा मत मिळवण्यात आतापर्यंत तरी भाजपला अपयश आलेलं आहे. आता त्यांच्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे अल्पसंख्यांक मुस्लीम आणि ख्रिश्चन मतं मिळवणं. एखाद-दोन मतं वगळता त्यांना मुस्लीम मतं मिळणं अवघड आहे. काही मुसलमान भाजपमध्ये गेलेही आहेत. ख्रिश्चन समुदायात इथे बहुसंख्य सीरियन ख्रिश्चन आहेत जे उच्च जातीचे आहेत. त्या समाजात गेल्या काही काळात इथे थोडंफार ध्रुवीकरण झालेलं आहे. कारण ख्रिश्चन समुदायातही आपापसात मतभेद आहेत. हा समुदाय अनेक संप्रदायांमध्ये विभागला गेला आहे आणि प्रत्येक संप्रदायाला आपल्या हितांसाठी काम करणाऱ्या पक्षाला मत द्यायचं आहे. जॅकबाईट समाज भाजपशी जवळीक साधू पाहात होता पण त्यांचं काही जमलं नाही."
पारंपारिकरित्या केरळमधल्या मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायांनी काँग्रेसचं नेतृत्व असणाऱ्या युडीएफलाच नेहमी मतदान केलं आहे.
पण ख्रिश्चन समुदायाची तक्रार आहे की युडीएफ मुस्लिमांना झुकतं माप देतं त्यामुळे ते गेल्या काही काळात भाजपकडे झुकले आहेत.
या व्यतिरिक्त संघाचे वरिष्ठ पदाधिकारी नुकतेच चर्चेसच्या नेत्यांना भेटले आणि त्यांनी भाजपला जिंकवून देण्याचं आवाहन केलं आहे. प्रमोद कुमार म्हणतात की यंदा काही ख्रिश्चन मतं भाजपला जाणं शक्य आहे. पण संघाचे एक स्वयंसेवक केतन मेनन म्हणतात की त्यांच्या संस्थेला हिंदू समाजासाठीच काम करायचं आहे.
ते म्हणतात की, "केरळचा हिंदू डाव्यांना मत देतो पण एक दिवस येईल जेव्हा हा समुदाय भाजपला मत देईल."
 
केरळचे बहुतांश हिंदू डाव्यांना का मत देतात?
जे प्रभाष याचं उत्तर देताना म्हणतात की, "केरळच्या इतिहासात सामाजिक सुधारणांची आंदोलनं डाव्यांनी चालवली आहेत. केरळचे हिंदू या आंदोलनांतूनच येतात. त्यामुळेच ते डाव्यांना मतं देतात."
राधाकृष्णन ही गोष्ट मान्य करतात की राज्यात संघाचा जोर वाढला आहे. ते म्हणतात, "यांचं महत्त्व वाढलंय. 15 वर्षांपूर्वीच्या तुलनेत भाजप एक तिसरी आघाडी म्हणून पुढे आला आहे."
संघाच्या स्वयंसेवकांचं म्हणणं आहे 80 च्या दशकात भाजपचे संसदेत फक्त 2 खासदार होते. पण आज त्यांचे सर्वाधिक खासदार आहेत आणि हा सगळ्यांत मोठा पक्ष आहे. त्यांना वाटतंय की केरळमध्ये संघाची मेहनत भाजपच्या नक्कीच कामी येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments