Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजनाथ सिंह हे नरेंद्र मोदी सरकारसाठी अडचणीचे ठरत आहेत का?

Webdunia
- प्रदीप सिंह
मोदी सरकारनं नुकतंच कॅबिनेटशी संबंधित 8 समित्यांची स्थापना केली आहे. त्यापैकी फक्त दोन समित्यांमध्ये राजनाथ सिंह यांना सामील करण्यात आलेलं आहे.
 
या सगळ्या आठ समित्यांमध्ये अमित शहांचा समावेश आहे, पण राजनाथ सिंहांना फक्त दोन समित्यांमध्ये सामील करण्यात आलेलं आहे. राजकीय आणि संसदीय बाबींशी निगडीत महत्त्वाच्या समित्यांमध्ये राजनाथ यांचा समावेश करण्यात आला नाही.
 
मीडियामध्ये ही बातमी येताच राजनाथ सिंहांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले. यानंतर काही तासांतच गुरुवारी रात्री उशिरा कॅबिनेट समित्यांची एक नवी यादी जाहीर करण्यात आली. नवीन यादीत राजनाथ सिंहांचा समावेश दोन वरून वाढवून सहा समित्यांमध्ये करण्यात आला. मोदी- शहा युगामध्ये असं होणं अघटित आहे.
 
फार कमी लोकांशी मतभेद असणारी व्यक्ती अशी भाजपमध्ये राजनाथ सिंह यांची प्रतिमा आहे. किमान बाहेरच्यांना तरी असं वाटतं. पण पक्षातल्या अनेकांचं मत वेगळं आहे.
 
भाजपमध्ये असेही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की राजनाथ हे भाग्यवान आहेत. विश्वास नसेल तर कलराज मिश्र यांना विचारा. ज्येष्ठ असूनही ते दरवेळी मागे पडले.
 
2002 मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजनाथांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आणि त्यानंतर काहीच दिवसांत राजनाथ केंद्रीय मंत्री झाले. त्यावेळी कलराज मिश्र यांना सगळ्यांत जास्त वाईट वाटलं.
 
भाग्य की संधी?
कलराज मिश्र ज्याला भाग्य म्हणतात त्याला तुम्ही संधीही म्हणू शकता. पण अनेकदा असं झालेलं आहे की राजनाथ सिंह योग्य वेळी योग्य ठिकाणी हजर होते.
 
उत्तरप्रदेशात जेव्हा कल्याण सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधात तोफ डागली तेव्हा ते या दोन दिग्गजांच्या लढाईमध्ये वाजपेयींच्या बाजूने उभे राहिले आणि मग याला कल्याण सिंह विरुद्ध राजनाथ सिंह असं स्वरूप आलं.
 
याचं बक्षीस म्हणून राजनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं. राज्यातील नेत्याचा राष्ट्रीय नेता झाला.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लालकृष्ण अडवाणींना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण झाली.
 
संघाचे पदाधिकारी नेहमीच राजनाथ यांच्याकडे सगळ्यांना समजून घेणारे नेते म्हणून पाहत होते. अशी व्यक्ती ज्यांना कोणीही लक्ष्य केलं नसतं.
 
शिवाय पद आणि जबाबदारी देणाऱ्याच्या सूचनांप्रमाणे काम करण्याची त्यांची तयारी असायची. ते राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अशीही पाळी आली जेव्हा असं वाटलं की त्यांच्यात आणि अडवाणींमध्ये वाद होऊ शकतात.
 
पण राजनाथ सिंह यांचं हे वैशिष्ट्यं आहे की युद्ध छेडलं जाणार हे लक्षात आल्यानंतर ते एक पाऊल मागे येतात. जिंकण्यापेक्षा त्यांचं जास्त लक्ष आपण हरत तर नाही ना, याकडे असतं. जर युद्धच झालं नाही तर हार-जीत होण्याचा प्रश्नच येत नाही.
 
'राजनाथ भित्रे आहेत'
कदाचित अडवाणी, कल्याण सिंह, शंकर सिंह वाघेला आणि उमा भारती यांचं जे झालं त्यावरून राजनाथ यांनी धडा घेतला की कोणतीही गोष्ट इतकी ताणू नये की ती तुटून जाईल.
 
त्यांच्या या स्वभावाला त्यांचे विरोधक त्यांची कमजोरी असल्याचं ठरवत राजनाथ घाबरट असल्याचं म्हणतात. राजनाथ घाबरट असोत वा नसोत पण ते आतापर्यंत यशस्वी झाले, हे मात्र खरं आहे. त्यांच्या यशामध्ये संघाचा मोठा हात आहे.
 
संघाच्या मदतीमुळेच ते दोन्ही वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. दुसऱ्यांदाही संधी त्यांच्याकडे आयती चालून आली.
 
नितीन गडकरींना दुसऱ्यांदा अध्यक्ष करण्याला संघाची पसंती होती, पण भाजप नेतृत्त्वाला हे मान्य नव्हतं. म्हणून मग पुन्हा एकदा राजनाथ यांना हे पद देण्यात आलं. दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळाल्यानंतर कदाचित पहिल्यांदाच राजनाथ यांना वाटलं की कदाचित आपण पंतप्रधानही होऊ शकतो.
 
मोदींना थांबवण्यात अपयश आल्यानंतर त्यांची सोबत
पण राजनाथ यांच्या या स्वप्नाच्या समोर नरेंद्र मोदी डोंगरासारखे आड आले. मग त्यावेळी मोदी आणि अडवाणी यांच्या युद्धामध्ये अडवाणींचा काटा काढत त्यांनी जुने हिशोब चुकते केले.
 
यासाठी त्यांना मोदींच्या सोबतीची गरज होती. मोदींनाही त्यावेळी राजनाथ यांची साथ गरजेची होती. दोन गरजवंतांनी केलेली ही हातमिळवणी होती.
 
काहीही केलं तरी आपण मोदींना थांबवू शकणार नाही हे राजनाथ यांच्या लक्षात आलं. म्हणून मग ते त्यांना सामील झाले. जयपूरमध्ये राजनाथ सिंह आणि संघाने जे पाहिलं त्यावरून हे नक्की झालं होतं की मोदी आता मागे वळून पाहणार नाहीत. झालं असं की, गुजरातच्या तत्कालीन राज्यपाल कमला बेनीवाल यांच्या नातीचं जयपूरमध्ये लग्न होतं. मोदींनाही या लग्नाचं आमंत्रण होतं.
 
जाण्याआधी मोदींनी पार्टीच्या तीन-चार लोकांना फोन करून सोबत चलण्यास सांगितलं. तिथे काँग्रेसची जास्त लोकं असतील आणि आपल्या ओळखीचं फारसं कोणी नसेल असं मोदींनी म्हटलं.
 
तिथे पोचल्यानंतर वधु-वरांना आशीवार्द देण्यासाठी मोदी जसे स्टेजच्या दिशेने जाऊ लागल्यावर अनेकांनी त्यांना पाहिलं.
 
मोदी-मोदीचे काही आवाज आले आणि काही क्षणांतच सगळ्या बाजूंनी मोदी...मोदी असा जयघोष व्हायला लागला. हे पाहून खुद्द मोदीही चकित झाले.
 
नंबर दोनचा दर्जा मिळाला, पण विश्वासार्हता नाही
त्यानंतर पक्षाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीमध्ये मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर फक्त सुषमा स्वराज यांनी त्याला उघडपणे विरोध केला.
 
सुषमा स्वराजांनी सगळ्यांना सावध करत म्हटलं, "तुम्हा सर्वांना याचा पश्चात्ताप होईल. माझं म्हणणं लिहून ठेवा. माझा विरोध लिखित स्वरूपात असायला हवा." पण त्यावेळी राजनाथ काही बोलले नाहीत.
 
त्यांना वाटलं, आत्ता मोदींना साथ देत बाकीच्यांचा काटा काढू. मोदींचं काय करायचं ते निवडणुकीनंतर पाहता येईल. पण 2014च्या निवडणूक निकालांनी राजनाथांची निराशा केली. त्यांनी दिलेल्या सोबतीचा मोदींनी मान राखला आणि त्यांना सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा दर्जा देण्यात आला. पण त्यांच्यावर विश्वास मात्र ठेवण्यात आला नाही.
 
बाजी आपल्या हातून निसटली, याचं दुःख पाच वर्षं राजनाथांनी सहन केलं. सरकार आल्यानंतर त्यांच्या मुलाची बातमी आल्यावर त्यांनी पंतप्रधानांना भेटून नाराजी व्यक्त केली. यासोबतच त्यांच्या जवळच्या लोकांनी मीडियाला असं सांगितलं की मंत्रिमंडळातल्या एका सदस्यानेच ही खोटी बातमी पसरवली.
 
समितीतून बाहेर ठेवलं जाणं, हा मोठा संकेत
ही गोष्ट पंतप्रधानांसुद्धा समजली. त्यानंतर वेळोवेळी राजनाथ असं काहीतरी बोलत वा करत राहिले ज्याने सरकार, विशेषतः पंतप्रधान अडचणीत येतील. या लोकसभा निवडणुकांच्या वेळी पुन्हा एकदा हेच घडलं जेव्हा त्यांनी म्हटलं की उत्तर प्रदेशात सप- बसप युतीमुळे भाजपचं पंधरा-वीस टक्के जागांचं नुकसान होऊ शकतं.
 
मोदी-शहा आणि राजनाथ यांच्या मनात एकमेकांविषयी फारसा विश्वास नाही याविषयी शंकाच नाही. कधीना कधी ते राजनाथ यांचा काटा काढणार हे निश्चित आहे.
 
याची सुरुवात गुरुवारी करण्यात आली. त्यांना कॅबिनेटच्या अनेक समित्यांमधून बाहेर ठेवण्यात आलं. राजकीय बाबींशी निगडीत समित्यांमधूनही बाहेर ठेवण्यात येणं ही सगळ्यांत मोठी गोष्ट होती. जी व्यक्ती उत्तर प्रदेशासारख्या राज्याची मुख्यमंत्री झाली, दोनदा पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष झाली आणि अगदी काही दिवसांपूर्वी पर्यंत देशाची गृहमंत्री होती तिला या समितीत न घेणं, यातून मोठे संकेत मिळतात.
 
याचा अर्थ असा होतो की आता पक्ष नेतृत्त्वाचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. जी गोष्ट आतापर्यंत पक्ष कार्यालयाच्या चार भिंतींच्या आत होती ती आता चव्हाट्यावर आली आहे.
 
ही गोष्ट राजनाथ यांनी सकाळी कबूल केली, पण संध्यकाळ होईपर्यंत बहुतेक संघाशी असलेले त्यांचे लागेबांधे पुन्हा एकदा कामी आले.
 
मोदी-शहांच्या काळात असा निर्णय यापूर्वी कधीही घेण्यात आला नव्हता जो चोवीस तासांतच बदलावा लागला.
 
हा राजनाथ सिंहांचा विजय आहे की येऊ घातलेल्या पराजयाचे पडघम?

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments