Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीरामविजय - अध्याय ७ वा

Webdunia
अध्याय सातवा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥


चंडकिरणसुकुमंडणा ॥ अमलकमलाक्षा रघुनंदना ॥ जलजोद्भवजनका जगज्जीवना ॥ पतितपावना श्रीरामा ॥१॥
विद्वज्जनमानसमराळा ॥ कामांतकध्येया भक्तवत्सला ॥ अनंतवेषा त्रिभुवनपाळा ॥ दीनदयाळा रघुपते ॥२॥
जयजय अविद्याविपिनदहना ॥ निजभक्तकौसल्यागर्भरत्ना ॥ जगदोद्धारा मुनिजनरंजना ॥ दुर्जनभंजना राघवेशा ॥३॥
मागें षष्ठाध्यायीं कथन ॥ वसिष्ठें रामास उपदेशून ॥ मग विश्र्वामित्र चालिला घेऊन ॥ यागरक्षणाचेनि काजें ॥४॥
भागीरथींत करोनि स्नान ॥ कौशिक राम लक्ष्मण ॥ सारोनियां नित्य अनुष्ठान ॥ सत्कर्माचरण वेदोक्त ॥५॥
मग धनुर्वेदयुक्ति नानामंत्र ॥ कोणे समयीं कैसें प्रेरावे अस्त्र ॥ तें रामासी अवघें मंत्रशास्त्र ॥ विश्र्वामित्र उपदेशी ॥६॥
युद्धाच्या नाना युक्ति कळा ॥ विश्र्वामित्रें सांगतांचि सकळा ॥ राघवें आकळिल्या त्या वेळा ॥ जैसा आंवळा करतळींचा ॥७॥
मूर्तिमंत अस्त्रदेवता ॥ रामचरणीं ठेविती माथा ॥ मग हृदयीं प्रवेशती तत्वतां ॥ जळीं जळगार जयापरी ॥८॥
पहावया श्रीरामाचें धैर्यमानस ॥ विश्र्वामित्र म्हणे तया समयास ॥ येणें मार्गे जे गेले सिद्धाश्रमास ॥ ताटिकेनें तयांस भक्षिलें ॥९॥
येणें मार्गे रघुपति ॥ जाऊं नये भय वाटे चित्ती ॥ हा मार्ग चुकवून त्वरितगतीं ॥ जावें सिद्धाश्रमातें ॥१०॥
ऐकतां कौशिकाचें वचन ॥ श्रीराम बोले सुहास्यवदन ॥ जेणें विश्र्वामित्राचे कर्ण ॥ तृप्त होऊन सुखावती ॥११॥
स्वामी तुमचे कृपेंकरूनी ॥ महाकाळ उभाच फोडीन बाणीं ॥ तेथें ताटिकेसी कोण गणी ॥ येच क्षणीं मारीन तीतें ॥१२॥
कौशिकाचे मनीं संशय होता ॥ कीं हीं बाळके केंवीं झुंजतील आतां ॥ त्या संशयाची समूळ वार्ता ॥ रामवचनें निरसली ॥१३॥
मग त्या रथावरी बैसोन ॥ ताटिकेचें हिंदोळिक वन ॥ त्याचि मार्गे तिघेजण ॥ जाते जाहले तेधवां ॥१४॥
वातवेगें जात स्यंदन ॥ कीं अपार भूमि टाकिली क्रमोन ॥ जैसें ऐकतां हरिकीर्तन ॥ पापें खंडोनि भस्म होती ॥१५॥
पुढे देखिलें घोर अरण्य ॥ वृक्ष लागले परम सघन ॥ चालावयासी स्यंदन ॥ मार्ग पुढें फुटेना ॥१६॥
रामासी म्हणे गाधिनंदन ॥ राघवा हेंचि ताटिकारण्य ॥ आतां येईल ती धांवोन ॥ वास काढून मनुष्यांचा ॥१७॥
तों हांक फोडिली अकस्मात ॥ जे ऐकतां दचकेल कृतांत ॥ विश्र्वामित्र जाहला भयभीत ॥ रक्षीं म्हणत राघवा ॥१८॥
उन्तत्त दशसहस्र गजांचें बळ ॥ ऐसी ताटिका परम सबळ ॥ पर्वत सांठवती विशाळ ॥ ऐसें उदर तियेचें ॥१९॥
ते कुंभकर्णाची भगिनी ॥ बहुत विशाळ राक्षसिणी ॥ शतांचीं शतें गो-द्विज धरुनी ॥ दाढेखालीं रगडीतसे ॥२०॥
ताटिका मार्गी जातां सहज ॥ मुखांत घालोनि रगडी द्विज ॥ वनपावोनीं शोधोनि द्विज ॥ नित्य भक्षी साक्षेपें ॥२१॥
प्रेतरक्तें वस्त्रें भरलीं ॥ तींचि आपणाभोंवतीं वेष्टिलीं ॥ मनुष्यशिरें कर्णीं बांधिलीं ॥ बहु दाट वळीनें ॥२२॥
नरशिरांच्या अपार माळा ॥ शोणितें चर्चित रुळती गळां ॥ कपाळीं सिंदुर चर्चिला ॥ बाबरझोटी मोकळिया ॥२३॥
द्वादश गांव पसरलें वदन ॥ पांच गांव लांब एकेक स्तन ॥ अगणित राक्षसी संगें घेऊन ॥ रामावरी लोटली ॥२४॥
सखियांस ताटिका म्हणे तेचि क्षणीं ॥ या पंथें येत मनुष्यांची घाणी ॥ नरमांसाची आजि धणी ॥ तुम्हांस देईन निर्धारें ॥२५॥
विश्र्वामित्र म्हणे चापपाणी ॥ हे वृक्ष विशाळ गेले गगनीं ॥ आंत गर्जतात राक्षसिणी ॥ ताटिकेसहित पाहे पां ॥२६॥
राम काढी कोदंडाची गवसणी ॥ जैसा याज्ञिकें कुंडीचा फुंकिला अग्नी ॥ कीं अकस्मात उगावला वासरमणि ॥ यामिनीअंतीं पूर्वेसी ॥२७॥
तंव सित ओढितां आकर्ण ॥ कडकडाट घोष दारुण ॥ जाहला सवेंच योजिला बाण ॥ प्रळयचफ्ळेसारिखा ॥२८॥
ज्या बाणाचें अर्धचंद्राकार वदन ॥ करी धांवत्या वायूचें खंडण ॥ रामें ओढूनि आकर्ण ॥ बाण सोडिला ते समयीं ॥२९॥
वृक्षांसहित राक्षसिणी ॥ मुख्य ताटिका हृदयापासोनी ॥ छेदोन पाडिली ते क्षणीं ॥ घोष गगनीं न समाये ॥३०॥
तों प्राण जातां राक्षसिणी ॥ ताटिका गर्जली ते क्षणीं ॥ तो घोष विमानीं ऐकोनि ॥ देव सर्व जगबजिले ॥३१॥
म्हणती विजयी विजयी श्रीरघुवीर ॥ वर्षती देव पुष्पांचे संभार ॥ ब्रह्मानंदें विश्र्वामित्र ॥ रामालागीं आलिंगी ॥३२॥
म्हणे रविकुळभूषणा रघुवीरा ॥ राजीवनेत्रा परम सुकुमारा ॥ तुझी धनुर्विद्या रामचंद्रा ॥ आजि म्यां दृष्टीं विलोकिली ॥३३॥
जैसें एकाचि नामेंकरून ॥ कोट्यावधि पापें जाती जळून ॥ तैसें ताटिकासहित हें वन ॥ एकाचि बाणें खंडिलें ॥३४॥
ताटिकेच्या रक्तेंकरूनी ॥ असंभाव्य तेव्हां रंगली मेदिनी ॥ देव दुंदुभि वाजविती गगनीं ॥ आला चापपाणि सिद्धाश्रमा ॥३५॥
जैसा वर्षाकाळीं गंगेचे पूर ॥ तैसे चहूंकडून धांवती ऋषीश्र्वर ॥ समस्तांसी वंदोनि रघुवीर ॥ भेटता जाहला ते काळीं ॥३६॥
यज्ञमंडप शास्त्रप्रमाण ॥ कुंड वेदिका भूमि साधोन ॥ चारी द्वारें अष्टकोन ॥ करिती साधून विप्र तेव्हां ॥३७॥
सकळ समग्री सिद्ध करून ॥ आरंभिला महायज्ञ ॥ श्रीरामासी म्हणे गाधिनंदन ॥ मखरक्षण करीं आतां ॥३८॥
तुवां ताटिका वधिली हा समाचार ॥ ऐकोनि धांवतील रजनीचर ॥ मारीच सुबाहु भयंकर ॥ प्रळय थोर करितील ॥३९॥
यालागीं नरवीरपंचानना ॥ सांभाळीं चहूंकडे रघुनंदना ॥ परम कपटी राक्षस जाणा ॥ पर्वतशिळा टाकितील ॥४०॥
श्रीराम म्हणे महाऋषि ॥ तुम्ही चिंता न करावी मानसीं ॥ शिक्षा लावीन कृतांतासीं ॥ विघ्नें करूं आलिया ॥४१॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन ॥ उल्हासलें ऋषीचें मन ॥ दीक्षाग्रहणें गाधिनंदन ॥ आरंभ करी यज्ञासी ॥४२॥
जैसा चंद्र वेष्टित तारांगणें ॥ कीं मित्राभोवती जैशीं किरणें ॥ तैसा ऋषिवेष्टित गाधिवदन ॥ कुंडासमीप विराजे ॥४३॥
ओंकारासहित स्वाहाकार ॥ अवदानें टाकिती सत्वर ॥ उठला मंत्रांचा गजर ॥ वषटूकारघोष पैं ॥४४॥
तों अस्ता गेला वासरमणि ॥ दोन प्रहर जाहली रजनी ॥ पिशिताशन आले धांवोनी ॥ ताटिकेच्या कैवारें ॥४५॥
वीस कोटी रजनीचर ॥ मुख्य मारीच सुबाहु असुर ॥ सिद्धाश्रमासमीप सत्वर ॥ हांक फोडित पातले ॥४६॥
हाक ऐकोनि दारुण ॥ भयभीत जाहले ब्राह्मण ॥ गळती हातींची अवदानें ॥ वदनी बोबडी वळतसे ॥४७॥
म्हणती रक्षीं रक्षीं रघुनंदना ॥ नरवीरश्रेष्ठा गोविप्रपाळणा ॥ श्रीराम म्हणे वो ब्राह्मणा ॥ चिंता कांहीं न करावी ॥४८॥
तंव एक म्हणे ब्राह्मण ॥ रक्षणार राम आणि लक्ष्मण ॥ पर्वताकार राक्षस संपूर्ण ॥ वीस कोटी पातले ॥४९॥
एक द्वार हे दोघे रक्षिती ॥ दुज्या द्वारें राक्षस संचारती ॥ आतां कैसी होईल गती ॥ पळावया निश्र्चितीं ठाव नाहीं ॥५०॥

अध्याय सातवा - श्लोक ५१ ते १००
विश्र्वामित्र म्हणे स्वस्थ करा मन ॥ मानव नव्हे रघुनंदन ॥ पुराणपुरुष आदिनारायण ॥ राक्षस वधावया अवतरला ॥५१॥
तों पर्वत आणि पाषाण ॥ यज्ञमंडपावरी पडती येऊन ॥ हाक फोडिती दारुण ॥ मग रघुनंदन काय करी ॥५२॥
कोदंड ओढून आकर्ण ॥ सोडी बाणपाठीं बाण ॥ राक्षसांचीं शिरें करचरण ॥ तटातटां तुटताती ॥५३॥
राक्षस परम अर्तुबळी ॥ ज्यांहीं सुरांचे मुकुट पाडिले तळीं ॥ हाक देती अंतराळीं ॥ यज्ञमंडप वेढिला ॥५४॥
एक उडती अंबरीं ॥ प्रेतें टाकिती यज्ञकुंडावरी ॥ मग रघुत्तम अयोध्याविहारी ॥ सर्वद्वारीं व्यापिला ॥५५॥
जिकडे तिकडे रघुनंदन ॥ चारी द्वारें अष्टकोन ॥ अष्टदिशा व्यापोन ॥ सोडी बाण श्रीराम ॥५६॥
मंडपाचिया कळसावरी ॥ उभा राम कोदंडधारी ॥ बाणांचा पर्जन्य तये अवसरीं ॥ चहूंकडोन पाडितसे ॥५७॥
रामरूपें असंख्यात ॥ यागमंडपाभोंवते वेष्टित ॥ बाणांचे पूर वर्षत ॥ संहार होत असुरांचा ॥५८॥
मंडपावर आणि खालतें ॥ सर्व व्यापिलें रघुनाथें ॥ तीळ ठेवावयापुरतें ॥ रामाविण रितें स्थळ नसे ॥५९॥
तृणीरांतूनि किती निघती शर ॥ शेषासी त्याचा न कळे पार ॥ कीं लेखकापासूनि अक्षरें ॥ किती निघती कळेना ॥६०॥
कीं मुखांतूनि शब्द निघती ॥ त्यांची जैशी न होय गणती ॥ कीं मेघधारा वर्षती ॥ नाहीं गणती तयांची ॥६१॥
महाकवीची पद्यरचना ॥ किती जाहली हें कळेना ॥ कीं कुबेरभांडारींची गणना ॥ कदा न कळे कोणातें ॥६२॥
मेरुपाठारीं रत्नखाणी निश्र्चिती ॥ त्यांतून रत्नें जैशीं निघती ॥ कीं पृथ्वीवर तृणांकुर किती ॥ नाहीं गणती तयांची ॥६३॥
कीं शास्त्रसंमतें अनेकार्थ ॥ असंख्य करिती निपुण पंडित ॥ तैसा रामबाणांसी नाहीं अंत ॥ तूणीर निश्र्चित रिता नोहे ॥६४॥
मेघ समुद्रजळ प्राशितां ॥ परी तो रिता नाहे तत्त्वतां ॥ कीं विष्णुमहिमा वर्णितां ॥ न सरे सर्वथा कल्पांतीं ॥६५॥
तैसा उणा नोहेचि तूणीर ॥ कोट्यानकोटी निघती शर ॥ करीत राक्षसांचा संहार ॥ समरधीर श्रीराम ॥६६॥
जैसी जाहलीया प्रभात ॥ वृक्षाहूनी पक्षी उडती बहुत ॥ तैसीं राक्षसशिरें अकस्मात ॥ आकाशपंथें उसळती ॥६७॥
वीस कोटी राक्षस देख ॥ एकला राम अयोध्यानायक ॥ परी ते मृगेंद्रावरी जंबुक ॥ अपार जैसे उठावले ॥६८॥
कीं दंदशूक मिळोन अपार ॥ धरूं आले खगेश्र्वर ॥ कीं प्रळयाग्नीवरी पतंगभार ॥ विझवावया झेंपावती ॥६९॥
कीं बहुत मिळून खद्योत ॥ धरून आणूं म्हणती आदित्य ॥ कीं शलभ मिळोनि समस्त ॥ महामेरु उचलूं म्हणती ॥७०॥
एकलाचि फरशधर ॥ परी अवनि केली निर्वीर ॥ एकले नृसिंहें संभार ॥ आटिले पूर्वी दैत्यांचे ॥७१॥
असो राक्षसशिरांच्या लाखोल्या ॥ रामें भूलिंगासी समर्पिल्या ॥ मरीच सुबाहु ते वेळां ॥ गदा घेऊन धांविन्नले ॥७२॥
रामें काढिला निर्वाण बाण ॥ ज्या शरमुखीं दैवत सूर्यनारायण ॥ सुबाहुचा कंठ लक्षून ॥ केलें संधान राघवें ॥७३॥
जैसा विहंगम वेगेंकरून ॥ धांवे वृक्षाग्नीचें फळ लक्षून ॥ तैसा सवेग गेला बाण ॥ शिर उडविलें सुबाहुचें ॥७४॥
त्या बाणाचा पिसारा किंचित ॥ मारीचास लागला अकस्मात ॥ त्या शरवातें अद्भुत ॥ मारीच गेला उडोनि पैं ॥७५॥
कीं खगेश्र्वराच्या पक्षफडत्कारीं ॥ अचळ उडोनि जाय दिगंतरी ॥ तैसा मारीच समुद्राभींतरीं ॥ जाऊनिया पडियेला ॥७६॥
परम होऊनियां भ्रमित ॥ लंकेस गेला धाकें पळत ॥ वाटे पाठीसी लागला रघुनाथ ॥ परतोनि पाहात घडिघडी ॥७७॥
लंकेंत राक्षस प्रवेशोन ॥ राक्षसेंद्रातें सांगे वर्तमान ॥ म्हणे मानव नव्हे रघुनंदन ॥ आदिपुरुष अवतरला ॥७८॥
अवघा ऐकोन वृत्तांत ॥ रावण दचकला मनांत ॥ जैसा सुपर्णाचा ऐकतां पुरुषार्थ ॥ सर्प बहुत संतापती ॥७९॥
कीं ऐकोन संतांचें स्तवन ॥ मनांत कष्टी होय दुर्जन ॥ कीं पतिव्रतेचा धर्म परिसोन ॥ व्याभिचारिणी विटती पैं ॥८०॥
असो समस्त आटोनि रजनीचर ॥ सिद्धाश्रमीं रणरंगधीर ॥ रणमंडळी रघुवीर ॥ एकला कैसा शोभला ॥८१॥
जैसा महाकल्पीं सर्व संहारे ॥ मग एकलें परब्रह्म उरे ॥ कीं समस्त लोपोनि नक्षत्रें ॥ एकला दिनकर उगवे जैसा ॥८२॥
कीं शुक्तिकेवेगळें मुक्ताफळ ॥ दिसे जैसें परम तेजाळ ॥ कीं प्रपंच त्यागोनि निर्मळ ॥ योगेश्र्वर विलसे जेंवि ॥८३॥
जैसी रात्र निरसतां उठती जन ॥ तैसे यज्ञमंडपांतूनि उठती ब्राह्मण ॥ भेटती रामास जाऊन ॥ ब्रह्मानंदेंकरोनियां ॥८४॥
जठरीं अन्नपाक होय वेगें ॥ परी गर्भास ढका न लागे ॥ कीं ज्ञानी वेष्टित तापत्रयभोगें ॥ परी अंतर न भंगें सर्वथा ॥८५॥
तैसे यज्ञमंडपासहित विप्र ॥ सघुत्तमें रक्षिले साचार ॥ पूर्ण जाहला मख समग्र ॥ श्रीरघुवीरप्रतापें ॥८६॥
विश्र्वामित्रासी नावरे प्रेमा ॥ म्हणे वत्सा माझिया श्रीरामा ॥ सहस्रवदनास तुझा महिमा ॥ न वर्णवेचि सर्वथा ॥८७॥
कौशिकासी म्हणती ऋषीजन ॥ श्रीराममूर्ति धाकुटी सगुण ॥ पर्वताकार राक्षस संहारून ॥ कैसे क्षणमात्रें टाकिले ॥८८॥
विश्र्वामित्र हास्यवदन ॥ ऋषिप्रति बोले वचन ॥ म्हणे आदित्यमंडळ दिसे लहान ॥ परी पृथ्वीभरि प्रकाश ॥८९॥
धाकुटा दिसे कलशोद्भव ॥ परी उदरीं सांठविला जलार्णव ॥ कीं वामनरूप धरी केशव ॥ परी दोन पाउलें ब्रह्मांड केलें ॥९०॥
दिसे इंद्राचें वज्र लहान ॥ परी पर्वताचें केलें चूर्ण ॥ पंडितहृदयीं बुद्धी सर्षपप्रमाण ॥ परी आब्रह्मभुवन व्यापिलें ॥९१॥
तैसा राम धाकुटा दिसे तुम्हां ॥ परी ब्रह्मादिकां नेणवे महिमा ॥ पुराणपुरुष हा परमात्मा ॥ भक्तरक्षणा अवतरला ॥९२॥
असो भूतावळी पातल्या तेथें ॥ त्यांहीं भक्षिलीं राक्षसप्रेतें ॥ यज्ञमंडपाभोंवते ॥ शुद्ध केलें भूमंडळ ॥९३॥
तों आलें मिथुलेश्र्वराचें पत्र ॥ तें स्वयें वाची विश्र्वामित्र ॥ सवें घेऊन समस्त विप्र ॥ स्वयंवरालागीं येइंजे ॥९४॥
ते दिवशीं बहुत सोहळा ॥ सिद्धाश्रमीं कौशिकें केला ॥ ब्राह्मणभोजन जाहलिया सकळां ॥ वस्त्रें अलंकार दीधले ॥९५॥
जेथें साह्या श्रीराम आपण ॥ तेथें कांहीं न दिसे अपूर्ण ॥ बहुत दक्षिणा देऊनि ब्राह्मण ॥ विश्र्वामित्रें तोषविले ॥९६॥
असो तेव्हां जाहलिया रजनी ॥ कौशिक निजला स्वशयनीं ॥ पुढें रामलक्ष्मण घेऊनी ॥ सुखें करून पहुडला ॥९७॥
साक्षात् शेषनारायण ॥ कौशिक निजला पुढें घेऊन ॥ निद्रा नव्हे ते समाधि पूर्ण ॥ उन्मनी ओंवाळून टाकावी ॥९८॥
हृदयीं न धरितां रघुनाथा ॥ शेजे निजती जे तत्त्वतां ॥ मज गमे ऐसें पाहतां ॥ कीं पशुच केवळ पडियेले ॥९९॥
रामस्मरणेंविण भोजन ॥ जैसें भस्मी घातलें अवदान ॥ तें यज्ञपुरुषासी न अर्पण ॥ वृथा भोजन तैसें तें ॥१००॥

अध्याय सातवा - श्लोक १०१ ते १५०
रामप्राप्तीविण कर्म देख ॥ नाशिती कुश मृत्तिका उदक ॥ तरी ते पिशाच नर ओळख ॥ भुलले मूर्ख जाणिजे ॥१॥
श्रीरामप्राप्तीवीण ज्ञान ॥ त्याचें नांव म्हणिजे अज्ञान ॥ विद्या तेचि अविद्या पूर्ण ॥ धर्म तो अधर्म जाणिजे ॥२॥
असो धन्य भाग्य कोशिकाचें ॥ पुढें निधान श्रीवैकुंठीचें ॥ घेऊन पहुडला साचें ॥ नाहीं चिंतेचें वास्तव्य ॥३॥
निद्रा लागली जों ऋषीस निश्र्चिती ॥ तों जागे जाहले दोघे दशरथी ॥ श्रीराम म्हणे सौमित्राप्रति ॥ परियेसीं एक जिवलगा ॥४॥
आम्ही कधीं जाऊं अयोध्येसी ॥ पाहूं दशरथाचा वदनशशी ॥ बोलतां श्रीरामाचे नेत्रांसी ॥ अश्रु आले तेधवां ॥५॥
तों शयनीं जागा जाहला गाधिसुत ॥ दोघांच्या ऐशा गोष्टी ऐकत ॥ स्फुंदस्फुंदोनि बोले रघुनाथ ॥ श्रीदशरथ देखों कधीं ॥६॥
सकळ रायांचे मुकुट एकसरीं ॥ नमस्कारिती ते अवसरीं ॥ पडती दशरथाचे प्रपदावरी ॥ किणी पडली चरणीं तेणें ॥७॥
ते चरण मी कधी देखेन ॥ दशरथाच्या पादुका घेऊन ॥ दिव्यरत्नीं मंडित पूर्ण ॥ मी उभा ठाकेन कधीं पुढें ॥८॥
जे अयोध्याप्रभूची पट्टराणी ॥ श्रीकौसल्या आमुची जननी ॥ ते अत्यंत कृश होउनी ॥ वाट पाहात असेल कीं ॥९॥
ऐसें विश्र्वामित्रें ऐकिलें ॥ उठोनि रामासी हृदयीं धरिलें ॥ म्हणे बारे जनकाचें पत्र आलें ॥ उदयीं जाऊं मिथुलेसी ॥११०॥
तेथें केवळ विजयश्री सीता ॥ ते तुज माळ घालील रघुनाथा ॥ कौसल्येसहित दशरथा ॥ तेथेंचि तुज भेटवीन ॥११॥
तूं जगद्रुरु श्रीरामचंद्र ॥ दाविसी लौकिक लीलाचरित्र ॥ असो उदयाचळीं प्रकटलें रविचक्र ॥ विप्र सारिती नित्यनेम ॥१२॥
घेऊन ऋषीश्र्वरांचे संभार ॥ श्रीराम आणि सौमित्र ॥ निघता जाहला विश्र्वामित्र ॥ मिथुलापंथे ते काळीं ॥१३॥
चरणचालीं ऋषि चालती ॥ म्हणोनि रथ टाकोनि रघुपति ॥ चरणीं चालतां हो जगती ॥ धन्य जाहलें म्हणतसे ॥१४॥
दोहीं बाहीं विश्र्वामित्र आणि सौमित्र ॥ मध्यें जगद्वंद्य राजीवनेत्र ॥ जो घनश्याम चारुगात्र ॥ कैसा शोभला ते काळीं ॥१५॥
पूर्वीं मंथावया क्षीरसागर ॥ निघाला जेव्हां क्षीराब्धिजावर ॥ ते वेळीं कमलोद्भव आणि उमावर ॥ दोहीं भागीं शोभेल जेंवीं ॥१६॥
कीं शशिमंडळा दोहींकडे लखलखित ॥ शोभती भृगुतनय अंगिरासुत ॥ की शंखचक्र विराजत ॥ श्रीविष्णुच्या दोहीं भागीं ॥१७॥
असो ऐसा चालतां रघुनाथ ॥ ऋषि आपुलाले आश्रम दावित ॥ ठायीं ठायीं बैसवूनि रघुनाथ ॥ पूजा करिती आदरें ॥१८॥
समस्तांचा करित उद्धार ॥ पुढें चालत जगदोद्धार ॥ तों पुढें प्रचंडशिळा दुर्धर ॥ दृष्टीं देखिली राघवें ॥१९॥
तों श्रीरामचरणरज ते वेळे ॥ वायुसंगें पुढें धांविन्नले ॥ शिळेवरी जाऊन पडले ॥ नवल वर्तलें अद्भुत ॥१२०॥
अहल्येसी लाविला चरण ॥ ऐसी कथा वर्णिती कविजन ॥ तरी अहल्या ब्राह्मणकन्या पूर्ण ॥ गौतमाची निजपत्नी ॥२१॥
ब्राह्मणपत्नी ते महासती ॥ तियेतें पाय लावील रघुपति ॥ हें न घडे कल्पांतीं ॥ बरवे संतीं विचारिजे ॥२२॥
असो चरणरजेंचि ते वेळां ॥ कांपों लागली प्रचंड शिळा ॥ विश्र्वामित्राप्रति घनसांवळा ॥ पुसता जाहला वृत्तांत ॥२३॥
म्हणे ऋषि हें नवल वर्तत ॥ थरथरां शिळा कांपत ॥ जैसा चंद्रोदय हळूहळू होत ॥ तैसें दिव्य रूप दिसत स्त्रियेचें ॥२४॥
परम शोभती विद्रुमाघर ॥ जे चंपकवर्ण सुकुमार ॥ उर्वशी रंभा म्हणती सुंदर ॥ परी इजवरोनि ओंवाळिजे ॥२५॥
मस्तकींचें रुळती कबरीभार ॥ वल्कलें वेष्टित सुंदर ॥ मज वाटतें इंद्रादि सुरवर ॥ इचे पोटी जन्मले ॥२६॥
कीं हे आदिभवानीसाचार ॥ आम्हांस आली हो समोर ॥ कीं हे कोणी ऋषिपत्नी सुंदर ॥ निद्रा घेऊन उठली पैं ॥२७॥
कीं पडली होती मूर्च्छा येउनी ॥ कीं निघाली पाताळाहुनी ॥ कीं कोणी टाकिली वधोनी ॥ प्राण येऊन उठली आतां ॥२८॥
कीं केलें शासन ॥ बैसली होती रुसोन ॥ कीं तुमची तपश्र्चर्या संपूर्ण ॥ येणें रूपें आकारली ॥२९॥
मग विश्र्वामित्र म्हणे राजीवनेत्रा ॥ हे ब्रह्मकन्या परम पवित्रा ॥ पतीनें शापितां मदनारिमित्रा ॥ शिळारूप जाहली हे ॥१३०॥
श्रीराम म्हणे महाऋषि ॥ अहल्या शिळा जाहली कैशी ॥ तो वृत्तांत मजपाशीं ॥ कृपा करोनि सांगिजे ॥३१॥
ऋषि म्हणे विरिंचीनें ब्रह्मांड रचिलें ॥ चित्र विचित्ररूप विस्तारिलें ॥ सकळांमाजी विशेष केलें ॥ अहल्येचें स्वरूप पैं ॥३२॥
देखोनि परम सुंदर ॥ तीस मागों येती बहुत वर ॥ कमलोद्भवासी पडला विचार ॥ स्वयंवर थोर मांडिलें ॥३३॥
ब्रह्मा बोले मानसींचा पण ॥ दों प्रहरांत पृथ्वीची प्रदक्षिण ॥ करून येईल पुढें पूर्ण ॥ त्यासी देईन हे अहल्या ॥३४॥
ऐकोन ऐशिया पणासी ॥ धांवो लागले देव ऋषि ॥ यज्ञ गंधर्व तापसी ॥ पृथ्वीप्रदक्षिणेसी चालिले ॥३५॥
त्यांत अवघ्यापुढें अमरपति ॥ ऐरावतारूढ धांवे शीघ्रगती ॥ इतर लोकपाळही धांवती ॥ वाहनीं बैसोनि आपुलाल्या ॥३६॥
एक ऊर्ध्वपंथें वेगें जाती ॥ एक समीरगतीं धांवती ॥ एक मार्गी अडखळून पडती ॥ सवेंचि पळती उठोनियां ॥३७॥
तंब इकडे गौतम मुनि ॥ जान्हवीजीवनीं स्नान करूनि ॥ बाहेर येतां नयनीं ॥ द्विमुखी कपिला देखिली ॥३८
तंव गायत्रीमंत्र जपोन ॥ विधियुक्त केल्या प्रदक्षिणा तीन ॥ नित्यकर्म अनुष्ठान ॥ गौतमें केलें सावकाश ॥३९॥
सत्यलोकास आला परतोन ॥ ज्ञानीं पाहे कमलासन ॥ तों पृथ्वीप्रदक्षिणा तीन ॥ करून आला गौतम मुनि ॥१४०॥
विधि म्हणे धन्य जाहलें ॥ अहल्येचें भाग्य फळासी आलें ॥ तात्काळ दोघांसी लग्न लाविलें ॥ यथाविधि पाणिग्रहण ॥४१॥
तों अवघ्यांपुढें अमरपति ॥ धांवत आला शीघ्रगती ॥ वधूवरें देखोनियां चित्तीं ॥ परम क्रोध संचरला ॥४२॥
विरिंचीस म्हणे सहस्रनयन ॥ वृद्धास केलें कन्यादान ॥ तूं असत्यनाथ पूर्ण ॥ कळों आलें येथोनि आम्हां ॥४३॥
स्रष्टा म्हणे वज्रधरासी ॥ मज असत्य तूं किमर्थ म्हणसी ॥ येणें तीन प्रदक्षिणा केल्या पृथ्वीसी ॥ पाहें मानसीं विचारूनि ॥४४॥
विचार न करितां बोले वचन ॥ सज्जनासी ठेवी नसतें दूषण ॥ वेदवाणी मानी अप्रमाण ॥ शतमूर्खाहूनि मूर्ख तो ॥४५॥
असो इंद्रें द्वेष धरोनि मानसीं ॥ म्हणे एकवेळ भोगीन अहल्येसी ॥ परतोन गेला स्वस्थानासी ॥ खेद अत्यंत पावोनियां ॥४६॥
घेऊनियां अहल्येसी ॥ गौतम आला निजाश्रमासी ॥ बहुत क्रमिलें काळासी ॥ परी इंद्र अहर्निशीं जपतसे ॥४७॥
तंव आलें सूर्यग्रहण ॥ गौतम अहल्या सनन करून ऋषि ध्यानीं बैसला तल्लीन ॥ अहल्या परतोन घरा आली ॥४८॥
ब्रह्मकन्या एकली गृहांत ॥ जाणोनि शक्र आला धांवत ॥ गौतमाचा वेष धरित ॥ सतीलागीं भोगावया ॥४९॥
कपाट देवोन गृहांतरीं ॥ आंत बैसली ब्रह्मकुमारी ॥ तो हा कपटवेषधारी ॥ येऊन द्वारी उभा ठाके ॥१५०॥

अध्याय सातवा - श्लोक १५१ ते २००
म्हणे अहल्ये धांव धांव झडकरी ॥ म्हणोन आंग टाकिलें धरणीवरी ॥ येरी धांवोन आली द्वारीं ॥ हृदयीं धरी तयातें ॥५१॥
कापट्य नेणे महासती ॥ हृदयीं निर्मळ जैशी भागीरथी ॥ परम खेद करी चित्तीं ॥ नयनीं वाहती अश्रुपात ॥५२॥
अहल्येनें वेगें उचलिला ॥ नेऊन मंचकावरी पहुडविला ॥ म्हणे प्रिये प्राण चालिला ॥ अंगसंग देईं वेगें ॥५३॥
येरी म्हणे स्वामी आजि ग्रहण ॥ मध्यान्हास आला चंडकिरण ॥ महाराज तुम्ही शास्त्रज्ञ पूर्ण ॥ विचारून पाहावें ॥५४॥
येरू म्हणे तुज शास्त्रासीं काय कारण ॥ माझें वचन तुज प्रमाण ॥ तंव ते सतीशिरोरत्न ॥ अवश्य म्हणे ते काळीं ॥५५॥
अहल्या इंद्र दोघांजणी ॥ शयन केलें एके शयनीं ॥ तंव गौतम नित्य नेम सारुनी ॥ आश्रमासी पातला ॥५६॥
म्हणे अहल्ये उघडीं वो द्वार ॥ येरी घाबरी सांवरी वस्त्र ॥ म्हणे कोणरे तूं दुराचार ॥ तो म्हणे अमरेंद्र जाण मी ॥५७॥
म्हणे रे अपवित्रा काय केलें ॥ श्रोत्रियाचें पात्र कां स्पर्शिलें ॥ तुझें थोरपण दग्ध जाहलें ॥ कर्म केलें विपरीत ॥५८॥
रति जाहली कीं परिपूर्ण ॥ वेगीं जाय तूं येथून ॥ मग अहल्या कपाट उघडी धांवोन ॥ तंव गौतम दृष्टीं देखिला ॥५९॥
अहल्येस ऋषि कैसा भासला ॥ की कल्पांतींचा सूर्य प्रकटला ॥ कीं अपर्णावर कोपला ॥ तृतीय नेत्र उघडोनियां ॥१६०॥
तो इंद्र पळतां शापिला वेगें ॥ तुझें अंगीं होतील सहस्र भगें ॥ नपुंसक होऊन वागे ॥ परद्वारिया पतिता तूं ॥६१॥
तंव ते अहल्या कामिनी ॥ थरथरां कांपे ऋषीस देखोनि ॥ जैसी महावातें कमळिणी ॥ उलथोन पडों पाहें पैं ॥६२॥
ग्रहणीं काळवंडें वासरमणि ॥ तैशी मुखींची कळा गेली उतरोनि ॥ परम कोपायमान मुनि ॥ अहल्येसी शापित ॥६३॥
हो तुझें शरीर शिळावत ॥ जड होऊन पडो अरण्यांत ॥ साठीसहस्रवर्षेंपर्यंत ॥ राहें मूर्च्छित होऊनियां ॥६४॥
शाप ऐकातांच लवलाहें ॥ धांवोनि धरी ऋषीचे पाय ॥ म्हणे महाराजा विचारूनि पाहे ॥ कापट्य केलें चांडाळें ॥६५॥
जाणोनियां पाकशासन ॥ जरी म्यां दिले असेल भोगदान ॥ तरी माझें शरीर हो शतचूर्ण ॥ ठकविलें पूर्ण पतितानें ॥६६॥
ऋषि म्हणे तुवां जाणोन ॥ शापिला नाहीं पाकशासन ॥ रति झाली कीं परिपूर्ण ॥ जाय म्हणोन बोललीस ॥६७॥
येरी म्हणे नेणोनि घडलें पाप ॥ मज उपजला पश्र्चाताप ॥ तपोनिधी पुण्यरूप ॥ देईं उःशाप सर्वथा ॥६८॥
अहल्या परम दीनवदन ॥ नेत्रीं वाहे अश्रुजीवन ॥ द्रवलें गौतमाचें मन ॥ काय वचन बोलिला ॥६९॥
म्हणे रविकुळीं अवतरेल नारायण ॥ कौसल्यात्मज रघुनंदन ॥ त्याच्या पदरजप्रतापेंकरून ॥ उद्धरोन मज पावसी ॥१७०॥
आतां होईं तूं चंडशिळा ॥ जड पाषाण परम सबळा ॥ वचन ऐकतांचि तात्काळा ॥ अहल्या मूर्च्छित पडियेली ॥७१॥
शरीर पडलें अचेतन ॥ अंग सर्व जाहलें पाषाण ॥ केश नेत्र नासिका स्तन ॥ जाहले कठिणरूप तेव्हां ॥७२॥
प्राण गोळा होऊनि समस्त ॥ आकर्षोंनि राहिली गुप्त ॥ गौतम आपुले दृष्टीं पाहत ॥ पाषाणवत् अहिल्या ॥७३॥
मग आठवूनि अहिल्येचे गुण ॥ गौतमासि आले रुदन ॥ म्हणे अहल्ये ऐसें गुणनिधान ॥ कैसें टाकून जाऊं मी ॥७४॥
तीस नेणोन घडलें पाप ॥ म्यां तर दिधला दीर्घ शाप ॥ आतां करावया जाईन तप ॥ इजसमीप कोणी नाहीं ॥७५॥
येथें सर्प व्याघ्रादि जीवजाती ॥ ईस शिळा देखोन पीडा करिती ॥ चंपककळिका अहल्या सती ॥ परम खेद पावेल ॥७६॥
मग ऋषि शाप देत वनासी ॥ जे जीवमात्र येतील अहल्येपाशीं ॥ ते गतप्राण होतील निश्र्चयेंसी ॥ कोणी शिळेसी न पहावें ॥७७॥
ऐसें ऐकतां शापवचन ॥ एक वृक्ष वेगळे करून ॥ पिपीलिकादि गज व्याघ्र संपूर्ण ॥ गेले पळून ते काळीं ॥७८॥
मग तो महाऋषि गौतम ॥ सतीचा खेद करी परम ॥ पावला तो बद्रिकाश्रम ॥ अनुष्ठान करीत बैसला ॥७९॥
म्हणे कामें नाडिला पाकशासन ॥ मज क्रोधें नागविलें पूर्ण ॥ इंद्र-अहल्येसीं शापितां जाण ॥ तपक्षय जाहला ॥१८०॥
इकडे इंद्र मयूर होऊन अरण्यांत ॥ अनुतापें हिंडे रुदन करित ॥ मग समस्त देवीं अमरनाथ ॥ गोतमापाशीं आणिला ॥८१॥
सुरवरीं बहुत प्रार्थून ॥ केलें इंद्राचें शापमोचन ॥ गौतम बोले प्रसन्नवदन ॥ सहस्रनयन तूं होशील ॥८२॥
शक्र सहस्रनेत्र जाहला ॥ निजपदा तत्काळ पावला ॥ तैपासोन हे अहल्या शिळा ॥ आजवरी जाहली होती ॥८३॥
रामा तुझे पडतां चरणरज ॥ अहल्या दिव्यरूप जाहल सहज ॥ श्रीरामा पहावया तुज ॥ सजीव सतेज जाहली ॥८४॥
कौशिकें सांगतां हें पूर्वकथन ॥ आश्र्चर्य करी रघुनंदन ॥ कौशिकासी प्रतिवचन ॥ काय बोलता जाहला ॥८५
म्यां काय केलें असें आचरण ॥ माझ्या पदरजें उद्धरे पाषाण ॥ कौशिक म्हणे तुझे चरण ॥ त्यांचें वैभव रामा हें ॥८६॥
असो रघुवीर तये काळीं ॥ ऋषिसहित आला तियेजवळी ॥ पदर सांवरोनि उठिली ॥ अहल्या देवी तेधवां ॥८७॥
मस्तकींचे मोकळे कबरीभार ॥ सांवरोनि वीरगुंठी बांधी सत्वर ॥ नेत्रीं न्याहाळित रघुवीर ॥ विधिसुता समोर पातली ॥८८॥
जो दशरथाचा महत्पुण्यमेरु ॥ जो कां लावण्यामृतसागरु ॥ जो जगवंद्य जगद्रुरु ॥ अहल्येनें देखिला ॥८९॥
जो मृडानीपतीचें हृदयरत्न ॥ जो इंद्रादिदेवांचें देवतार्चन ॥ जो जलजोद्भवाचें ध्येय पूर्ण ॥ नारदादिकांचें गुह्य जें ॥१९०॥
जे सनकादिकांची आराध्य मूर्ति ॥ चारी साही वर्णिती ज्याची कीर्ति ॥ तो नेत्रीं देखिला रघुपति ॥ प्रेम चित्तीं न समाये ॥९१॥
अष्टभावें दाटोन ब्रह्मकन्या ॥ साष्टांग नमी राजीवनयना ॥ तो श्रीराम बोले सुवचना ॥ माते ऊठ झडकरीं ॥९२॥
ऐसें ऐकतां ते वेळीं ॥ कमलोद्भवकन्या उठली ॥ जैसी कोकिळा गर्जे वसंतकाळीं ॥ तैसी स्तवन करीतसे ॥९३॥
म्हणे जयजय रामा करुणासमुद्रा ॥ हे दशरथे प्रतापरुद्रा ॥ हे जगद्रुरु श्रीरामचंद्रा ॥ मज चकोरलागीं उदय तुझा ॥९४॥
हे राघवा पुराणपुरुषा ॥ हे जगत्पालका अनंतवेषा ॥ हे कौसल्यात्मजा चंडांशा ॥ निसरली निशा तव उदयीं ॥९५॥
हे विद्वज्जनमानसमांदुसरत्ना ॥ हे ताटिकांतक नरवीर पंचनना ॥ तुझ्या नामप्रतापाची ऐकतां गर्जना ॥ पापवारणा संहार ॥९६॥
श्रीरामा तूं भवरोगवैद्य सुजाण ॥ मात्रा देऊन निजचरणरेण ॥ दोषक्षयरोग दवडोन ॥ अक्षय केलें मजलागीं ॥९७॥
साठसहस्रवर्षेंपर्यंत ॥ अहंदेहभूतें झडपिलें यथार्थ ॥ तूं पंचाक्षरीं रघुनाथ ॥ भूतें समस्त पळालीं ॥९८॥
साठसहस्रवर्षेंवरी ॥ जळतां चिंतेच्या वणव्याभीतरीं ॥ तूं मेघ वर्षतां झडकरी ॥ आजि पूर्ण निवाल्यें ॥९९॥
माझ्या कुरळकेशेंकरून ॥ राघवा झाडीन तुझे चरण ॥ तुजवरून ओंवाळून ॥ काय टाकीन माझी हे ॥२००॥

अध्याय सातवा - श्लोक २०१ ते २५९
असो गौतम पाहे ज्ञानी ॥ तों उद्धरिली आपुली कामिनी ॥ तात्काळ उभा ठाकला येऊनि ॥ वंदी चापपाणि तयातें ॥१॥
श्रीराम उगवतां दिनमणि ॥ हीं चक्रवाकें मिळाली दोन्हीं ॥ असो सकळ ऋषि मिळोनि ॥ शेस भरिती उभयतांची ॥२॥
अहल्या म्हणे हो श्रीरामा ॥ तुज अनंत कल्याण हो सवोत्तमा ॥ हिमनगजामातमनविश्रामा ॥ पूर्णब्रह्मा परात्परा ॥३॥
श्रीरामा सीता स्वयंवरी ॥ तुजचि प्राप्त होईल ते नोवरी ॥ तुजवांचोनि आणिकास न वरी ॥ तुजचि वरील निर्धारें ॥४॥
अहल्या गौतम दोघांजणीं ॥ निजाश्रमीं पूजिला चापपाणी ॥ पुढें श्रीराम आज्ञा घेऊनि ॥ मिथिलेजवळी पातले ॥५॥
शतानंद पुत्र अहल्येचा ॥ तो होय पुरोहित जनकाचा ॥ संग धरोनि श्रीरामाचा ॥ तोही निघाला ते वेळीं ॥६॥
मिथिलेबाहेर उपवनांत ॥ ऋषिसहित राहिला रघुनाथ ॥ तों नगरांतून आली मात ॥ स्वयंवरपणाची तेधवां ॥७॥
उमाकांताचें चाप दारुण ॥ त्यास जो बळिया वाहील गुण ॥ त्यास जानकीपाणिग्रहण ॥ हाचि पण स्वयंवरीं ॥८॥
श्रीराम म्हणे विश्र्वामित्रासी ॥ जानकी जन्म पावली कैसी ॥ पण केला धनुष्यासी ॥ तरी तें चाप कोणाचें ॥९॥
कौशिक सांगे पूर्वकथन ॥ पूर्वीं राजा पद्माक्ष जाण ॥ तेणें कमला करून प्रसन्न ॥ हेंचि वरदान मागीतलें ॥२१०॥
कं माझी कन्या होऊन घरीं ॥ खेळें माझिये निजअंकावरी ॥ मग ते वैकुंठपतीची अंतुरी ॥ काय बोले तेधवां ॥११॥
मी येतां तुझिया मंदिरा ॥ बरें तुज नव्हे नृपवरा ॥ नसतीं विघ्नें येती घरा ॥ विचार बरवा नव्हे हा ॥१२॥
नृप म्हणे निश्र्चयें माझे अंतरीं ॥ माते तूं होय माझी कुमरी ॥ इंदिरा म्हणे स्वामी मुरारी ॥ तया आधीन मी असें ॥१३॥
मग प्रसन्न करूनि श्रीधर ॥ राज पद्माक्ष मागे वर ॥ मज कन्या रमा देईं साचार ॥ ऐकतां मुरहर हांसिन्नला ॥१४॥
मग मातुलिंग फळ दीधलें ॥ तें रायें घरी नवमास ठेविलें ॥ त्यांतून कन्यारत्न निघालें ॥ तेज प्रकटलें असंभाव्य ॥१५॥
वाढतां वाढतां जाहली उपवर ॥ तीस मागों येत बहुत वर ॥ पद्माक्षासी सुख अपार ॥ कन्या सुंदर देखोनि ॥१६॥
ऋृषिगण गंधर्व नृपवर ॥ यक्ष चारण विद्याधर ॥ एकवटले समग्र ॥ पद्माक्षाचे मंदिरीं ॥१७॥
म्हणे पण करीं एक लागवेगीं ॥ कोप चढला पद्माक्षालागीं ॥ म्हणे नभसुनीळता जयाचे आंगीं ॥ त्यास कन्या देईन हे ॥१८॥
ऐकोनि सर्वही कोपले ॥ म्हणती कायरे मिथ्या बोले ॥ एकसरिसे वीर खवळले ॥ युद्ध मांडले असंभाव्य ॥१९॥
अवघ्या राजांसी एकला ॥ पद्माक्ष सप्तदिन भांडला ॥ शेवटीं सर्वी मिळोनि मारिला ॥ पद्माक्षरावो रणामाजीं ॥२२०॥
तों पद्माक्षी ते वेळीं ॥ अग्निकुंडी गुप्त जाहली ॥ पद्माक्षाची संपदा लुटली ॥ ग्राम विध्वंसूनि सर्व गेले ॥२१॥
तया ब्रह्मारण्यामाझारी ॥ पद्माक्षी निघाली कुंडाबाहेरी ॥ रावण विमानरूढ ते अवसरीं ॥ लावण्यसुंदरी देखिली ॥२२॥
देखोन सौंदर्य रूपडें ॥ रावणाची उडी पडे ॥ यरी यज्ञकुंडामाजी दडे ॥ रावणें कुंड विझविलें ॥२३॥
तेथें खणितां बहुत यत्नें ॥ त्यासी सांपडलीं पांच रत्नें ॥ घरा आणिलीं दशाननें ॥ संदुकेमाजी ठेविली ॥२४॥
मग एकांतींचें अवसरीं ॥ रावण सांगे मंदोदरी ॥ अमोल्य रत्नें पृथ्वीवरी ॥ तुजालागीं सुंदरी आणिली ॥२५॥
धांवोनी मंदोदरी उचली पेटी ॥ तंव ते न ढळेचि तये गोरटी ॥ हांसोन दशवक्र शेवटीं ॥ आपण उठे उचलावया ॥२६॥
तंव ती न ढळेचि विसांकरीं ॥ आश्र्चर्य झालें ते अवसरी ॥ प्रधान आणि मंदोदरी ॥ पेटी उघडिती तेधवां ॥२७॥
तंव षण्मासांचे कन्यारत्न ॥ देखता होय दशानन ॥ मंदोदरी म्हणे हें विघ्न ॥ राया घरासी आणिलें ॥२८॥
जो मायार्णवावेगळा ॥ चैतन्यदेही घनसांवळा ॥ त्यासीच हे घालील माळा ॥ इतरां ज्वाळा अग्नीची हे ॥२९॥
इणें निर्दाळिला पद्माक्ष नृपवर ॥ बहु रायांचा केला संहार ॥ ही येथें असतां साचार ॥ लंकापुर नुरेचि ॥२३०॥
