Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्यानमार: म्हणून आम्ही भारतात आश्रय घेतला, म्यानमारमधून पळून आलेल्या पोलिसांनी सांगितले कारण

Webdunia
गुरूवार, 11 मार्च 2021 (16:56 IST)
रजनी वैद्यनाथन
बीबीसी प्रतिनिधी
म्यानमारमधल्या लष्करी उठावानंतर तिथल्या काही पोलिसांनी भारतात आश्रय घेतला आहे. यापैकी एकाने बीबीसीशी बातचीत करताना लष्कराने दिलेले आदेश मानण्यास नकार दिल्यानंतर म्यानमारमधून पळून भारतात आश्रय घेतल्याचं सांगितलं.
 
इतरही डझनभर पोलिसांचंही हेच म्हणणं आहे. म्यानमारच्या नागरिकांना गोळ्या घालून ठार करण्याचा दबाव येईल, या भीतीमुळेच म्यानमारमधून पलायन केल्याचं ते सांगतात.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश मला देण्यात आले होते. पण, मी हे करू शकत नसल्याचं मी त्यांना सांगितलं."
 
नाइंग (बदललेलं नाव) यांनी 9 वर्ष म्यानमारच्या पोलीस खात्यात सेवा बजावली. मात्र, 27 वर्षांचे नाइंग यांनी आज ईशान्य भारतातल्या मिझोरममध्ये शरण घेतली आहे.
मी नाइंग, इतर काही पोलीस अधिकारी आणि विशीतल्या काही तरुण महिलांची भेट घेतली. लष्कराचे आदेश मान्य करण्यास नकार दिल्यानंतर आहे ती नोकरी सोडून पलायन केल्याचं ते सांगतात. एक अधिकारी म्हणाले, "लष्कराविरोधात आंदोलन करणाऱ्या निष्पाप नागरिकांना ठार करण्यासाठी किंवा त्यांना इजा पोहोचवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जाईल, अशी भीती मला वाटत होती."
"लष्कराने बंड करत लोकांनी निवडून दिलेलं सरकार पाडणं चुकीचं असल्याचं आम्हालाही वाटतं."
 
म्यानमारच्या लष्कराला 'तातमादोव्ह' नावाने ओळखतात. तातमादोव्हने 1 फेब्रुवारी 2021 रोजी उठाव केला आणि सत्ता काबीज केली. तेव्हापासून म्यानमारमध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी निदर्शनं सुरू आहेत.
 
50 हून जास्त लोकांना ठार केल्याचा आरोप तिथल्या सुरक्षा दलांवर करण्यात येतोय.
 
नाइंग पश्चिम म्यानमारमधल्या एका शहरात कनिष्ठपदावर कार्यरत होते. फेब्रुवारीच्या शेवटी त्यांच्या शहरात आंदोलनांनी वेग धरल्याचं ते सांगतात.
आंदोलकांवर गोळीबार करण्यास दोन वेळा नकार दिल्यानं पलायन केल्याचं नाइंग सांगतात.
 
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "मी हे करू शकत नाही आणि मी लोकांच्या बाजूने असल्याचं मी माझ्या बॉसला सांगितलं. लष्कर खूप शक्तिशाली आहे आणि ते दिवसेंदिवस अधिकाधिक निष्ठूर होत आहेत."
 
आमच्याशी बोलताना नाइंग यांनी मोबाईल काढून फोटो दाखवले. पत्नी आणि पाच वर्ष आणि सहा महिन्यांच्या पोरींना म्यानमारमध्ये सोडून ते भारतात आलेत.
 
ते म्हणाले, "त्यांना यानंतर परत कधीही भेटता येणार नाही, अशी काळजी मला वाटते."
 
मी नाइंग आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांना मिझोरममधल्या एका अज्ञात स्थळी भेटले. जिथे आम्ही बोलत होतो तिथून त्या सर्वांचं घर म्हणजेच म्यानमार अगदी 16 किमी अंतरावर आहे.
 
आम्ही ज्या पोलिसांशी बोललो ते म्यानमारमधून भारतात पळून आलेल्या अगदी सुरुवातीच्या काही लोकांपैकी आहेत आणि म्यानमारमध्ये जे सुरू आहे त्याचे प्रत्यक्षदर्शी आहेत.
म्यानमारमध्ये लोकशाहीला समर्थन करणाऱ्या आणि लष्कराविरोधात असहकार करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
आमच्याशी बातचीत करणाऱ्या पोलिसांनी जे दावे केले त्याची सत्यता बीबीसी तपासू शकत नाही.
 
यूएन, अमेरिकेसह अनेक देशांनी म्यानमारमध्ये लष्करी कारवाईत झालेल्या नागरिकांच्या मृत्यूचा निषेध करत अधिकाऱ्यांनी संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, लष्कराने त्यांच्यावर होत असलेल्या टीकेचं खंडन करत त्यांच्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना सामोरं जायला तयार असल्याचं म्हटलं आहे.
 
लष्करी उठावानंतर म्यानमारमधून जवळपास 100 हून जास्त लोकांनी पलायन करत मिझोरममध्ये आश्रय घेतल्याचं एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितलं.
 
टूट (नाव बदललेलं आहे) यांना ज्या दिवशी लष्करी उठाव झाला तो दिवस जसाच्या तसा आठवतो. ते म्हणतात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती आणि त्यांच्या पोलीस ठाण्याजवळच लष्कराची एक चौकी उभारण्यात आली होती.
 
"आणि काही तासातच लष्कराने उठाव करत सरकार उलथवून सत्ता काबीज केल्याचं कळलं," असं ते सांगतात.
 
मला आणि माझ्या काही सहकारी पोलिसांना लष्कराच्या जवानांसोबत रस्त्यावर गस्त घालण्याचं काम देण्यात आल्याचं टूट यांनी सांगितलं. शांततेच्या मार्गाने थाळीनाद करत लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी निदर्शनं करणाऱ्या नागरिकांना अटक करण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचं ते म्हणाले.
 
टूटसुद्धा म्यानमारमधल्या एका मोठ्या शहरात पोलीस खात्यात काम करत होते. त्यांनाही निदर्शकांवर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी नकार दिला.
 
ते सांगतात, "पाच पेक्षा जास्त लोक गटाने एकत्र येताना दिसले तर त्यांच्यावर गोळ्या झाडा, असे आदेश आमचे इन्चार्ज असलेल्या लष्करी अधिकाऱ्याने दिले होते. लोकांना मारहाण करण्यात येत होती. हे सगळं बघून मला रात्री झोप येत नव्हती."
 
"रक्तबंबाळ झालेले निष्पाप नागरिक बघितल्यावर माझी सद्सद्विवेकबुद्धी मला अशा राक्षसी कृत्यापासून दूर रहायला बजावत होती."
 
टूट त्यांच्या पोलीस ठाण्यातून पलायन करणारे एकमेव पोलीस कर्मचारी आहेत. ते मोटरबाईकवरून मिझोरमला आले. भारतात येण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात येताना प्रचंड भीती वाटत होती, असंही ते सांगतात.
 
तिआऊ नदी ओलांडून हे लोक भारतात आले आहेत.
 
ज्यांच्याशी आम्ही बोललो त्यांच्या मते येणाऱ्या काही दिवसात आणखीही बरेच पोलीस भारतात येतील.
 
ग्रॅस (नाव बदललेलं आहे) आम्ही भेटलेल्या दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.
 
आंदोलकांना पांगवण्यासाठी लष्करी जवान काठ्या आणि रबर बुलेटचा वापर करत असल्याचं त्या सांगतात. इतकंच नाही तर एका जमावावर, ज्यात लहान मुलंही होती, जवानांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फेकल्याचंही त्या सांगतात.
 
त्या म्हणाल्या, "आम्ही जमाव पांगवावा आणि आमच्याच सग्यासोयऱ्यांना अटक करावी, अशी त्यांची इच्छा होती. पण, आम्हाला ते शक्य नव्हतं."
 
"आम्हाला तिथली पोलीस यंत्रणा आवडते. पण, आता सगळंच बदललंय. आम्ही यापुढे ती नोकरी करू शकत नाही."
 
24 वर्षांच्या ग्रॅस सांगतात घर सोडताना घरच्यांशी वादही झाला. विशेषतः त्यांच्या आईला हृदयाचा आजार आहे. त्यामुळे ग्रॅस यांनी घर सोडून जावू नये, असं त्यांना वाटत होतं.
 
त्या सांगतात, "माझे आई-वडील म्हातारे आहेत. त्यांनाही हे सगळं आवडत नाहीय. पण, आमच्यासारख्या तरुणांकडे त्यांना घरी एकटं सोडून पलायन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही."
म्यानमार प्रशासनाने भारताला 'मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्यासाठी' भारतात आश्रय घेतलेल्या म्यानमारच्या नागरिकांना सुपूर्द करण्याचं आवाहन केलं आहे.
 
तर मिझोरममध्ये आलेल्या लोकांना तात्पुरता निवारा देण्यात येईल आणि पुढे काय करायचं हे केंद्राने ठरवावं, असं मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी म्हटलं आहे.
 
येणाऱ्या दिवसात म्यानमारमधून आणखीही बरेच लोक मिझोरममध्ये येतील, असं स्थानिकांनाही वाटतंय.
 
म्यानमारमधून केवळ पोलीस पलायन करून आलेत, अशातला भाग नाही. म्यानमारमधून आलेल्या एका दुकानदारालाही आम्ही भेटलो. लोकशाहीवादी चळवळीला ऑनलाईन पाठिंबा दिला म्हणून त्यांना प्रशासनाने वॉरंट बजावलं होतं.
 
याविषयी सांगताना ते म्हणाले, "मी स्वार्थामुळे पळून आलेलो नाही. देशातला प्रत्येकजण घाबरलेला आहे. मी इथे आलोय कारण मला सुरक्षित ठिकाण हवं आणि चळवळीला पाठिंबा देण्यासाठी इथे राहून जे करता येईल ते सर्व मी करेन."
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments