महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागलाय. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 लाख 40 हजारापार पोहोचली आहे. फक्त शहरी भागातच नाही, तर राज्याच्या ग्रामीण भागात संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतोय.
कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार लॉकडाऊन, कडक निर्बंध घालण्याचा विचार करतंय. पण, रुग्णांचे आकडे कमी होताना दिसत नाहीयेत. फेब्रुवारीत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सरासरी 3 हजार होती, तर मार्च महिन्यात 34 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरातील 10 कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांपैकी 8 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये कोव्हिड-19 चा वाढता संसर्ग चिंतेची गोष्ट असल्याचं केंद्र सरकारने मान्य केलंय.
राज्यातील कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यात बेड्सची काय परिस्थिती आहे? यावर आपण एक नजर टाकूया...
मुंबई
देशाच्या आर्थिक राजधानीत गेल्या 15 दिवसात कोव्हिड-19 अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 34 हजारांनी वाढली आहे. मुंबईत सद्यस्थितीत 47 हजारावर अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल सांगतात, "मुंबईत कोरोना रुग्णांसाठी बेड्सची कमतरता नाही. रुग्णसंख्या वाढली तरी पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत."
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार -
मुंबईत उपलब्ध असलेल्या 1030 व्हॅन्टिलेटर्सपैकी 213 रिक्त आहेत
ऑक्सिजन बेड्सची संख्या 8,725 असून 2160 बेड्स उपलब्ध
ICU बेड्सची संख्या मात्र पालिकेसाठी चिंतेचा विषय बनलीये. शहरातील 1631 ICU बेड्सपैकी 336 सद्यस्थितीत उपलब्ध आहेत
सौम्य आणि मध्यम आजारी रुग्णांसाठी कोव्हिड रुग्णालय आणि कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये 3053 बेड्स
कोव्हिड केअर सेंटर, कोव्हिड हॉस्पिटलमधील 16,193 बेड्सपैकी 3920 रिक्त आहेत
(वरील माहिती आणि आकडेवारी 30 मार्च 2021 पर्यंतची आहे.)
बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजीशिअन आणि खासगी रुग्णालयाचे मुख्य समन्वयक डॉ. गौतम भन्साळी सांगतात, "खासगी रुग्णालयात 5 ते 7 टक्के बेड्स वॉर्डमध्ये, तर 2 ते 3 टक्के ICU बेड्स रिक्त आहेत. मुंबईत बेड्सची कमतरता नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही."
मुंबईतील सेव्हन हिल्स आणि बीकेसी जंबो सेंटरमध्ये केसेस अचानक वाढल्याने बेड्सची संख्या वाढवण्यात आलीये. सेव्हन हिल्स रुग्णालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी डॉ. महारुद्र कुंभार सांगतात, "लक्षणं नसलेल्या लोकांसाठी बेड्सची विचारणा होतेय. या लोकांना बेड्स मिळत नाहीत. लक्षणं असलेल्यांना बेड्स दिला जातोय. सद्यस्थितीत रुग्णालयात 1750 बेड्स आहेत. येणाऱ्या काळात आणखी बेड्स वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत."
अत्यंत सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी मुंबईत 60 हजारपेक्षा जास्त क्वारेंन्टाईन बेड्स उपलब्ध असल्याची माहिती महापालिकेने दिलीये. कोरोना रुग्णांची संख्या येत्या काळात 10 हजारापार जाईल असा अंदाज मुंबई महापालिकेला आहे. त्यामुळे शहरात बेड्स वाढवण्याचं काम सुरू झालंय.
पालिका आयुक्त इक्बाल चहल म्हणतात, "रुग्णालयात बेड्स पालिकेच्या वॉर्ड वॉररूममधून दिले जातील. कोणीही थेट लॅबमधून रिपोर्ट घेऊन रुग्णालयात जाऊ नये. लॅबने पालिकेला रुग्णांबाबत माहिती द्यावी. पालिका अधिकारी त्यांना बेड्स उपलब्ध करून देतील."
बेड्सबाबत मुंबई महापालिकेचा आदेश
सहाय्यक आयुक्तांनी नर्सिंग होम आणि रुग्णालयातील बेड ताब्यात घ्यावेत
गरज पडल्यास पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी
सहव्याधी नाहीत अशा लक्षणं नसलेल्या रुग्णांना बेड मिळणार नाही
लक्षणं नसलेले रुग्ण दाखल असतील तर त्यांना तातडीने डिस्चार्ज द्या
खासगी रुग्णालयाच्या ICU मधील 100 टक्के बेड्स वॉर्डमधून दिले जातील
"पुढच्या आठवड्यापर्यंत खासगी रुग्णालयात 7000 बेड्स उपलब्ध असतील," असं चहल पुढे म्हणाले.
ठाणे
ठाणे जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत 37 हजारपेक्षा जास्त अॅक्टिव्ह कोरोनारुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 9 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
ठाणे महानगर पालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी सांगतात, "वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झालीये असं म्हणता येणार नाही. शहरात कोरोना रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध आहेत. पण, प्रशासनावर दवाब नक्की आहे."
ठाण्यातील बेड्स उपलब्धता -
ठाण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये 1298 बेड्सपैकी 223 उपलब्ध आहेत
2161 ऑक्सिजन बेड्सपैकी 230 सद्य स्थितीत रिक्त
443 ICU बेड्सपैकी 99 रिकामे आहेत
गंभीर अवस्थेतील कोरोनाग्रस्तांसाठी 163 व्हेंटिलेटर्स उपलब्ध
ऑक्सिजन सप्लाय नसलेले 760 बेड्स रुग्णांसाठी उपलब्ध आहेत
"ग्लोबल रुग्णालयात 1100 तर पार्किंग प्लाझामध्ये 1200 बेड्स उपलब्ध आहेत. रुग्णांना काही विशिष्ठ रुग्णालयातच बेड हवा असतो, असं शक्य होत नाही," असं संदीप माळवी पुढे म्हणाले.
वाढत्या संसर्गावर आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील 11 हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन केलं होतं.
पुणे
पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीत राज्यातील सर्वात जास्त 57 हजार रुग्ण कोरोनाबाधित आहेत. तर सक्रिय रुग्णांची टक्केवारी 18 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यात प्रशासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. पण, तरीदेखील कोरोनाग्रस्तांचे आकडे कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. पुण्यात 30 मार्चला 4 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली.
पुण्यातील बेड्स उपलब्धता -
पुण्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयात 5084 कोव्हिड बेड्स आहेत
आयसोलेशनसाठी ऑक्सिजन नसलेले 149 बेड्स सद्यस्थितीत उपलब्ध
ऑक्सिजन बेड्सची एकूण संख्या 3312 असून फक्त 229 बेड्स रिक्त आहेत
व्हेंटिलेटर नसलेल्या 321 ICU बेड्सपैकी फक्त 4 बेड्स शिल्लक राहिलेत
पुण्यात व्हेंटिलेटर असलेल्या ICU बेड्सची परिस्थिती देखील गंभीर बनत चालली आहे. व्हॅन्टिलेटर असलेल्या 435 ICU बेड्सपैकी फक्त 13 रिक्त आहेत.
कोरोनाचा स्फोट झाल्यानंतर बंद करण्यात आलेलं जंबो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करावं लागलं. 23 मार्चला सेंटर सुरु झाल्यानंतर 9 दिवसातच 400 बेड्सचं सेंटर पूर्ण क्षमतेने भरलं आहे.
पुणे जंबो कोव्हिड सेंटरचे डीन डॉ. श्रेयांश कपाले सांगतात, "सद्य स्थितीत 400 बेड्सच्या कोव्हिड सेंटरमध्ये फार कमी बेड्स उपलब्ध आहेत. येत्या 48 तासात 100 बेड्स वाढवण्यात येणार आहेत."
"रुग्णालयात दाखल होतानाच रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचं दिसून येत आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे खूप उशिरा रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. ही परिस्थिती आणखी काही दिवसात गंभीर होण्याची शक्यता आहे," असं ते पुढे म्हणतात.
नागपूर
विदर्भात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. कोरोना नियंत्रणासाठी नागपूरमध्ये 15 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला. पण, वाढणाऱ्या केसेस काही कमी झाल्या नाहीत.
नागपूरमध्ये सद्यस्थितीत 45 हजारपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या 10 दिवसात हा आकडा 17 हजारांनी वाढल्याचं समोर आलंय.
नागपूरमध्ये बेड्स उपलब्धता -
नागपुरमध्ये खासगी आणि सरकारी रुग्णालयात 290 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत
ICU बेड्स 61 आहेत
अत्यंत गंभीर रुग्णांसाठी फक्त 18 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत
नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, "सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दररोज बेड्सची संख्या वाढवण्यात येत आहे. येणाऱ्या काळात ही संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची पालिका आणि जिल्हा प्रशासनाने भरती सुरू केली आहे."
नागपूरमध्ये सरकारी आणि खासगी मिळून 96 रुग्णालयांचं कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यात आलंय.
नाशिक देशातील सर्वात जास्त कोव्हिड रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे. नाशिकमध्ये सद्य स्थितीत 29 हजारच्या आसपास रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत.
नाशिकमध्ये बेड्सची उपलब्धता -
गेल्या 4 दिवसात 36 रुग्णालयात 1019 बेड्स वाढवण्यात आले आहेत
खासगी आणि सरकारी रुग्णालयात 921 ऑक्सिजन बेड्स शिल्लक
ICU मध्ये 255 बेड शिल्लक
268 व्हेंटिलेटर
नाशिकमधील बेड्स उपलब्धतेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना आयुक्त कैलाश जाधव म्हणाले, "रुग्णांना मोठ्या रुग्णालयात बेड्स हवे असतात. त्याठिकाणी बेड्स उपलब्ध नाहीत. मात्र, इतर रुग्णालयत बेड्स आहेत. लोकांना बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बेड रिझर्वेशन सिस्टिम पुन्हा सुरू करण्यात आली आहे."
खासगी डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे म्हणतात, "नाशिकमध्ये बेड्स मिळवण्यासाठी त्रास होतोय. लोकांना रुग्णालयं पालथी घालावी लागत आहेत ही वस्तूस्थीती आहे. पण काही रुग्णांना विशिष्ठ रुग्णालयात उपचार हवे आहेत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालीये."
औरंगाबाद
गेल्या आठवड्यात राज्यातील सर्वात जास्त 48 कोरोना पॉझिटिव्हिटी रेट औरंगाबादमध्ये होता. जिल्ह्यात सद्य स्थितीत 20 हजारपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता 11 मार्चपासून औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला. 11 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत अंशत: लॉकडाऊन लागू आहे. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, राजकीय सभा, धार्मिक सभा, क्रीडा स्पर्धा याकाळात बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच या कालावधीमध्ये आठवडी बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत.
औरंगाबादमध्ये बेड्सची परिस्थिती -
औरंगाबाद ग्रामीणमध्ये 614 कोव्हिड बेड्स उपलब्ध आहेत
शहरी भागात 995 कोव्हिड बेड्स शिल्लक
सद्यस्थितीत शहरातील रुग्णालयात फक्त 11 व्हॅन्टिलेटर्स उपलब्ध
आयसीयू आणि ऑक्सिजनचे 34 बेड रिक्त
नांदेड
नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेल प्रशासनाने येथे लॉकडाऊन घोषित केलं आहे.
मंगळवारी नांदेड ग्रामीणमध्ये 344 तर महापालिका क्षेत्रात 683 असे नवे रुग्ण आढळले. जिल्हा प्रशासनाने 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, मेडिकल, पेट्रोल पंप, गॅस पंप चोवीस तास सुरू राहणार आहेत. सकाळी 7 ते 12 या दरम्यान किराणा दुकाने चालू ठेवता येतील. त्याचप्रमाणे दूध विक्री, वर्तमानपत्र, पाणीपुरवठा, फळ आणि भाजीपला विक्री सकाळी 7 ते 10 दरम्यान चालू राहील.
नांदेडमध्ये बेड्सची संख्या -
नांदेड शहरात 999 कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी बेड्स आहेत
त्यातील फक्त 40 बेड्स उपलब्ध
शहरातील 572 ICU बेड्सपैकी फक्त 10 बेड्स उपलब्ध आहेत
अहमगनगर
अहमदनगर जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत 8,117 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील 10 अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये अहमदनगरही आहे.
नगर जिल्ह्यात, लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी आयसोलेशन 2266 बेड्स तर, सौम्य आणि मध्यम आजारी रुग्णांसाठी 2719 बेड्स उपलब्ध आहेत.
अहमगनगर शहरातील बेड्सची उपलब्धता -
कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी सामान्य बेड्स 898
उपलब्ध ऑक्सिजन बेड्सची संख्या 312
161 आयसीयू बेड्स उपलब्ध
काय म्हणतात आरोग्यमंत्री?
"महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता निर्माण केलेल्या आरोग्य सुविधा कमी पडू शकतात," अशी भीती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती.
राज्यातील बेड्सच्या उपलब्धतेबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "राज्यात बेड्स उपलब्ध नाहीत असं नाही. मुंबई आणि इतर जिल्ह्यातही बेड्स उपलब्ध आहेत. काही विशिष्ठ रुग्णालयात ज्यांची मागणी जास्त आहे. त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. बेड्स वाढवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत."
राज्यात वाढणारी रुग्णसंख्या पाहता ऑक्सिजनची मागणी वाढलीये. त्यामुळे सरकारने 80 टक्के ऑक्सिजनची निर्मिती फक्त कोरोना रुग्णांसाठी करण्याचा निर्णय घेतलाय.
केंद्राय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात सरासरी 32 मृत्यूंची नोंद होत होती. ही संख्या आता 118 वर जाऊन पोहोचली आहे.