दशानना हें परम विघ्न ॥ इजसी आधीं बाहेर घालीं नेऊन ॥ मग बोलाविले सेवक जन ॥ संदुक मस्तकीं दीधली ॥३१॥
पेटी उचलिली ते अवसरीं ॥ हळूच आंतून शब्द करी ॥ मी आणिक येईन लंकापुरीं ॥ रावण सहपरिवारीं वधावया ॥३२॥
ऐकोनियां ऐसें वचन ॥ रावणाचें दचकलें मन ॥ म्हणे इचा आतां वध करीन ॥ मयजा चरण धरी मग ॥३३॥
चरणीं दृढ ठेवोनि माथा ॥ म्हणे पुढील विघ्नें आतांचि कां आणितां ॥ मग शांत केलें पौलस्तिसुता ॥ सकळीं मिळूनि तेधवां ॥३४॥
रावण सांगे सेवकासी ॥ जनकराजा आहे मिथिलेसी ॥ त्याचिया गांवावरी हे विवसी ॥ धाडी नेऊन घाला रे ॥३५॥
मग रातोरातीं तात्काळीं ॥ पेटी पुरिली मिथिलेजवळी ॥ तें शेत कोणे एके काळीं ॥ जनकें ब्राह्मणासी दीधलें ॥३६॥
पद्माक्ष नृप पूर्वींचा पूर्ण ॥ पुन्हां अवतरला तो ब्राह्मण ॥ रायें वेदवक्ता म्हणोन ॥ क्षेत्रदान दीधलें ॥३७॥
सुमुहूर्त पाहोनि सुंदर ॥ ब्राह्मणें जुंपिला नांगर ॥ नांगरादांती परिकर ॥ पेटी अकस्मात लागली ॥३८॥
ब्राह्मण सत्यसन्मार्गी ॥ पेटी उचलिली लागवेगीं ॥ मग दाखविली जनकालागीं ॥ म्हणे राया ठेवणें घेईं आपुलें ॥३९॥
राव म्हणे काय आहे भीतरी ॥ विप्र म्हणे मी नेणें निर्धारीं ॥ जनकराजा आश्र्चर्य करी ॥ पेटी उघडिली तेधवां ॥२४०॥
भोंवतें प्रधान पाहती सकळी ॥ तों पांच वर्षांची कन्या देखिली ॥ असंभाव्य प्रभा पडली ॥ आश्र्चर्य वाटलें सकळिकां ॥४१॥
जनकास उपजला स्नेहो ॥ म्हणे स्वामी हे कन्यारत्न मज द्या हो ॥ ब्राह्मण म्हणे महाबाहो ॥ तुझीच कन्या हे निर्धारें ॥४२॥
ऐसी ते जनकात्मजा सुंदर ॥ सकळ सौंदर्याचें माहेर ॥ जनकरायासी सुख अपार ॥ म्हणे इंदिरासाचार आली हे ॥४३॥
एकवीस वेळां निःक्षत्री ॥ परशुरामें केली धरित्री ॥ सहस्रार्जुन वधोनि क्षणमात्रीं ॥ सूड घेतला रेणुकेचा ॥४४॥
त्र्यंबकधनुष्य घेऊन हातीं ॥ आला जनकाचे गृहाप्रति ॥ षोडाशोपचारें जनक नृपति ॥ भार्गवरामासी पूजितसे ॥४५॥
भोजनास बैसले गृहांतरीं ॥ शिवधनुष्य ठेवूनि बाहेरी ॥ तों जानकीनें ते अवसरीं ॥ घोडें केलें धनुष्याचें ॥४६॥
परशुराम भोजन करूनि ॥ सभेंत बैसला येऊनि ॥तों कोदंड न दिसे नयनीं ॥ भार्गव मनीं क्षोभला ॥४७॥
म्हणे गजभारीं न लोटे धनुष्य ॥ त्याचा कोणीं केला अभिलाष ॥ परशुराम आणि मिथिलेश ॥ द्वाराबाहेर जों आले ॥४८॥
तों कोंदडाचें घोडें करूनि ॥ झ्यां झ्यां म्हणोनि ओढी मेदिनीं ॥ परशुरामें तें देखानि ॥ अंगुळी वदनीं घातली ॥४९॥
पिता देखानि जनकबाळी ॥ कोदंड सांडोनियां पळाली ॥ धनुष्य पडलें ते स्थळीं ॥ तें न ढळेचि कवणातें ॥२५०॥
वीर लाविले प्रचंड ॥ परी नुचलेचि कोदंड ॥ भार्गव म्हणे हें वितंड ॥ सीतवेगळें उचलेना ॥५१॥
मग जनक म्हणे कुमारी ॥ मागुतीं चापातें घोडें करीं ॥ सीतेनें बैसोनि झडकरीं ॥ पूर्वस्थळासी आणिलें ॥५२॥
मग बोले फरशधर ॥ आमुचें अवतारकृत्य जाहलें समग्र ॥ मग तेथें धनुष्य ठेवूनि साचार ॥ जनकाप्रति बोलतसे ॥५३॥
आतां राया हाचि पण ॥ जो या धनुष्या वाहील गुण ॥ त्यासी सीतेसी पाणिग्रहण ॥ हा तूं पण करीं मिथिलेशा ॥५४॥
ऐसें सांगोन जनकासी ॥ भार्गव गेला बदरिकाश्रमासी ॥ विश्र्वामित्र सांगे श्रीरामासी ॥ पूर्व कथा ऐसी हे ॥५५॥
कौशिक म्हणे श्रीरामा ऐके ॥ तुझें चरित्र तुज ठाऊकें ॥ परी बोलविसी आमुच्या मुखें ॥ जाणोनियां सर्वही ॥५६॥
रामविजय ग्रंथ सुंदर ॥ पुढें अष्टमाध्यायीं सीतास्वयंवर ॥ जेथें श्रीराम विजयी साचार ॥ त्याविण आणिका न वरीच ॥५७॥
ब्रह्मानंदा रघुवीरा ॥ कमलोद्भवजनका श्रीधरवरा ॥ पुराणपुरुषा परात्परा ॥ अक्षय कीर्तन दे तुझें ॥२५८॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत श्रोते चतुर ॥२५९॥
सप्तमोऽध्याय गोड हा ॥७॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दत्त जयंती विशेष रेसिपी : दत्तगुरूंना आवडणारी घेवड्याची भाजी

दत्तमाला कर्णांकित माघ माहात्म्य

श्रीदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामावली श्री दत्तात्रेय 108 नाम

Dattatreya Jayanti 2024 दत्त जयंती कधी आहे? दत्ताचा जन्म कुठे झाला?

Dhanu Sankranti 2024: धनु संक्रांतीला या चुका टाळा, नाहीतर प्रगती थांबेल !

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments