Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोराबजी टाटा यांनी भारतीय खेळाडूंना स्वतःच्या पैशाने ऑलिम्पिकला का पाठवलं होतं?

Webdunia
शुक्रवार, 26 मार्च 2021 (19:09 IST)
सूर्यांशी पांडे
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी ब्रिटीश काळात भारतभूमीत ऑलिम्पिकची पटकथाही आकार घेत होती आणि त्याला आकार देणारे होते सर दोराबजी टाटा.
सर दोराबजी टाटा यांच्याच प्रयत्नांमुळे 1920 साली 6 भारतीय खेळाडूंनी एंटवर्प ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला
ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा भारत ब्रिटिशांचं साम्राज्य असणारा आशिया खंडातला पहिला देश होता.
 
सुरुवात कशी झाली?
सर दोराबजी टाटा भारतातले प्रमुख स्टील आणि लोखंडाचे उद्योजक जमशेदजी टाटा यांचे थोरले चिरंजीव होते.
रतन टाटा दोराबजी टाटा यांचे धाकटे बंधू. दोराबजी टाटांपेक्षा ते 12 वर्षांनी लहान होते. रतन टाटांपूर्वी सर दोराबजी टाटा यांनीच वडील जमशेदजी टाटा यांचं स्वप्न पूर्ण केलं होतं. स्टील आणि लोखंडाच्या उद्योगात 'टाटा' कंपनीने नावलौकिक मिळवावं, असं त्यांचं स्वप्न होतं.
ब्रिटीश इंडियात औद्योगिक योगदानाबद्दल 1910 साली सर दोराबजी टाटा यांना 'नाईट' पदवीने सन्मानित करण्यात आलं होतं.
 
मात्र, दोराबजी टाटा तिथेच थांबले नाहीत. क्रीडा क्षेत्रातही भारताने अग्रेसर व्हावं, अशी त्यांची इच्छा होती.
 
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मुजूमदार आणि पत्रकार नलीन मेहता यांच्या 'Dream of a Billion' या पुस्तकात सर दोराबजी टाटा यांच्या ऑलिम्पिक योगदानाविषयी तपशीलवार उल्लेख आहे.
मुंबईतच सर दोराबजी टाटा यांचा जन्म झाला. तिथूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी गॉनविल अँड कीज कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिजमध्ये प्रवेश घेतला.
इंग्लंडमधल्या महाविद्यालयांमध्ये खेळांना प्राधान्य मिळत असल्याचं त्यांनी बघितलं. याचा त्यांच्यावर बराच प्रभाव पडला. पुढे दोराबजी टाटा भारतात परतले आणि मुंबईतल्या झेव्हियर्स कॉलेजमधून 1882 पर्यंत शिक्षण घेतलं.
बोरिया मुजूमदार आणि नलीन मेहता आपल्या पुस्तकात सांगतात की सर दोराबजी टाटा यांनी तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अॅथलेटिक्स असोसिएशन आणि अॅथलेटिक्स स्पोर्ट्स स्पर्धा आयोजित करण्यास प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका निभावली.
 
सचिन तेंडुलकर आणि सर दोराबजी टाटा
1988 साली 14 वर्षांच्या सचिन तेंडुलकरने एका आंतर-शालेय क्रिकेट स्पर्धेत विनोद कांबळीसोबत 664 रन्सची पार्टनरशीप केली होती.
जगभरातल्या वर्तमानपत्रांमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या या अविश्वसनीय खेळीची चर्चा झाली. सचिनला ज्या स्पर्धेतून ओळख मिळाली ती ही स्पर्धा. या स्पर्धेचं नाव होतं हॅरिस शिल्ड. सर दोराबजी टाटा यांनीच 1886 साली या स्पर्धेची सुरुवात केली होती.
 
1920 ऑलिम्पिक : स्वतःच्या पैशाने खेळाडूंना पाठवलं
सर दोराबजी टाटा यांची पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यांनी 1919 साली जिमखान्याच्या पहिल्या अॅथलेटिक बैठकीचं आयोजन केलं होतं. या आयोजनात सहभागी हणारे सर्व खेळाडू शेतकरी होते आणि त्यांना फक्त धावता यायचं.
स्पर्धा सुरू झाली आणि दोराबजी टाटा यांच्या लक्षात आलं की या खेळाडूंना खेळाचे नियम माहितीच नाही. मात्र, त्याकाळी ऑलिम्पिक्समध्ये अॅथलेटिक्स क्वालिफाय करण्यासाठी जे टायमिंग असायचं ते काही खेळाडूंनी पूर्ण केलं होतं.
या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर डेव्हिड लॉईड उपस्थित होते. सर दोराबजी टाटा यांनी त्यांच्यासमोर भारताला 1920 साली होणाऱ्या एंटवर्ट ऑलिम्पिकमध्ये पाठवावं, असा प्रस्ताव ठेवला.
भारताला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता यावं, यासाठी सर दोराबजी टाटा यांनी ब्रिटीश ऑलिम्पिक समितीचा पाठिंबा मागितला.
पुढे दोघांमध्ये बऱ्याच बैठका झाल्या आणि अखेर गव्हर्नर लॉईड यांनी होकार दिला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) भारताला सहभागी होण्याची परवानगी दिली आणि इथेच भारतीय ऑलिम्पिक समिती स्थापन्याची पायाभरणी झाली.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून (IOC) परवानगी मिळाल्यानंतर खेळाडू निवडीसाठी एक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 6 खेळाडूंनी उत्तम कामगिरी दाखवली. त्यांचीच 1920 च्या एंटवर्ट ऑलिम्पिसाठी निवड करण्यात आली.
खरंतर या खेळाडूंना ऑलिम्पिकमधल्या अॅथलेटिक्स खेळाचे नियम आणि वागणूक यांची जराही कल्पना नव्हती.
'Dream of a Billion' पुस्तकात एका संवादाचा उल्लेख आहे. यात एका मुख्य जिमखाना सदस्याला विचारण्यात आलं की ऑलिम्पिक्समध्ये 100 मीटर स्पर्धेत क्वालिफाय करण्यासाठी वेळमर्यादा किती आहे. यावर ते म्हणाले, "असेल एक-दोन मिनीट." मात्र, त्यांना जेव्हा सांगण्यात आलं की ऑलिम्पिक्समधल्या धावण्याच्या शर्यती मिनीटांच्या नाही तर सेकंदांच्या असतात, त्यावेळी त्या जिमखाना सदस्याला विश्वासच बसला नाही.
एव्हाना ऑलिम्पिक्ससाठी भारताकडून 6 खेळाडूंची निवड झाली होती. पुढचा प्रश्न होता - या खेळाडूंना परदेशात पाठवण्यासाठीचा खर्च कोण उचलणार? खेळाडू शेतकरी होते आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती.
जवळपास 35 हजार रुपयांची गरज होती. जिमखान्याने 'द स्टेट्समन' वृत्तपत्रात देणगीसाठी जाहिरात दिली. सरकारने 6000 रुपये दिले.
 
मात्र, जनतेला करण्यात आलेल्या आवाहनाचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे मग सर दोराबजी टाटा यांनी स्वतः तीन खेळाडूंचे पैसे भरले. इतर खेळाडूंना देणगीच्या पैशातून पाठवण्यात आलं.
 
भारताच्या एकाही खेळाडूची कामगिरी चांगली झाली नाही. वृत्तपत्रांमध्येही पहिल्या भारतीय संघाची विशेष चर्चा झाली नाही.
 
1924 सालचं पॅरिस ऑलिम्पिक - गेमचेंजर
मात्र, भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक सहभागानंतर भारतात ऑलिम्पिकविषयी हळू-हळू जागरुकता निर्माण होत होती. 1920 साली खेळासाठी लागणारा बहुतांश पैसे टाटा, तत्कालीन महाराजे आणि सरकारने दिला होता. मात्र, 1924 साली भारतातील वेगवेगळ्या प्रांतांपासून ते सैन्यापर्यंत सर्वांकडून मदतीचा ओघ आला.
राज्यपातळीवर होणाऱ्या 'ऑलिम्पिक ट्रायल्स'ना वर्तमानपत्रांमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 1920 साली सर दोराबजी टाटा यांनी ऑलिम्पिकसाठी खेळाडूंची निवड स्वतःच्या अनुभवाच्या आधारे केली होती. मात्र, यावेळी अनेक टप्प्यांच्या स्पर्धांनंतर 'दिल्ली ऑलिम्पिक'च्या माध्यमातून निवड करण्यात येत होती.
या सुनियोजित निवड प्रक्रियेमुळेच ऑल इंडिया ऑलिम्पिक असोसिएशनची स्थापना झाली. 8 खेळाडूंना 1924च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
खरंतर यावेळीदेखील खेळाडूंची कामगिरी खूप चांगली नव्हती. मात्र, खेळाडूंनी 1920 च्या तुलनेत बरी कामगिरी बजावली. ऑल इंडिया ऑलिम्पिक असोसिएशन केवळ 3 वर्ष टिकलं. 1927 साली इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ही नवीन संस्था स्थापन करण्यात आली. हीच संस्था आजही भारतात ऑलिम्पिक खेळांची जबाबदारी उचलते.
त्यावेळी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष सर दोराबजी टाटा हेच होते.
1928 साली बर्लिनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच सर दोराबजी टाटा यांनी आयओएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अनेक राजे आणि उद्योजकांची नजर त्या रिकाम्या खुर्चीवर होती.त्यावेळी आयओएचं अध्यक्ष होण्यासाठी पैशांची गरज तर होतीच शिवाय, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसमोर भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आयओएच्या अध्यक्षाला इंग्लंडला जाण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा पैसा असणंही गरजेचं होतं.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कपूरथलाच्या महाराजांचं नाव सुचवलं. सर दोराबजी टाटा यांचीही सहमती मिळाली.दरम्यान, दिग्गज क्रिकेटर आणि नवानगरच्या जाम साहिब, रणजी आणि बर्दवानच्या राजांची नावंही समोर आली.मात्र, पटियालाचे महारज भूपेंदर सिंह मैदानात उतरले तेव्हा सर्वांनीच माघार घेतली. रणजींनीही माघार घेतली. कारण पटियालाचे महाराज भूपेंदर सिंह यांनी आर्थिक अडचणीच्या काळात रणजी यांना बरीच मदत केली होती.दोघांचेही घनिष्ठ संबंध होते. 1924 साली ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे पंजाबचे खेळाडू दलिप सिंह यांनाही त्यांनीच मदत केली होती. दलिप सिंहांविरोधात सुरू असलेल्या राजकारणामुळे त्यांना ट्रायल्समध्ये भाग घेता येत नव्हतं. त्यावेळी त्यांनी महाराज भूपेंदर सिंह यांच्याकडेच मदत मागितली होती.
त्यानंतर महाराज भूपेंदर सिंह यांनी दलिप सिंह यांना संघात स्थान मिळवून दिलं. इतकंच नाही तर हे प्रकरण बघता त्यांनी पटियाला स्टेट ऑलिम्पिक्स असोसिएशनची स्थापनाही केली.
रणजी यांच्यानंतर खेळात रस होता तो पटियालाचे महाराज भूपेंदर सिंह यांना.
यानंतर 1927 साली आयओसीने महाराज भूपेंदर सिंह यांची इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. भूपेंदर सिंह यांची अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी सर दोराबजी टाटा यांना लाइफ प्रेसिडेंट पद देऊन त्यांचा गौरव केला.
 
भारताची सुवर्ण कामगिरी
1928 सालच्या अॅम्स्टरडॅम ऑलिम्पिक्समध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळालं.
मेजर ध्यानचंद आणि हॉकीमुळे हे शक्य झालं. यानंतर भारतीय हॉकी टीमने सलग 6 वेळा सुवर्ण पदकांची कामगिरी केली.
यंदा टोकियोमध्ये ऑलिम्पिक्सचा सोहळा रंगतोय. यावेळच्या ऑलिम्पिक्ससाठी भारताकडून तब्बल 77 खेळाडू क्वालिफाय झालेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments