Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिष्टाचाराचे १६ नियम

Webdunia
तुम्ही वरच्या फसव्या रंगावरून फार काळ जगाला फसवू शकत नाही. जगाला तुमच्या प्रामाणिक भावना व मनातील शुध्द भाव समजतातच, म्हणून जगात वावरताना शुध्द अंत:करण घेऊनच वावरले पाहिजे.
 
पण शिष्टाचार हे समाजात वावरताना वापरायचे नियम आहेत, ते काही तुमच्या चारित्र्याचे निदर्शक नाहीत. केवळ नम्रपणा हा नैतिकतेला पर्याय होऊ शकत नाही. कारण शिष्टाचार हे झाडाच्या सालीसारखे बाह्य आवरण आहे. झाडाची बाह्य साल अंतरंगाची जागा होऊ शकत नाही. झाडाच्या सालीवरून अंतरंगाची थोडीशीच कल्पना येऊ शकते, पण बाह्य साल जरी चांगली राहिली असली, तरी अंतरंग किडलेले असू शकते, म्हणून अंतर्बाह्य प्रामाणिकपणा हाच सर्व शिष्टाचाराचा पाया असला पाहिजे.
 
तुम्हाला चांगली चालरीत असावी व तुमचे वागणे शिष्टाचाराचे व्हावे असे तुम्हाला वाटत असेल, तर खालील १६ नियम पाळल्यास तुम्हाला वेगळा शिष्टाचार शिकण्याची जरूर भासणार नाही.
 
१) दुसर्‍याचे दोष पाहात बसू नका, गुण पाहा. समोरच्या माणसाच्या मनात काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न  करा, म्हणजे त्याचा राग तुम्हाला येणार नाही. समोरच्या माणसाच्या र्मयादा असतात, त्या समजून घ्या.
 
२) प्रत्येक माणूस स्वत:ला श्रेष्ठच समजतो. अगदी लहान मुलालाही प्रतिष्ठा असते, म्हणून कोणाच्याही आत्मसन्मानाला धक्का लावू नका.
 
३) जरूर नसताना दुसर्‍याला उपदेश करू नका. मशागत झालेल्या जमिनीवर पाऊस पडल्यास तेथे बीज अंकुरते. खडकावरील पाणी वाहून जाते.
 
४) तुम्हाला भेटणार्‍या माणसाचा जो अभ्यासविषय असेल त्यात रस दाखवा. त्यामुळे त्याला उत्तेजन मिळेल आणि तुमच्याही ज्ञानात भर पडेल.
 
५) नेहमी चेहर्‍यावर हास्य ठेवा. दुर्मुखलेल्या रडक्या चेहर्‍याचे कोठेही स्वागत होत नाही.
 
६) प्रत्येकाला आपले नाव व आडनाव अतिशय प्रिय असते. मराठीत कावळे, पोपट, लांडगे, गाढवे अशीही आडनावे आहेत. ती त्यांची कुलचिन्हे (टोटेम) असतात. आडनावावरून त्यांची टिंगलटवाळी किंवा चेष्टा करू नका, शिवाय परिचयाच्या सर्व माणसांची नावे व आडनावे अचूक लक्षात ठेवा. अभ्यासाने हे साध्य होते. महात्मा गांधींसारखे थोर पुढारी हजारो माणसे त्यांच्या नावाने ओळखून हाक मारत असत.
 
७) उत्तम संभाषण कला म्हणजे दुसर्‍याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे. तुम्ही स्वत: कमी बोला आणि समोरच्या माणसाला बोलण्यास उत्तेजन द्या. त्यातून तुमचे ज्ञान वाढेल व समोरच्या माणसालाही मन मोकळे केल्याचे समाधान लाभेल.
 
८) नेहमी स्वत:चीच टिमकी वाजवू नका. समोरच्या माणसाच्या हिताची व उत्कर्षाची चर्चा करा.
 
९) नेहमी नीटनेटका व स्वच्छ पोषाख ठेवा, पण भडक व श्रीमंती दाखवणारे कपडे करू नका किंवा अंगभर लक्ष्मीधराप्रमाणे अलंकारांचे ओझे घेऊन फिरू नका.
 
१0) तुकाराम महाराजांचे पुढील शब्द सोन्याच्या अक्षराने तुमच्या मनाच्या पाटीवर लिहून ठेवा -
 
सत्यापरता नाही धर्म। सत्य तेचि परब्रह्म।।
 
सत्यापाशी पुरुषोत्तम। सर्वकाळ तिष्ठत।।
 
११) तुमचे वर्तन तुमच्या ध्येयाशी सुसंगत ठेवा. उदा. संन्याशाचा वेष करणार्‍याने तमाशा पाहायला जाता कामा नये.
 
१२) नम्रता व शालीनता कधीही सोडू नका, पण नम्रता व लाचारी यातील सीमारेषा स्पष्टपणे ओळखा.
 
१३) स्वत:चे गुणगान व स्तुती कधीही करू नका. स्वत:ची स्तुती सांगणार्‍यांना रामदासांनी पढतमूर्ख म्हटले आहे.
 
१४) तुमचे गुण इतरांना तुमच्या कार्यातून पटले पाहिजेत. तुम्ही श्रेष्ठ असलात तरीही आपल्याभोवती खुषमस्करे बाळगू नका.
 
१५) क्रोध, द्वेष, मत्सर, जळाऊपण शिष्टाचाराचे हाडवैरी आहेत.
 
१६) दुसर्‍याच्या मनाला लागेल असे विनोदातही बोलू नका. विनोद बोचरा नसावा. स्वत:वर केलेला विनोद हाच सर्वश्रेष्ठ विनोद असतो.
 
अलीकडे शिष्टाचार म्हणजे ढोंगीपणा व दांभिकपण असे काहींना वाटते, ते सर्वस्वी चूक आहे. वरील १६ नियम तुम्ही कटाक्षाने पाळले, तर शिष्टाचार तुमच्या स्वभावात मुरेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Utpatti Ekadashi 2024: उत्पत्ति एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

आरती मंगळवारची

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments